आयुर्वेद आणि व्याधीक्षमत्व
व्याधीक्षमत्वावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
पुढीलप्रमाणे आहेत
१) देश-
ब्रिही धान्य गुरू व पित्तवर्धक आहे. अनुप देशात व्याधीवर्धक आहे परंतु हेच धान्य जंगल देशात कमी प्रमाणात अहितकर ठरते.
२) काल –
कालाचा विचार करताना ऋतूंचा विचार करावा लागेल. उदा. ब्रिही धान्य शरदामध्ये अधिक अहितकर होईल परंतु तेच हेमंतात कमी अहितकर होईल.
तसेच वयाचा (बाल, तरूण, वृध्द) विचार ही कालामध्येच करावा लागेल. उदा.बालवयात कफकर आजार जास्त प्रमाणात उद्भवतील तर वृध्दापकाळात वातकर आजार उद्भवतील. कारण त्या काळात त्या त्या दोषांचे प्राबल्य अधिक असते.
३) संयोग –
ब्रिही धान्यांचा संयोग मधाबरोबर केला तर कमी अहितकर होतो. तेच दह्याबरोबर खाल्ले तर आधिक अहितकर होते.
४) वीर्य-
उष्णवीर्य द्रव्ये ब्रिही धान्याबरोबर अधिक अहितकर होईल तेच शीतवीर्य द्रव्ये कमी अहितकर होतील.
५) प्रमाण –
अधिक प्रमाणात खाल्लेले अन्न /ब्रिही धान्य अहीतकर होईल ,अर्थात कमी प्रमाणात खाल्ले तर कमी अहितकर होईल.
रोगी व्यक्तीच्या क्षमतेनुसार/अवस्थेनुसार व्याधीक्षमत्वावर परिणाम करणारे काही घटक आहेत –
अ) दोषाधिक्यानुसार -संस्रृष्टायोनिरिती अर्थात दोन किंवा दोनपेक्षा जास्त दोषांनी निर्माण झालेला आजार जास्त कष्टकर होईल.
ब) विरूध्दोपक्रम -पित्तजप्रमेहामध्ये मेद आणि पित्त ह्यांचा संयोग अधिक अहितकर व कष्टप्रद ठरतो.
क) गंभीरानुगत – अर्थात रस, रक्त, मांसानुगत व्याधी सुसह्य होतील तर मेद, अस्थी, शुक्रानुगत व्याधी उत्तरोत्तर अधिक कष्टप्रद होतात
ड) चिरस्थीत -अर्थात दीर्घकाल शरीरात रहाणारा आजार अधिक कष्टकारी होतो तर अल्पकाळातील आजार सुसह्य होतो .
इ) प्राणायतन – दशप्राणायतन (दोन शंखप्रदेश, त्रिमर्म, कण्ठ, रक्त, ओज, शुक्र, गुद ह्यांच्या ठिकाणचे आजार कष्टकर/प्राणघातक ठरतात.
ई) मर्मोपघाती – मर्मस्थानावरील आघात अधिक कष्टकर/प्राणघातक ठरतात.
ए) कष्टप्रद/असाध्य –
ज्या व्याधीमध्ये जास्त कष्ट होतात, ज्या असाध्य व्याधी आहेत अश्या रोग्यांची व्याधीक्षमता कमी असते.
ऐ) क्षिप्रकारी-ज्या व्याधी खूप कमी वेळात/जलद उत्पन्न होतात अश्या रूग्णांची व्याधीक्षमता कमी रहाते.
व्याधीक्षमता कमी असणाऱ्या व्यक्ती जसे की
१) अतीथूल २) अतीकृश ३) अतीदुर्बल ४) रक्त, मांस, अस्थी क्षीण झालेल्या व्यक्ती
५) असात्म्य आहारविहाराचे सेवन करणारे
६) अल्प आहार घेणारे ७) हिनसत्व असणारे
याविपरीत व्यक्तीमध्ये व्याधीक्षमत्व चांगले रहाते.
क्रमशः
स्वस्थ रहा, मस्त रहा, हसत रहा.. आरोग्यमयी जीवनाच्या शुभकामना 😊

– लेखन : डॉ स्वाती दगडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800