Thursday, July 3, 2025
Homeलेखआम्ही चेंबूरकर......

आम्ही चेंबूरकर……

मी जवळ जवळ वीस वर्षापेक्षा अधिक काळ, साधारण वयाची 80-85 ओलांडलेल्या माणसांकडून ‘चेंबूर’ विषयी सतत माहिती घेत आहे. त्यासंबंधी अनेक नोंदी बाळगलेल्या आहेत.

हा लेख ‘चेंबूरकर‘ या नात्याने माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तसं हा विषय खूप व्यापक आहे. शिवाय माझ्या नोंदींमध्ये काही कमतरता किंवा चुकीची माहिती असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे असल्यास आपण ताबडतोब मला लक्षात आणून द्यावे, ही विनंती ! म्हणजे पुढे सुधारणा करता येईल ………

बहुतेक इमारतींच्या गच्चीवरून खाली नजर फिरवताना अजूनही टिकून असणारी सृष्टीची हिरवाई पाहिली की ‘चेंबूर’ मुंबईच्याच नकाशावर आहे का ? अशी शंका येते आणि प्रदूषणाचे म्हणाल तर ‘चेंबूर सोडून शुद्ध हवेत गेलेला माणूस हमखास आजारी पडतो’, असे गमतीने ‘आम्ही चेंबूरकर‘ म्हणतो, इतका तो आता प्रदुषणालाही निर्ढावलेला आहे !

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सहा आणि आठ नंबर बसमधून येणाऱ्या प्रवाशांना बोरीबंदर, दादर आल्याचं ओरडून सांगावे लागायचे पण सगळे खोकू लागले की ‘चेंबूर आलं असं समजा’, असे कंडक्टर सांगायचा, असा उल्लेख ‘विधायक गुरु‘ या पुस्तकात आढळतो. परंतु ‘गॅस चेंबर’ असे समजल्या जाणाऱ्या आमच्या चेंबूरच्या प्रदूषणाची पातळी आता मात्र खूपच कमी झाली आहे !

‘जिथं वस्ती तिथं गाव’, या तत्त्वावर सर्वप्रथम चेंबूरमध्ये गावठाणं वसलं. दुतर्फा खाडीच्या मध्ये राहणारे रहिवासी इथल्या खाडीत ‘चिंबोरी‘ नावाचे खेकडे मोठ्या प्रमाणात मिळायचे, असे सांगतात. ‘चिंबोरी’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे या भागाचे नाव ‘चेंबूर’ पडले असावे, असा कयास आहे. पाचकळशी-आगरी-
कोळी समाजाचे लोक मुख्यत्वे येथे प्रथमतः वस्ती करून राहिले. ढळत्या सूर्याचे सहजपणे दर्शन घेऊन कोल्हेकुई सुरू व्हायच्या आत गाव निद्रेच्या आधीन व्हायचा !

चिंबोरी

आगरी समाजाची भातशेती जिथे होती तिथे आता ‘गोल्फ क्लब’ चा गालिचा पसरलेला आहे. इंग्रजांनी गोल्फ खेळण्यासाठी बनवलेला हा ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्ड क्लब’ आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठीही वापरला जातो.

मात्र गावकरी जिथे गुरेढोरे चरण्यासाठी घेऊन जात, त्या भागाला त्या काळात ठेवलेले ‘चरई‘ हे नाव आजतागायत आहे. ही गोष्ट चरईमध्ये राहणाऱ्या नव्वद  वर्षांच्या सुरेंद्रनाथ विनायक पाठारे जे साधारण सत्तर-पंचाहत्तर वर्षापूर्वी येथे स्थाईक झाले, त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी  मला सांगितली होती.

जुन्या काळात बांधलेला वाडा, घरापुढील तुळशी वृंदावनासहित अजूनही त्या काळाची साक्ष देतो, हे लक्षात आले. कित्येक वापरात- बिनवापरात असलेल्या विहिरी आणि गाई- म्हशींचे गोठे गावची आठवण करून देतात.

सुस्तपणे अंग पसरत वाडवली, मारवली, माहूल, घाटला आणि गव्हाणपाडा वगैरे भाग चेंबूरमध्ये विसावले. पाचकळशी लोकांचा मुख्य व्यवसाय ‘सुतारकाम’ होता. नवीन पिढीतील बहुदा आता आर्किटेक्ट या व्यवसायाकडे वळले आहेत. कोळ्यांना खाडीत भरपूर प्रमाणात मासे मिळायचे. माहूलच्या मिठागरातून खटारे भरून मीठ आणले जायचे.

त्या काळी तरुण मुले पाय मोकळे करण्यासाठी अणुशक्तीनगरच्या 999 फूट उंचीच्या डोंगरावर जात. तेथून ‘गेटवे ऑफ इंडिया’ सहज दिसायचा. आता तो डोंगर संरक्षित क्षेत्रांमध्ये येतो.

दुसरा डोंगर संपूर्ण लाल मातीचा. तेव्हा ‘लिटिल मलबार हिल’ या नावाने ओळखला जायचा आता त्याला ‘लाल डोंगर‘ म्हणतात. त्यावरच्या वस्तीने आता तो पूर्णपणे झाकोळला आहे.

घर बांधताना एक कोपरा तरी देवासाठी राखून ठेवणारी माणसे गावात सर्वप्रथम देऊळ बांधतात. आणिक गावचे ‘शंकर देऊळ’ चेंबूर नाक्यावरचे ‘दक्षिणमुखी हनुमान मंदिर’, चेंबूर स्टेशन जवळचे ‘भुलिंगेश्वर मंदिर’ (देऊळवाडी) वगैरे तसेच सर्व जाती-धर्मांची श्रद्धास्थाने चेंबूरमध्ये आहेत. वस्ती वाढावी या उद्देशाने इंग्रजांनी बांधलेल्या रस्त्यावर ख्रिश्चनांनी वस्ती केली आणि तेथे ‘ओ. एल. पी. एस. चर्च’ बांधले. मारवाली येथे भव्य ‘मारवली चर्च’ आहे.

भुलिगेश्वर मंदिर

छेडानगर, पेस्तमसागर या भागात दक्षिण भारतीय माणसे मोठ्या प्रमाणात राहायला आली. छेडानगर येथील ‘कार्तिकेय मंदिर’, ‘अहोबिल मठ’, ‘श्रृंगेरी मठ’ या मंदिरात पूजापाठ या व्यतिरिक्तही अनेक अध्यात्मिक कार्ये चालतात.

आहोबिला मठ

घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आंबेडकर उद्यानात आहे. त्याच्यासमोर ‘बुद्धविहार’ आहे. ‘बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर असं बुद्धविहार असणं, हे भारतातील एकमेव ठिकाण आहे’, अशी माहिती तेथील भिक्षु महाथेरो यांनी दिली.

मुसलमान बांधवांसाठी ‘झामा मस्जिद’ आहे. ‘जैन मंदिर’ हे गावठाणाच्या टोकाशी आहे. अशी कित्येक श्रद्धास्थाने चेंबूरची शान वाढवतात.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सैनिकांसाठी बांधलेल्या बॅरेक्स कालांतराने ओस पडल्या. परंतु फाळणीनंतर पाकिस्तानमधील सिंधी, रिफ्यूजी म्हणून भारतात परतले, त्यातल्या काहींनी या बॅरेक्समध्ये आसरा घेतला. या भागाला ‘चेंबूर कॅम्प‘ म्हणून ओळखले जाते. कित्येक सिंधी पदार्थांबरोबर येथील झामा मिठाईच्या दुकानात मुंबईत प्रसिद्ध असलेली ‘शेवयाची बर्फी’ आणि ‘गुलाबजाम’ याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

चेंबूर स्टेशनजवळची ‘गुप्ताची भेळ’, नाक्याजवळची ‘भटाची मिसळ’, राजकपूर आवडीने खायचा ते ‘गीताभवनची इडली‘ आजही प्रसिद्ध आहे. रस्त्यावरचा वडापाव- चायनीजच्या गाड्यांबरोबर महागड्या हॉटेलपर्यंत खवय्यांची सर्वत्र गर्दी असते.

अन्न- पाणी-निवारा मूळ गरजांनी निवांत झाला तर माणूसच कसला ? भाऊराव चेंबूरकर यांनी अथक प्रयत्नांनी जसवंत बागेत मनोरंजनासाठी ‘विजय सिनेमागृह’ बांधले. त्याच जागी भव्य ‘अकबरअलीज शॉपिंग सेंटर‘ उभे राहिले. मुंबईत शॉपिंग सेंटर्स वाढल्यावर हे शॉपिंग सेंटर बंद पडले. आता चेंबूरला ‘के स्टार माॅल‘ सोबत मोठी बाजारपेठ आहे. या आकर्षणामुळे येता-जाता दादरला जाणारा चेंबूरवासीय आता सहसा चेंबूरबाहेर खरेदी करत नाहीत.

अनेक सिनेमागृहाबरोबर भव्य ‘फाईन आर्ट सोसायटी नाट्यगृह‘ दिमाखात उभे आहे. तेथे सर्वभाषीय नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची सोय झाली आहे.

फाईन आर्ट

1925- 26 साली दिवसभरातून चेंबूर-कुर्ला अशी दोनच फेऱ्या करणारी दोन डब्यांची रेल्वेगाडी आता नऊ डब्यांची होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलपर्यंत अखंड दिवस फेऱ्या मारते. रेल्वे ट्रॅक्सच्या दोन्ही बाजूस वस्ती आहे. सुब्रमण्यम स्वामी, पार्वती परिहार यासारख्या अनेक समाजसेवकांच्या अथक प्रयत्नांनी व्हि. के. टेंबे यांच्या नावाने बांधलेल्या उड्डाणपुलामुळे चेंबूरच्या दोन्ही वस्त्या जोडल्या गेल्या.

व्हि. के. टेम्बे उड्डाणपूल

1929 साली चेंबूर नाक्याजवळ  ‘शेठ द्वारकादास त्रिभुवनदास धर्मार्थ दवाखाना’ या नावाने पहिला दवाखाना एका श्रीमंत माणसाने बांधला. आज ‘जॉय हॉस्पिटल’, ‘झेन हॉस्पिटल’, ‘ इनलॅक्स हॉस्पिटल,  ‘सुराणा-सेठिया हॉस्पिटल’ असे कित्येक अद्ययावत दवाखाने , रात्रंदिवस चालणारी औषधांची दुकाने, गरिबांसाठी लायन्स क्लबचे दवाखाने, ऍम्बुलन्स सेवा याचबरोबर जनावरांसाठीचे दवाखानेही आहेत. ज्यांच्या निव्वळ हस्तस्पर्शाने रोग पळून जायचा, अशी ख्याती असलेले अठरा तास काम करणारे गरिबांचे वाली एच. डी. पाटील आज हयात नसले तरी त्यांचा दवाखाना व त्यांचे स्थान जनमानसात टिकून आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सुविधांमध्ये वाढ होत नाही, पिण्याचे पाणी दोन-चार तास येते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही त्यामुळे गटारी तुंबतात, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी जमते, उंदीर -मच्छर -माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो तरीही हे फक्त बोटावर मोजण्याइतक्या दिवसातपुरताच असते. चेंबूरकर अशा समस्यांना घाबरत नाही. पनवेल, वसईवरून आलेल्या ताज्या भाजीपाल्याला आणि फळांना अजूनही विशेष मागणी आहे.

1973 साली दसऱ्याच्या दिवशी चेंबूरमध्ये ‘चेंबूर नागरिक सहकारी बँक‘ ही पहिली सहकारी बँक स्थापन झाली. कै. अजाबराव ढुमणे यांच्याबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी अथक प्रयत्न केले होते. कै. ढुमणे हे बँकेचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांच्या या योगदानासाठी त्यांना मानाने दिला गेलेला खाता क्रमांक ‘एक’ होता. आज या बँकेच्या एकोणवीस शाखा आहेत. या बँकेबरोबर अनेक भारतीय आणि परदेशी बँका चेंबूरवासीयांची पुंजी सांभाळत आहेत !

चेंबूरमध्ये वटवृक्षासारखा पसरलेला शिक्षण संस्थांचा इतिहास लिहायचा ठरला तर तो एक ग्रंथच होईल. स्वातंत्र्यपूर्वकाळात चेंबूरची मुले मजल-दरमजल करीत कुर्ला- सायन- दादर येथे शिक्षणासाठी जात असत, तेव्हा आंब्याच्या आमराईत जेथे आता सांडू गार्डन झाले आहे तेथे कावळ्यांच्या बरोबरीने लहानग्यांची शाळा भरत असे. रंग बदलणारे सरडे आणि रस्तोगल्ली गणपती उत्सवाच्या आसपास रंगीबिरंगी फुलांनी डवरलेले तेरडे आता मात्र कमी झाले आहेत; तरीही अजूनही चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात कावळे, चिमण्या, कबूतर, कोकिळा, पोपट आणि त्यांचा पिढ्यांचा सांभाळ करणारे कित्येक रानटी फुलांनी बहरलेले वृक्ष टिकून आहेत.

सांडू गार्डन

बागेत शिकणाऱ्या मुलांसाठी 1952 साली ‘बालविकास प्राथमिक शाळा’ श्रीमती शांताबाई आंब्रे यांच्या प्रयत्नांनी उभी राहिली परंतु ‘प्राथमिकनंतर काय?’ हा प्रश्न होताच! त्या काळात 1954 साली चेंबूरमधील आयुर्वेदिक औषधाचे निर्माते सांडू यांनी आपली स्वतःची जागा शाळेसाठी उपलब्ध करून दिली. तत्कालीन शिक्षणमंत्री ना. शांतीलाल शहा यांच्या हस्ते ‘चेंबूर हायस्कूल’चे उद्घाटन झाले. शाळेची इमारत हळूहळू विस्तारत गेली. श्रमदानाने स्वातंत्र्यसैनिक भ.मा. पंत यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी डोंगर फोडून भव्य मैदान तयार केले ज्याचे नाव ‘भ.मा. पंत मैदान’ असे आहे.

चेंबूरमध्येच सुंदर फुलांच्या वाड्या होत्या. या शाळेतील ‘पुष्पदिन’ पाहायला लोक दूरवरून यायचे. या शाळेव्यतिरिक्त आता इंग्रजी मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू वगैरे माध्यमांच्या कित्येक खाजगी आणि म्युनिसिपालिटीच्या शाळा येथे आहेत.  दानशूर दा. कृ. मराठे आणि माजी महापौर शरदभाऊ आचार्य यांच्या अथक प्रयत्नांनी मुलांसाठी आणि खास करून मुलींनी चेंबूरबाहेर शिक्षणासाठी जाऊ नये, या उद्देशाने 1978 साली ‘ना. ग. आचार्य दा. कृ. मराठे’, कॉलेजची स्थापना केली गेली. आज चेंबूरमध्ये पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेजबरोबर मूकबधिर, मतिमंद मुलांसाठीही शाळा आहेत.

एक उत्कृष्ट संघटक कै. हशू अडवाणी यांनी 1962 मध्ये ‘विवेकानंद एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. त्याच्याशी निगडीत आज बावीस संस्था आहेत. त्याचा लाभ साधारण पंधरा हजार विद्यार्थ्यांना होतो. चेंबूरवासीयांना गौरव वाटावा असा ‘त्वदीयं वस्तु गोविन्द: तुभ्यमेव समर्पये।’ असे त्यांचे जीवन होते.

‘चेंबूर उपनगर येणाऱ्या काळात मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील प्रगतीचे केंद्र होणारच !’ हा आशावाद व्यक्त केलेले कै. रामकृष्ण चेंबूरकर यांनी आपल्या कार्याने स्वतःचं एक स्थान निर्माण केले होते. त्यांच्या या गौरवशाली कार्याबद्दल चेंबूरमधील जुने माहूल ते घाटकोपर या सर्वात मोठ्या रस्त्याला
20 ऑगस्ट 1967 रोजी त्याकाळचे मुंबईचे महापौर डाॅ. लिऑन डिसोझा यांच्या हस्ते ‘रामकृष्ण चेंबूरकर मार्ग’ हे नाव देण्यात आले.

चेंबूरचे आदरणीय व्यक्तिमत्व कै. विठ्ठल नारायण पुरव यांच्या समाजकार्याबद्दल सायन-ट्रॉम्बे हायवेला वि. ना. पुरव असे नाव देण्यात आले. आता वाहनाने 11 मिनिटात चेंबूर आणि शिवाजी टर्मिनस याला जोडणारा ‘फ्री-वे’ आणि 11 मिनिटात चेंबूर आणि सांताक्रुज याला जोडणारा ‘लिंक रोड’ तयार झाला आहे. पण गर्दीमुळे थोडा वेळ वाढला आहे इतकेच ! त्यामुळे चेंबूर मुंबईचा जणू ‘मध्य’भाग झाला आहे.

‘गोल्फ क्लब’ जवळील महापालिकेच्या उद्यानाला त्याकाळचे नगरसेवक शरद आचार्य यांनी ‘स्वातंत्र्यसैनिक उद्यान‘ हे नाव दिले. 30 जानेवारी 1984 साली तेथे एक स्तंभ उभारण्यात आला. या स्वातंत्र्यसैनिक स्तंभावर 39 स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेली आहेत.  दुसर्‍या बाजूस जे स्वातंत्र्य सैनिक पंधरा वर्षे चेंबूरमध्ये आहेत, त्यांची नावे कोरली आहेत. त्यापैकीच एक ‘ए. आर. कुन्नुरे’. चेंबूर मधील समस्यांसाठी ते नेहमीच झटत असतात. वर्षानुवर्ष आक्रसत चाललेला ‘बसंत पार्क‘ चा तलाव आज त्यांच्याच प्रयत्नांमुळे ‘गणपती विसर्जना’ पुरता का होईना, टिकून आहे.

बसंत पार्क

1909 साली जन्मलेले देशभक्त कै. नारायणराव आचार्य हे चेंबूरमधील एक कर्मयोगी होते. त्यांच्या नावाने ‘आचार्य उद्यान‘ लहानग्यांबरोबर मोठ्यानाही आकर्षित करते. यांत्रिकयुगात दहा वर्षांपूर्वीपर्यंत एकमेव  घोडा या उद्यानाभोवती रपेट करताना दिसून यायचा. भारत-पाक युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या नॅट विमानाच्या ताफ्यापैंकी एक विमान आज या उद्यानाचे विशेष आकर्षण ठरले आहे.

चेंबूर म्हणजे भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईचे उत्तर पूर्वेकडील प्रवेशद्वार, जिथे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा जणू चेंबूरच्या रक्षणासाठी उभा आहे. जवळच कपूर घराण्याचा आर. के. स्टुडिओ होता. मुंबईच्या औद्योगिकीकरणाबरोबर चेंबूरच्या दक्षिण भागात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स(RCF) लिमिटेड, टाटा पॉवर हाऊस वगैरे कंपन्या आणि त्यांच्या अनुषंगाने सरकारी निमसरकारी खाजगी उद्योग उभे राहिले. या कंपन्यांच्या वसाहतींबरोबर चेंबूर चहुबाजूने वाढू लागले. सुमननगर, शेलकॉलनी, सुभाषनगर इत्यादी. 1955 साली नियोजनपूर्वक टाऊनशिप कॉलनी बांधण्यात आली.  त्याच्या उद्घाटनाला पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. आज त्याला ‘टिळकनगर‘ संबोधण्यात येते.  तिथल्या गणपतीची आरास पाहायला तोबा गर्दी लोटते.

ब्रिटिशांनी खास जेलसाठी राखून ठेवलेल्या 36 एकर भूभागावर 1945 साली ‘भिक्षेकरी स्वीकार गृह बांधण्यात आले होते. ‘भिकाऱ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, हे या संस्थेचे प्रमुख कार्य होते. याच आवारात नवजीवन महिला वसतिगृह होते, जे वेश्यांच्या पुनर्वसनाचे कार्य पाहायचे. काळाच्या ओघात तेही आता नामशेष झाले आहे. असे असूनही चेंबूरमध्ये तेव्हाही आणि आताही मोठ्या प्रमाणात भिकारी आहेत आणि वर्तमानपत्रात चेंबूरचा वेश्याव्यवसाय गाजला, ही दुर्दैवाची बाब आहे. ‘चेंबूर महिला समाजा’ने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत पहिले वसतिगृह सुरू केले.

वाशीचा उड्डाणपूल झाल्यावर चेंबूर या उपनगरातील वाहतुक प्रचंड वाढली. काळाच्या ओघात ‘कलिको केमिकल्स कंपनी’, ‘कच्छ डाईंग मिल’, ‘स्वस्तिक डाईंग मिल’ इत्यादी कंपन्या लोप पावल्या. सामान्यांची वस्ती असलेले वाशीनाका, सिद्धार्थ कॉलनी याचबरोबर उच्च मध्यमवर्गीयांचा मोठा वर्ग चेंबूरमध्ये विखुरलेला आहे. त्यांच्या प्रतिष्ठित राहणीमानाचा भाग म्हणून नवनवीन जिमखाने ‘चेंबूर जिमखाना’, ‘छेडानगर जिमखाना’, ‘एकर्स क्लब’ उदयास आले ते मात्र काळाच्या ओघात टिकून राहतील अशी आशा वाटते.

चेंबूर जिमखाना

चांगल्या सामाजिक कार्यासाठी सुदृढ शरीराची आवश्यकता असते, या उद्देशाने मल्लखांब, जिमनास्टिक इत्यादी व्यायाम प्रकारासाठी ‘पवनपुत्र व्यायाम मंदिरा’ची स्थापना 1963 साली कै. रा.ह. पाठारे आणि सुहास पाठारे यांनी केली. राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये या संस्थेची मुले नाव गाजवत आहेत. परंतु या संस्थेची मूळ जागा मात्र आता अस्तित्वात नाही.

1927 साली चेंबूरमध्ये नोटीफाईड एरिया कमिटी स्थापन झाली. 1940 साली या कमिटीचे ग्रामपंचायतीत विलीनीकरण झाले. नंतर 1950 मध्ये ग्रामपंचायत महापालिकेत विलीन झाली. आता परत एम. वार्डाचे पूर्व आणि पश्चिम असे भाग पडले. संपूर्ण चेंबूर एम. वार्ड पश्चिम मध्ये मोडते . चेंबूर वार्ड ऑफिस आणि रेशन ऑफिस हे कौलारू चाळीत होते. आता त्यांच्या बहुमजली इमारती झाल्या आहेत.

चेंबूरमध्ये कोणा एका पक्षाला बहुमत न मिळता सर्व पक्षांचे प्रतिनिधी चेंबूरमध्ये प्रतिनिधित्व करतात. तसे पाहायला गेले तर चेंबूरचे रहिवासी विद्यमान केंद्रीय लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, रिपब्लिकन पक्षाचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री भाजपचे हशू अडवाणी आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरुदास कामत यांनी चेंबूरच्या विकासाबरोबर महाराष्ट्र आणि देशाच्याही विकासाची धुरा सांभाळली.

संगीतप्रेमी श्री. खडके यांनी दोन तपाहून अधिक काळ ‘संगीत सम्राट खासाहेब अल्लादिया खाँ संगीत महोत्सव’, चार दिवस बालविकास संघात साजरा केला, ही संगीतप्रेमींसाठी पर्वणीच होती. तसं इथे अनेक महिला मंडळं, सीनियर सिटीजन्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब तसेच विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंडळ, अध्यात्मिक मंडळं वगैरे वर्षभर कार्यक्रम साजरे करतात पण तिथे वयस्करांचीच गर्दी असते.

नवरात्रीत मराठी भाषिकांची उकडीची देवी करून घागर फुंकण्याचा कार्यक्रम, गुजरातींचा गरबा, बंगाल्यांची दुर्गा देवी, सिंधी समाजाचा चेटीचंजनो मेला इत्यादी कार्यक्रमांच्या निमित्ताने तरुणांची उपस्थिती असते. अधूनमधून नाट्यमहोत्सव भरविले जातात. येथील कार्यक्रमांना आजपर्यंत हेमा मालिनी, दादा कोंडके, अनुप जलोटा, शं. ना. नवरे, मेधा पाटकर इत्यादी अनेक क्षेत्रातील मान्यवर येऊन गेलेत.

येथे राहात असलेल्या नाट्य- चित्रपट- दूरचित्रवाणी कलाकारांची यादी तर न संपणारी आहे. पृथ्वीराज कपूर आणि त्यांचे घराणे, धुमाळ, आत्माराम भेंडे, अशोककुमार, ललिता पवार, शांता जोग, अनंत जोग, शोभना समर्थ, नूतन, अनिल कपूर, मच्छिंद्र कांबळी, नलिनी जयवंत, सोनाली कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, सोहम कपूर, आदित्य पंचोली, विद्या बालन, प्रिया बापट, उमेश कामत इत्यादी आणि चेंबूरवासीयांना गर्व वाटावा असे पद्मभूषण पं. सी. आर. व्यास, पद्मश्री पं. सतीश व्यास, गायक व संगीतकार कै. पं. नारायणगावकर, संगीतकार पं. श्रीनिवास खळे, गायक महादेवन, गायिका श्रुती सडोलीकर, शिवशाहीर विजय चेंबूरकर, पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, कवी अशोक नायगावकर याच मातीतले ! मोठ्यांचा आशीर्वाद आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीतील कलाकार आता तयार होत आहेत.

दोन रुपयांचे पुस्तक विकत घेताना चार वेळा विचार करणारा मराठी माणूस एका तरी वाचनालयाचा सभासद नक्कीच होतो ! 1 ऑगस्ट 1921 रोजी लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ ‘लोकमान्य टिळक’ लायब्ररीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कित्येक लायब्रऱ्या आज चेंबूरकरांच्या वाचनाची भूक भागवत आहेत.

चेंबूरमधून अनेक मासिके व भित्तीपत्रके निघतात त्यापैकी काही वृत्तपत्रे चेंबूर समाचार, चेंबूर वैभव, रथचंद्र, चेंबूर न्यूज, खरी वार्ता वगैरे अल्पायुषी ठरली. तर मावळमराठा सारखी काही टिकून आहेत.

लोकसत्तेचे माजी संपादक कुमार केतकर, महाराष्ट्र टाइम्सच्या माजी विशेष प्रतिनिधी श्रीमती नीला उपाध्ये, पत्रमहर्षी दे.र. भागवत, पत्रकार शरद वर्तक, वसंत उपाध्ये, सुधाकर वडनेरे, सदानंद खोपकर इत्यादी पत्रकारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल!

स्त्री-मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या शारदा साठे आणि ज्योति म्हापसेकर या चेंबूरच्याच ! चेंबूरसोडून यातील काही नावाजलेली मंडळी आता चेंबूरबाहेर गेली असली तरी चेंबूरवासीयांना त्यांचा अभिमान आहे !

चेंबूरच्या जवळ असणारी ठिकाणे म्हणजे अणुशक्तीनगर, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मराठी विज्ञान भवन यामुळेही चेंबूरला महत्त्व प्राप्त झाले आहे. चेंबूरपर्यंत जाणारी ‘मोनोरेल‘ आणि आता ज्याचे काम जोरात चालू आहे ती ‘मेट्रोरेल’ याचा चेंबूरकरांना यांना मोठा फायदा होत आहे.

2011 पासून ‘काळा घोडा फेस्टिवल’च्या धर्तीवर ‘चेंबूर-फेस्ट’चे आयोजन केले जाते, त्यासाठी मुंबईभरातून माणसे चेंबूरमध्ये येतात.

बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एका लेखात न मांडता येणारा हा चेंबूरचा विस्तार लोकसंख्येने (16.28 किलोमीटरवर वसलेला) चार लाखाच्यावर असला तरी उग्र राक्षसासारखा न वाटता गतकाळाच्या वैभवशाली खुणा बाळगत सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या परंतु स्निग्ध डोळ्याच्या एखाद्या वृद्धासारखा भासतो.

या लेखासाठी मदत करणारे सर्वश्री सुरेंद्रनाथ पाठारे, भानत, सुहास पाठारे, सुधाकर वडनेरे, रजनी कुलकर्णी आणि अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माहिती आणि वेळ देणाऱ्या सहृदयींचे मी आभार मानते.
संदर्भ:
एक कर्मयोगी:  सुधाकर वडनेरे
विधायक गुरु: अश्विनीकुमार मिश्र
चेंबूर डायरी 1999:  संदीप शर्मा.

प्रतिभा सराफ

– लेखन : प्रा. प्रतिभा सराफ #चेंबूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. प्रतिभाताई, खूप छान लेख लिहिला आहे. चेंबूर ची glass factory, गुन्हेगारी जगत व इतर काही गोष्टींचा उल्लेख नाही. अर्थात लिहावे तेवढे कमीच, इतक्या गोष्टी आहेत पण तुम्ही लेख सर्वसमावेशक करण्याचा उत्तम प्रयत्न केल्याचे निश्चितपणे जाणवते.
    देवेंद्र भुजबळ सरांनीही खूप अगदी सुयोग्य संपादन व मांडणी केली आहे.

  2. अबब! किती ही चेंबुरची माहिती! युगायुगांची! चेंबूर मधे दोन वर्षे राहण्याचा योग आला होता.आणि तसेही एरवी आम्ही शूटींग साठी एस.एल.studiola देवनार डेपो वरून जायचो.त्यामुळे प्रतिभा यांनी लिहिलेल्या places पहिल्या होत्या.पण त्यांचा इतिहास नव्हता माहित.पूर्वेतिहास लिहिल्याने लेख वाचनीय झालय.चिंबोरीचे चेंबूर आवडले.रसास्वाद घेते आहे.

  3. आमच्या चैंबुर ची एवढी छान सुंदर माहिती वाचून खुप वाटले. मी चैंबुर मध्ये लग्न झाल्यावर आले. त्यामुळे आज चैंबुर ची जी माहिती वाचून भरपूर नविन माहिती मिळाली. चैंबुर मधील श्री स्वामी समर्थ च्या मठाचा उलेख राहिला. प्रा. प्रतिभा सराफ चे लेखन सुंदर व फोटो सहित माहिती खुप छान. 🙏नेहमी प्रमाणे NewsStoryToday सुरेख लेख 👍👍

  4. प्रा. प्रतीभा सराफ ,# चेंबूरकर यांच्या सर्वंकष लेखणीतून प्रसवलेले आणि सन्मा. देवेंद्र भुजबळ साहेबांनी संपादन केलेले ” आम्ही चेंबूरकर ” हा लेख वाचतांना माझ्या मनाला प्रश्र्न पडला की, खरंच एकेकाळी कोळी आणि आगरी समाजाची वस्तीस्थान असलेल्या चेंबूरच्या परिसरात आज या समाजाचा मागमुसही दिसत नाही. अशा जुन्या-नव्या पिढीतील अनेक सामाजिक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थाचे जाळे अनेक समाज धुरीणांच्या अथक प्रयत्नानंतर निर्माण केले आहे , हा संपूर्ण लेखाजोखा अतिशय सुंदरपणे व सजगपणे मांडले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!

    राजाराम जाधव,
    सहसचिव सेवानिवृत्त
    महाराष्ट्र शासन

  5. देवेंद्रजी..
    आपण माझ्या लेखाला योग्य जागी योग्य फोटो टाकून समग्र केले आहे. मनापासून धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments