सौ. अलका देवेंद्र भुजबळ प्रकाशिका, ‘न्यूज स्टोरी टुडे’ तसेच श्री देवेंद्र भुजबळ हे लेखक-संपादक असलेले ‘आम्ही अधिकारी झालो !’ पस्तीस लेखांचा प्रेरणादायी, अनुकरणीय, मार्गदर्शक असा यशकथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. मलपृष्ठावर विषयाशी निगडित अशी रचना आहे, ती ज्येष्ठ गझलकार सुरेश भट यांची !
पुस्तक लेखनाच्या, पुस्तक निर्मितीच्या अनेक आठवणी हृदयात कायम घर करून असतात. ह्या पुस्तकाचे लोकार्पण तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनात तर प्रकाशन जपान देशात आणि तोही ओसाका ते हिरोशिमा या प्रवासात बुलेट ट्रेनमध्ये झाले. हा एक अद्वितीय असा योगायोग म्हणावा लागेल.

पहिलीच यशकथा “अमीट नीला सत्यनारायण” यांची विविधांगी माहिती देणारी आहे. त्यांच्या स्वभावाचे वर्णन करताना लेखक लिहितात, ‘कडक, शिस्तप्रिय, कणखर, निश्चयी अधिकारी म्हणून त्यांची जशी प्रतिमा होती, तशीच संवेदनशील कवी, गीतकार, लेखक, कला रसिक म्हणून त्यांची प्रतिभा होती.’
उच्च पदांवर कार्य करताना अनेक तडजोडी कराव्या लागतात, आपले आवडीचे छंद जपण्याकडे दुर्लक्ष होते असे असतानाही सत्यनारायण यांची पस्तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या दोन कथांवर चित्रपट निर्माण झाले आहेत. गीतलेखन आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे.
अनेक अधिकाऱ्यांचा प्रवास हा अतिशय कष्टदायी असाच आहे. या पुस्तकातील ‘तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर’ या लेखाचे नायक श्री जी. श्रीकांत ! ज्ञानलालसा आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असलेला मानव शांत बसत नाही. दहाव्या वर्गात उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे खात्याचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते तिकीट तपासणीस या पदावर हजर झाले. पुढे बहिस्थ परीक्षांच्या माध्यमातून बी. कॉम., एम. कॉम झाले. रेल्वेची नोकरी करीत असताना त्यांना गरीब-श्रीमंत ही विषमता बेचैन करीत होती. वेगळं काहीतरी करण्याची ऊर्मी अस्वस्थ करीत होती. कमल या मित्राने श्रीकांत यांना स्पर्धा परीक्षा देण्याची सूचना केली. यामुळे त्यांना एक दिशा, एक मार्ग सापडला. भरपूर अभ्यास करून त्यांनी यश मिळवले. त्यांचा हा प्रवास गोरगरिबांना तारक, मदतगार असा आहे.
रेशीम संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका असे कार्य करणाऱ्या एका कर्तृत्ववान महिलेची यशोगाथा वाचक दरबारी लेखक भुजबळ यांनी आत्मियतेने रेखाटली आहे. आईचं आजारपण जपत यशोशिखरावर पोहोचण्याऱ्या विदर्भ कन्या भाग्यश्री बागायत कठीण परिस्थितीत विविध परीक्षांमध्ये यश मिळवून त्यांनी नागालँडमध्ये विविध पदांवर काम केले. एकदा त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या भोजन प्रसंगी भाग्यश्री यांची उडालेली तारांबळ आणि त्यावेळी त्यांना उपाशी राहावे लागले हे वर्णन रोमहर्षक आहे. महत्त्वाच्या, जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असताना त्यांनी लेखनाची आवड जोपासली आहे.
दोन सख्खे भाऊ श्री चंद्रकांत डांगे आणि श्री प्रदीपकुमार डांगे चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असूनही ग्रामसेवक असलेल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दोघांनीही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले. दोघेही बंधू आजच्या तरुणाईचे आदर्श ठरावेत असा त्यांचा मार्गदर्शक प्रवास आहे.
डांगे बंधूंप्रमाणे टिना आणि रिना या दोन भगिनींचा प्रवास उत्कंठावर्धक आहे. आपल्या मुलींची अभ्यासू वृत्ती ओळखून त्यांच्या आई; हेमाली डाबी कांबळे यांनी स्वतःच्या उच्च पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि हेमाली डाबी कांबळे या समर्थपणे मुलींच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि मुलींनी इतिहास घडवला.
स्वाती मोहन राठोड या मुलीने अगदी कठीण आणि हलाखीच्या परिस्थितीत स्वतःचे स्वप्न सत्यात उतरवले. वडील मोहन राठोड हे मोलमजुरी करत. यावरून स्वातीची कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती लक्षात येते. स्पर्धा परीक्षेविषयी एक व्याख्यान ऐकून स्वातीने स्पर्धा परीक्षा देण्याचा मनोमन निश्चय केला परंतु सर्वच दृष्टीने मार्ग खडतर असला तरीही इच्छा असली, कष्ट करण्याची तयारी असली की मार्गक्रमण करण्याची स्फूर्ती मिळते. अशा कठीण परिस्थितीत एकानंतर एक परीक्षेत यश मिळवत ती इतर मुलींसाठी आदर्श ठरली.
लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आईने दारु विक्रीचा व्यवसाय स्वीकारल्यामुळे घरी येणाऱ्या गिऱ्हाईकांची बोलणी ऐकताना ‘मी आता अभ्यास करीत आहे, मी नाही जाणार.’ असा स्वाभिमान जपणाऱ्या राजेंद्र यांची कहाणी खरोखर चित्तथरारक आहे. राजेंद्र लहान असताना भूक लागली म्हणून तो रडायचा तेव्हा त्याच्या आवाजाने त्रस्त झालेले दारु प्यायला आलेले कुणीतरी त्याच्या तोंडात चक्क दारुचे थेंब टाकायचे, परिस्थिती किती हवालदिल बनवते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राजेंद्रची आजीही दूध नसल्यामुळे त्याला दारु पाजायची. वाचताना अंगावर काटा उभा राहतो. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, असे वातावरण असलेल्या मुलाचे भविष्य कसे असेल? परंतु राजेंद्र यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीवर धाडसाने नि कष्टाने मात आपल्या स्वप्नाला गवसणी घातली आणि उच्च पदावर कार्यरत होण्याची जिद्द पूर्णत्वास नेली.
नामांकित अधिकारी श्री तुकाराम मुंढे यांच्या अमरावती येथे झालेल्या सत्कार समारंभात एक मुलगी उपस्थित होती. मुंढे यांच्यापासून प्रेरणा मिळालेली ती युवती होती पल्लवी चिंचखेडे! तिनेही मनोमन ठरवले की, मलाही असेच यश मिळवून उंच भरारी घ्यायची आहे. तेव्हा पल्लवी अमरावतीत कुटुंबीयांसह झोपडपट्टीत राहत होती, वातावरणाचा गलबला असायचा, झोपडपट्टीजवळून जाणाऱ्या नागपूर – मुंबई ह्या सुपर एक्सप्रेस हायवेवरून जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज पल्लवीची अभ्यासाची ध्यान मुद्रा भंग करत नसे. अशा परिस्थितीत पल्लवी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाली. पल्लवीची यशोगाथा प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त केली आहे.
‘माना कि अंधेरा बहुत घना है, मगर किसने कहा, दिया जलाना मना है?’ असा आशादायी विचार करून स्वप्न सत्यात उतरवणारे अनेक तरुण आहेत. ऋषिकेश ठाकरे या तरुणाच्या वाटचालीचे लेखन प्रा. मोहन खडसे यांनी केले आहे. लहानपणी अभ्यासात विशेष गोडी नसलेल्या ऋषिकेशला सुरुवातीला त्याच्या आजीने सतत प्रोत्साहन दिले. ऋषिकेशची इंग्रजी विषयाची भीती पळवून, गोडी लावण्यात शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे मूळातच अत्यंत बुद्धिमान असलेल्या ऋषिकेशला योग्य मार्ग सापडला, दहावी-बारावी दोन्ही परीक्षांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यशस्वी झाला.
‘सदैव हसतमुख राहून काम करणाऱ्या अधिकारी…’ अशी ख्याती असलेल्या वर्षा ठाकूर घुगे ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येऊन अविस्मरणीय अशी कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी आहेत. बी.ए. (डिफेन्स) ह्या अत्यंत कठीण विषयाची पदवी मिळवून, कायद्याची पदवी केल्यानंतरही स्वस्थ न बसता ठाकूर यांनी एमपीएससीची परीक्षा यशस्वीपणे पार पाडली. मराठवाडा विभागातील पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी होण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना वर्षा यांनी अनेक समाजाभिमुख योजना राबविण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आहेत.
महामहिम राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची ‘यश तेव्हाच मिळते ज्यावेळेला तुम्ही 3C ची कठोर साधना कराल. पहिला C म्हणजे कमिटमेंट, दुसरा C. म्हणजे कन्सिस्टन्सी, तिसरा C म्हणजे कॉन्फिडन्स. या तिन्हीचा समन्वय असला तर, यशोदेवी तुम्हाला यश नक्कीच देते…’ ही शिकवण गुरुमंत्र मानून आपल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करणारे आशिष उन्हाळे यांची कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे.
आई ही पहिली गुरू असते. आपल्या मुलींची अभ्यासात प्रगती व्हावी, त्यांनी उच्च पदस्थ अधिकारी व्हावे या हेतूने कृष्णाबाई सातपुते या शिक्षिकेने आपल्या मुलींना शाळेव्यतिरिक्त अभ्यास करून उज्ज्वल यश मिळावे म्हणून व्यवसायमाला आणून दिल्या. काही दिवसांनी त्यांनी त्यासंदर्भात चौकशी केली तेव्हा मुलींनी काहीच लिहिले नाही हे पाहून कृष्णाबाई एका शिक्षिकेच्या भूमिकेतून कडाडल्या,’तुम्हाला अभ्यास करायचाच नसेल तर, ह्या व्यवसायमालांचा घरात काय उपयोग? बाहेर शेकोटी पेटलेली आहे, त्यात टाकून देऊ!’ हे बोल मुलींच्या मनावर आघात करून गेले. त्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांची पावलं ईप्सित साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाच्या मार्गावर निघाली. पुढे तेजस्वी यांनी शिक्षण क्षेत्रात भरपूर यश मिळवून त्या पोलीस अधीक्षकपदी रुजू झाल्या.
आईवडील हे सातत्याने आपल्या मुलाच्या यशस्वी भवितव्यासाठी झटत असतात, प्रसंगी अर्धपोटी राहून मुलांना शिकवत राहतात, अनेकवेळा परिवारातील भाऊ, बहीण, मावशी, आत्या, काका, काकू, मामा, मामी इत्यादी नातेवाईक आपल्या पाल्याचा उत्कर्ष व्हावा म्हणून खूप परिश्रम घेत असतात. पश्चिम बंगाल राज्यात सह पोलीस आयुक्त म्हणून शुभम जाधव यांच्या चिकाटीची, जिद्दीची यशकथा लिहिली आहे, शुभम यांच्या आत्या आशा दळवी यांनी ! दळवी यांनी सांगितलेला शुभमचा जीवनपट प्रेरणादायी आहे.
‘अभी तो नापी है, बस मुट्ठीभर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है…!’ याप्रमाणे अनेक जण जे मिळालं त्यात समाधान न मानता त्यापुढे कसं जाता येईल हा विचार करून मार्गक्रमण करतात कारण त्यांचा स्वतःच्या बुद्धीवर, चिकाटीवर, कठोर परिश्रमातून यश मिळविण्यावर विश्वास असतो म्हणूनच केवळ पाच वर्षाची असताना आईवडिलांचे छत्र हरवलेली प्रांजली बारस्कर ही मुलगी संकटं, अडीअडचणी यावर मात करून जेव्हा सहायक आयुक्त या पदावर आरुढ होते तेव्हा तिची प्रामाणिक धडपड पाहून डोळे ओलावतात.
वाचण्याची आवड किती असावी हा खरेतर व्यक्तिपरत्वे वेगवेगळा अनुभव असू शकतो परंतु रात्री घरातील लाईट बंद झाल्यानंतरही देव्हाऱ्यात तेवणाऱ्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात वाचन करणारी अशी एक वाचन वेडी म्हणजे स्वकर्तृत्वाने पोलीस उपअधीक्षक पदावर झेप घेणाऱ्या सुनीता कुलकर्णी ! मीरा बोरवणकर यांना आदर्श मानून पोलीस खात्यात नोकरी करण्याचा केलेला पण मोठ्या जिद्दीने पूर्ण करणाऱ्या सुनीता कुलकर्णी यांचे अनुभव अनुकरणीय असेच आहेत.
लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे यांचा जीवनप्रवास वाचकांपुढे अत्यंत तळमळीने मांडला आहे, सौ. रश्मी हेडे यांनी ! त्यांनी लिहिलेले, ‘अग्निदिव्यातून सोन्यालाही जावे लागते त्याशिवाय ते उजळत नाही, तसेच भारतीय सैन्यदलात उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी त्या उमेदवारांना देखील कठोर परिश्रम करावे लागतात. अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो. ही परीक्षा सलग पाच दिवस असते.अतिशय प्रगत मानसिक, शारीरिक कसोट्या लावून निवड समिती योग्य उमेदवारांची निवड करते.’ हे वाक्य कर्नल सासवडे यांनी घेतलेल्या कष्टाची योग्य मांडणी करते.
‘कॅंटिनबॉय ते जॉईंट सेक्रेटरी’ हे शीर्षक यश कथेतील नायकाच्या हृदयस्पर्शी वाटचालीची साक्ष देते. राजाराम जाधव यांनी शिक्षणासाठी जितके कष्ट घेतले तितकेच परिश्रम त्यांनी शासकीय पदावर असताना घेतले. महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असताना जाधव यांनी अविरतपणे साहित्य सेवा केली आहे. श्री भुजबळ यांनी राजाराम जाधव यांचं विद्यार्थी जीवन, उच्चपदस्थ अधिकारी आणि लेखक हा त्रिवेणी संगम या लेखात आपुलकीने लिहिला आहे.
एखादेवेळी आपण ठरवतो एक परंतु अमाप कष्ट करूनही जेव्हा यशश्री प्रसन्न होत नाही तेव्हा सारेच काही संपले असे नसते, एक मार्ग बंद होत असताना प्रयत्नवादी, हार न मानणारी व्यक्ती दुसरा मार्ग ज्याला ‘प्लॅन बी’ म्हणतात तो तयार ठेवतो आणि त्या ‘बी’ मार्गाने कठोर परिश्रम करून यशस्वी होतो. असाच ‘प्लॅन बी’ चा अवलंब करून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदापर्यंत झेप घेतली ती पवन नव्हाडे यांनी! नव्हाडे यांची कामगिरी सुयोग्य शब्दांत श्री भुजबळ यांनी चितारली आहे.
अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची विद्यार्थी दशेतील आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षणासाठी पडेल ते काम करून, प्रसंगी अर्धपोटी राहून अभ्यास केला असल्याचे आपणास या यशोगाथा पुस्तकात वाचायला मिळते. या दिव्यातून तावूनसुलाखून निघून स्वतःची यशमाला इतरांपुढे ठेवणारे, इतरांना आशेचा दीप दाखविणारे वाय.जी. कांबळे यांचा ‘डेअरीबॉय ते विक्रीकर सहआयुक्त’ हा कष्टप्रद प्रवास इतरांना अनुकरणीय ठरावा असा आहे.

या लेखमालेतील एक नायक स्वतः श्री देवेंद्र भुजबळ आहेत.आपण स्वतः जे भोगलंय, पाहिलंय, अनुभवलंय तेच अनेक अधिकाऱ्यांनी सोसलंय हे त्यांच्या सारख्या अभ्यासू लेखक, व्यासंगी अधिकारी, आणि प्रकाशक यांनी हेरलं. या सर्वांच्या प्रवासाला वाचकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर ठेवून या प्रवासातून अनेकांनी प्रेरणा घेऊन स्वतःला ठामपणे, आत्मविश्वासाने घडवावे या प्रामाणिक हेतूने त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचा गौरवशाली इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे. स्वतः श्री भुजबळ यांनी माहिती संचालक म्हणून मंत्रालयात पदोन्नती मिळेपर्यंतची धडपड उत्कटतेने लिहिली आहे. प्रचंड यातना सहन करूनही श्री भुजबळ यांची समाजसेवा अविरत चालू आहे. ‘न्यूज स्टोरी टुडे’ या पोर्टलच्या माध्यमातून विविध घडामोडी ते वाचकांपर्यंत पोहचवतात. तसेच प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लेखकांना लिहिते केले आहे.
नियोजन विभागात उपसंचालक या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या वर्षा भाकरे यांनी ‘आई झाली अधिकारी’ या लेखात त्यांनी या पदापर्यंत पोहोचताना स्वतः काय-काय झेलले, कोणत्या परिस्थितीतून त्यांना पुढे जावे लागले, नोकरी सांभाळताना, कौटुंबिक नाती जपताना, आई झाल्यावर कोणत्या तडजोडी कराव्या लागल्या ते सारे स्वतः मांडले आहे. त्यांची ही व्यथा बहुतांश सर्वच नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची आहे. हा भावनात्मक लेख वाचताना हृदय कळवळून येते.
ध्येयपूर्तीसाठी झपाटलेल्या व्यक्तिंना ना आर्थिक, ना सामाजिक परिस्थिती अडवते ना शारीरिक व्यंग आडवे येते. जिथे शारीरिक दृष्ट्या सक्षम असणारांना जबाबदारी पेलताना नाकीनऊ येतात तिथे एक दृष्टीहीन महिला आत्मविश्वास, प्रामाणिकता, चिकाटी या गुणांमुळे एसबीआय सारख्या अग्रगण्य बॅंकेत महत्त्वाचे पद सांभाळते ते वाचताना वाचक निशब्द होतो. श्री भुजबळ यांनी सुजाता कोंडीकिरे ह्या महिलेचा मांडलेला जीवन वृत्तान्त वाचताना सुजाता यांच्याबद्दलचा आदर दुणावतो.
मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुरेश गोपाळे यांच्या ‘एक पाखरु वेल्हाळ’ या आत्मचरित्रात त्यांनी जी ससेहोलपट लिहिली आहे, मुंबई शहरात भीक मागत, थोर गायिका सुमनताई कल्याणपूर यांच्याकडे गाडी धुण्याचे काम करताना जीवनाला कंटाळून आत्महत्येचा विचार येतो, त्यावेळी कल्याणपूर यांचे पती नंदाशेठ सुमनताईंनी गायिलेले ‘एक एक पाऊल उचली, चाल निश्चयाने…’ हे गीत ऐकवले. त्यामुळे सुरेश गोपाळे यांचे नैराश्य दूर झाले आणि पुढे त्यांनी कधीच मागे वळून न पाहता पुढचा शैक्षणिक प्रवास आत्मविश्वासाने पार पाडून उच्च पदावर झेप घेतली.
काही अधिकारी असे असतात, जे चाललंय तेच पुढे चालवितात, काही अधिकारी मात्र जे सुरू आहे त्यात आपल्या कौशल्याची वेगळी भर घालून नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी असलेले असतात! श्री चंद्रमणी इंदूरकर हे अधिकारी असेच नाविन्याचा ध्यास घेतलेले. ‘जेल सुधरविणारा अधिकारी’ लेखात श्री भुजबळ यांनी श्री इंदूरकर यांच्या जीवनाचा आलेख तळमळीने मांडला आहे. ज्यामुळे अनेक अधिकाऱ्यांसाठी तो मार्गदर्शक ठरू शकेल.
श्री महेश खुटाळे यांचे थोडक्यात जीवन चरित्र मांडणारा ‘खेळता खेळता अधिकारी’ हा सौ. रश्मी हेडे यांचा लेख ‘अशक्य ते शक्य’ ही महती सांगणारा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्री खुटाळे यश मिळविणारे खुटाळे त्यांचे गुरू श्री जगन्नाथ धुमाळ यांच्याबद्दल आदराने सांगतात, ‘स्पष्टवक्तेपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, शिस्त व अतिशय कडक धोरण असल्यामुळे मी जीवनात यशस्वी होऊ शकलो व हीच गुरूंची शिकवण पुढे नेण्याचे काम मी करत आहे.’
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी ‘संघर्षातून झाली अधिकारी’ या यश कथेत, पत्र्याच्या घरात राहून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नायब तहसीलदार या पदावर कार्यरत असलेल्या कु. प्राजक्ता बारसे या तरुणीचा उद्बोधक प्रवास सांगितला आहे. शिवखेरा यांचे एक वाक्य या सर्व लेख नायकांचे वेगळेपण ठसठशीतपणे दाखविणारे आहे. खेरा यांचा ‘जितने वाले कोई अलग काम नही करते, वह हर काम अलग ढंग से करते है!’ हा विचार आजच्या तरुणाईला खूप प्रेरक ठरावा असा आहे.
अंजू कांबळे अत्यंत महत्वाकांक्षी अशी विद्यार्थीनी! सेल्सगर्ल म्हणून काम करत असताना अंगभूत हुशारी, कष्ट करण्याची तयारी यामुळे अंजू यांचे लक्षवेधी मार्गक्रमण जवळून पाहणारे माहिती संचालक श्री भुजबळ यांनी यथोचित शब्दांत वर्णन केले आहे.
‘फर्ग्युसन’चे सप्तर्षी’ तसेच ‘दीपस्तंभ’चे नवरत्न या दोन लेखांमध्ये श्री देवेंद्र भुजबळ यांनी पंधरापेक्षा अधिक मान्यवरांच्या यशस्वी वाटचालीचा ओघवत्या भाषेत आढावा घेतला आहे.
चरणजित सिंग ही व्यक्ती ‘आनंदी पापाजी’ या नावाने परिचितांमध्ये परिचित आहे. ‘करे करावे आप, मानूस के कुछ नहीं हाथ’ गुरुबानीतील हा संदेश गुरूमंत्र समजून आनंदी वाटचाल करण्याऱ्या पापाजींचे कार्य सर्वांना तारक ठरेल यात शंका नाही.
‘आम्ही अधिकारी झालो !’ या पुस्तकातील व्यक्तिंचा प्रवास वाचताना कुठे मन आनंदाने भरून येते, कधी डोळे पाणावतात, कधी आश्चर्य वाटते, अभिमानाने ऊर भरून येतो. एक प्रेरक, स्फूर्तिदायक, मार्गदर्शक असे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखक-संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांना शतशः धन्यवाद !

— परीक्षण : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ.अलका भुजबळ. ☎️ 9869484800