भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! देताना, माझ्या कुमारवयाच्या मुलांसाठी तयार होणाऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून कुमारवयीन मुलांना – भारताच्या भावि नागरिकांना आपल्या संस्कृतीची चुणूक देणारा परिचय घडवण्याचा मानस आहे. त्या ‘बलसागर भारत होवो….’ या आगामी पुस्तकातील राष्ट्रचिन्हांच्या संदर्भातील हा अंश सादर करत आहे.
राष्ट्रध्वज
हिंदुस्तानात अनेक छोटी-मोठी राज्ये होती. त्यांचे आपापाले ध्वज होते. पुढे सुमारे दिडशे वर्षे देशावर इंग्रजांचा एकछत्री अंमल होता. १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धास ब्रिटिशांनी बंड नाव दिले तरी तेव्हा देशात स्वातंत्र्य प्राप्त करण्याची इच्छा जन्मली होती. त्या इच्छेस खत-पाणी घालण्यास सुजाण नेते प्रयत्नशील होते. जनतेस एका छत्राखाली आणण्यास भगिनी निवेदिता, मादाम कामा, लोकमान्य टिळक, परदेशी राहणाऱ्या पंजावबी देशभक्तांची गदर पार्टी, नेताजी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधीजी वगैरे महानुभावांनी आपापल्या मानसिकतेनुसार ध्वज तयार केले.
वंदे मातरम् हे घोषवाक्य उच्चारत सर्वसामान्य जनता मातृभूमीस इंग्रजांनी घातलेल्या पारतंत्र्याच्या जोखडातून मायभूमीस मुक्त करण्यास धडपड करत होती. या सर्वाचा एकत्रित परिणाम झाला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ३ जून १९४७ रोजी घोषणा केली, – काही अटी (फाळणी अग्रभागी) मंजूर असतील तर ब्रिटिश सरकार पंधरा ऑगस्ट रोजी सत्तांतरण करण्यास तयार आहे. तोवर सरकारने हिंदू-मुस्लिम प्रजेत प्रचंड तेढ निर्माण केली होती. फाळणीस पर्याय नाही, हे सर्वांना कळले होते.
आपली कार्यप्रणाली कशी असावी, या चर्चेने निर्णायक रूप घेतले. आपण सर्वसमावेशक ! पाकिस्तान मुस्लीम राष्ट्र होणार होते, तशी भारतास हिंदूराष्ट्र ही ओळख नको होती. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्व आर्यावर्तात आर्यांनी रुजवले असल्याने, सर्व नेत्यांना सर्व धर्माचा सन्मान राखणारी प्रणाली पसंत होती. हा विचार सादर करणाऱ्या राष्ट्रध्वजाची निर्मिती त्यांना हवी होती. म्हणून २३ जून रोजी सर्व पक्षीय समितीची स्थापना झाली. सर्व धर्मीयांना पटणारा राष्ट्रध्वज पंडित जवाहरलाल नेहरूंनी २२ जुलै रोजी विधिमंडळासमोर सादर केला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वजापाठची भूमिका मांडताना सांगितले, “केशरी रंग शौर्य नि वैराग्याचे प्रतीक ! तो आध्यात्मिकतेचा पुरस्कार करतो. म्हणून त्यास सर्वोच्च स्थान दिले आहे ! नंतर आहे पांढरा रंग ! तो सत्य नि प्रकाशाचा पुरस्कर्ता ! आपले धरणीशी अतूट नाते ! कारण आपला देश शेतकीप्रधान आहे ! विकास हे आपले ध्येय ! कष्टाची कास धरून राष्ट्रास आपण सुराष्ट्र बनवू इच्छितो ! समृद्धीची आस असली तरी समृद्धीचा मोह नाही, हे सूचित करण्यास विरक्तीचे महात्म्य पटवणारा केशरी रंग वर आणि त्यास समृद्धीसूचक हिरवळीच्या रंगाचा पाया हवा, असा विचार करून हिरवा रंग खाली ठेवला आहे ! समृद्धी आणि विरक्तीच्या मधोमध सत्य व प्रकाशाचा श्वेत रंग ! त्यात मध्यावर गतीशीलता सूचित करणारे अशोकचक्र ! सम्राट अशोकाच्या अशोकचक्राचे चोवीस आरे ! रात्रंदिन महेनत करून ईप्सित साध्य करण्याचा मानस व्यक्त करणारे ! भारत सत्य, संयम आणि आणि अहिंसेच्या विचारास वरते, हे सूचित करणारे ! राष्ट्रध्वज काहीबाही चित्रित केलेला कापडाचा तुकडा नाही ! भारतीय मानसिकता सादर करणारे ते आहे राष्ट्रचिन्ह ! देशाचा आत्मा, चैतन्य, प्राचीन परंपरा, सांस्कृतिक वैविध्य, सर्वधर्मसमभाव…. सारे प्रतीत करणारे आशयघन राष्टचिन्ह !!”
नंतर विधिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रध्वजाच्या संदर्भातील महत्वाच्या बाबींविषयी सखोल चर्चा झाली! त्यानुसार ध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण २:३ ठरले. ध्वजासाठी सुती वा रेशमी खादी (खादी सिल्क) वापरण्याचे ठरले. रंगांचा गडदपणा इंडियन कलर स्टँडर्डने ठरवलेल्या धोरणानुसार ठरवून विधिमंडळाची बैठक संपली.
राष्ट्रमुद्रा
स्वतंत्र राष्ट्राचा राष्ट्रध्वज असतो तशी राष्ट्रामुद्राही असते. राष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण, संस्कृती व उज्ज्वल इतिहास, या राष्ट्रचिन्हातून सूचित होणे सर्वांना हवे होते ! आर्यपरंपरा फार समृद्ध ! राष्ट्रमुद्रेवेळीही आर्यांच्या उच्च विचारास प्राधान्य मिळाले. घटना समितीचे काम १९४६ च्या डिसेंबर महिन्यात सुरू झाले होते. तेव्हाच या संदर्भातही विचार चालू झाला होता! राष्ट्रध्वज ठरताच या विचाराने वेग घेतला ! राष्ट्रमुद्रा ठरवताना आपल्या उज्ज्वल इतिहासाचा वेध घेताना पुन्हा सम्राट अशोकाचा सुवर्णकाळ विचारात घेताना, सम्राटनिर्मित पाच शिलालेख विचारात घेण्यात आले.
एका शिलास्तंभाच्या शिरोभागी सचक्र सिंहमुखी मुद्रा सर्वांना सूचक वाटली ! तोंडे चार दिशांना असूनही एकमेकांना लगटलेले चार सिंह नि सर्वांना आधारभूत असणारा वर्तुळाकार ! त्यात सिंह, हत्ती, बैल आणि घोडा, हे चार पशू ! आपल्या संस्कृतीत सिंह सामर्थ्याचे, हत्ती संपन्नतेचे, बैल मेहनतीचे आणि घोडा चापल्याचे प्रतीक समजतात. सारे पशू वेगवान ! अशोकचक्रास चोवीस आरे ! मानवाने दिवसाचे चोवीस तास गतीशील नि सतर्क असावे, असा भाव त्यातून व्यक्त होतो ! म्हणून ही सिंहमुखी मुद्रा राष्ट्रमुद्रा ठरवण्यात आली. मुद्रेखाली वैदिक परंपरेच्या स्मृतीचा जागर करवणारे घोषवाक्य असावे, असे ठरले. वैदिक श्रुतीत अग्रभागी असलेले ‘सत्यमेव जयते’ हे घोषवाक्य सर्वानुमते पसंत करण्यात आले.
अनेक देशांचे अनेक राष्ट्रध्वज आणि तितक्याच राष्ट्रमुद्रा ! पण भारतीय राष्ट्रध्वज आणि राष्ट्रमुद्रा ठरवताना जेव्हढा गांभीर्याने विचार झाला आहे, तसा इतर राष्ट्रांनी केलेला विशेष जाणवत नाही. हा पोकळ अहंकार नसून वस्तुस्थिती आहे ! आर्यावर्तात साधक बाधक विचारांना किती महत्व होते, याचा पुरावा आहे ! दोन-तीन पिढ्या मागे वळून बघणे फारसे अवघड नाही. पूर्वसूरींच्या विचारांची खोली आणि दक्षता जाणून घेऊन ती आत्मसात करणे हे पुढच्या पिढीचे – कुमारवयीन मुलांचे कर्तव्य आहे ! मेकॉलेच्या विकृत शिक्षणप्रणालीमुळे भारतीयांच्या दोन-तीन पिढ्यांचा तोल ढळला आहे. लांब उडी घेण्यास दोन पावले मागे जावे लागते, हे समजून घेऊन मुलांनी हा प्रयास करावा. काही पिढ्या मागे वळून बघितले तर वैफल्याची धूळ झटकून पूर्वीचे सांस्कृतिक वैभव प्राप्त करता येईल! उत्साहित मनाने भविष्य घडवावेसे वाटेल.! राष्ट्रमुद्रेवरील प्रतीक पशू नवतारुण्यास गदागदा हलवून, सामर्थ्य, संपन्नता, मेहनत आणि चापल्यास आव्हान देतील !
दैनंदिन जीवनाच्या नीरस धबडग्यात सद्विचार अलक्षित राहात आहेत. चलनी नोटांवर, पोस्टाच्या तिकिटावर, फिल्म डिव्हीजनने तयार केलेल्या डॉक्युमेंटरी वगैरेंवर झळकणारी राष्ट्रमुद्रा केवळ औपचारिक चित्र ठरू लागली आहे. म्हणून आशयगर्भ राष्ट्रमुद्रा मुलांच्या जन्मदात्यांकडून नि पर्यायाने मुलांकडून अलक्षित राहू लागली आहे. कुणाला खऱ्या अर्थाने ती ‘दिसत’ नाही कारण कुणी खऱ्या अर्थाने तिच्याकडे ‘बघत’ नाही ! स्वाभाविकच त्यातील गर्भितार्थ कुणास ‘स्पर्शत’ नाही, हे कटू वास्तव !
वैचारिक ग्लानी झटकून या प्रतिकांकडे बघितले तर ती तुमच्याशी बोलू लागतील. जशी आमच्या पिढीतील सुजाणांशी नि त्याही आधीच्या पिढीशी सरसकट बोलत होती. तसे घडवले तर कुमारमंडळींना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आपल्या सर्व प्रतिकात नक्कीच आहे. तशी प्रेरणा प्राप्त केलेली, सामर्थ्य आणि दक्षतेस प्राधान्य देणारी नवी पिढी, मेहनत आणि चापल्याने परिस्थितीस भिडली तर सुवर्णकाळ अवतरण्यास वेळ लागणार नाही ! पुनश्ट प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभम् भवतु !

– लेखन : स्मिता भागवत. कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ख़ूप उपयुक्त माहीती
मी save केली 👍🏼