Friday, December 19, 2025
Homeलेखआपले हित, आपली जबाबदारी !

आपले हित, आपली जबाबदारी !

आजकाल बातम्या बघा. रोज कसले ना कसले आंदोलन, कुठेतरी मोर्चा, कुणाचे तरी (आमरण) उपोषण, कुणाचा तरी जाहीर निषेध, अशाच बातम्यांचा सुकाळ झालाय.. अन् हे अर्थातच एकट्यादुकट्या चे काम नसते.

मोर्चा, आंदोलन, निषेध म्हटले की एक (किंवा आजकाल अनेक.. कारण युती आघाडी चे राजकारण वाढलेले) पक्ष आले. नेते, लोक प्रतिनिधी, पुढारी आले. त्यांच्या मागे हजारो, नव्हे लाखो कार्यकर्ते आले.. त्यात पोराबाळापासून तर बायका, तरुण, तरुणी, वृद्ध (शेतकरी प्रश्न असेल तर हे हवेतच) असा सर्व वयाचा स्पेक्ट्रम हवाच.. त्याशिवाय मजा नाही.. इफेक्ट नाही.. दृश्य परिणाम नाही.

पूर्वी आतासारखी इलेक्ट्रॉनिक माध्यमे नव्हती. त्यामुळे गर्दी जमवायला वेळ लागायचा. संख्या जमवणे कठीण जायचे. आता तो प्रश्न नाही. व्हॉट्सॲप, फेसबुक, अन् काय काय.. क्षणात निरोप व्हायरल होणार. अगदी मोर्चाची तयारी, गाड्या, आता जे सी बी, ट्रक, खाण्यापिण्याची, झोपायची सोय. सगळे या माध्यमाच्या मदतीने या कानाचा खडा त्या कानाला लागू न देता करता येते.

सामान्य, सुशिक्षित नागरिकाला प्रश्न हा पडतो की या मोर्चात, आंदोलनात सामील होणाऱ्या तरुण तरुणींना, स्त्री पुरुषांना, वृद्धांना दुसरे, महत्वाचे, विधायक काम नसतेच का ? यात सामील होणारी मुले मुली यांच्या शाळा कॉलेजचे काय ? नोकरी करणाऱ्या स्त्री पुरुषांचे काय ? घरात यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वयोवृद्धाचे काय ? की याची यांना पर्वा च नसते ? या कामाचे काही मूल्य, महत्त्वच नसते ?

१४० कोटीचा आपला देश.. या देशाच्या गरजा, भविष्यातील योजना, तांत्रिक, शैक्षणिक प्रगती साठी चढायच्या पायऱ्या, त्यासाठी द्यावा लागणारा आवश्यक वेळ.. या सर्वांचे या कुणाला भानच नसते का ? आपल्याला नेमके काय हवे, त्यासाठी काय करायला हवे, काय करू नये, या मोर्चा आंदोलनाने नेमके काय साधले जाते, खरेच मूळ प्रश्न सुटतात का, की ते सुटल्याचे खोटे आभास निर्माण केले जातात.. हे अन् असे प्रश्न यापैकी कुणालाच कसे पडत नाहीत ? असा विवेकी विचार कुणालाच कसा करावासा वाटत नाही ? आपला दुरुपयोग केला जातोय, आपल्याला खेळण्या सारखे खेळवले जातेय हे यापैकी कुणालाच कसे कळत नाही ? यात जी मुले मुली असतात त्यांचे पालक त्यांना असे वाऱ्यावर कसे काय सोडतात, काहीच प्रश्न का विचारीत नाहीत ?..

ही मुले (विद्यार्थी) शाळा कॉलेजात गैरहजर असतात यामुळे, तर त्यांचे शिक्षक, प्राध्यापक त्यांना जाब का विचारीत नाहीत ? हेही सामाजिक दृष्टिकोनातून गांभीर्याने का घेतले जात नाही ?

आजच्या जागतिक स्पर्धेत हे असे निरर्थक वेळेचे निरोद्योग घातक ठरणार आहेत भविष्याच्या दृष्टीने.. या निरर्थक उद्योगात देशाचे किती मनुष्य तास खर्च होत असतील महिन्याला, वर्षाला ? याचाही कुणी कधी विचार करीत नाही, तशी कुणाला गरजही भासत नाही हे धोक्याचे लक्षण आहे प्रगत देशासाठी.

एकीकडे तिसऱ्या महायुद्धाच्या मांजर पावलांनी येण्याची चाहूल दिसते आहे. चीन, अमेरिका, रशिया अशा बलाढ्य देशांकडून विविध आव्हाने आपल्यासमोर आ वासून उभी आहेत. ए आय नावाचे नवे वादळ दारावर येऊ घातले आहे. सगळीकडे एक प्रकारचे अनिश्चिततेचे, संभ्रमाचे दूषित वातावरण पसरले आहे. आपलेच नाही तर प्रत्येक देशाचे राजकारण कधी नव्हे इतके गढुळले आहे.सगळीकडे चिखल पसरल्यासारखे, प्रदूषित वातावरण.. आतापर्यंत मानव समूहाने सहकाराच्या भावनेने एकत्र येऊन, परस्परांवर विश्वास ठेऊन एवढी प्रगत वाटचाल केली. जनावरात अन् माणसात हाच तर फरक आहे. जनावरे एकत्र समूहाने प्रगत वाटचाल शोधत नाहीत. आपल्या सगळ्या तंत्रयुगाच्या वाटचाली या सामूहिक देवघेवीतून, सहकाऱ्याच्या भावनेतून, विश्वासातूनच झाल्या आहेत. जाती धर्माच्या भिंती आधीही होत्या. आताही आहेत. त्या तशाच राहणार आहेत. कदाचित अधिक पोलादी घट्टपण येईलही त्यात. तरी आपल्याला कुणालाच एकट्याने वाटचाल करता येणार नाही. कुठलाही वर्ग, कुठलाही समाज, कुठलाही देश एकला चलो रे हे धोरण स्वीकारून पुढे जाऊच शकत नाही पुढे आता.

म्हणूनच या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्याला आपला विवेक असा गहाण ठेवून चालणार नाही. निरर्थक उद्योगात आपला अमूल्य वेळ खर्च करून चालणार नाही. प्रत्येक क्षणाचे, तासाचे मूल्य आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्या गरजा पेक्षा देशाच्या गरजा जास्त महत्वाच्या याची जाण ठेवली पाहिजे. आपला वेळ कुण्या दुसऱ्याच्या मालकीचा नाहीय. त्यावर आपलाच हक्क आहे. त्याचा विनियोग करायचे स्वातंत्र्यही आपल्यालाच आहे. याबाबतीत आपल्याला कुणी बाहेरच्या शक्तीने, अदृश्य हाताने डिकटेट करता कामा नये. आपण कुणाच्या तालावर, कुणाच्या हाताने कठ पुतळी सारखे नाचता कामा नये. आपले भले बुरे आपल्याला कळायला हवे. आपले हक्क आपणच मिळवायला हवेत. या लोकशाही पद्धतीत न्याय मिळवण्यासाठी अनेक सच्चे मार्ग आहेत. न्यायालये आहेत. पोलिस यंत्रणा आहे. आपणच निवडून दिलेले शासन आहे. या प्रक्रियेतून जाण्यास वेळ लागेल. पण सबुरी ठेवायला काय हरकत आहे ? सत्याग्रह करू शकतो आपण. समूहाच्या दबावानेच कामे होतात हा भ्रम आहे. त्यात खरे तर राजकारण आहे. सत्तेचे राजकारण. एकमेकावर कुरघोडी करण्याचे गलिच्छ राजकारण. स्वतःची पोळी भाजून घेण्याचे पुढाऱ्यांचे, बाहुबली चे राजकारण. एक कुटिल डाव.. तो सुजाण समाजाने, निदान युवा पिढीने ओळखला पाहिजे. अशा मोर्चात, आंदोलनात आपला अमूल्य वेळ खर्च करणे यात आपले, समाजाचे, देशाचे नुकसान आहे. या रस्ता रोको, रेल रोको मुळे सगळी यंत्रणा कोलमडून पडते.पोलिसावर ताण पडतो. सामान्य नागरिकाचे (ज्यांचे या मागण्याशी काही देणे घेणे नसते) नुकसान होते. त्यांची अडवणूक होते. कुणाला तातडीने दवाखान्यात जायचे असते. कुणाला परीक्षेला, मुलाखतीला, जायचे असते. महत्वाच्या मीटिंगज असतात. सगळेच गणित बिघडते. घड्याळ कोलमडून पडते. देशाचे आर्थिक नुकसान होते.

आपल्याला वेडे करायला, नाचवायला अनेक निरुद्योगी बाहुबली नेते टपले आहेत. आपण त्यांच्या नादी लागून आपलेच (अन् देशाचे) नुकसान करून घ्यायचे की आपण शहाणे व्हायचे हे शेवटी आपल्यालाच ठरवायचे आहे. आपल्या भल्याचे निर्णय आपणच वेळेवर घ्यायचे असतात.

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आता अंतर्मुख होण्याची गरज आहे. हे या लेखात पांढरी पांडे सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मांडले आहे. हा लेख माहितीपूर्ण तर आहेच पण यावर चर्चा नव्हे चर्चासत्र होण्याची गरजच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…