विरेंद्र गजानन फडणीस, ऊर्फ कवी “बाळ” ! नुकतीच वयाची नव्वदी गाठली तरी ज्यांना “बाळ” हे नामाभिधान प्राप्त झाले आहे, असे माझे काका श्री. विरेंद्र फडणीस ह्यांचा जन्म दिनांक ७ जुलै, १९३४ रोजी कोल्हापूर येथे श्री. गजानन फडणीस आणि सौ.सरस्वतीबाई फडणीस ह्या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे हे सातवे अपत्य !
तीन मोठ्या बहिणी आणि तीन भाऊ ह्यांच्या पाठीवर जन्मलेल्या विरेंद्रला “बाळ” असे संबोधले गेले आणि नंतर योगायोगाने “बाळ”च्या पाठीवर पुन्हा पुत्रप्राप्ती न झाल्याने हा सर्व परिवाराचा लाडका “बाळ” बनून राहिला. “बाळ”च्या पाठीवर जन्माला आलेली अखेरची अपत्य म्हणजे कन्या “मीना” ही “बाळ”ची धाकटी बहीण असूनही ती इतर मोठ्या भावंडांसोबत ह्या भावाला “बाळ” म्हणूनच बोलवत राहिली, आणि हा विरेंद्र आपल्या परिवारातच नव्हे, तर शेजारीपाजारी, ओळखीपाळखीत सुद्धा “बाळ” बनून सर्वांना प्रेम देत राहिला.
वडील ब्रिटिशांच्या काळात पोलीस खात्यात, सरकारी नोकरीत असल्याने कौटुंबिक परिस्थिती सुखवस्तू होती, पण नेकीने वागणारे आणि सचोटीने नोकरी करणारे गजानन फडणीस पोलीस खात्यात असूनही त्यांनी सांपत्तिक माया जमवलेली नाही. वडिलांच्या बदलीच्या नोकरीत गावोगावी फिरून शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्याच ! त्यामुळेच कोल्हापूर, व नंतर सांगली येथे राहून शालेय शिक्षण पूर्ण होताच विरेंद्रने मुंबई येथे येऊन नोकरी पकडली. मोठे तीन भाऊ तो पर्यंत मुंबईमध्ये स्थिरावले होते. वडील गजाननराव निवृत्त झाल्यावर, कधी मुलांबरोबर मुंबईत, तर कधी आपल्या गावी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी ह्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जाऊनयेऊन राहात होते. अशा वेळेस विरेंद्र ऊर्फ बाळ ह्याने मोठा भाऊ मदन व वहिनी सौ. मंगला ह्यांच्या बरोबर राहून नोकरी करत करत आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ह्याच दादा-वहिनीला आई- वडिलांच्या स्थानी मानून बाळ मुंबई मध्ये स्थायिक झाला आणि दादाच्या मुलींचा म्हणजे माझा लाडका “बाळकाका” झाला.
सांगलीत शालेय शिक्षण घेत असतानाच मोठ्या तीन बहिणींची लग्न पार पडलेली असल्याने, त्यांच्या मुलांनी बाळमामाला लळा लावला होताच ! सर्वात मोठी भाची नीलिमा हिला खेळवताना, झोपवताना, कधी बडबडगीत, कधी अंगाईगीते लिहून गाण्याचा छंद बाळ जोपासत होता. वहीमध्ये प्रत्येक कविता लिहिली की खाली “कवी बाळ” अशी स्वाक्षरी करत आपली हौस भागवत होता.
पुढे मुंबईला आल्यावर नोकरी व अभ्यास करताना बाळचा हा छंद काहीसा मागे पडला ; परंतु गोष्टी सांगत, गाणी म्हणत रमवणारा बाळकाका दादाच्या मुलींचा अतिशय लाडका “काका” बनला.
विरेंद्र ह्यांनी “राष्ट्रीय बचत संघटन” खात्यात केंद्रीय कर्मचारी म्हणून लिपिक पदावर नोकरी स्वीकारली आणि आपल्या कर्तृत्वाने पदोन्नती मिळवत ह्याच खात्यातून केंद्र सरकारचे “गॅझेटेड ऑफिसर” म्हणून ते निवृत्त झाले. ऑफिसमधील सहका-यांचे अतिशय आवडते फडणीस साहेब हे त्यांच्या मित्र परिवारात व परिचितां मध्येही “काका” म्हणूनच लोकप्रिय झाले.
७ फेब्रुवारी, १९६५ रोजी विरेंद्र ह्यांचा विवाह अंधेरी, मुंबई येथील प्रेमा वैद्य ह्यांच्याशी झाला. लग्नानंतर नाव बदललेली सौ. विनिता फडणीस हिच्या सहवासात विरेंद्र ह्यांचा संसार फुलला. सौ. विनिता ही विरेंद्र ह्यांना सर्वार्थाने अनुरूप होती. एकत्र कुटुंबातील नोकरी करून आपल्या आई-वडिलांना आर्थिक सहकार्य देणारी ही मुलगी आता पत्नी ह्या नात्याने विरेंद्र ह्यांच्या संसारात आली आणि पतीसारखेच सासरच्या एकत्र कुटुंबासोबत आनंदात जीवन जगत राहिली. पोस्ट व टेलिग्राम खात्यातील सरकारी नोकरी इमाने इतबारे करतानाच विनीता आपली सून, जाऊ, वहिनी अशी नवीन नाती फुलवत, सासरच्या माणसांमध्ये रमून गेली होती.
लग्नानंतर वर्षभरातच ह्या जोडप्याला संजीव हा पुत्र आणि त्यानंतर तीन वर्षांनी वृषाली ही कन्या झाली आणि त्यांचा संसार अधिकच बहरला. पण संसार व नोकरी सांभाळताना ह्या दोघांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व नातीगोती ह्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. “बाळ” हा त्यांच्या दादाचा उजवा हात होता, तर विनिता ही वहिनींची सावली होती. आई-वडिलांची जबाबदारी ह्या दोन पुत्र व सुनांनी अगदी समंजसपणे व त्यांच्या इच्छेनुसार विभागून घेतली होती. नणंदांचे माहेरपण करताना विनिताची साथ लाभत होती आणि भाच्या-पुतण्यांचे कौतुक करताना विरेंद्र स्वतः पुढाकार घेत होता. कुटुंबातील प्रत्येक भाच्या-पुतण्यांना ह्या “काका” च्या स्वभावातील गोडव्याने जिंकून घेतले आहे. दादा च्या मुलींच्या जोडीने विरेंद्र-विनिताची मुले आपल्या आई-बाबांना “काका” आणि “काकी” असे संबोधतात, ह्याचाही ह्या जोडप्याला अभिमान आहे.
सुदैवाने संजीव आणि वृषाली ह्यांचेही लग्न वेळेवर पार पडले आणि त्यांना उत्तम जोडीदार लाभले. संजीव आपल्या व्यवसायात यशस्वी झाला आणि वृषालीला निमिष देशपांडे ह्यांच्या रुपाने अतिशय कर्तबगार पती मिळाला. संजीवची पत्नी श्वेता म्हणजेच काकांची लाडकी सूनबाई हिने मात्र आपल्या सासू – सासऱ्यांना “काका – काकी” न बोलता “आई – बाबा” बोलायला सुरुवात केली आणि आपल्या एकुलत्या एका कन्येलाही त्यांना “आजी-आजोबा” अशीच हाक मारायला शिकवले. काकांची ही संसारातील पदोन्नती सुद्धा अतिशय आनंददायक आहे.
पण निवृत्तीनंतरचा काळ सुखाने जगणाऱ्या ह्या जोडप्याच्या आनंदी संसाराला अचानक कोणाची दृष्ट लागली. सौ. विनिताचे अल्पकालीन आजाराने निधन झाले आणि तिच्यावाचून जगणेच माहिती नसलेले काका काही काळ दु:खाच्या गर्तेत गेले. परंतु बालवयापासून भक्तिमार्ग अनुसरलेले आणि तरुण वयात अध्यात्मिक गुरू लाभलेले काका लवकरच सावरले आणि मुलांच्या संसारात रमले. लहानपणापासून बाळ सांगलीच्या गणपतीचा भक्त, कोल्हापूरची अंबाबाई ही मायेची सावली मानणारा पुत्र, आणि तरुण वयात मुंबईत आल्यावर मित्रांच्या संगतीने दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घेणे, घरी येताना पेढे आणून दत्तगुरूंना नैवेद्य दाखवणे, दरवर्षीच नवरात्रामध्ये श्री संत साईबाबांच्या पोथीचा सप्ताह करून कडक उपास करणे; ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त कौटुंबिक गणेश पूजा, नवरात्र, श्रावण महिन्यातील व्रतवैकल्ये पार पाडताना आईला मदत करणे हा बाळचा स्थायीभाव होता. ह्या भक्तिमार्गाने त्यांचे अवघे जीवन तरले. प्रत्येक सुखदुःखात त्यांना देवाची साथ आणि आईवडिलांचे आशिर्वाद लाभले, आणि त्यांचे जीवन सुखमय झाले.
पत्नीच्या वियोगाने खचलेले बाळकाका ह्या भक्तियोगाने पुन्हा सावरले. काकांनी स्वतःला आपल्या तरुण वयात मागे पडलेल्या काव्य- लेखनाच्या छंदात रमवले. काकांची आई सौ.सरस्वतीबाई फडणीस ही त्या काळात काव्य रचना करून पाटीवर लिहून ठेवत असे आणि नंतर हा धाकटा पुत्र आईच्या कविता कागदावर उतरवून ठेवत असे. आईचा हा वारसा तिचा पुत्र पुढे चालवू लागला. कुटुंबात किंवा परिचितांमध्ये कोणाचेही वाढदिवस, लग्न, मुंज, बारसे, कोणत्याही प्रकारचा सोहळा असेल तर काका त्यावर सुंदर काव्य रचना करून शुभेच्छा देत असतात. कुटुंबातील लग्नसमारंभात मंगलाष्टका, बारशाला पाळणा गीत आणि इतर समारंभांसाठी त्याला साजेशी काव्य रचना करून व ती कागदावर छान सजवून खाली “कवी बाळ” असे लिहिलेली शुभेच्छापत्रे बनवण्यात काकांचा वेळ आनंदात जाऊ लागला.
ह्यातूनच काकांना आणखी एक छंद लागला, तो म्हणजे घरात आलेल्या निरुपयोगी वस्तू , जुनी कॅलेंडर्स, शुभेच्छापत्रे वगैरेंमधून नवनिर्मिती करून आपली स्वतःची भेटवस्तू बनवणे, आणि त्यामध्ये आपल्या कविता किंवा शुभेच्छा दर्शक चारोळ्या सजवून त्या त्या व्यक्तीला भेट म्हणून देणे ! ह्यामध्ये काकांचे कलात्मक मन गुंतत गेले आणि विविध प्रकारची नवनिर्मिती होऊ लागली. काका / मामा / आजोबा वगैरे नात्याने त्यांनी दिलेल्या ह्या स्वनिर्मित भेटवस्तू पाहून ती मिळणारी व्यक्ती सुद्धा आनंदीत होत असते आणि ते स्वतः आपल्या निर्मितीच्या आनंदात अधिकच रममाण होत असतात.
आता काका शुभेच्छा काव्यांच्या जोडीला इतरही प्रासंगिक काव्य रचना करून आपल्या काव्यसंपदेत भर घालत आहेत. अलीकडेच त्यांचा एक काव्यसंग्रह त्यांच्या मुलांनी प्रकाशित केला आहे. ह्या व्यतिरिक्त संत पुरुषांच्या जीवनावर आधारित लेख आणि काही आपल्या जीवनातील आठवणी सांगणारे लेखन करून काका वेगवेगळ्या मासिकांमध्ये किंवा विशेषांकांमध्ये पाठवत असतात. त्यांना प्रसिद्धी मिळाल्यावर अधिकच आनंद व उर्जा गाठीशी घेऊन काकांचे हे लेखन चालू असते.
बाळकाकांनी मागच्या वर्षी अथक प्रयत्नांनी संपूर्ण फडणीस परिवाराची वंशावळ सांगणारे पुस्तक लिहिले आणि मुलगा संजीव व जावई निमिष ह्यांच्या सहाय्याने ते प्रकाशित केले. त्यामुळे पाच पिढ्यांचा इतिहास एकत्र सांगणारे हे पुस्तक हा एक कौटुंबिक दस्तैवज बनला. लेखनाचे असे अनेक संकल्प काकांच्या मनात नित्य नांदत आहेत, आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवताना करावी लागणारी मांडणी व इतर जुळवाजुळव ह्यामध्ये गुंतलेले काकांचे मन आजही चिरतरूण आहे.
आता त्यांचे मन नातवंडांच्या यशाचा आनंद घेण्यात रमलेले आहे. कन्या वृषाली आणि जावई निमिष देशपांडे ह्यांचा उत्कर्ष पाहायचे भाग्य तर लाभलेच; पण त्या दोघांचा एकुलता एक मुलगा, आणि काकांचा एकुलता एक नातू साहिल देशपांडे इंजिनिअर होऊन अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन आला आणि सध्या न्यूझीलंड मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. अलीकडेच त्याचा थाटामाटात विवाह संपन्न होऊन आजोबांना मैथिलीच्या रुपातुन अतिशय गोड व प्रेमळ नातसून पाहण्याचे सौभाग्यही लाभले आहे.
काकांचा पुत्र संजीव व स्नुषा श्वेता ह्यांच्या जीवनात खूप उशिरा कन्यारत्न आले आणि ह्या एकुलत्या एका नातीने, श्रीया फडणीस हिने काकांच्या जीवनाचे सोने केले. पत्नीच्या वियोगाचे दु:ख जाणवू न देण्याची जबाबदारीच जणू ह्या नातीने घेतली आणि त्याकाळी आपल्या बाललीलां मध्ये आजोबांना रमविणारी छोटीशी श्रीया आता बायोमेडिकल मध्ये पीएचडी करत आहे. तिचा हा उत्कर्ष पाहणे हा काकांच्या जीवनाचा आनंदाचा ठेवा आहे, आणि नातीच्या पीएचडी पूर्ण होऊन डाॅक्टरेट पदवी मिळवण्याच्या क्षणाने आजोबांचा आनंद कळसाध्याय गाठणार आहे. त्यामुळेच आता काका निराशेचे सूर आळवत बसत नाहीत, तर शतायुषी जीवनाची वाटचाल करताना सुखाचा प्याला ओठाशी लावून जीवन भरभरून जगत आहेत. पुढच्या आयुष्यात नातवंडांचे कर्तृत्व, नातीच्या पीएचडी पदवीला जोडून तिच्या लग्नाचा आनंद आणि नंतर दोन्ही नातवंडांकडून पतवंडांना पाहण्याचे सुख लाभावे, ह्या दिसायला सामान्य वाटणा-या गोष्टी सुद्धा त्यांचा आयुष्य जगण्याचा आनंद व उत्साह वाढवत आहेत.
परमेश्वर कृपेने माझ्या बाळकाकांना आयुष्याचा अमाप आनंद लाभावा, आणि त्यांची निर्मळ मनोवृत्ती त्यांना साथ देत राहावी, म्हणजे त्यांना शतायुषी आयुष्याचे शिखर गाठणे सोपे होईल, ह्याचा मला विश्वास आहे.
काका, तुमच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा देते. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि बहुप्रसवी प्रतिभा लाभावी आणि ह्या शिदोरीसह तुमच्या जीवनाचे हे पिंपळपान आनंदाने तरंगत तरंगत पैलतीराचा ठाव घेत राहावे एवढीच मनोकामना व्यक्त करते. शतायुषी व्हा.
जीवेत् शरदः शतम् !
— लेखन : सौ. मृदुला राजे. जमशेदपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800