आयुष्य आपल्याला कोठे कोठे नेते कळत नाही. आज मी मुंबईत महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहे. कल्याणला स्थायिक झाले आहे. पण शेवटी आपले गाव ते आपले गाव…..
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील एक छोटेसे गाव चापेगडी. अजूनही त्या गावाची मला एक वेगळीच ओढ आहे. त्या गावाच्या मातीत माझा जन्म झाला. त्या गावात तेव्हा फक्त सातवीपर्यंत शाळा होती. नंतरच्या वर्गात चार मैल पायपीट करुन शाळेत जावे लागायचे.
मला तेव्हा कुठल्याही वाहनाची फार भिती वाटायची. त्यामुळे मी वाहन चालवायला पण शिकली नाही. पायात चपला नाही. अनवाणी काट्याकुट्याच्या वाटेवरुन शाळेत जावे लागायचे. दप्तरही नाही. उन्हातान्हात पाटी पुस्तकांची इवली सावली डोक्यावरुन धरुन जावे लागायचे. शाळेत जाताना व येताना मागून एखादे वाहन येऊन धडकणार तर नाही ना ? याची मला सतत भिती वाटायची. त्यामुळे दोन दोन मिनिटाला मी चालताना मागे वळून पहायची. साधी सायकल जरी दिसली तरी रस्त्याच्या अगदी कडेला होऊन चालायला लागायची. पण आज बघा मी अशा महानगरात येते जाते जिथे माणसे कमी आणि वाहने जास्त धावतात ! नशीब कुणाला कोठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही.
आमच्या गावाजवळून नाग नदी वाहते. मला आठवते लहानपणी सुट्टीच्या दिवशी मी ती नदी ओलांडून दुसर्याच्या शेतावर आईसोबत मजुरी करायला जायचे. वडीलांचे छत्र लहानपणीच हरपले. ते सरपंच होते. दंडम शरीरयष्टी होती आणि मुख्य म्हणजे मोठे शाहीर होते. या गावात मी परिस्थितीचे चटके सोसत लहानाची मोठी झाली.
मला आठवते, साधारणतः 1987-88 ची घटना असेल. आम्हाला मुख्याध्यापक म्हणून पाटील गुरुजी होते. बहुतेक ते राजस्थानचे असावेत. त्यांची मुलगी मंगला माझी मैत्रिण होती. तिला दोन भाऊ होते. ते त्यांच्या गावी होते व त्यांच्याजवळ तिची आई रहायची. चापेगडीमधील एका मनोहर नावाच्या मुलाला पाटील गुरुजींनी आपला मुलगा मानले होते. अर्थात गुरुजींचा मानलेला मुलगा म्हणजे मंगलचा भाऊ लागतो, परंतु गुरुजींची इच्छा काही वेगळीच होती. त्यांना वाटायचे की मंगलने मनोहरशी लग्न करावे पण हे मंगलला कसे पटावे ? तिला ते मानलेल्या भावाशी लग्न करणे मान्य नव्हते. त्यावरुन पाटील गुरुजी तिला खूप त्रास द्यायचे.
एके दिवशी मला माझ्या मोठ्या बहिणीचे कपडे आणायला टेलरकडे जायचे होते. मंगलचे घर ओलांडूनच मला जावे लागले. मंगल बाहेरच बसलेली मला दिसली. तिने मला इशारा करुन बोलवले पण पाटील गुरुजी घरीच असतील आणि मला पाहिले तर रागवतील या भितीने मी तिच्याकडे गेले नाही आणि दुसर्याच दिवशी मंगलने अंगावर राॅकेल ओतून स्वतःला संपवल्याची दु:खद बातमी माझ्या कानावर आली. मी धावत धावत तिच्या घरी गेले तर आख्खे गाव गोळा झालेले होते आणि मंगल वेदनांनी अक्षरशः तडफडत होती. तिला त्या वेदना सहन होत नव्हत्या. ती तिच्या अंगावर दोन्ही हातांनी पाणी टाकीतच होती. एकही कपडा तिच्या अंगावर नव्हता. ते दृश्य फार भयानक होते. शेवटचे आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि चार दिवसातच मंगला देवाघरी गेली. मी स्वतःला माफ करु शकली नाही. तिने बोलवले त्याचवेळी मी गेले असते तर मंगल आज वाचली असती. चापेगडीत असताना एक चांगली मैत्रिण गमावल्याचे दु:ख मला अजूनही आहे. विशेष म्हणजे तिने जेव्हा राॅकेल ओतून घेतले तेव्हा पाटील गुरुजी व मनोहर घरीच होते तरीही त्यांनी तिला थांबवले नव्हते.
दुसरी एक अशीच घटना मला आठवते. मी नववीत शिकत होते. त्यावेळी भूगोल शिकवायला मला खंडारे गुरुजी होते. ते खूप कडक शिस्तीचे होते. त्यांचा वर्ग सुरु असताना एकाही विद्यार्थ्याने कुठेही बघितलेले त्यांना आवडायचे नाही. तेव्हा शाळेचे बांधकाम सुरु होते. फरशी बसवलेल्या नव्हती. त्यामुळे आम्ही मातीवरच डेस्क टाकून बसायचो. एके दिवशी खंडारे गुरुजी वर्गावर आले. अर्धा अधिक पिरियड संपला असेल. ते शिकवत असताना माझे लक्ष अचानक समोर असलेल्या पुस्तकाकडे गेले. खंडारे गुरुजींनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जमिनीवर पडलेली माती उचलून माझ्या चेहर्यावर फेकून मारली. हाही प्रसंग मी अजूनही विसरलेले नाही.
या गावात मी गेले की मला माझे बालपण आठवते. आईचे कष्ट आठवतात. भले गाव मोठे नसेलही पण या गावाने मला कष्टाने पुढे जाण्याची जिद्द दिली. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्याची शक्ती मला याच गावाने दिली.
बालपणातील कितीतरी आठवणी या गावाच्या कुशीत दडलेल्या आहेत. या गावाला कधीतरी विसरणे मला शक्य आहे का? आज मी मुंबई सारख्या महानगरात नोकरी करते. कल्याण सारख्या ठिकाणी आज माझे स्वतःचे निवासस्थान आहे पण ज्या गावाने मला जन्म दिला, वाढविले आणि माझ्यात एक जिद्द पेरली, कष्टाने महत्प्रयासाने आपले ईप्सित साध्य करण्याची शिकवण दिली ते माझे जन्मगाव चापेगडी आजही मला भूषणावह आहे. त्या वैदर्भीय गावाच्या मातीचा कपाळी टिळा लावून त्यापुढे नित नतमस्तक रहावे असेच मला वाटत राहते.
– लेखन : सौ प्रिया रामटेककर
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
गावच्या जुन्या आठवणी खूप सुंदर आणि अचूक शब्दात मांडल्या आहेत..👌👌
गाव्या जुन्या आठवणी खूप सुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत …👌👌
Tumch vadilach purn nav Kay hot
प्रिया जी.
खूप सुंदर गावाचं वर्णन केलंत तुम्हीआणि प्रसंग अगदी भावुक करून गेले.
मलाही माझ गाव आठवलं.
प्रकाश फासाटे. मोरोक्को( नॉर्थ आफ्रिका
अतिशय भावले. दुर्गम आदिवासी भागातील गावाने आयुष्याला पुढे जाण्याची जिद्द दिली.. व्वा सलाम.. गावातील मैत्रणीसंदर्भातील हद्य प्रसंग.. शाळेतील शिक्षकांनी माती फेकून मारण्याचा प्रसंग हृदयस्पर्शी आहेत. ओघवत्या शैलीतील गावाचे मोठेपण अप्रतिम आहे..