सय माहेराची येता
आठवती मनोमनी
माय-बापाच्या माघारी
माझे भाऊ नि वहिनी
नाही होणार परकं
खात्री देई माझं मन
यावं यावं लवकर
आमंत्रण अगत्यानं
गुणी, हुशार भाचरं
माझ्या माहेराची शान
ज्येष्ठ पिढीचा वारसा
चालविती, अभिमान
जेव्हा शक्यता नसते
प्रत्यक्षात भेटण्याची
ताकावर आभासाच्या
भागे तहान दुधाची
सणवार, जन्मदिन
मस्त साजरे करतो
दूर राहूनी जवळी
नामी पर्याय शोधतो
अशा माहेरावरती
राहो कृपा देवाजीची
कर जोडूनी येथुन
करी प्रार्थना नित्यची

— रचना : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800