Thursday, November 21, 2024
Homeसंस्कृतीआम्ही खामगावकर....

आम्ही खामगावकर….

भारतातील काही उच्च तापमान असलेल्या शहरांमध्ये खामगाव आहे. खामगावचा उन्हाळा खूपच कडक असतो. पाऊस मध्यम असून माणसे मात्र मायाळू व प्रेमळ आहेस. संकटात एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाणारी आहेत…..

बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी खामगाव हे एक तालुक्याचे व मध्यवर्ती ठिकाण. समॄद्ध व संपन्न. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा खामगावातून जातो. त्यामुळे खामगावचे महत्त्व आपोआपच वाढलेले. रेल्वेच्या मुख्य लाईनला जोडणारा खामगाव – जलंब हा बारा किमीचा प्रवास. खामगाव अनेकविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यांतील काही ठळक गोष्टींचा आपण थोडक्यात परामर्श घेऊ…..

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वांत मोठे, प्रगत व औद्योगिक विकास झालेले शहर म्हणजे खामगाव. महाराष्ट्र सरकारने नवीन जिल्हा निर्मिती मध्ये खामगाव जिल्हा म्हणून प्रस्तावित केलेला आहे.

कापसाची जुनी व मोठी बाजारपेठ – ही खामगावची ओळख इंग्रजांच्या काळापासून आहे. अलीकडच्या काळापर्यंत कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून खामगावची प्रसिद्धी होती. एकेकाळी खामगावला “भारताचे मॅंचेस्टर” म्हणून ओळखायचे. येथून कापुस इंग्लंडला मॅंचेस्टर येथे जायचा. भडभडी जीन व त्यासारखे मोठमोठे व अनेक जीन म्हणजे कापसावर प्रक्रिया करण्याऱ्या गिरण्या खामगावात होत्या. येथून भारतात व भारताबाहेर कापसाचा मोठा व्यापार चालायचा.

रजत नगरी – संपूर्ण भारतात खामगाव शुद्ध चांदीसाठी नावाजलेले आहे. चांदीचे दागिने व विविध वस्तू येथे बनवल्या जातात. संपूर्ण भारतात येथे बनवलेल्या वस्तूंना प्रचंड मागणी असते. यावरून खामगावची ओळख “रजत नगरी” म्हणून निर्माण झाली आहे. तसेच शुद्ध सोन्यासाठी ही खामगाव प्रसिद्ध आहे.

जनुना तलाव – आधी संपूर्ण खामगावला पाणी पुरवठा करणारा व सुंदर बागेमुळे व तेथील मूर्त्यांमुळे, रस्त्याने दुतर्फा खूप मोठमोठी अनेक वडाची झाडे, रेणूका मातेचे मंदिर यांमुळे तेथे नागरिकांची वर्दळ सतत वर्दळ असते.

जनूना तलाव

राष्ट्रीय शाळा – खामगावचे वैभव म्हणून राष्ट्रीय शाळेकडे पाहिले जाते. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून ही शाळा भारतीय स्वातंत्र्य चळवळ काळातील व अजूनही राष्ट्रीय मूल्ये, राष्ट्रप्रेम निर्माण करणारे पवित्र स्थान आहे. येथील पंधे गुरुजींमुळे येथील मूर्तीकला संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. सरूताई सेवक यांनी अविवाहित राहून आपले जीवन संगीतकलेसाठी वाहून घेतले आहे. येथे नॄत्य, गायन, वादन, चित्रकला, बागकाम, शिल्पकला इत्यादी कलांचे शिक्षण दिल्या जाते.

मोठी देवी – संपूर्ण भारतात एकमेव अशी परंपरा खामगावची आहे. नवरात्रौत्सव झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपासून दसऱ्यापर्यंत दहा दिवस येथे मोठी देवीचा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण भारतातून देवीचे भक्त या यात्रेला येतात. देवीची खणानारळाने ओटी भरतात.

शरीरसौष्ठव परंपरा – येथील शिवाजी व्यायाम मंदिर, तानाजी आखाडा, चंदनशेष आखाडा व काॅंग्रेस भवन आखाडा अशी आखाडयांची उज्ज्वल परंपरा येथे राहिलेली आहे. अनेक नामांकित मल्ल या मातीने देशाला दिले आहेत. कबड्डी, मल्लखांब, दांडपट्टा चालवणे यात खामगावकर पटाईत आहेत.

अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल

शिक्षणाची गंगा – महाराष्ट्रात मोठी प्रतिष्ठा असलेले शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेने खामगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आय टी आय ही खूप जुनी व प्रसिद्ध आहे. ज्ञानदानाच्या कार्यात भारतातून पहिला मेरीट देणारी अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हे विदर्भात एक मोठा दर्जा टिकवून आहे. न्यू ईरा हायस्कूल, जि. प. हायस्कूल, अंजुमन विद्यालय, केला हिंदी हायस्कूल, गो. से. महाविद्यालय, महिला महाविद्यालय, भास्करराव शिंगणे महाविद्यालय, सिद्धी विनायक टेक्निकल कॅम्पस इत्यादी खामगावात दर्जेदार शिक्षणाची हमी देणारी केंद्रे आहेत. लाॅयन्स ज्ञानपीठ, एस एस डी व्ही, संस्कार ज्ञानपीठ, लकी सानंदा स्कूल इत्यादी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतूनही चांगले शिक्षण मिळते. पंचशील होमिओपॅथिक काॅलेज ॲंड हाॅस्पीटल हे महाराष्ट्रातील नावाजलेले मेडिकल कॉलेज आहे.

काॅंग्रेस भवन मैदान येथे अनेक राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा,क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच मोठ्या सभा व विविध कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. माखरिया मैदान हे सर्कस साठी प्रसिद्ध आहे.

पुतळे – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळे, बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, लोकमान्य टिळक, महाराणा प्रताप, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले यांचे पुतळे खामगावच्या सौंदर्यात भर घालतात.

सण व उत्सव – गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, मोठी देवी उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती, सुभाषचंद्र बोस जयंती, दिवाळी, दसरा, होळी, पोळा, नागपंचमी, बकरी ईद, मोहरम, रमजान ईद, ख्रिसमस इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात.

पाचलेगावकर मुक्तेश्वर आश्रम – प्रसिद्ध पाचलेगावकर महाराजांचा आश्रम प्रसिद्ध आहे. येथे दत्त जयंती निमित्त सात दिवस राष्ट्रीय व्याख्यानांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.नागपंचमीला येथे नाग पाहण्यासाठी पिंजऱ्यात ठेवले जातात.

मंदिरे – संत गजानन महाराज मंदिर, राम मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, भय्यूजी महाराज आश्रम, शिवमंदिर, लाकडी गणपती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर येथे नवरात्रात नऊ दिवस मोठी यात्रा भरते. श्वेतांबर व दिगंबर पंथाची जैन मंदिरे, मशीद, गुरुद्वारा, चर्च विहार हे ही आहेत.

कोल्हटकर स्मारक मंदिर हे नाटके व विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. टिळक स्मारक मंदिर, देवजी खिमजी मंगल कार्यालय, संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंगल कार्यालय, देशमुख मंगल, जगदंबा मंगल कार्यालय, आईसाहेब मंगल कार्यालय येथे लग्न सोहळे व विविध कार्यक्रम होतात.

ग्रंथालये – कामगारांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी सुसज्ज व संपन्न असे दस्तुर रतनजी ग्रंथालय, राष्ट्रभाषा वाचनालय व इतर वाचनालये आहेत.

खामगावात पश्चिम विदर्भात सर्वात मोठी एम आय डी सी आहे. शेकडो कारखाने आहेत. हिंदुस्तानी युनीलिव्हर ही साबण निर्मिती करणारी नामांकित कंपनी येथे आहे. खामगाव येथे मोठा कापड उद्योग आहे.

गजानन महाराज मंदिर, शेगाव

शेगावचे प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर येथून जवळच आहे. सुटाळा, किन्ही महादेव येथे पुरातन शिवमंदिरे आहेत. रावण टेकडी रावण दहनासाठी तर फरशी पोळा यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. गोंधनापूरचा किल्ला, गारडगावचे बौद्ध विहार, पिंपळगाव राजा येथील देवी मंदिर, अटाळी येथील भोजने महाराज मंदिर, हेही प्रसिद्ध आहेत. जवळच ज्ञानगंगा अभयारण्य आहे. सनी पॅलेस, गजानन टाॅकीज ही मनोरंजन केंद्रे आहेत तर नटराज गार्डन, टाॅवर गार्डन हे बगीचे विरंगुळ्यासाठी केंद्रे आहेत.

खवैय्यांमध्ये लोकप्रिय असलेले आनंद भुवन, खिलोशिया भवन, बाबुरावची भेलगाडी,अग्रवाल टी स्टाॅल ही खामगांवची ओळख. पुरणपोळी, मिरचीची भाजी, गोवरीतील रोडगे यासारखे खाद्यपदार्थ आहेत. शेगाव कचोरी तर प्रसिद्धच आहे.
भाषा व लोकजीवन – व-हाडी, मराठी, हिंदी, उर्दू व गुजराती या भाषा बोलल्या जातात.

महाराष्ट्राचे माजी कॄषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, माणिकराव गावंडे, गोविंददासजी भाटिया, शंकरराव बोबडे, आकाश फुंडकर, दिलीपकुमार सानंदा, इत्यादी राजकीय नेत्यांनी खामगावचा कायापालट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

– लेखन : प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मोहन काळे यांनी सर्व प्रकारची माहिती जमवून अभ्यासपूर्ण आणि अतिशय उत्तम लेख लिहिला आहे. प्रतिभा सराफ

  2. अवघं खामगाव डोळ्यांपुढे उभं झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments