Thursday, November 21, 2024
Homeसंस्कृतीआम्ही नागपूरकर.....

आम्ही नागपूरकर…..

विदर्भ म्हणजे कडक उन्ह… विदर्भ म्हणजे मागासलेला, दूर्लक्षित भाग… विदर्भ म्हणजे खेडवळ भाषा ! मित्रांनो, हे पूर्वग्रह मनातून आपोपच निघून जातील मात्र त्यासाठी आपणास याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघावे लागेल. कडक रणरणत्या उन्हात माणसाला हायसं करणारी अन “जिंदगी धूप तुम घना साया !” असं गायला लावणारी पूर्व विदर्भातील हिरवी दाट झाडी… झाडीतून भटकंती करणारे वनराज..! माणसाला आपलसं करणारी गावरान वर्‍हाडी बोली… खवैय्या पर्यटकांना भावनारी नागपूरची सावजी थाळी ! आयुष्यातला हा निराळा इंद्रधनु अनुभवण्यासाठी पूर्व विदर्भातील हिरव्या गर्द वनराईने बहरलेल्या आणि संत्र्यांनी मोहरलेल्या ‘ऑरेंज सिटी’ उर्फ नागपूरच्या भटकंतीचे एकदा अवश्य नियोजन करा आणि हो नागपूरच्या परिसरातील पर्यटक स्थळांना देखील अवश्य भेट द्या !

नागपूरच्या हिरव्या गर्द वनराईच्या आणि चौपदरी रस्त्यांच्या दूतर्फा असलेल्या वृक्षांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती त्या हिरव्या अनुभूती साठी तेथील उन्हाळा देखील आनंदाने सोसतो. येथील जागोजाग बांधलेल्या उड्डाण पुलांवरून ड्राइव्ह करताना हवाई जहाजातून सफर करीत असल्याची एक निराळी अनुभूती मिळते… काहीशी पंख लाभल्या सारखी !

नागपूरकर ! आपल्या सडेतोड आणि सरळ वागणूकीमुळे कधी कधी फटकळ वाटतात. मात्र असे असले तरिही जुने वैर विसरून गरजेला धावून जातो तो खरा नागपूरकर. हे मात्र निश्चीत की इथल्या उष्ण वातावरणाचा नागपूरकरांवर प्रभाव झालेला दिसतो. अन्याय सहन न करणे हा नागपूरकरांचा गुण. चुकीचे काही घडत असेल तर यांना ते खटकतेच आणि मग स्वतःची त्यात काही भुमिका असो नसो त्यावर ते आपले परखड मत नक्कीच मांडणार. मात्र यामुळे बरेचदा स्वतःचे नुकसान देखील होते.

नागपूरच्या मातीत इथल्या पाण्यात नक्कीच काही भारलेले असावे. नागपूरने आपल्याला कवी ग्रेस, पुरुषोत्त्तम दारव्हेकर, सुरेश भट, राम शेवाळकर, डॉ. वि. स. जोग, नंदा खरे यांच्यासारखे कवी लेखक महाराष्ट्राला दिले. नागपूरकर संगीत, कला आणि साहित्याचे जाणकार आहेत. येथील सांस्कृतिक सभागृहांमधून सांस्कृतिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असते. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर ! इथे दरवर्षी डिसेंबर-जानेवारी दरम्यान भारत भरातील विविध संस्कृतीचे टिकाऊ खाद्य पदार्थांचे, कला कुसरीच्या वस्तुंचे प्रदर्शन त्याचबरोबर देशभरातील निरनिराळ्या लज्जतदार चविच्या अन्नपदार्थां सोबतच संगीत नाट्य नृत्य असा बहुरंगी रसास्वाद घेत नागपूरकर या सर्व पाहुणे मंडळींच आगत्य करतो.

नागपूरकरांकडे भरपूर सकारात्मक उर्जा असूनही ते तिचा आप मतलबासाठी फारसा वापर करताना दिसत नाहीत. स्वतःच्या गुणांचं भांडवल न करता आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला बरेचदा नागपूरकर म्हणजे मागास वाटतो. मात्र इथले स्वच्छ रस्ते, जागोजाग वसलेले सुनियोजित बगिचे, वाहतूकीचे शिस्त पालन, शहरात पहिल्यांदाच आलेल्या पाहुण्याला योग्य ते मार्गदर्शन यातून नागपूरकर आजही आपली निराळी ओळख टिकवून आहेत.

काही घराण्यांमधे इथला राजेशाही थाट वारसा हक्कात आलेला दिसतो त्यामुळे पश्चिम वैदर्भी नागपूरकरांना जरा गर्विष्ठ आणि वरचढ मानतात. पण माझा गेल्या कित्येक वर्षातील अनुभव या ग्रहाला देखील खोडून काढतो. इथे शिक्षणाला फार महत्त्व आहे आणि त्या त्या क्षेत्रातील दर्जदार शिक्षण देणाऱ्या शासकीय, निम शासकीय आणि खाजगी संस्था देखील आहेत. नागपूरची बोली मराठी मालिकांमधून दाखवितात ती वर्‍हाडी अथवा ग्रामीण नक्कीच नाही तर मुळतः नागपूरचा रहिवासी असलेल्या व्यक्तीला प्रमाणभाषेची चांगलीच जाण आहे. फक्त त्याचा ती अनाठायी अभिमान बाळगत नाही.

हे मात्र निश्चीत की नागपूरकरांकडे फारसा व्यावसायिक दृष्टीकोन नसल्याने तो एका चाकोरीबद्ध आयुष्यात समाधानी असतो आणि म्हणूनच की काय पश्चिम महाराष्ट्राला नागपूरकर त्यांच्या सारखा स्मार्ट वाटत नसावा. पण त्यामुळे तो आपली नाती-गोती, मैत्री-प्रितीच कोणतही भांडवल न करता जपतो. मात्र कुणी त्याच्या मैत्रीचा गैरवापर करत असेल तर त्याला तोंडावरच शाब्दिक चपराक द्यायला मागेपुढे पहात नाही तो खरा नागपूरकर ! शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.

नागपूरकर जिवाला जीव लावतो… पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीचे अगत्य अगदी मनोभावे करतो. आग्रहाने चहा, पोपटीच्या दाण्याचा पोहा, मुगडाळीचा शीरा असा वैविध्यपूर्ण नाष्टा, अगदी पातळ नाजुक फुलक्या त्यावर अस्सल गावराण तुप, मसालेदार भाजी, सुकी भाजी, चटण्या, लोणची, कोशंबिरी, पकवान्न असे सुग्रास जेवण आणि मग पुन्हा दुपारचा चहा त्यासोबत हलकासा नाष्टा असं अगदी आपुलकीने करतो. इथल्या प्रथेप्रमाणे पाहुणचार म्हणजे सोबत आहेर आलाच. साडी-चोळी ची जागा जिन्स-टॉपने अन शर्टपीसची जागा रेडिमेड विअरने घेतली असली तरी यजमान आपल्या परिस्थितीनुरूप आजही या प्रथा आनंदाने पाळतो. सोबत बेसनाचे भुरा साखर अन अस्सल तुपातले लाडू, मसालेदार कुरकुरीत चिवडा, संत्रा बर्फी, सुक्या मेव्याचे लाडू असा सुग्रास खाऊ देखील आपुलकीने देतोच देतो… !

चला तर मग वळवूत आपली शाब्दिक भटकंती नागपूर शहरातील पर्यटनाकडे.

लेक गार्डन-
अद्भूत निसर्गाचा आनंद लुटायची जर कुणाची इच्छा असेल, तर त्याने नागपूरच्या सक्करदरा भागातील ‘लेक गार्डन’ला अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाच्या आनंदासोबतच तुम्हाला मनासारखी विश्रांतीही येथे घेता येईल. या उद्देशासाठी सक्करदऱ्यातील ‘लेक गार्डन’ सारखे अत्यंत रमणीय स्थळ आहे. रविवारची सुटी घालविण्यासाठी आणि मनासारखा आनंद लुटण्यासाठी हे एक उत्तम स्थळ आहे.

या ‘लेक गार्डन’मध्ये खेळण्यासाठी पाच विस्तारित मैदान आहेत. या गार्डनचे सौंदर्य अप्रतिम आहे. येथील तलावातील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सौंदर्य फारच मनमोहक आहे. या गार्डनमध्येच तलाव असल्याने दिवस असो की रात्र, येथील वातावरण नेहमीच थंड असते.

गांधीसागर तलाव-
नागपूरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण विज्ञान केंद्राच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे २७५ वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.

जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे. १७४२ मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी या तलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे नौकाविहाराचीही सोय आहे.

सातपुडा बॉटनिकल गार्डन-
नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. सातपुडा गार्डन आणि आसपासच्या परिसराच्या आल्हाददायक वातावरणात दुर्मिळ पक्षी देखील आढळतात.

सेमिनरी हिल-
नागपूरातील सेमिनरी हिल ही लहान आकाराची टेकडी आहे. सेंट चार्ल्स यांच्या नावावर या टेकडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येऊ शकते. सेमिनरी हिलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अगदी लागूनच असलेले जपानी गार्डन होय. या टेकडीवरील घनदाट झाडांना नागपूर शहराचे फुप्फुस समजले जाते.

फुटाळातलाव-
नागपूरातील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे फुटाळा तलाव ! सर्वच वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. नागपूरचे पूर्वीचे राजा भोसले यांनी हा तलाव बांधला आहे. रंगीत फवारे आणि आल्हाददायक वातावरण येथील वैशिष्ट्य आहे. सायंकाळी हॅलोजन दिव्यांमुळे येथील वातावरण अधिकच आकर्षक होत असते. तीन बाजूंनी वेढलेला तलाव, हिरव्यागार जंगलाचे कवच आणि एका बाजूला अतिशय सुंदर अशी व्यापक चौपाटी हे देखील येथील मुख्य आकर्षण आहे. तलावाच्या किनाऱ्यावर आणि टेकडीवरून सूर्यास्ताचा मोहक अनुभव घेता येऊ येतो.

हा परिसर निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक स्थलांतरित पक्षी या तलावाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हा परिसर उपयुक्त असा तर आहेच पण प्रेमी युगूलांसाठी हे ठीकाण मुंबईतील कोणत्याही चौपाटी पेक्षा कधीही अधिक शांत आणि प्रसन्न. या विविध वैशिष्ट्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरकरां करिता हे अतिशय लोकप्रिय पिकनिक स्थळ ठरले आहे.

चिल्ड्रन्स ट्राफिक पार्क-
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत धरमपेठ येथील ‘चिल्ड्रन्स ट्राफिक पार्क’ म्हणजे लहान मुलांचा सुनियोजित ट्राफिक झोन. मुलं वाहतुकीच्या नियमांचे पालन करतं पार्कमधे मिळणारी छोटी छोटी वाहन चालविन्याचा ती शिकण्याचा मनमुराद आनंद घेतात. ईथल्या आकर्षक सायकल्स, बगीच्या आणि रस्ते बघून पुन्हा एकदा बालपण जगावेसे वाटते.

महाराज बाग-
भोसल्यांच्या काळातील हा बाग विशेषत्वाने ओळखला जातो तो येथील वैविध्यपूर्ण पशु-पक्ष्यांमुळे. २० प्रजातीची जवळपास ३०० पशु-पक्षी येथे आढळून येतात ज्यात वाघ, मोर, ससे, काळविट यांचा समावेश होतो. शहराच्या मध्यवर्ती असलेला हा बाग लहान मुलांना आकर्षित करतो.

गोरेवाडा तलाव-
नागपूरच्या वायव्येकडे असलेला गोरेवाडा तलाव हा २३५० फूट खोल आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. राज्य सरकारच्या जल कार्य खात्याने १९११ मध्ये या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाच्या चहूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राणीही आहेत.

‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यान’ ज्याचे २६ जानेवारी २०२१ ला उद्घाटन झाले तेथे पर्यटकांना जंगल सफारीची उत्तम सोय असून विविध पक्षी प्राण्यांसह आता तेथे वनराजाचे देखील आगमन झालेले आहे. दोस्तांनो, हे उद्यान अगदी शहरातच स्थित असून तेथे जंगल सफारीची उत्तम सोय असल्याने शहरवासीच काय पण पाहुण्यांना देखील फार सोयीचे असे हे ठिकाण आहे. येथील प्रस्तापित ‘फुलपाखरांचे राष्ट्रीय उद्यान’ पर्यटकांना नक्कीच आपलेसे करेल.

मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय-
ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे. अनेकविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे.

विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.

अंबाझरी तलाव-
नागपूरच्या पश्चिमेकडे ६ किलोमीटर अंतरावर अंबाझरी तलाव आहे. शहरातील हा सर्वात मोठा आणि अतिशय मनमोहक तलाव आहे. या तलावाच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे. तलावाला लागूनच अतिशय सुंदर असा अंबाझरी बगिचा आहे.

१९५८ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या बगिच्याचे क्षेत्रफळ २० एकर इतके आहे. लहान मुलांसाठी येथे करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत.

रमण विज्ञान केंद्र आणि रमण तारांगण-
शुक्रवारी तलावाच्या अगदि समोर स्थित हे विज्ञान केंद्र म्हणजे विद्यार्थ्यांमधली विज्ञाननिष्ठा विकसीत करणारे केंद्र. मुलांच्या विज्ञानासंबंधी प्रश्नांना अगदि सोप्या आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने या केंद्रात उत्तरं मिळतात. येथील विशेष आकर्षण म्हणजे येथील कृत्रिम तारांगण जे ग्रह ताऱ्यांची माहिती देतं एका निराळया अनुभूतीतून. शालेय विद्यार्थ्यांनी एकदा तरी अवश्य भेट द्यावी असे हे विज्ञान केंद्र.

दीक्षाभूमी-
या वास्तुचे वास्तुकार शेओ डान माल हे असून या वास्तुचे निर्माणकार्य जुलै १९७८ साली सुरु झाले होते जे १८ डिसेंबर २००१ ला पूर्ण झाले. दीक्षाभूमी हे भारतातील बौद्ध धर्माचे एक शांतिस्थल. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ अक्टूबर १९५६ रोजी पहिले महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ५,००,००० पेक्षा अधिक अनुयायांना बौद्ध धर्माची विधिवत दीक्षा देऊन बाबासाहेब स्वतः पुन्हा धम्माचे दिक्षीत झाले.

दरवर्षी जगभरातील लाखो अनुयायी येथे येतात. ही इमारत मनःशांती देणारी आहे. जगरहाट काही काळ विसरून माणूस या स्थळी अगदी निश्चिंत होऊन विसावतो. महाराष्ट्र शासनाने या पर्यटन स्थळास ‘अ’ दर्जा दिला आहे.

मग येतायना आपण नागपूरकरांचा पाहुणचार घ्यायला !

तृप्ती काळे.

– लेखिका : तृप्ती काळे
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. लेखिका तृप्ती काळे यांनी, मी कधीही न पाहिलेल्या नागपूरची भौगोलिक, सामाजिक, खाद्य संस्कृतीची इत्यंभूत माहिती आपल्या अप्रतिम लेखनाद्वारे दिली त्या मुळे प्रत्यक्षात नागपूर दर्शन झाल्याचे समाधान लाभले.
    लेखिकेचे धन्यवाद 🙏

  2. अप्रतिम लेख. वाचत असताना नागपूर हिवाळी अधिवेशनातील दिवस आठवतात. आलू गोंडा हा गोंडस शब्द तिथेच ऐकायला मिळाला. वैदर्भीय पदार्थांची चव अविस्मरणीय. अगदी तुपात थबथबलेल्या खास पुरणपोळीचा स्वाद अजून जीभेवर रेंगाळत आहे. पातवड्यांची भाजी,आख्खी गवारीची भाजी, दाळकांदा,..आणि हो आपुलकीची वर्‍हाडी बोली. ‘पाहलं’ अशा धाटणीचे एकेक उच्चार. तेथील अगत्यशील माणसं देखील अनुभवली आहेत. थंडी सुद्धा कशी रेशमी वाटायची. एरव्ही उशीरा उठणारी मंडळी हटकून नागपूर हिवाळी अधिवेशनात पहाटे चार पाचला उठून सिव्हिल लाईन्सच्या ऐसपैस व शांत कमी रहदारीच्या रस्त्यावरुन रपेटला जायची आणि रात्री शेकोटी पेटवून गप्पा झोडत रहायची… खूपच छान लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments