नदीकिनारी गाव सुंदर ! तिथे नांदतो शिवशंकर विश्वंभर ! प्रभु रामाच्या पदस्पर्शाने पावन पुरातन ! माता महालक्ष्मी, रेणुका, जगदंबा भवानी शक्ती पीठ थोर ! गावाची सीमा आणि क्षेत्र बहुविशाल पंचक्रोशीतील ! ऐशा जन्मभूमीतील गावकरी नशीबवान थोर ! ह्या मंगल पवित्र भूमीला साष्टांग नमस्कार वारंवार !
हे वर्णन आहे नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील खरवंडी चे. इथे शिवशंकराच्या दोन शिव पिंडी आहेत. एक शंकराची पिंडी डमरू सारखा पाया असलेली आहे. तर दुसरी पिंडी पार्वतीची, जी जमिनीत आहे. कुठल्याही शिवमंदिरात अशा दोन प्रकारच्या शिवपिंडी नसतात.
रामायण काळात खर नावांच्या राक्षसाचा प्रभू रामाने वडाच्या झाडाखाली वध केला अशी आख्यायिका सांगितली जाते. यावरूनच या गावाचे नाव खरवड आणि पुढे अपभ्रंश होऊन खरवंडी असं पडलं.
मोगलांच्या काळात इतर अनेक मंदिरे जशी तोडली तसाच या मंदिराचा विध्वंस झाला. या मंदिराचे अवशेष मोगलांनी इतरत्र वापरले. अशा दोन तर्हेच्या अदभूत पिंडी इतरत्र कुठेही नाहीत. पण इथे मात्र पुरातन, प्रसिद्ध अशा दोन प्रकारच्या अद्भूत पिंडी इथे आहेत. इथे शिवपार्वतीची जागृत चैतन्य शक्ती आहे.
खरवंडी गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
1. एकाच मंदिरात दोन प्रकारच्या अदभूत पिंडी.
2. प्रभु रामाने इथे खरनावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्यावरून या गावाला खरवंडी हे नाव पडले. या वरून या गावाला पुरातन वारसा आहे, असे वाटते.
3. या एकाच गावात दोन नद्या आहेत.
4. एका नदीचं पाणी गोड आहे तर दुसरीचं पाणी खारं आहे .
5. गावाला किल्ल्याची तटबंदी होती. आता फक्त वेश म्हणजे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराचा जिर्णोध्दार इथल्या गावकर्यांनी केला आहे.
6. या गावचे जमीन क्षेत्र नेवासा तालुक्यात सर्वात मोठे आहे.
7. शेजारच्या गावाला जोडणारे रस्ते नावानिशी प्रसिध्द आहेत. उदा: वडाळवाट, चांदवाट, कांगुनवाट, गोमळवाडीवाट, सोनईवाट, खेरडवाट, करजगाववाट, तामसवाडीवाट, नेवासवाट, निंबगाववाट, चिचुखाट ईत्यादि.
गावातल्या गल्ल्याना, आळ्यांना, विभागांना, नावे होती तशीच नावे गावाच्या शिवार क्षेत्रांना आहेत. ब्राह्मणजाई, खळगा, चंद्रावळ, चोरसर, माथा, वाणीनीचे बरड, वसवाडी, भट्टी ईत्यादि .
असे हे आमचे गाव खूप देवभोळे आहे. तर मंडळी, येतायना खरवंडी ला !

– लेखन : राम खाकाळ
निवृत्त दूरदर्शन निर्माता. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.