मुंबईतील राजभवनचा परिसर समुद्रकिनाऱ्यापासून जमिनीपर्यंतच्या उंचसखल जागेवर पसरलेला आहे. पंचेचाळीस एकरावर घुमटाकार जंगल कडा, समुद्र व वाळू आहे…..
राजभवनच्या भेटीविषयी, तिघी सख्या आपापले अनुभव कथन करतायत….
नित्यनेमाने, प्रत्येक महिन्याच्या 10 ता. सीवूड मॉलमध्ये जमतो. तसेच 10 एप्रिल ला, आमचा ग्रुप भेटला नि आमच्यात जणू स्फूर्ती आली. गप्पांच्या ओघात नकळत, “चला, वन डे पिकनिक करूया !” असे सर्वांच्या मनी आले.
अलकाने पटकन ‘राजभवन पिकनिक’ करूया का ? असे सुचवले. साऱ्यांचे हात उंचावले आणि चेहऱ्यावर उत्सुकतेची फुले खुलली. दुसऱ्या दिवशी अलकाने राजभवनला भेटण्याची तारीख मिळवली. १९ किंवा २० या तारखे मधून सर्वानुमते २० तारीख पक्की झाली.
‘माहेरवाशिण’ व्हाट्सअप ग्रुपचे नाव आता “राजभवन पिकनिक” झाले ! ग्रुपवरून मेसेजेसना सुरुवात झाली होती. अठरा ते वीस सीटर बस मिळविण्यास, गुगल पासून ते आपापल्या आसपास असलेल्या ट्रॅव्हलपर्यंत, शोधाशोध सुरु झाली. शेवटी माहेरवाशिण, पिकनिकची, संभाजी ट्रॅव्हल्स च्या बस वर शिक्कामोर्तब झाले.
व्यवस्थापनाने वेग धरला होता. कधी दमात घेऊन तर कधी कवेत घेऊन, आम्हा सर्वांना संपर्कात ठेवून, पिकनिकची रूपरेखा अलका माझ्यापर्यंत देत होती. तिची कामाची पद्धत व चौकसपणा लाजवाब ! पिकनिकची तयारी करताना, तिच्यातील तत्परता, विशिष्ट पद्धतीत पिकनिकचा आलेख तयार करताना, तिचे असलेले आयोजन खूपच नियमात व काटेकोरपणे असते. त्यामुळे ‘राजभवन पिकनिकची’ सारी तयारी अगदी आठ दिवसात झाली होती.
पिकनिक मध्ये समाविष्ट झालेल्या माझ्या मैत्रिणी- अलका, सुरेखा, सुप्रिया, शुभदा, वृंदा, दीपा, हीना, रेखा, भारती (प्रथमच आमच्या पिकनिक ग्रुपमध्ये सामील झालेली वकील), जोत्सना, स्मिता, वर्षा, वनिता, व माझी नात दुर्वा. असा आमचा पंधरा जणांचा ग्रुप तयारीला लागला. मोबाईलवरून gpay द्वारे माझ्याकडे, एका दिवसात पैसे जमा झाले. संभाजी ट्रॅव्हलला एक हजार रुपये पाठवून, बस आमच्या तारखेस पक्की केली.
अलकाच्या तल्लख बुद्धीने व्हिडिओ ग्रुप कॉलकरून, पिकनिकच्या दिवसाची इतम्भुत माहिती दिली. सकाळी पावणे चारला ऐरोलीहून बस निघून, वाशी सेक्टर ९ घेत, मोरारजी सर्कल वरून, सानपाडा पोलिस स्टेशनला साडेचार पर्यंत पोहचेल. पनवेल व खांदेश्वरच्या मैत्रीणी १९ च्या रात्री सानपाडा येथे मुक्काम करतील. नाश्त्यासाठी ब्रेड, चटणी, चीज स्लाईस व सॉस सोबत घेऊ. वेळ वाचावा व बाहेरील पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात, हया गोष्टीचे भान राखत, अलकाने व शुभदाने, हे काम उत्तमपणे व जबाबदारीने पार पाडले होते. सोबत एखादा ड्रेस व पाण्याच्या बाटल्या, टोपी, गॉगल, प्रत्येकीने आणावे. शालेय शिक्षिका जशी सहलीची तयारी करून देते, त्याप्रमाणे अलकाने एका शिक्षिकेरुपी सहलीचे आयोजन केले होते.
ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर अशोकसह साऱ्याजणी वेळेवर आल्या आणि आम्ही “राजभवना” कडे, भल्या पहाटे, सुंदर शांत मुंबईच्या रस्त्यावरून, आमच्या बसने सुसाट वेग घेतला होता. सकाळी उजाडता-उजाडता आमची बस राजभवनच्या भव्य दरवाजा समोर येऊन थांबली. दरवाजाच्या कमानीवर “सत्यमेव जयते” हे मानचिन्ह दृष्टीस पडले नि गर्वाने छाती किंचित फुगली होती.
दरवाज्याच्या आतील खोलीत जाऊन आमच्या नावासमोर सही व मोबाईल नंबरची नोंद करून घेण्यात आली होती. आमची पूर्ण तपासणी करून आत आलो होतो. सोबत गाईड्स म्हणून श्री. नागेश (नागोराव रोडवाढ) व श्रद्धा विलात यांची नेमणूक करून दिली होती. पंचेचाळीस एकराचा परिसर, तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला होता. गर्द जंगलात उभारलेले राजभवन, भव्यदिव्य वाटले. परिसरात हिरवीगार मोठमोठी झाडे दिमाखात उभी होती. त्यात विशिष्ट प्रकारची विविध खास औषधोपयोगी झाडेझुडपे नावांसह लिहून ठेवलेली आहेत. असंख्य रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ तर, हिरव्यागार गवताचे मुलायम गालिचे, आमच्या पायांना, मोरपिशी स्पर्शाची अनुभूती देत होते. विविध पक्षांचे सकाळीच कानावर पडणारा तो किलबिलाट व कोकिळेचे मंत्रमुग्ध करणारे गाणे, आमच्या कर्णाना सुख देत होते. तुरा डोलावत चाललेला मोर, पाहून जणू आमच्या डोळ्याचे पारणे फिटले होते. अतिसुंदर असा नयनरम्य स्वर्गीय देखावा होता.
निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या त्या परिसरात, आम्ही सगळ्या एका गच्चीत आलो होतो. तेथून सुर्याच्या उगवत्या लाल गोळ्याने, जणू अथांग समुद्राच्या अंगावर, लाल रंगाचा गालीचा अंथरला होता. मधेच समुद्रातून डॉल्फिन आपले तोंड पाण्याबाहेर काढून, जणू सूर्याला वंदन करत असावेत, असा भास होत होता. समुद्राच्या पलीकडील किनाऱ्यास, उत्तुंग चर्च, वानखेडे स्टेडियम, हॉटेलच्या उंच इमारती, अगदी विलोभनीय दिसत होते.
तिथून पुढे आम्ही श्री.गुंडी देवीच्या मंदिरात प्रवेश केला. शांत वातावरणात दगडात उमटलेल्या काही मूर्ती होत्या. देवीसाठी मंदिराच्या आवारात तिथेच उमललेली फुले घेऊन, एक व्यक्ती आमच्या हातात फुले देत होती.
तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ‘फुले फुकट आहेत, घ्या सर्वांनी !’ देवीच्या दारात पैसे न घेता, फुले देणारी ही व्यक्ती, मी नव्हे तर साऱ्या जणी, हा अनुभव घेत होत्या. मनोभावे गणपती व देवीचे दर्शन घेऊन, आम्ही बंकर म्युझियम कडे येऊन पोहचलो होतो.
लोखंडी उघड्या दरवाजातून उतरत्या रस्त्याने चालत आत शिरलो होतो. बाजूने चारी बाजूंनी भक्कम भिंती उभारलेल्या होत्या. ब्रिटिशकालीन लोखंडी भक्कम दरवाजे, हाताने जोर लावून जराही हलत नव्हते. आत अंधार असल्याने, अंतरा अंतराने भिंतींना विशिष्ट जागा तयार करून, कंदील प्रज्वलित केलेले होते.
यदाकदाचित शत्रूचा हल्ला झाला तर, राज्यपालास व तेथील कार्यरत सहकाऱ्यांसह, सुरक्षित बाहेर काढता यावे यासाठी, वर जाणारा भुयारी मार्ग, साखळदंडासहित तयार केलेला पाहण्यास मिळाला. ब्रिटिश सैनिकांच्या बदलत गेलेल्या व्यक्तीरेखा, मोठ्या फोटोत पाहता आले.
भारतीय सैनिकांचे तर शिवकालीन मावळे, भारतीय जवान व ब्रिटिश पुतळे उभारलेले आहेत. सोळाव्या शतकापासूनचा हा प्राचीन इतिहास पाहताना, मला माझ्या देशातील स्वातंत्र्यवीरांचा अभिमान वाटला.
डोळे दिपून टाकणाऱ्या भव्यदिव्य राजभवनात आम्ही प्रवेश केला. राजभवनाचे ते विशिष्ट दालन, व्यासपीठावरील नीटनेटकेपणा, समोर मांडलेल्या नीटस खुर्च्या, प्रवेशद्वारावर अंथरलेला सुंदर गालिचा ! मन वेधून घेणारे, छताला लटकते झुंबर शोभून दिसत होते. व्यासपीठाच्या मध्यावर “सत्यमेव जयते” चे मानचिन्ह ! डोळ्यात भरत होते. बाजूला विशाल डायनिंग रूम होते. लांबलचक टेबलावर, आच्छादलेल्या शुभ्र पांढऱ्या कापडामुळे, चहुबाजूंनी लावलेल्या रेखीव खुर्च्या शोभून दिसत होत्या.
व्हरांड्यात काचेच्या कपाटात, रसायने भरून, झाडाच्या खोडावर दिमाखात उभा असलेला मोर, जणू पक्ष्यांचा राजा मीच ! असे दाखवून देत होता.
सारी विलोभनीय दृष्ये डोळ्यात भरून घेतली होती. चहा- कॉफी व बिस्कीटाचा पाहुणचार, घेतल्यानंतर, महाराष्ट्राचे बावीसावे आदरणीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी, यांचे पीआरओ श्री. उमेश काशीकर साहेब यांच्याशी भेट होणार होती.
बाजूलाच असलेल्या विस्तृत मोकळ्या बागेत, हिरव्यागार हिरवळीवर व समोर भारताचा राष्ट्रध्वज, अश्या जागी आम्ही सर्व विराजमान झालो. काही क्षणातच श्री. काशीकर साहेबांचे आगमन झाले. आम्ही साऱ्या जणी त्यांच्या स्वागतास उभ्या राहिलो. हसतच त्यांनी आम्हाला बसण्यास सांगितले. सर्वानुमते त्यांनी मराठी भाषेत बोलण्यास सुरवात केली. अगदी सुंदर सोप्या भाषेत सोळाव्या शतकापासून ते आत्तापर्यंतचा इतिहास गोष्टीरूपात सांगू लागले.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिश गव्हर्नरने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजास मानाचा सलाम केला होता, हे ऐकताना देशाच्या अभिमानाने ऊर भरून आला. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचा जन्म झाला नि गुजरात राज्य वेगळे झाले होते. ह्या अवसरावर, आपल्या देशाची गानकोकिळा लता मंगेशकर ह्यांनी पसायदान गायले होते. अशी ही पवित्र जागा !
मुंबईतील काही रेल्वेस्टेशन्सची नावे गव्हर्नराच्या नावावरून दिली आहेत. हे ऐकून खूपच नाविन्य वाटले. होऊन गेलेल्या गव्हर्नरांची खूपच माहिती आम्हाला काशीकर साहेबांकडून गोष्टीरुपी ऐकण्यास मिळाली होती.

कार्यक्रमाची सांगता करताना, ध्वजासमोर उभे राहून राष्ट्रगीत गाऊन भारतमातेला मानवंदना दिली. पीआरओ म्हणजे कडक कपड्यातील कडक स्वभावाचा इसम असेल, असे वाटले होते. पण ही व्यक्ती अगदी साधी सोप्या व्यक्तिमत्वाची होती. त्यांनी आपला स्वतः चा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला होता. साहेब, तुमचे खूप खूप धन्यवाद !
सहलीचा पुढील फेरफटका, बाबुलनाथ मंदिर, इस्कॉन राधा कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गेटवे ऑफ इंडियाला जाऊन लॉंचमधून समुद्रात भ्रमण केले.
ताज हॉटेलला जेवण करण्याचे स्वप्न मात्र, काही कारणास्तव राहून गेले होते. दिल्ली दरबार हॉटेलात जाऊन आम्ही गाजर दरबार थाळीचा लाभ घेतला होता. एमटीएनएलच्या ITX कार्यालयात जावून थोडेसे ताजेतवाने झालो होतो. मॉलमधील चहाचा आस्वाद घेऊन मरिन ड्राईव्ह समुद्र किनार्यावर खूप फिरलो. फोटोची बरसात केली. पुढे गिरगाव चौपाटीवर बर्फाच्या गोळ्यावर ताव मारला.
अगदी लहान मुलांप्रमाणे तोंड रंगवून खाण्याची मजा घेतली. पुढे जाऊन व्हिविन्ग डेकचे सुंदर लाइटिंग पहिले.
रात्रीच्या वेळी मुंबई दर्शन पाहण्याचे औचित्य साधून, मनसोक्त फिरलो.

– लेखन : सौ.वर्षा भाबल.
💐राजभवन💐
नुकत्याच एमटीएनएल मधुन व्हीआरएस घेतलेल्या आम्हा मैत्रिणींचा ग्रुप राजभवन पाहण्यासाठी गेला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष राज्यपालांचे पीआरओ श्री काशीकर साहेब यांनी त्यांचा बहुमुल्य वेळ आम्हाला दिला आणि राजभवनाचा संपूर्ण ईतिहास त्यांच्या अलौकिक शैलीत सांगीतला.
आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या तिंरग्याला विदेशी गव्हर्नर ने सॅल्युट केला हे ऐकून ऊर स्वाभिमानाने भरून आला.
मलबार हिल हे पुर्वी जंगल होते त्या वेळच्या गव्हर्नर ने १८०२ साली हि जागा फक्त १३७ रु मध्ये लोकांना विकली हि रोचक आणि आश्चर्य जनक माहिती सांगितली.
राजभवन पुर्वी परळ येथील हाफकीन ईंन्स्टीट्युट येथे होते व ते तेथून ईकडे कसे आले, कोणकोणते गव्हर्नर होऊन गेले त्यांनी कशा पध्दतीने बदल घडवून आणले, त्यावेळी पार्श्वभूमी काय होती याची सखोल माहिती आम्हाला दिली.
प्रत्येक गव्हर्नरच्या नावाने आपल्या रेल्वे स्टेशनची नावे कशी पडली याची देखील छान माहिती सरांनी सांगीतली.
खरोखर आम्ही एक नवीन व ऐतिहासिक माहिती चा प्रचंड मोठा साठा सोबत घेऊन आलो. सरांचे मन पूर्वक आभार🙏🙏🙏🙏
एव्हढ्या मोठ्या पदावर असुन देखील सरांनी आमच्यासाठी वेळ काढून अतिशय शांत व सहजतेने आम्हाला इत्यंभूत माहिती दिली त्याबद्दल सरांचे शतशः आभार. 🙏🙏🙏
कोणत्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही अशी बहुमुल्य माहिती सरांनी आम्हाला दिली. खरे तर राजभवनाचा ईतिहास ऐकता ऐकता संपूर्ण मुंबई चा ईतिहास सरांनी सांगीतला.
स्वातंत्र्यापुर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई याचे छान वर्णन केले. 1960 साली महाराष्ट्र राज्य तयार झाले व गुजरात हे वेगळे राज्य बनले. येथील शक्तीपिठाची माहिती दिली.
गानकोकीळा लता मंगेशकर यांनी तेव्हा पसायदान गायिले होते हे सांगितले.
आम्हाला जे दोन गाईड दिले होते त्यांनी देखील खूप छान माहिती दिली. त्यांचेही मन पूर्वक आभार🙏

– लेखन : सौ स्मिता लोखंडे.
अलका, तुला खूप खूप धन्यवाद.🙏🏼खूप छान पिकनिक अरेंज केलीस. खूप खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी.😄
तू , सुरेखा, वर्षा नेहमीच आम्हाला अश्या आनंदाची पर्वणी देत असता. खरंच खूप फ्रेश झाल्या सारख वाटतं.
झालेला आनंद शब्दबद्ध होऊ शकत नाही. तुम्ही आमचं तात्पुरत् पालकत्व पिकनिक मध्ये स्वीकारलं.😄या मागे हेतू असा की आम्हाला जास्तीत जास्त आनंद कसा देता येईल आणि कुठलाही त्रास न होता तो आम्ही सहजतेने लुटावा !😄
राजभवन मध्ये तर खूप छान माहिती प्रत्यक्ष अनुभवता आली. केवळ अलका तुझ्यामुळे. 👍💐तसेच बाबूलनाथ, इस्कॉन इ मंदिर, बोटीतील मज्जा 😄
अहाहा अलका तू आणि सुरेखा किती सहजतेने मधेच बस मधून उतरून, उन्हातान्हाची पर्वा न करता आमची तिकीट्स काढली. तुम्ही सुपर्ब अरेंजर आहात. 👍👍❤️❤️💪💐 खूप लिहावंस वाटतंय 😄पण पोळ्या करतेय ! पुन्हा एकदा आमच्या सर्व सख्याना पण खूप खूप धन्यवाद. आपण एकत्र येऊन खूप छान धम्माल केली. माझ्या खूपच छान मैत्रिणी❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ love you All😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😂😂😂 दुर्वा तुला नेक्स्ट पिकनिक ला डार्क चॉकोलेट☺️ 🍫🍫🍫🍫🍫 नक्की😘😘😘😘

– लेखन : शुभदा रामधरणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
एकदिवसीय सहल असेच म्हणावे लागेल.खूप छान वर्णन।केलेलं आहे.असेच फिरत रहा.तुमची सहल डोळ्यासमोर उभी केलीत.धन्यवाद.वर्षा मॅडम,लोखंडे,शुभदा मॅडम.मस्त।माहितीदिलीआहे. Hats of young ladies.