इतक्या वर्षांनी अजुनहि भारत माझे माहेर व जन्मभूमी तर यु.के. माझे सासर व कर्मभूमी ही भावना मनांत दृढ आहे…..सांगताहेत तिथे ५० वर्षांपासून रहात असलेल्या सौ लीना फाटक…..
आम्ही युकेत रहाणारे म्हणून आम्ही युकेकर. लंडनपासून जवळ जवळ २०० मैल लांब आहोत. लंडनला फक्त १० महिने राहिलो. स्काॅटलंडमधे लार्गज् व साॅल्टकोटस् या गावी ७/८ वर्ष, वेल्समधे क्लानडुडनो व डिगानवी येथे ८/९ वर्ष आणि उरलेली इंग्लंडमधे वाॅरिंगटन या गावी.
हे ३ प्रदेश व नाॅर्दन आयर्लँड मिळून यु.के. होतो. म्हणून मी स्वत:ला “युकेकर” म्हणवते.
लार्गज् सुंदर टुमदार, माझ लाडकं गांव. यु.के. मध्ये पहिल वास्तव्य तिथे. तिथले वाॅर मेमोरियल, समोर दिसणारे “आरन्” नांवाचं बेट, रमणीय वाटतं. ग्लासगोपासून साधारण ५० मैल पश्चिमेकडे समुद्र किनारी.

बजेट एयरलाइन्स सुरू होण्याआधी सुट्टीसाठी ही गावे प्रसिद्ध. लार्गज् येथे एका पबमध्ये १०० च्या वर, वेगवेगळ्या जगप्रसिद्ध स्काॅटीश व्हिस्की मांडून ठेवलेल्या आहेत.

साॅल्टकोटस्, लार्गज् पासून १५ मैल दक्षिणेला. त्यामानाने थोडं कमी दर्जाचं. खिशाला परवडणारं. उन्हाळ्यांत तिथे दरवर्षी जत्रा भरायची.
साॅल्टकोटस् येथे पूर्वी मिठागरं होती. म्हणून हे नांव दिलं. आम्ही तिथं जास्त राहिलो.

वेल्समधली दोन्हीहि गावं समुद्रकाठी व लोकप्रिय. सुट्टीत खुप लोक येतात. हाॅटेल्सच्या रांगाच रांगा आहेत. इकडच्या लोकांना समुद्राचे प्रचंड आकर्षण त्यामुळे रिटायर्डमेंट नंतर इथे स्थायिक व्हायचं हे आजुबाजुच्या बहुतांशी लोकांच स्वप्न. म्हणूनच वयस्कर लोक पण खुप आहेत. क्लानडुडनोला “God’s waiting room” असं म्हणतात. त्याला लागून असलेल्या काॅनवी गावातला जुना किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या भागाच्या कौंटी, नगरपालिकेचे ठिकाण. इथे पूर्वी कल्चर्ड पर्लस् तयार केले जायचे.
वाॅरिंगटनला विशेष महत्त्वाचे असे कांही नाही. पण राहायला चांगले. व इथे पण “गोल्डन गेट आहे बर का ! इथली रग्बीची टीम व त्यांचं क्रिडांगण प्रसिद्ध. लिव्हरपूल व मॅंचेस्टरच्या मधे वाॅरिंगटन. दोन्हीला जोडणारा शिप कॅनॉल वाॅरिंगटन मधून जातो. मॅंचेस्टरच्या कापड गिरण्यांचा माल यांतून लिव्हरपूलला जायचा व तिथल्या बंदरातून जगभर पुढे जायचा. चेस्टर हे पण खुप सुंदर एैतिहासिक रोमन् शहर, इथून ३० मैलांवर. चे शायर कौंटीची राजधानी.

वाॅरिंगटनच्या आजुबाजुला मोटरवेजचे जाळे. वाॅरिंगटनला राहून लोक आजुबाजुच्या २५/३० मैलांवर कामाला जातात.
या देशाला निसर्गाचा वरदहस्त आहे. झारीनी पाणी घालावे तसा १२ महिने कधीही पाऊस पडतो. त्यामुळे सगळीकडे हिरवेगार गालीचे पसरले आहेत असे वाटतं. त्यांत ऋतु प्रमाणे हिरव्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा दिसतात. “स्प्रिंग” मधला कोवळा हिरवा, तर “समर” मधला भरगच्च फुलांआड लपलेला गर्द हिरवा. आणि, “आॅटम्” मधे तर, अहाहा, हिरव्यातून डोकावणारा शेंद्री, लाल रंग तर अतिशय विलोभनीय असतो. असं वाटत, की पान-गळतीच्या आधी, जणू सगळी शक्ती एकवटून पाने रंगांची उधळण करतात, मगच थंडगार झालेल्या धरतीला ऊब देण्यासाठी तिच्या कुशीत शिरतात व आत्म समर्पण करतात.
“विंटर” मधे सूचीपर्णी वृक्ष गर्वाने उंच मान करून उभे असतात. त्यांच्या हिरव्यगार पानांवर पांढऱ्याशुभ्र बर्फाची रांगोळी प्रेक्षणीय वाटते.
ऋुतुंप्रमाणे प्रत्येक प्रांतातहि वैविध्य आहे. स्काॅटलंडमधला “बेन नेव्हिस” माउंटन व “हायलंड” भागातला रगेडनेस, “लाॅक लाॅमंड”, खुप मोठ्ठ सरोवर, व तिथला तथाकथित ” नेसी” नांवाचा माॅनस्टर, इंग्लंड मधल्या, बऱ्याच टेकड्या व सरोवरे असलेल्या “लेक डिस्ट्रीक” मधला, वर्डस्वर्थ सारख्या कवीमनाला भुरळ घालणारा रम्य निसर्ग, याॅर्कशायर डेल्स, चेद्दर गोर्ज, तर वेल्स मधल्या स्नोडेन पर्वतांच्या रांगांचे सौंदर्य काही वेगळेच.

नाॅर्दन आयर्लँड मधला “जायंट काॅजवे”. आयर्लँडला तर पांचूचे बेट म्हणतांत. हि सगळी नैसर्गिक, खुप सुंदर प्रेक्षणिय स्थळे आहेत. बाकी मानव निर्मित पॅलेसेस, म्युझियमस् मोठमोठाली शहरे, चर्चेस व जुने कॅसलस्, तसेच सुबक रचनेची छोटी छोटी गावे हे जगप्रसिद्ध आहेच. ह्या सगळ्याबद्ल किती लिहावं तितकं थोडच आहे.
प्रांतानुसार लोकांचे स्वभाव वैशिष्ट पण वेगवेगळे. इंग्लंडमधले लोक खुप अदबीनी बोलणारे. निदान दोन शब्द बोलल्या शिवाय पुढे न जाणारे. पण खुप ओळख झाल्याशिवाय घरात प्रवेश मिळणार नाही. स्काॅटीश लोक मनमोकळे, स्वागत करणारे पण पैशांच्या बाबतीत काटकसरी. आर्थिक सुबत्ता नसेल तर काटकसर रक्तांत भिनते असं मी म्हणीन. वेल्स लोक त्यांच्या भाषेचा, संस्कृतीचा अभिमान असणारे. सर्व शिक्षण फक्त वेल्स भाषेतून करता येईल अशा स्वतंत्र शाळा आहेत. प्राथमिक शाळेपर्यंत भाषा शिकावीच लागते. भरपूर साहित्य त्या भाषेत आहे. इंग्लिश भाषेसहित सर्वत्र बोलली पण जाते.
स्काॅटीश लोकांची “गेलीक” भाषा मात्र आता फारशी बोलली जात नाही. आयरीश लोकांचा तसा फारसा संबंध आला नाही. पण ते फ्रेंडली आहेत. कॅथलिक व प्राॅटेस्टंट यांच्यात सतत चालू असणाऱ्या भांडाभांडीतहि आनंदी असतात. तिन्ही प्रांतात इंग्लिशच बोलली जाते. पण उच्चार मात्र सगळ्यांचे वेगळे. सुरूवातीला कळणे अवघडच. आता सवयीने हा मॅंचेस्टर, ग्लासगो, का वेल्श उच्चार ते समजते.
वेल्श लोक इंग्लिश बोलतात ते एैकायला खुप गोड वाटतं. इंग्लिश लोकांवर मात्र इतर तिन्ही प्रांतियांचा खुप राग. चुकुनहि इंग्लिश म्हणलेले त्यांना अजिबात आवडत नाही. जगावर राज्य केलं ते इंग्लिश लोकांनी. इतर प्रांतियांना त्यांनी समान हक्काने कधी वागवले नाही. त्यामुळे त्यांच्यावर राग. आम्हां “परदेशींशी” सगळेच चांगले वागतात. मला व कुटुंबीयांना, वैयक्तिक वाईट अनुभव फारसा आला नाही.
कामाच्या व इतर बाबतीत वंशभेद किंवा विषमता थोड्याफार प्रमाणांत नक्की जाणवते. पण ते प्रत्येक देशांत ठिकठिकाणी, दिसतेच. महाराष्ट्रातहि आप-पर प्रांतिक विषमता दिसतेच.
बाकी इतर यु.के. ची लांबी-रूंदी, लोकसंख्या वगैरे माहिती गुगलतज्ञांना काही सेकंदात मिळेल.
१९४५ पासून इथल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन खुप सुधारलं. नॅशनल हेल्थ सर्व्हिसमुळे सर्वांना मेडिकल ट्रीटमेंट व सोशल सर्व्हिसेसमुळे शालेय शिक्षणहि मोफत मिळू लागले. तसेच लोकांना राहायला घरे बांधली गेली. कमी पगार किंवा नोकरी मिळेपर्यंत आर्थिक मदत मिळू लागली. टॅक्सेस वाढले पण जीवन सुखावह झालं. यामुळे दोन्ही महायुद्धांनंतर आलेला देशाभिमान वाढला.
२४ तास वीज, पाणी, गॅसच्या पाईपलाईन्स, अंडरग्राउंड ड्रेनेज ह्या सोयी सगळीकडे उपलब्ध झाल्या. मला याचं तेंव्हा फार अप्रुप वाटायचं. विशेष म्हणजे या सर्व सोयी प्रत्येकाला मिळतात. मग तो कुठल्याही देशातून व कितीहि कालावधी साठी आलेला असो. मिलीटरी सोडून इतर सर्व अधिकार नागरीक म्हणून प्रत्येकाला आहेत. सिटिझनशिप घ्यावी लागत नाही. त्यामुळेच सर्वांचा ओढा यु.के. त यायचा असतो. म्हणूनच माझ्यासारखे फक्त ५ वर्षांसाठी आलेले अर्ध शतक झालं तरी इथेच राहातात. आणि कंपनीतर्फे दोन वर्षांसाठी आलेली सद्ध्याची तरूण पिढी देखील हळूहळू आपले पाय इथे पक्के रोवतात.
एवढ्या कालावधीत यु.के. मधे सुद्धा खुप बदल झाला आहे. काही चांगला तर काही मला न पटणारा. मायक्रोचीपस् मुळे टेक्नाॅलाॅजीत जगभर प्रगती झाली आहे. दळण-वळण व परदेशी चलनातील क्षमता चांगलीच वाढलीय.
आम्ही आलो तेंव्हा भारत सरकार, १४ रूपयाला एक पाऊंड या दराने फक्त तीन पाऊंड प्रत्येकी बाहेर नेऊ देत असे. दळण-वळणाच्या प्रगतीमुळे जगाच्या एका कोपऱ्यांतली वस्तु अॅमेझाॅन सारख्या कंपन्या दारी आणुन देतात. आम्ही साधा चपाती आटा, तांदूळ इत्यादी, ५० मैलांवरून आणत असू. खाद्यपदार्थासकट सगळ्याचीच आता रेलचेल झालीय.
यु.के. खऱ्या अर्थाने आंतर-देशी, भाषी, धार्मिक व सांस्कृतिक झाला आहे. साॅल्टकोटस् मधे आम्ही एकटे भारतीय. मराठी तर अशक्यच. वाॅरिंगटनला आल्यावरसुद्धा २०/२५ मैलांच्या परिसरांत मराठी कोणी नव्हते. आता कंपन्यांतर्फे येणारे तरूण लोक ग्रुपनी येतात. आमच्यासारखं त्यांना “एकटे” वाटत नाही. पण — इथले कारखाने बंद पडत आहेत. तिथे अॅप्रेंटीसशिप करून काॅलेजमधे शिक्षण घेतां यायचे. खुप थोडेजण काॅलेज/युनिवर्सिटीत जायचे. उत्तम दर्जाचे, अनुभवी कामगार तयार होत असत. नुसत्यां पुस्तकी ज्ञानापेक्षा ही पद्धत शतपटींनी चांगली. आत्ताचे पदवीधर भरपूर कर्जाचा भार घेऊन शिक्षण पूर्ण करतात. मागून ते फेडावेच लागते.
फार ईस्ट कडून येणारा माल कमी दर्जाचा, २/३ वर्ष टिकतो. दुरूस्ती न परवडणारी. त्यामुळे अशा वस्तुंचे इथे डोंगर तयार झाले आहेत. घरे विकत घेणे परवडत नसलेल्यांसाठी नगरपालिकेची घरे भाड्यानी मिळायची. ती पण कमी झाली. श्रीमंत लोकांना छान धंदा मिळाला. गरीबांची मात्र ओढाताण होते.
उद्योजक इथल्या तरुणांना ट्रेनिंग देण्यापेक्षा इतर देशातून कामगार आणू लागले. वंशवाद वाढायला सबळ कारण मिळाले. या गोष्टी मला पटत नाहीत. थोड्याफार प्रमाणांत असे जगभर चालू आहे याचे मात्र वाईट वाटते.
कोणतेहि काम कमी दर्जाचे न मानणे, वरिष्ठ अधिकारी असून त्यांत वृथा अभिमान न मानता, कामावरहि स्वत:चे काम स्वत: करणे, पुरातन गोष्टी जतन करणे, स्वच्छता, टापटीप, शिस्त असे कितीतरी गुण या लोकांकडून घेण्यासारखे आहेत. मन लावून काम करणे व संपले की तितकीच मजा करणे हा यांचा स्वभावधर्म. मला आवडल्या, पटल्या तितक्या चांगल्या गोष्टी आत्मसात करून मुलांना पण तसे प्रोत्साहन दिले. तसेच, माझ्या लहानपणापासून आई-वडील व सर्व श्रेष्ठ जनांकडून मिळालेली भारतीय संस्कृतीची बहुमोल नैतिक मुल्ये आचरणांतुन जपली व मुलांपर्यत पोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचे पडसाद नातवंडांत उतरले आहेत हे बघून मनाला खुप समाधान वाटतय.
इतक्या वर्षांनी अजुनहि भारत माझे माहेर व जन्मभूमी तर यु.के. माझे सासर व कर्मभूमी ही भावना मनांत दृढ आहे. भारतीय स्त्रीचा माहेरचा ओढा कधीही कमी होत नाही. पण सासरही तिचे, तिनीच घडवलेले असते. म्हणून ते तिचं स्वत:चं, हक्काचं असतं. मनाची ओढ असली तरी पाय वळत नाहीत.
कधीकधी “धोबीका कुत्ता” आहोत असं वाटतच, पण ते थोड्या वेळापुरतच. चांगलं व वाईट हे प्रत्येक माणसात, राष्ट्रांत, धर्मांत, व संस्कृतीत दिसतेच. माणसाचे स्वभाव-वैशिष्टयांचे सर्व कंगोरे सगळीकडे बघायला मिळतात.
कारण काहिही असो, मानवी स्थलांतर पूर्वीपासून सुरू आहेच. ज्याला जिथे आवडेल, रूचेल व सौख्य मिळेल तिथे तो स्थिर होतो. म्हणूनच बी.बी.सी.चे प्रसिद्ध मार्क टुली, भारतांत सुखेनैव रहातात तर माझ्या सारखे काही यु.के.कर होऊन आनंदी असतात आणि, मला जशी माझ्या “माहेरची ओढ” कायम असेल तशीच मार्क टुलींना पण त्यांच्या “माहेरची ओढ” नक्कीच असेल याची खात्री आहे. 🙏🙏🙏

– लेखन :सौ. लीना फाटक, वाॅरिंगटन, यु.के.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, +91 9869484800
खूप सुंदर यु.के. चं वर्णन वाचून मजा आली .सर्व फोटोही खुपच सुंदर .घरबसल्या लंडनची ट्रीप झाली.
खुप खुप धन्यवाद। लीनाताई 🙏🙏🙏🙏
आशाताई कुंदप, बंडू दाते, व दिलीप खन्ना तुम्हासर्वांना खुप खुप धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे देवेंद्रजी यांनी मला ही संधी तर दिलीच पण लिहिण्यास लागणारे प्रोत्साहन दिले. मला ते फार महत्त्वाचे वाटले. खुप आभार देवेंद्रजी. असाच लोभ असू दे.
ओघवती भाषा. मन यु.के.त पोचलं. छान, सुंदर सुरेख
खुप धन्यवाद चंद्रकांत बर्वे व गौरी जोशी-कंसारा. असाच लोभ राहो.
खूपच छान वणँन वाचलयावर तिथे यावसे वाटते तुमचै आशीवाँद असलाया स यैऊ
तुमचै दोघातफेॅ अभिनंदन.माझया मराठित चुका झालाया स क्षमसव
लीनाताई, तुमचं अभिनंदन व कौतुक 👌एवढ्या लांब असूनही तुम्ही मराठीपण जपत आहात, आपली संस्कृती नातंवंडात रुजवत आहात, आणि खास करून मराठीपण जपत आहात 🙏
लीना ताई, आपला लेख अतिशय सुंदर आहे. तेथील पर्यटन स्थळांबद्दल आपले लेखन माहितीपूर्ण आहे. मला सगळ्यात अधिक भावलं ते म्हणजे कितीही वर्ष परदेश वास्तव्य केलं तरी एक पाय नेहमी भारताच्या उंबरठ्याच्या आत असतो आणि तो नेहमी तिथेच रहावा असंही वाटतं. मला अमेरिकेत येवून १५ वर्षे झाली, मात्र तेंव्हा जग बरेच जवळ येत असल्याने आपल्या मानाने आमचे जीवन बरेच सोपे होते. आपण त्याकाळात सांस्कृतिक, मानसिक किती संघर्ष केला असेल ह्याची कल्पना मी करू शकते.
आपण वर्णिलेली शंका ‘ धोबी का कुत्ता ‘ देखील अत्यंत सत्य आहे. मी देखील त्याचा अनुभव घेते.
मात्र सरतेशेवटी माणुसकीचा असा एखादा रंग दिसतो की जन्मभूमी आणि कर्मभूमी वर सारखीच माया जडते.
काय योगायोग आहे…कालच्या माझ्या कवीवर्य केशवसुतांच्या लेखात मी उल्लेख केला आहे, तीच चरणे पुन्हा लिहिते…
‘ जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत…’
अतिशय सुंदर लेख, आपले मनापासून आभार🙏🏻
लेख वाचून छान वाटलं