Thursday, September 18, 2025
Homeसंस्कृतीआम्ही नासिककर......

आम्ही नासिककर……

नासिककर म्हटला की कसा सरळ, मनमोकळा, निरागस, भाबडा, काय असेल ते सडेतोड तोंडावर बोलणारा, भांडायला नेहमी तयार असणारा पण दुसर्‍या दिवशी लगेच गोडही होणारा………….
श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पावनभूमीत आपला जन्म व्हावा आणि गोदाकाठावर अवघे बालपण सरावे यासारखे भाग्य नाही.

पंचवटीचा परिसर, काळाराम मंदिर, रामकुंड, तपोवन, व्हिक्टोरिया ब्रिज ( आजचा अहिल्याबाई होळकर पूल) यांची पार्श्वभूमी बालपणाला लाभावी यासारखे समृद्धपण नाही.

कळत नव्हते त्या वयात आईने बोटाला धरुन कितीदा काळाराम मंदिरात सिन्नरकर बुवांच्या किर्तनाला नेले असेल. त्यामार्गात सीतागुंफा, पाच प्रचंड प्राचीन वटवृक्ष, सीतामाईचा संसार दर्शन घडवणारे मंदिर लागायचे. लाकडी खेळण्यांची दुकाने लागायची. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यालगत वटवृक्षाखाली शितला मातेचे मंदिर लागायचे, जिथे लहानपणी गोवर कांजण्या निघाल्या की हमखास दहीभाताचा नैवेद्य दाखवला जायचा.

काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला हळदी कुंकूचे दुकान आणि बाहेर घास घालण्यासाठी गाई बांधून ठेवलेल्या असायच्या. काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर काळभैरवाचे छोटे मंदिर आठवते.
काळाराम मंदिराच्या प्रांगणात हरिनाम सप्ताह व्हायचे. एकदा गीताभारती सुद्धा येऊन गेलेल्या होत्या.

तेथील सभागृहात सिन्नरकर बुवांचे किर्तन रंगायचे. डोक्यावर लाल पगडी, गुडघ्यापर्यंत लांब पांढराशुभ्र कूर्ता, धोतर आणि खांद्यावरुन हातांपर्यंत लांब शेला अशी सिन्नरकर बुवांची मूर्ती कधी कमरेवर हात ठेवून तर कधी जागीच उडी मारुन आख्यान रंगवायचे. त्यांच्या रंगात बाजूचे मृदंगवाले आणखी रंग भरायचे. आई एकीकडे तल्लीन व्हायची आणि बसल्या जागी डुकल्या काढणार्‍या मला एका हाताने हलवून जागं करीत रहायची.

काळाराम मंदिराकडून पुढे खाली गेले की सरदार चौक व त्यापुढे सांडव्यावरची देवी व पुढे नारोशंकर मंदिराची मागील बाजूस फोटोफ्रेमची रांगेत दुकाने. समोर उसाची गुर्‍हाळे, रामाचा रथ निघायचा तेव्हा इथेच जत्रेतील फोटो स्टुडिओ, रहाटपाळणे, जादूचे आरसे, मोटार सायकलचे चित्तथरारक खेळ, यम दरबार, बुढ्ढी के बाल, फुगे यांनी परिसर गजबजून जाई.

रामनवमीनंतर निघणाऱ्या रामरथ गरुडरथ हनुमानरथ यांच्या यात्रा, तो उत्साह दरवर्षी पाहण्यासारखा असतो. पुढे गोदामाईच्या पूरामध्ये नारोशंकर मंदिराची एक दगडी छत्री वाहून गेलेली दिसेल. तिथून पुढे गेले की रामसेतू पूल लागेल. सतत गजबजलेला. येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा होणार नाही अशा बेताने तिथे हमखास गाई रवंंथ करतांना दिसतील. कुठे कुठे जडीबुटी घेऊन बसलेल्या मशेरी लावून लावून दाताच्या कडा काळ्या झालेल्या आदिवासी लेकुरवाळ्या दिसतील.

तिथेच तुम्हाला जुन्या काळातील एक आणे दोन आणे यासारखी नाणीही फडक्यावर पसरुन दिसतील. रामसेतू पुलाचा आधार घेऊन पांडे मिठाईचे दुकान दिसेल. तिथून पुढे गेले की भांडी बाजार. बालाजी मंदिर. कुंकवाची दुकाने. मला आठवते आई भांडी बाजारातील एका मोडीच्या दुकानातून हमखास घसमर जुनी भांडी निवडून घ्यायची.

रामसेतूवर उजव्या हाताला खाली उतारावर मोठमोठे आरसे लावलेले एक सलून होते. तिथे वडील मला केस कापायला घेऊन जायचे. केस किती कमी करायचे याच्या सूचना आईने आधीच दिलेल्या असायच्या. तशा सूचना देत देत वडील मागे बाकावर पेपर वाचत बसायचे आणि त्याप्रमाणे केस कमी करता करता न्हावी मला एकसारखे हाताने खाली वाकवायचे. तेवढे वाकून वाकून मान दुखून यायची. कानाजवळ मागून वस्तरा फिरताना हमखास गुदगुल्या व्हायच्या आणि हलू नको म्हणून सूचना यायच्या. केस कमी करताना समोरच्या मोठ्या आरशात नारोशंकर मंदिर आणि परिसर दिसत रहायचा. घरी गेल्यावर परत सांगितल्याप्रमाणे केस कमी झालेच नाही अशी आईची नाराजी वडीलांना ऐकून घ्यावी लागायची ते वेगळेच.

तेथून खाली उतरुन गेले की पुढे यशवंत पटांगण लागायचे. देव मामलेदारांचे मंदिर पुरात वाहून गेल्यावर तिथे आता दुसरे मंदिर बांधले आहे. या पटांगणात उभे राहिले कि पश्चिमेस एकमुखी दत्ताचे मंदिर आहे व उजव्या बाजूला समोर व्हिक्टोरिया पूल दिसतो. व्हिक्टोरिया पूलाच्या शेवटी सुंदरनारायण मंदिर आहे. जवळच वडीलांच्या विद्यार्थ्याचे भज्याचे दुकान होते. तेथे वडील मला नेहमी घेऊन जायचे. यशवंत पटांगणात कित्येक वर्षापासुन वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते. त्यात अनेक दिग्गज व्याख्याते येऊन गेलेले आहे.

गोदाकाठी फिरायला येणाऱ्यांचे इथे एक आकर्षण म्हणजे कोंडाजी माधवजी चिवड्याची भेळभत्त्याची दुकाने. समोर गांधी ज्योत, रामकुंड, तशीच आणखी कुंडे, प्राचीन गोदावरी मंदिर, कपडे बदलण्याचे ठिकाण दिसेल. मुख्य म्हणजे दरवर्षी गोदावरीला पूर किती आला आहे याचा अंदाज बांधता येईल असा मोठ्ठा दुतोंडी मारुती दिसेल. पलिकडे उंचावर कपालेश्वर मंदिर दिसेल.

गोदाकाठी अनेक मंदिरे दिसतील. याच मंदिरांच्या रांगांमधील सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ एक अहिल्याराम व्यायामशाळा होती. मला आठवते तेव्हा मी तिथे जिम्नॅस्टिकसाठी जायचो. मलखांबावरील प्रात्यक्षिके नंतर यशवंत व्यायाम शाळेत व्हायची तेव्हा त्यात मीही भाग घेतला होता.

रामकुंडाच्या दोन्ही किनार्‍यांवर दशक्रिया पिंडदान, श्राद्ध, अस्थिविसर्जन करण्यासाठी भारतभरातून येणाऱ्या भाविकांची रेलचेल दिसेल. गोदाकाठी वटपिंपळ वृक्षांवर कावळ्यांचे थवेच्या थवेही दिसतील. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पंडित ब्राह्मणांची सोवळ्यातील लगबग इथे दिसेल.गोदाकाठी एके ठिकाणी जुने बाड घेऊन पंडित यात्रेकरूंच्या नावाची गोत्राची नोंद करुन घेत असतात आणि यापूर्वी त्यांचे कोणते पूर्वज तिर्थयात्रेस येऊन गेले त्याच्या नोंदी काढून दाखवतात. पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या हस्तलिखित जुन्या दुर्मीळ पोथ्यासुद्धा या ठिकाणी पहावयास मिळू शकतात.

गोदाकाठी रामकुंडावर गेलो की मला हमखास आठवतात ते दिवस जेव्हा माझ्याच वयाच्या मामाने मला पहिल्यांदा रामकुंडात हळूच ढकलले होते आणि मग पोहायला शिकवले होते. नंतर कितीतरी दिवस आम्ही रामकुंडावर पोहायला जायचो. मला आठवते त्या वयात गोदावरीचा पूर पहायला आम्ही व्हिक्टोरिया पुलावर जायचो. तेव्हा एक भरदार मिशांचा पहिलवान टायर घेऊन पुलाच्या कठड्यावरुन तेवढ्या पूरात उडी घ्यायचा व पोहत पोहत पलिकडे जायचा.ते पाहतांना अगदी छाती दडपून जायची.

गोदाकाठीच पलिकडे गोराराम गल्लीत वडिलांची बाल शिक्षण मंदिर ही शाळा होती. तिथे ते मला रामकुंडावरुनच न्यायचे. येतांना गोदाकाठी भरलेल्या भाजी बाजारातून भाजीपाला घ्यायचे. आईपण बुधवारी गोदाकाठी भरणाऱ्या बाजारातून मीठमसाले वगैरे बाजार करायची.

गोदाकाठी आणखी एक आकर्षण होते आणि ते म्हणजे सांड्यावरच्या देवीजवळ गुढीपाडव्याच्या आसपास लागणारी हारडे करड्यांची रंगीत दुकाने. आईबरोबर मी देवीच्या दर्शनाला आलो की त्या टांगून ठेवलेल्या हारडे करड्यांकडे अगदी आशाळभूत होऊन पहात राही.गोदाकाठावरील आणखी एक आठवण म्हणजे गोराराम गल्लीतील श्रीकृष्ण मंदिर. जन्माष्टमीच्या दरम्यान इथली श्रीकृष्णाची चल मूर्ती रोज वेगवेगळ्या रुपात सजवली जाते आणि तिच्या दर्शनासाठी अक्षरशः झुंबड उडते.

माझे सगळे बालपणच जणू या गोदाकाठी बागडते रहाते. सिंहस्थ पर्वणीत कधी ते तपोवनातील विविध साधुंच्या जथ्यात रमत राहते. तेथे शिरापुरीच्या भंडार्‍यात रमत रहाते. राम लक्ष्मण सीता यांच्या वेषभूषेत आशीर्वाद गोळा करीत रहाते. तपोवनातील साधूंच्या शोधात कधी जनार्दन स्वामींचेही शिवमंदिर उभारताना अवचित दर्शन होते.
बालपणी काळाराम मंदिराजवळ उत्तर भारतातून ‘रामलीला’ करणारी मंडळी यायची तेव्हा त्याचेही आकर्षण असायचेच.पंचवटीतील नाशिककर स्टुडिओ आठवतो. आई व तिच्या मैत्रिणी तिथे फोटो काढून घ्यायला जायच्या. मला आठवते पंडित नेहरु गेले तेव्हा त्यांची रक्षा हेलिकॉप्टराने रामकुंडात विसर्जित करण्यासाठी आणली होती तेव्हा नाशिककर फोटो स्टुडिओने काढलेल्या फोटोत आईचा रामकुंडावरील एक फोटो आलेला होता. त्याकाळी फोटो मात्र अगदी अभावानेच काढले जात त्यामुळे त्याकाळातील बालपणातील एकही फोटो आज नाही याची खंत वाटत रहाते. पण तो काळ मात्र सतत डोळ्यासमोर तरळत रहातो.

गोदाकाठीच रथाजवळच्या शाळेत मी अंकुष या बालमित्राबरोबर एकटाच पहिलीला प्रवेश घ्यायला गेलो होतो हे आज आठवले की हसू येते. नंतर सोनूबाई हिरालाल केलाची नवीन शाळा व त्या दरम्यान गांधीजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने शाळेत वाटलेली स्मृतीचिन्ह पुस्तके आठवतात. नंतर पाचवीला जवळच श्रीराम विद्यालयात गेल्याचे व त्या दरम्यान सर्वात मोठा आलेला १९६९ चा पूर व नंतर १९७१च्या युद्ध प्रसंगी बेंचखाली बसणे आठवते. तिथेच शनिचौकात रंगपंचमीला खोदलेले रंगांचे रहाड छातीत धडधड वाढवायचे. जवळच सरदार चौकातील ग्रंथालयात पहिल्यांदा स्वीकारलेले सदस्यत्व व तेथून लागलेली पुस्तकांची गोडी मला विसरता येणार नाही. बालपणात नाशिकची कक्षा अशी हळूहळू माझ्या दृष्टीने विस्तारत राहिली.

वडील तेव्हा रोज म्हणायचे मी ‘पल्याड’ जावून येतो. तेव्हा अर्थ कळायचा नाही पण आज कळते पल्याड म्हणजे गोदावरी पलिकडे जाणे. गोदावरी ओलांडण्याबाबतही तेव्हा समजूती होत्या. पूर्व बाजूला रहाणारे पूर्व काठावरच श्राद्ध आदी विधी करणार आणि पश्चिमेला राहणारी मंडळी पश्चिमेलाच ते विधी करणार. मला आठवते माझे आते मामा व आत्या गाणगापूरवरुन आले तेव्हा प्रथम गोदावरीच्या पश्चिमेला भाड्याने खोली घेऊन राहिले होते व गोदावरीची विधीवत पूजा करुन मग अलिकडे पूर्वेस राहत्या घरी आले होते.

मला नंतर कामानिमित्त व शिक्षणानिमित्ताने गोदावरी ओलांडून पलिकडे मेनरोडवर व गंगापूररोडला जावे लागायचे. त्या निमित्ताने माझ्या दृष्टीने नाशिकची कक्षा तेवढी विस्तारली होती. नेताजी भोईर यांची नाटके दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत व्हायची तेव्हा त्यांच्याबरोबर कधीतरी लहानपणी परशुराम सायखेडकर नाट्यगृह व त्यांची नाटके पाहिली ते आठवते. तर कधी गणेश विसर्जन मिरवणूकीत त्यांच्या ट्रकमधून व्हिक्टोरिया पूलावरुन गेल्याचे व गोदावरी ओलांडल्याचे आठवते.नववी दहावीला असताना परशुराम साईखेडकर नाट्यगृहाजवळच सार्वजनिक वाचनालयात मी सदस्य झालो आणि माझ्या वाचनाच्या कक्षा आणखीच रुंदावल्या. कधी सवंगड्यांसह आनंदवल्ली सोमेश्वरला गेल्याचे तर कधी मातीचे गंगापूर धरण, पांडवलेणी, चांभारलेणी पहायला गेल्याचे आठवते. आजीच्या पाठुंगळी बसून वणीच्या सप्तशृंगी देवीच्या गडाच्या तेव्हाच्या निव्वळ उंच दगडांच्या एकेक दमछाक करणार्‍या पायर्‍या चढल्याचे आठवते.

आयुष्यातील निम्मी वर्षे अशा रितीने नासिकनेच घडवली. ढिगभर जाहिरातींचे कागद खिशात बगलेत कोंबून खाकी शर्ट विजारीतील डोक्यावर हॅट घातलेले व खांद्यावर कर्णा अडकवलेले व विशिष्ट आवाजात मेनरोडला जाहिरात करणारे वडणेरे काका मला अजून आठवतात. ‘कुल्फेss’ अशी साद देत हातगाडीवर मटक्यातील कुल्फी विकणारा भैय्या माझ्या स्मरणात आहे.

धुळवडीला होळीला प्रदक्षिणा घालत नाचणारे वीर आठवतात. रविवार कारंजावरील चांदीचा सुंदर गणपती आठवतो. सोमेश्वरच्या रस्त्यावर पेरुच्या बागा आठवतात. दोन दोन पैशात पेलाभर दूध मुलांना वाटणारे पांजरपोळ आठवते. ” बाज इनून घ्या बाज “अशी उन्हात हाळी देत येणारा म्हातारा आठवतो. ये नागs नरसोबा म्हणून चित्र विकणारी मुले आठवतात.

पंचवटीत कोकिळा काशिनाथ गवळी मावशी तपोवनात काळाराम मंदिराबाहेर गोदाकाठी मोठ्या रांगोळ्या घालण्याबद्दल प्रसिद्ध होती. ती आठवते. नासिकच्या कितीतरी आठवणी आहेत. त्यांना नासिकचा एक सुगंध आहे जो सतत दरवळत राहतो.

नासिककर म्हटला की कसा सरळ, मनमोकळा, निरागस, भाबडा, काय असेल ते सडेतोड तोंडावर बोलणारा, भांडायला नेहमी तयार असणारा पण दुसर्‍या दिवशी लगेच गोडही होणारा. त्याला कुत्सितपणा, चिकटपणा, चिकित्सकपणा असा माहितच नसतो. टोमणे मारणे देखील त्याच्या स्वभावात येत नाही. शुद्ध मराठीत न बोलता तो रांगड्या भाषेत कडक बोलणार. नासिककर कसा ओळखायचा तर गंमतीने उदाहरण दिले जाते. ते म्हणजे सगळीकडे ‘एकोणीस’ म्हटले जाते पण ‘एकोणाविस’ म्हटले की तो हमखास नासिककर असतो.

नासिककर’ नासिक’ म्हणतो तर बाहेरचा ‘नाशिक’! ‘काय वो नाना’ म्हटलं की ओळखावं नासिककर समोर आहे.
नासिककराचे पहिले प्रेम म्हणजे इथली तर्रीदार तिखटजाळ मिसळ. अशी मिसळ की जिच्यात मूग मटकी शेव पोहे असतील व ती बनपावाबरोबर असेल आणि पाहिजे तितका तिखट तर्रीदार रस्सा मिळेल. इथल्या मिसळमध्ये तुम्हाला कधी कधी साबुदाणा खिचडी पण टाकलेली दिसेल.

नाशिकची खास ओळख म्हणजे झणझणीत कोंडाजी चिवडा आणि बुधा हलवाईची शुद्ध तुपातील जिलेबी. नासिककर कधी कधी सायंतारा मध्ये साबुदाणा वडाही आवर्जून खाईल. नासिककराला इथल्या गोड द्राक्षांचाही अभिमान असतो. जगभरात नासिकची द्राक्षे प्रसिद्ध आहेत.

थंड आरोग्यदायी हवामानाचे हे नासिक शहर एकेकाळी निसर्ग रम्य घनदाट वनराईंनी वेढलेले होते. पेशव्यांचा सरदारवाडा इथे पाहिला की वाटते त्यांनाही इथल्या थंड हवामानाची भुरळ पडलेली होती. गोपिकाबाई सुद्धा नासिकजवळ आनंदवल्ली येथे वाडा बांधून राहिल्या होत्या.

आजचे नाशिक पाहिले तर निसर्गरम्य वनराईच्या जागी चौफेर सिमेंट क्रांकिटचे जंगल उभे राहिले आहे. नासिक चौफेर विस्तारत चालले आहे. रस्ते चौपदरी होत आहेत. रहदारी वाढली आहे. उड्डाणपूल उभारले गेले आहेत. तिर्थक्षेत्र म्हणून प्राचीन काळापासून नासिकची ओळख आहेच पण आता द्राक्ष उत्पादक नासिक वाईनरी मुळे आपली नवीन ओळख मिळवू पहात आहे. नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, अनेक शैक्षणिक संस्था यांचा नासिककरांना अभिमान वाटतो. नासिककर आलेल्या पाहुण्यांचे नेहमी हसतमुखाने स्वागत करतो.

आज या नाशिकचा चौफेर झालेला विस्तार पाहिला की थक्क व्हायला होते. काही भाग काळाच्या ओघात बदलून गेले. आधुनिक झाले. जुन्या नासिकातील वाडे कोसळता कोसळता सावरत अजूनही आपला इतिहास अजून जपून आहेत. पंचवटी कारंजा, रविवार कारंजा येथे एकेकाळी खरोखर कारंजे होते आणि तिथून टांगे धावायचे. आज फक्त अशी भागांची नावे राहिली आहेत.

नासिक कितीही विस्तारले तरी बालपणात जडणघडणीत जे नासिक मी अनुभवले तेच आजही मनात जपून ठेवलेले आहे. नासिकचे प्राचीनत्व, नासिकचा इतिहास, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, गोदावरी उगम असलेली ब्रम्हगिरी पर्वत, पंचवटी, तपोवन इत्यादी पार्श्वभूमीवर नासिकचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून असलेले महत्त्व आठवून अभिमानाने म्हणावेसे वाटते ‘होय, मी नासिककर आहे.’ या पुण्यक्षेत्राचे गोदाकाठाचे आपल्यावर अनंत ऋण आहेत.

याच भूमीत ऋषितुल्य कवि कुसुमाग्रज लाभले. वसंत कानेटकर सारखे नाटककार लाभले. कवि आनंद लाभले. साहित्याची मोठी परंपरा लाभली. स्वातंत्र्य चळवळीत तेजस्वी विचार देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या भूमीने दिले. आंबेडकर चळवळीतील दादासाहेब गायकवाड याच भूमीत लाभले. अशा नासिक पुण्यभूमीस शत शत नमन !

विलास कुडके.

– लेखन : विलास आनंदा कुडके.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. तुम्ही पंचवटीकर दिसता.मी नाशिककर.वय 86 .नाही म्हणायला व रषभर पंचवटीतील प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकलो विधाते मास्तर. वडिलांची बदली वर्ष भर तिथेच झाली होती.सरदार चौकाच्या वरच्याबाजूला असलेले हलवाई दुकान व तेथील मोठया पितळी भांड्यातले गुलाबजाम विसरणार नाही
    नाशिक मधील दुकानांबददल नंतर कधी तरी

  2. Newsstorytoday टीमचे तसेच आदरणीय श्री भुजबळ साहेबांचे मनापासून धन्यवाद.. असेच वेळोवेळी लेखन करुन घ्यावे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा