आम्ही यवतमाळकर मनाने एकदम साधेभोळे वगैरे आहोत असं मी अजिबात म्हणणार नाही पण प्रेमाचा ओलावा, आपुलकी नक्कीच आहे….सांगताहेत यवतमाळच्या माहेरवाशीण वर्षा हेमंत फाटक..
“होनबे, करतोनबे, काऊन असा बोलून राह्यला “अशी भाषा म्हणजे वैदर्भीय भाषा असा बऱ्याच शहाण्या लोकांचा समज आहे आणि काही सिरियलवाल्यांनी या गैरसमजाला भरपूर खतपाणी घातले आहे.
पण मला वाटतं कि भाषेला प्रदेशाचं बंधन नको. ही भाषा उत्तम, ती भाषा वाईट असं काही नको. मराठी असे माझी मायबोली हेच अंतिम सत्य !!
यवतमाळ हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आजूबाजूच्या गावांना रस्त्याने जोडले गेलेले आहे. आम्ही यवतमाळकर मनाने एकदम साधेभोळे वगैरे आहोत असं मी अजिबात म्हणणार नाही पण प्रेमाचा ओलावा, आपुलकी नक्कीच आहे.
यवतमाळला मेडिकल काँलेज, इंजिनिअरिंग काँलेज, पाँलिटेक्निक काँलेज जे खूप जुने आणि प्रख्यात आहे. आयुर्वेदिक काँलेज पण उत्तम आहे. तिथली कन्या शाळा काटे बाईंच्या नावाने फेमस होती. त्या शाळेत प्रत्येकी एक तुकडी मुसलमान मुलींची होती. माझ्या वर्गात पण नजिमा आणि यास्मिन या दोन मुसलमान मुली होत्या. नजिमा तर माझी पहिली पासूनची मैत्रीण होती. अभ्यंकर कन्या शाळा, विवेकानंद आणि राणी लक्ष्मीबाई ह्या शाळा खूप चांगल्या आहेत. आर्ट आणि काँमर्स साठी दाते, तर सायन्सकरता अमोलकचंद विद्यालय आहे. आता तर भरपूर शाळा निघाल्या आहेत.
सांगायला अभिमान वाटतो कि गझल सम्राट भाऊसाहेब पाटणकर हे आमच्या यवतमाळचे !!

यवतमाळला पाणीपुरवठा करणारं निळोणा धरण बऱ्यापैकी मोठ आहे. आमच्या शाळेची पिकनिक दर 2/3 वर्षांनी तिथेच जायची. मज्जा यायची खूप. आई धपाटे करुन द्यायची. शाळेकडून कधीतरी पाँपकाँर्नचं पाकीट मिळायचं.
थोडं समोर आलं कि जगतमंदीर आहे. तिथे राधाकृष्ण, रामसीता आणि शंकर-पार्वतीच्या संगमरवरी मुर्त्या आहेत. देखणं मंदिर आहे हे पण. कोणी पाव्हणे आले कि आम्ही सकाळी उठून तिथे फिरायला जायचो. बाजूलाच संकटमोचन मंदिर आहे. चारीही बाजूंनी भरपूर हवा सुटायची. नुसत बसलं तरी प्रसन्न वाटायचं.
यवतमाळातकर मुळातच भाविक. इथले दत्त मंदिर तर खूप जुने आहे. तसच आडवठी बाजाराजवळ शीतलामातेचं मंदिर आहे. रामाचं मंदिर माइंदे चौकात आहे. महादेवाचे हेमाडपंथी मंदिर तर फार सुरेख आहे.
श्रावणात तर तिथे दर सोमवारी छोटीशी यात्रा भरायची.
आमची शाळा पण 12 च्या ऐवजी 10 लाच सुटायची. मग काय सगळ्याजणी मंदिरात जायचो. खडीसाखर खात खात रमतगमत घरी यायचो. कधी कधी टांग्यात बसून घरी यायचो. पोळ्याच्या दिवशी मात्र खूप मोठी जत्रा भरायची. 200/300 दुकान असायचे. बाहुल्या, गाड्या, रंगीबेरंगी लाकडी खेळणी, स्टीलच्या खेळभांड्यांचा सेट, क्रिकेट ची बँट, फुटबॉल, छोट्या मुलांच्या सायकली, फ्रेम,फ्लॉवरपाँट, फुल, तोरण सगळं असायचं. बाबा मला दरवर्षी घेऊन जायचे.
आता यात्रा नाही, पोळा नाही काहीच नाही. आमचे दूधवाले काका त्यांच्या बैलजोडीला घेऊन घरी यायचे. आम्ही त्यांची पूजा करायचो. बैलपोळ्याला लहान मुले घरोघरी जात असत.
बैलगाडी वरुन आठवलं. यवतमाळचा शंकरपट फार प्रसिद्ध होता. आजूबाजूच्या गावातून खिल्लारी बैलांच्या जोड्या शेतकरी आणायचे. जोरदार शर्यत असायची. लाऊडस्पीकरवर काँमेंट्री व्हायची. 2 दिवस चालायचं हे सगळं. बाजोरीया नगरच्या मोठ्या पटांगणात ही शर्यत असायची. आता सगळं बंद पडलं.

यवतमाळात तेव्हा अप्सरा, सरोज आणि शाम अशी तीन टाँकिजेस होती. नंतर एक संदीप टाँकिज निघालं होतं. पण नंतर ते बंद पडले. मला वाटतं आता फक्त अप्सरा टाँकिज सुरू आहे. मला आठवतं तेव्हा रांगेत उभं राहून तिकीट काढाव लागायचं. सिनेमा लागायच्या आधी रिक्क्षा किंवा टांग्यातून जाहिरात व्हायची. सिनेमातली गाणी लागायची. जुने सिनेमे पण लागायचे. तसंच सर्कस आली की सगळी जण पहायला जायचो.
आझाद मैदानात मीनाबाजार लागायचा. मग काय आकाशपाळणा, मेरी गो राऊंड मधे बसायचं. मला अजूनही नागकन्या/देवकन्याचं आश्चर्य वाटतं. त्यांचा फक्त चेहराच पाळण्यात ठेवलेला दिसायचा, बाकी काहीच नाही दिसायचे आणि त्या डोळे फिरवायच्या. बोलायच्या पण. अजूनही माझ्यासाठी ते नवल आहे. बाजूलाच “मोत का कुंवाँ” असायच.(अशीच पाटी असायची). एक माणूस गरगर मोटरसायकल वरुन खाली, खालून वर न्यायचा. ते मात्र खरं असायचं. बाजूला बुढीचा चिवडा मिळायचा. मटकीची उसळ टाकलेला तो चिवडा भन्नाटच लागायचा. आत्ताही तोंडाला पाणी सुटलं.
मेन लाईनीत बजरंग सोडा फँक्टरी होती आणि बाजूला भारत सोडा फँक्टरी. तिथली पंजाबी कुल्फी लईच भारी ! आणि आईस्क्रीम, लस्सीपण. बाबा आणि मी तर काही आणायला त्या भागात गेलो कि आईस्क्रीम लस्सी तर प्यायचोच. आता मला वाटतं दोन्ही दुकान नाहीत.
तसंच सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री एक ताज कुल्फीवाला हिंडायचा. 50पैसे,1 रु आणि 2 रु ची कुल्फी त्याच्याकडे असायची. उन्हाळ्यात रोज रात्री आम्ही काँलनीतले सगळेजण गच्चीवर बसून ती कुल्फी खायचो.
यवतमाळला भारीच्या महाराजांची समाधी आहे. काशीकर महाराज म्हणत त्यांना. मी स्वतः त्यांना बघितलं आहे. एकदा नक्की जा तिथे. चांगलाच अनुभव येईल. यवतमाळच्या आजूबाजूला लोहारा, मंडदेव, कळंब आणि ढुमणापूर अशी बरीच देवस्थान आहेत. कळंबला तर स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे. दर बारा वर्षांनी गंगा तिथे अवतरते. गाभारा सगळा पाण्याने भरून जातो. जवळजवळ 8/10 दिवस गाभारा पाण्याने भरलेला असतो. मग ते पाणी आपोआप ओसरतं.
पाण्यावरुन आठवलं. आम्ही लहान असतांना चोवीस तास नळाला पाणी यायचं. आता मात्र हाल आहेत. 10/15 दिवसांनी पाणी येतं. ते पण 4/5 तासच ! रस्ते पण खड्डयात गेले आहेत. पावसाळ्यात तर वाटतं आपण एखादी होडी विकत घ्यावी !
का दुर्लक्षित राह्यलं काय माहित ? नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावतीच्या मानाने यवतमाळ मागेच पडलं. रेल्वे लाईन नसल्यामुळे असेल कदाचित !

– लेखन : वर्षा हेमंत फाटक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
लहानपणी च्या आठवणी दाटून आल्या। Yavatmal is Yavatmal
यवतमाळचे छान वर्णन केले आहे. यवतमाळला न जाता सगळं गांव डोळ्यापुढे उभे राहिले.
अप्रतीम वर्णन. यवतमाळला जाऊन प्रत्यक्ष भटकंती करायची उर्मी दाटून आली.
Varsha vahini khup sundar varnan ahe. Short but complete.
छान लिहिले आहे
वर्षा फाटक, आम्ही यवतमाळकर , वाचून छान वाटले.
व्वा!….यवतमाळला प्रत्यक्ष गेल्याचा भास झाला…..
यवतमाळचे रेखाटन अप्रतिम