कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥
सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा दोन्ही हाताच्या तळव्याचे दर्शन घेत हा वरील श्लोक म्हणतो. त्या प्रित्यर्थ आपण हातानी जी कामे करतो, हालचाली करतो, त्या हातातील तळव्या बद्दल, प्रत्येक बोटा बद्दल, आदर निर्माण होतो.
व्यक्तीच्या तळहातावर आणि दहा बोटांमध्ये पंचतत्वातील विविध देवता वास करत असतात. हे पंचतत्व दिवसभर व्यक्तीला प्रत्येक कामात मदत करत असतात. या हातांनी दैनंदिन व्यवहार केले जातात. सकाळी उठल्यावर सर्व साधारण पाचही बोटं एकत्र करून दोन्ही हाताची तळवे जोडून नमस्काराची भावना तयार होते.
एखाद्या व्यक्तीला गुरूंना, देवाच्या मूर्तीला, फोटोला, माता पिता, वरिष्ठ नागरिकांना किंवा एखाद्या दिव्य शक्तीला आदराची भावना म्हणजे नमस्कार.
अनेक स्तराची माणसं समाजात वावरत असतात प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने समाजासाठी पर्यायाने राष्ट्रासाठी, देशासाठी कार्य करीत असतात.
आपल्या हाताची पाच बोटं ही समाजाची पाच घटक मानू या.
पहिलं बोट ‘अंगठा’, दुसरं बोट ‘तर्जनी’, तिसरं बोट ‘मध्यमा’, चौथं बोट ‘अनामिका’, तर पाचवी आपली ‘करंगळी’.
आपण नमस्कार करतो तेव्हा पाच बोटांनी पाच स्तरांतील समाजा प्रित्यर्थ कल्याणकारी भावना असावी.
पहिलं बोट ‘अंगठा‘ हा सर्व श्रेष्ठ. त्याचे महत्व आगळे वेगळे, आपले स्वकीय, आप्त म्हणजे कुटूंब, आजी आजोबा, माता पिता, आपले नातेवाईक, आपले शेजारी, आपले मित्र मंडळ या सर्वासाठी सुरक्षा, सुसंगतीची भावना नमस्कार करताना असावी. या शिवाय आपलं अस्तित्व राहणार नाही
दुसरं बोट ‘तर्जनी‘ म्हणजे आपल्याला समाजात लागणारे मार्गदर्शक म्हणजे शिक्षक, प्राध्यापक अनेक क्षेत्रातले गुरू वैद्यकिय, शासकीय कार्यकारी, पोलिस अधिकारी, लेखक, कवी हे समाजात मार्ग आणि आयुष्याला दिशा दाखवून चांगले वळण देतात. अश्या सर्वाच्या कल्याणासाठी नमस्कार करताना भावना असावी
मधलं बोट सर्वात उंच ‘मध्यमा‘ श्रेष्ठत्व मिळवलेले म्हणजे देशातील पुढारी, उच्चपदस्थ, जज्ज, उद्योगपती, वैज्ञानिक, डाॅक्टर्स, तिन्ही दलातील उच्चस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ, देशासाठी लढणारे सैनिक याच्या कल्याणासाठी नमस्कार करताना मनात भावना असावी.
चौथं बोट ‘अनामिका‘ म्हणजे समाजातील असे लोक की ज्यामुळे सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन विस्कळीत होते जसे की दूधवाला,पेपरवाला, भाजीवाले फळवाले, मोलकरीण वाॅचमन, कचरा घेऊन जाणारे कर्मचारी अश्या लोकांसाठी कल्याणकारी भावना असावी .
पाचवं बोट म्हणजे ‘करंगळी‘ म्हणजे स्वतः साठी, स्वतःबद्दल आदराची भावना. या समाजाचा मी स्वतः एक महत्त्वाचा भाग आहे. मी समाजा प्रित्यर्थ माझ्या कडून देशाच्या कल्याणासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी एक नागरिक म्हणून माझ्याकडून चांगले कार्य करवून घे. माझे मन समाजात कामाशी एकनिष्ठ पारदर्शक असावे माझे आचार विचार पवित्र असावे. अशी कल्याणकारी व उत्तम भावना नमस्कार करताना असावी.
समाजातल्या अश्या अनेक स्तरांतील लोककल्याणासाठी हात जोडून केलेला असावा हा नमस्कार.
ॐ सहनाववतु।
सह नौ भुनक्तु।
सह वीर्यं करवाव है।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषाव है।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः!
हे ईश्वरा, आम्हा सर्वाचे समाजातील सर्वांचे रक्षण कर आम्हा सर्वाचे जीवन सुखमय व आनंदमय होवो आम्हा सर्वाचे श्रम सन्मार्ग राहो आम्हा सर्वाचे ज्ञान अत्युत्तम होवो. आम्ही दोषमुक्त होवो सर्वत्र शांती असू दे.
— लेखन : पूर्णिमा शेंडे (कोल्हापूरे). मुंबई
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
🙏लेखात छान विचार मांडले आहेत 💐👍