कोल्हापूर प्रसिध्द आहे, ते महालक्ष्मी मंदिर, सामाजिक सुधारणांचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज, कुस्ती आणि कलेसाठी. पण या कोल्हापूरची एक वेगळीच, चवदार ओळख सांगताहेत बंगलोर निवासी, कोल्हापूरच्या माहेरवासिण परवीन कौसर
आज मी तुम्हा सर्वांना माझ्या तांबड्या पांढऱ्या नगरीत, म्हणजेच कलेच्या नगरीत आई अंबाबाईच्या कलापुर, म्हणजेच कोल्हापूरमध्ये खाद्य भ्रमंती करण्यासाठी नेणार आहे.
जेव्हा तुम्ही पुणे मुंबई हायवे वरून आत कोल्हापूर मध्ये दाखल व्हाल तेव्हा तुमच्या स्वागताला एक मोठी कमान सज्ज असेल. कमानी पासून अगदी थोड्याच अंतरावर बसस्थानक आहे. बसस्थानकाच्या बाहेर नाष्ट्याचे पदार्थ सुसज्जीत आणि सुशोभितपणे उभ्या असलेल्या गाड्या मिळतील. त्या गाड्यांवर पोह्यांचे डोंगर आणि सोबतीला वाफाळलेला चहा मिळेल. पोहे आणि शिरा एकत्र प्लेट मध्ये मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे माझे कोल्हापूर.
चहा, पोहे, शिरा, उप्पीट हे तर आहेतच पण या मध्ये मिसळपावला विसरून कसे चालेल ? मिसळ आणि कोल्हापूर एकच समीकरण. कोल्हापूरची झणझणीत, चरचरीत लालभडक कट वाली मिसळ त्यावर शेव, चिवडा आणि सोबतीला लिंबू आणि पाव याचबरोबर त्यावर सजवलेले कोथिंबीर कांदा. आहाहा फक्त नावानेच तोंडाला पाणी सुटले !
खाऊ गल्ली, राजारामपुरी आणि भवानी मंडप येथे संध्याकाळी लोकांचे थवे पहायला मिळतात. एका पेक्षा एक खाण्याचे पदार्थ. शेवपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, भंडग, कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी, आणि कोल्हापूरचा फेमस बटाटावडा, अप्पे हे सगळे एकाच जागी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ.
यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन राजाभाऊच्या भेळीचा. ज्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.
बटाटा वडा खावा तर कोल्हापूरचाच, त्यात दिपक वडा म्हणजे क्या बात👌. एका पेक्षा एक वड्यांची दुकाने मिळतील.
यानंतर आई अंबाबाईच्या देवळाजवळ विद्यापीठ शाळेच्या आवारात चाट भांडार म्हणजेच मेवाड आईस्क्रीम आणि चाटच्या गाड्या आहेत. त्याच जवळ छुनछुन बैल गाडीचा आवाज येतो तसेच घुंगरू वाजणारे ऊसाच्या रसाचे दुकान. कोल्हापुरला जाऊन उसाचा रस नाही प्यालो हे शक्यच नाही.
शाकाहारी जेवणाचे हाॅटेल म्हणजे झोरबा शाहुपुरी येथे. तेथे अख्खा मसुर, मेथी बेसण अगदी उत्कृष्ट मिळते. तिथेच जवळच असणारे फक्त महिलांनीच चालवत असलेले वहीनी हे दुकान जिथे बाकरवडी, आळूवडी, चकली, डिंकाचे लाडू अतिशय उत्तम आणि घरगुती चवीचे मिळतात.
जसे गुळासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर यामध्ये जोडीला आहे दुध कट्टा. दुधकट्टा कोल्हापूर मध्ये गंगावेश आणि महानगर पालिकेच्या आवारात रात्री गवळी आपल्या म्हशी घेऊन येतात आणि आपल्या समोर ताजे दुध कच्चे दुध काढून ग्लासभर देतात. ती मज्जाच मज्जा आणि चवच न्यारी. आम्हाला लहानपणी आमचे बाबा तिथे दुध प्यायला घेऊन जायचे.
त्या समोर म्हणजेच महानगर पालिकेच्या समोर प्रसिद्ध असलेले माळकर मिठाई दुकान. यांची जिलेबी उत्कृष्ट आणि त्याच बरोबर खाजा ही मिळतो. एक वेगळीच चव खुसखुशीत असा खाजा. तिथेच बाजूला असलेले श्री. ढिसाळ काकांचें पेढ्यांचे दुकान.त्यांच्या दुकानात मिळणारा फरसाण एक नंबर.
या सर्व पदार्थांमध्ये कोल्हापूरचा पांढरा, तांबडा रस्सा विसरून चालणार नाही. मटणाचा लाल रस्सा म्हणजे तांबडा रस्सा आणि मटणाचे सुप काढून काजू खसखस पेस्ट घालून केलेला पांढरा रस्सा.
याच बरोबर माशांचे ही प्रकार मिळतात. सुरमई, पापलेट, बांगडा तळलेले आणि आमसुलाची सोलकढी यांचे ताट मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे शाहुपुरी येथील वामन हॉटेल.
याच बरोबर हॉटेल जयहिंद. या हाॅटेलची खासियत बिर्याणी आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मटण आणि चिकनचे स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थ. चवीला ही आणि आपल्या खिशाला परवडेल असेच.
जेवण झाल्यावर पान खाण्याची पध्दत. मग काय चला पद्मा टॉकीज जवळ सुंदर पान. आहाहा….सर्व प्रकारचे पान. त्यावर खोबऱ्याचा कीस टाकून लवंग टोचून गुलकंद मसाला घालून केलेला तोंडांत न मावणारा इतका मोठा पान. मग काय लै भारीच.
तसेच आईस्क्रीमची एक खासियत आहे बरं का कोल्हापूर मध्ये. काॅकटेल आइस्क्रीम हे इथेच मिळणार. त्यामध्ये ही दोन प्रकार एक साधे आणि एक स्पेशल. यामध्ये मोठ्या ग्लास मध्ये दोन आईस्क्रीमची बॉल आणि फळे, चेरी, जेली, ड्रायफ्रुट्स आणि कधी कधी चवीने खाणारा वरून प्लेन केक पण घालून खातो. आम्ही प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत माहेरी गेल्यावर आईस्क्रीम खायला जातोच.
यात शेवटी आणखीन एका हाॅटेलचे विशेष वाटते. म्हणजे बेळगाव येथून येऊन आपला जम बसवलेल्या नियाज हॉटेलचे. मांसाहारी जेवण उत्कृष्ट मिळते.
कोल्हापूरची मिरची आणि गुळ हे दोन्ही प्रसिद्ध.
तर मग जायचं न माझ्या माहेरी आई अंबाबाईच्या कलानगरीत कोल्हापूरमध्ये ?

– लेखन : परवीन कौसर, बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800