Sunday, July 13, 2025
Homeलेखआम्ही "माहेरवाशिणी"

आम्ही “माहेरवाशिणी”

“घेवू विसावा माहेरवासात ! या आंतरिक ओढीने, नवी मुंबईतील ‘एमटीएनएल’ च्या सेवानिवृत्त झालेल्या मैत्रिणींनी मनी बेत आखला. आमची सखी, न्यूज स्टोरी टुडे ची संपादक सौ. अलका भुजबळ, हिने बदलापूर येथील “माहेरवाशिण” हे ठिकाण सुचवलं. पटापट पिकनिकचा दिवस व तारीख ठरली.

अगदी भिशीचे काम करता करता, अलकाने “माहेरवाशीण” स्टे होमला फोन लावून, संचालक प्रभा शिर्के, यांच्याशी संवाद साधला. दुसऱ्याच दिवसापासून, माझ्याकडे गुगल पे द्वारे, बसचे पैसे गोळा करण्याचे काम सुरू झाले.

स्मिता, शुभदा, गीता, लक्ष्मी, अलका, लता, सुरेखा, पानसरे, शुभा, वर्षा, मसन्द, हिना, शैला, जयश्री व तिची दोन मुले, जया, विजू, जॉय, दीपा, वंदू आणि वनिता, असा बावीस जणींचा ताफा तयार झाला. बसचे बुकींग ठरवून टाकले.

फोनवरून अलकाचे व माझे, पिकनिक मॅनेजमेंट सुरू होते. अलकाच्या उत्साही बुद्धीत बरेच आराखडे तयार होत होते. बसमधील सुका खाऊ ते पाण्याच्या बाटली पर्यंत, गाडीचा नंबर ते ड्रायव्हरच्या व्हक्सिनेशन सर्टिफिकेट पर्यंत ! अशोक चालकाचा मोबाईल नंबर व त्याचा फोटो ! झाले ! बस आम्ही पक्की ताब्यात घेतली.

आता ग्रुपवर सर्वानुमते पुढची आखणी सुरू झाली. जाताना लाल व काळ्या रंगाचा ड्रेस कोड पक्का केला. तिथे छान फोटो शुटसाठी अधिकचे दोन ड्रेस सोबत असावेत, त्यात एक वनपीस नक्की आणावा असे ठरले ! बस सुटण्याची वेळ व पिकअप करण्याची ठिकाणे ठरवण्यात आली. प्रचंड उत्साह व सुपीक बुद्धी, आखणीचा ताळमेळ व नियमबद्धता अलकाच्या मॅनेजमेंटमधे कमालीची दिसून येत होती.

२८ फेब्रुवारी २०२२, सकाळी ०६:३० पासून ऐरोली, वाशी, सानपाडा, खारघर, कामोठे व पनवेल अशी ठिकाणे घेत, सगळ्याजणी बस मध्ये विराजलो आणि प्रवासाच्या ओघात, मस्तीला उधाण आले.

स्मिताची गाणी👌, अलका, सुरेखा चा डान्स👌, गीताचे मस्तवाल विनोद,,,☺️ कोणाचे काय तर कोणाचे काय ! त्याबरोबर सुक्या खाऊची मेजवानी, त्यावर चहा कॉफीचा मुलामा ! फुल-टू-धमाल😊 !!!!!

बेभान धुंदीत असतानाच, आमची बस माहेरवाशिणच्या गेटवर येऊन थांबली. आमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आमची “माय” अंगणात, काठापदराच्या लाल साडीत, नाकात नथ, उंचीने लहान व किरकोळ बांध्याची, चेहऱ्यावर आनंदी हास्य, अशी “ती माय” आमच्या स्वागतास उभी होती.

बस मधून उतरताच “मी मराठी, मी मराठी !” अंगी चैत्यन्य निर्माण, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव डोळ्यासमोर उभे करणारे गीत, आमच्या कानावरून मनात भिनले. सर्वांना प्रेमाने जशी आपली आई मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगते, त्याच शिस्तीत, आम्हाला त्या मातेने उभे केले. आमच्या आईच्या शिस्तीच्या धडा पुन्हा आम्हाला अनुभवता येत होता !

सुंदर लखलखीत तांब्यातील पाणी, स्वतः वाकुन तिने आमच्या प्रत्येकीच्या पायावर घातले. तिथेच हृदयात एक तीव्र वेदना जाणवली. प्रत्येकीच्या डोक्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला होता. तेव्हा वाटले, मुली सासरहून लांबून आल्या आहेत, येताना त्यांना नजर – बाधा वा दृष्ट लागली असेल, ती पिडा टळावी व त्या सुखरूप राहाव्यात, हा त्यामागचा हेतू, या आईच्या ठायी दिसत होता. सर्वांच्या काळजात ममतेचा हुंदका दाटून आला. आईच्या गळ्यात पडून साऱ्याच रडल्या !, वनिताला तर रडूच आवरेना. तिला तिची आईची मूर्ती डोळ्यासमोररून जातच नव्हती. आईच्याही डोळ्यातील अश्रुंना पूर आला होता. त्यावेळी त्या मातेत, प्रत्येकीला आपली आई दिसली व भेटली होती.

औक्षणाचे ताट घेऊन प्रत्येकीला हळदी कुंकवाचा टिळा कपाळी लावला होता. प्रत्येकीच्या डोक्यावर फूलपाकळ्या ठेवल्या होत्या. साऱ्या जणी अगदी, आईने केलेल्या प्रेमळ स्वागताने, हरवून गेल्या होत्या. हया मातेचा आशीर्वाद घेण्यास, सर्वांनी आपसूकच आईचे चरण स्पर्श केले. अविस्मरणीय असा हा अनुभव नेहमीच स्मरणात राहिल.

आईच्या दारात माहेरवाशिणीचे प्रेमाने स्वागत झाले होते. विचारपूस होत होती. जणू, सासरी गेलेली लेक, माहेरपणासाठी आईकडे माहेरी आली आहे, असे हृदयद्रावक दृश्य, साऱ्या जणी अनुभवत होतो.

हात -पाय धुवून, चेहर्‍यावर थंड पाण्याचा शिडकावा करून, आम्ही अगदी ताजेतवाने झालो होतो. लगेचच आईने आम्हाला न्याहारी करण्यास बसवले. स्वतःच्या हाताने घावन, चटणी, ठेपले व सर्वांच्या आवडीचे अनारसे वाढले होते. “पोटभर खा.” असे आई निक्षूण बजावत होती. खाताना प्रत्येकीला प्रेमाने न्याहाळत होती. जणू तिच्या डोळ्यात असे भासत होते की, तिची लेक सासरी गेल्यावर जणू काही वाळली आहे, असा भास तिच्या नजरेत भासत होता.

चहा-कॉफी झाल्यावर, आई आम्हाला फिरायला घेऊन गेली. बालपणी आमची आई, आम्हाला फिरायला नेत असे, त्या प्रसंगाची आठवण जागी झाली.

थोड्याच वेळात ही माय आमच्यात पूर्ण मिसळून गेली. गप्पा करत त्या वनात आम्ही किती चाललो होतो, हे आम्हाला जाणवलेही नाही ! ही असते माऊलीच्या सहवासात, लेकीना मिळणारी ऊर्जा !

फिरून पुन्हा घराकडे परतलो. आता मात्र आईने स्वयंपाक कामांत वेग घेतला होता. माझ्या लेकी खूप भुकेल्या असतील, या तळमळीने ती स्वयंपाक घरात, स्वतः तिथल्या काम करणाऱ्या लेकीना मदत करू लागली होती. मध्येच आमच्याकडे येऊन, आम्हाला काही हवे-नको विचारत होती. सर्वांना ऊन असल्याने लिंबूसरबत दिले. आईच्या हृदयातील तळमळ आम्हाला जाणवत होती. दुपारच्या जेवणात मस्त लुसलुशीत गरम पुरणपोळी, स्वतः ताटात वाढत होती. “भरपूर खा.” असे वारंवार सांगत होती. मायेने खाऊ घालणारी आई , खूप वर्षांनी आज आम्हाला पुन्हा गवसली होती. जेवता जेवता उखाण्यात नाव घेण्याचा खेळ मस्तच रंगला. सर्वांना ती शाबासकीची थाप देत होती. कौतुक करणारी असते ती आईच !

‘आई’ प्रभाताई शिर्के

जेवणावर ताव मारून आम्ही साऱ्या थोड्या सुस्तावलो होतो. कुणी जमिनीवर अंग टाकले होते तर कुणी झोपाळ्यावर झोके घेत होते. काही जणी ऑफिसचे दिवस आठवून, प्रत्येक जणी आपापल्या मैत्रिणींच्या आठवणी सांगत होत्या. अगदी सगळ्या जुन्या मैत्रिणी, त्या दिवशी नावासकट डोळ्यासमोर उभ्या राहात होत्या.

संध्याकाळचा चहा आटोपून, सगळ्याजणी वनपीस ड्रेसअप करून, पुढील खेळ खेळायला तयार झाल्या होत्या. सगळ्या अगदी टवटवीत दिसत होत्या. आईच्या हातचा प्रेमाचा घास, लेकीचे सौंदर्य खुलवून जातो, हे जाणवले होते. आमच्या नाच-गाण्यात आईसुद्धा मिसळून गेली. मंदारने आम्हा सर्वांचे सुंदर शूटिंग केले होते. म्युझिक साऊंडच्या तालावर सगळ्या अगदी मनमुराद थिरकत होत्या. “जय, जय शिवशंकर !” या गाण्यावर तर अलकाने सुंदर डान्स चे प्रदर्शन केले. ‘झिंगाट’ गाण्यावर तर सगळ्या मनमुराद नाचल्या. मनावर असलेला ताण- तणाव त्या क्षणाला, कुणाच्याही पटलावर भासत नव्हता. सारं विसरून, स्वतःत मंत्रमुग्ध झाल्या होत्या. आईच्या मायेत विसावून मौजमजा लुटून घेत होत्या.

‘लोकमत सखी’ च्या चित्रा गायकवाड आणि त्यांची मैत्रीण सुद्धा आमच्या ‘फूल टू धमाल’ ग्रुपला  सामील झाल्या होत्या. खेळात सामील होऊन, “आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनी आकार ॥”
हे गीत गाऊन सर्वांच्या मनी, आईच्या आठवणी जाग्या केल्या होत्या.

परत फिरण्याची वेळ जवळ येऊ लागली. सर्वांची आवराआवर सुरू झाली होती. खाली येताच खमंग बटाटा वड्याचा वास पसरला होता. प्रेमाने भरलेला चहा, आम्ही पुन्हा प्यायलो. जड अंतकरणाने आईचा निरोप घेण्याची वेळ नजदीक होती.

“माहेरवाशिणच्या” आईची सोबत आम्हाला जेमतेम सात-आठ तास लाभली होती. पण त्या सोबतीत सात जन्माची माया मिळाली होती. जणू आम्ही सासरी निघालो आहोत, असेच ते दृश्य होते. आईच्या डोळयात पुन्हा अश्रू भरून आले होते. THANKS असा शब्द, त्या दिवशी आमच्या कुणाच्याही कोशात नव्हता. कारण आई आपल्या मुलींच्या भावना स्पर्शातून जाणून घेत असते. लेकीची एक मिठी, आईला सर्वकाही सांगून जाते. आम्ही आईला ठेवून चाललो आहोत, हया भावनेने प्रत्येकीचे डोळे ओलावले. कंठ दाटला. सर्वांचं मन जड झाले. दिवसभर आईचा सहवास कसा वाटला, हे सांगताना सर्वांचे डोळे पाणावले होते. वर्षा भाबल, स्मिता, वनिता आणि कधीही भाषण न करणारी आमची मसंद, शुभदा, सुरेखा यांनी केलेल्या शब्द सुमनांनी आईचे, आणि सर्वांचे डोळे परत परत भरून येत होते.

स्वतः ला सावरत, खमंग वडा-पाव अशी भेट, सोबत ममतेच्या हुंदक्यात ओघळलेले आईचे अश्रू, प्रत्येकीने शिदोरीत बांधून घेतले. “जाताना वाटेत भूक लागेल तेव्हा, आठवणीने खा.” असे फक्त आणि फक्त आईच हक्काने सांगू शकते. हृदयाच्या कप्प्यात आईच्या मायेचा साठा घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, ते परत कधी येता येईल याचाच विचार करत….

वर्षा भाबल.

– लेखन  : सौ. वर्षा भाबल
– संपादन : अलका भुजबळ. ☎️9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. धन्यवाद ! लीना मॅडम.
    तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, पुरुष लग्नानंतर स्वतःचे बालपणीचे घर सोडून दुसऱ्या घरी जात नाही. त्यांचे कोडकौतुक नेहमीप्रमाणे होतच असते. त्यामुळे अश्या कौतुकाचे नाविन्य त्यांना नसावे. असे वाटते.
    खूप छान प्रश्न आहे तुमचा !

    वर्षा भाबल.

  2. लिना मॅडम तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, पुरुषांना लग्नानंतर स्वतःचे बालपणातील घर सोडून दुसऱ्या घरी जावे लागत नाही. त्यांचे कोडकौतुक नेहमीच होत राहते. त्यामुळे अश्या गोष्टी त्याना नवख्या नाहीत.
    धन्यवाद लीना मॅडम !

  3. खुप खुप छान लेख. वर्षा, अलका तुमच्या पुढच्या ट्रीपपूर्वी मला सांगा हं, मी पण येईन तुमच्या बरोबर. अस “माहेर” आपल्याला, महिलांना, हव असत जिथे सगळी बंधने सहजतेने दूर करता येतात. लेख अतिशय आवडला. प्रतिसादाला उशिर होत आहे. 🙏 पुरूषांना अस का वाटत नाही हा विचार मात्र मनांत आला. उत्तर मिळेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments