आम्ही गेली जवळ जवळ १५/१६ वर्षे अमेरिकेतील लुईव्हील येथे राहतोय. पहिलं १ १/२ वर्ष सोडलं तर बाकी सर्व वर्षे लुईव्हील मध्येच आहोत.
लुईव्हील हे जरी केंटकी राज्याचं राजधानीचं शहर नसलं तरी केंटकी मधील सर्वात मोठे शहर आहे. पूर्वीच्या मानाने आता भारतीय जनसंख्या ही पुष्कळ आहे.
लुईव्हील हे प्रचंड मोठ्या अशा ओहायो नदीवर वसलेले शहर. ऐतिहासिक वारसा लाभलेले. अमेरिकन स्वातंत्र्यानंतर जवळपास २५ वर्षानंतर फ्रांस कडून अमेरिकेने आत्ताच्या टेक्सास पासून ते कॅनडापर्यंत बराच मोठा भूभाग घेतला. त्याची पहाणी करायला ‘रॅाबर्ट क्लार्क’ आणि ‘मेरीवेदर लुईस’ अशी जोडगोळी आली. त्याच लुईस च्या नावावरून ‘लुईसव्हील’ असे या शहराचे नामकरण झाले व ओहायोच्या पलिकडील शहराचे क्लार्क यांच्या नावावरून ‘क्लार्क्सव्हील’ असे नाव झाले. पण गंमत म्हणजे क्लार्क्सव्हील इंडीयाना राज्यात तर लुईव्हील केंटकीत, मधे फक्त ओहायो नदी.
इथले लोकं त्यांच्या टीपिकल ॲक्सेंट मधे लुईव्हील असा उच्चार करतात. लुईसव्हीले म्हटलं तर त्यांना काही कळणार नाही.
आम्हाला दोन्ही शहरात रहायला मिळाले. लुईव्हील च्या मानाने क्लार्क्सव्हील फारच लहान आहे. पण अमेरिकेतील आमचे प्रथम वास्तव्य तिथे झाल्याने आजही ते मनाच्या खूप जवळ आहे.
केंटकी भरपूर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. तसे डोंगराळ आहे. टेकड्या, वळणावळणाचे रस्ते, प्रचंड वृक्षसंपदा, विस्तिर्ण शेते यांची अक्षरश: लयलूट आहे. वर्षातले चारही ऋतू येथे पहावयास मिळतात.
मेपल, ओक, डॅागवूड ची झाडे भरपूर असल्याने स्प्रिंग मध्ये फुलांचा सुंदर नजारा तर, फॅालमधे हळद कुंकवासारखी लालचुटूक व पिवळी, केशरी पाने बघायला मिळतात. समर मधे सर्वत्र हिरवागार शेला पांघरला जातो आणि विंटरमधे तोच पांढरा शुभ्र असतो. अर्थात इथे बर्फ, उत्तरेकडील राज्यांच्या मानाने तसा कमी असला तरी कधी कधी १/२ ते २ फूटापर्यंत सुद्धा पडतो.
लुईव्हील मधे भरपूर पार्क्स आहेत. त्यातील काही सपाट जमिनीवर तर काही डोंगर टेकड्यांवर वसलेली आहेत. काही आरक्षित जंगले देखिल आहेत. या सर्व पार्क्समधून, विशेषत: टेकड्या असलेल्या पार्क्समध्ये स्लेडींग करायला खूप लोक जमतात. बर्फाच्छादीत टेकड्यांवरून घसरत जाण्याचा आनंद मनाला प्रसन्न करून जातो.
लुईव्हीलमधे जगप्रसिद्ध हॅार्सरेस होते. संपूर्ण जगभरातून बडे बडे अमिर उमराव वर्षातून एकदा त्यासाठी इथे येतात. पाण्यासारखा पैसा ओतला जातो. याची सुरवात म्हणून लुईव्हीलमध्ये मोठा एअर शो केला जातो. यात लढाऊ विमाने व फटाक्यांची नयनमनोहारी रोषणाई ओहायो नदीच्या पार्श्वभूमिवर केली जाते.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुप्रसिद्ध ओक्स व डर्बी होते. ओक्स चे वैशिष्ठ्य असे की यात फक्त महिला सहभागी होतात. म्हणजे स्त्रीजातीय घोडे व त्यांच्या घोडेस्वार सुद्धा स्त्रीया असतात. ती पहायला बायका मुली सुद्धा खास स्प्रिंग ड्रेसेस परिधान करून व विविध कलाकुसरीच्या हॅट्स् घालून जातात. विविधप्रकारच्या कलात्मक हॅट्सचे फार महत्व आहे.
लुईव्हील पासून ५० मैलावर लेक्सिंग्टन हे घोड्यांसाठीचे सुप्रसिदध ठिकाण आहे. इथे बरेच हॅार्स फार्म्स आहेत. ते ही फार प्रेक्षणिय आहेत. हिरव्यागार गवतावर धावणारे उमदे घोडे पहायला फार मौज वाटते.
लुईव्हीलमधे प्रसिद्ध डर्बी संग्रहालय ही पाहता येते. प्रत्येक शहरात डाऊनटाऊन हा एक भाग असतो, तसा लुईव्हील मधेही आहे. येथे मोठाल्या कंपन्यांची कार्यालये, वेगवेगळी रेस्टॅारंटस् सर्व नदीच्या पार्श्वभूमिवर उठून दिसतात.
मोठे केंटकी आर्ट्स सेंटर ही येथेच आहे. उस्ताद झाकीर हुसेन व पं.शिवकुमार शर्मांसारख्या दिग्गजांनी येथे हजेरी लावली आहे. यम ब्रॅण्डस् (केएफसी, पिझा हट, टाको बेल इत्यादी) यांचे मुख्य कार्यालय ही लुइव्हीलचेच. शिवाय ह्युमाना (आरोग्य विमा कंपनी) चे मुख्य कार्यालय ही लुईव्हील मधेच आहे. हजारो भारतीय येथे नोकरी करतात.
याच परिसरात युनिव्हर्सिटी ॲाफ लुईव्हील व सारी मोठी मोठी हॅास्पिटल्स ही आहेत. युनिव्हर्सिटीचे खास वैशिष्ठ्य म्हणजे त्याच्या कुलगुरु पदी सौ. निली बेंडापुडी या भारतीय महिला आहेत.
लुईव्हील मधे बहुतांश पगडा डेमोक्रॅट पक्षाचा आहे. निमा कुलकर्णी या आणखी एक भारतीय इथल्या आमदार आहेत. या दोन्हीही गोष्टी भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहेत.
डाऊनटाऊन मध्येच फोर्थ स्ट्रीट लाईव्ह हे तमाम तरुणाईचे आकर्षण आहे. डीस्कोच्या तालावर इथे असंख्य पावले थिरकतात. हे आकर्षण म्हणजे लुईव्हीलच्या नाईट लाईफ ची जान आहे.
शांत संध्याकाळी नदीच्या काठाकाठाने जलविहार करण्यासाठी, आरामात जेवत आजुबाजूचा नजारा निरखत, नदीवरचा वारा अंगावर झेलत नदीकाठी विहार करण्यासाठी ‘बेले ॲाफ लुईव्हील’ अशी सुंदर दिमाखदार, तीन मजली बोट आहे.
व्हिस्कीच्या शौकीनांसाठी इथेच तयार होणारी कंटाकी बर्बन अतिशय प्रसिद्ध आहे. ब्लॅण्टन्स नावाच्या बर्बनची बाटली सुद्धा अगदी आकर्षक असते व वरती घोड्याची छोटी प्रतिकृती असलेले झाकण असते.
$५० पासून ते $३५००० पर्यंत याची किंमत असू शकते.
पॅपी व्हॅन विंकल ही बर्बन दूर्मिळ व अतिशय महाग आहे. लोक ती घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावतात. ३८ डिस्ट्रीलरीजच्या परिसरातील बर्बन ट्रेल ही तमाम व्हिस्की प्रेमींची पर्वणी आहे. या ट्रेलवर वेगवेगळ्या व्हिस्की चाखायला तर मिळतातच शिवाय मौजमजा करत, ट्रेल ही करता येते.
लुईव्हीलमध्ये छोट्या मोठ्या जत्रा होतच असतात पण ॲागस्टमधे होणारी कंटाकी स्टेट फेअर प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते. मौज मजा मस्ती, खाणेपिणे, म्युझिक धमाल वातावरण असते. मुलांचे खेळ, छोट्या पोलीस गाड्या, छोटे फायर ट्रक ज्यात बसून बाळगोपाळ मंडळी अगदी खूष होऊन जातात. आजीबाईच्या गोष्टीतला भला मोठा भोपळा प्रत्यक्षात आला तर ? याच जत्रेमध्ये मध्ये केंटकीतील तंबाखू, मका, वेगवेगळ्या रंगाढंगाचे टोमॅटो, भले मोठे भोपळे, खास रानमध, अशी केंटकीतील शेती उत्पन्ने तसेच जर्सी गाईंचे देखिल प्रदर्शन असते.
लुईव्हील ला भारतीय वंशाचे अनेक लोक गेली कित्येक वर्ष राहतात. त्यामुळेच इथे फार मोठे व सुंदर देऊळ आहे. गणपती, दिवाळी, महाशिवरात्र असे अनेक उत्सव, नित्याच्या पूजाअर्चा देवळात होत असतात. अगदी होम हवन व रावणदहनही केले जाते. समस्त हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हे ठिकाण भावी पिढ्यांच्या दृष्टीने सांस्कृतिक केंद्रच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
हे सोडून इथे ३ स्वामी नारायण मंदिरे, नेपाळी देऊळ, गुरुद्वारा सुद्धा आहे. लुईव्हील तसेच केंटकी मध्ये अनेक मान्यवरांची पाळेमुळे आहेत. जगप्रसिद्ध राष्ट्रपती ‘अब्राहम लिंकन’ यांची केंटकी ही जन्मभूमी आहे. ‘थॅामस अल्वा एडीसन’ हा इलेक्ट्रीक बल्ब बनवणारा शास्त्रज्ञही लुईव्हीलला वास्तव्यास होता. त्याचे घर, त्याच्या वापरातील वस्तूंसकट आता सर्वांच्या दर्शनासाठी खुले आहे.
लुईव्हील हे जगप्रसिद्ध बॅाक्सर, ‘मुहम्मद अली‘ याचे माहेरघर, त्याच्या नावाचा रस्ता आणि मोठे सेंटरही येथे आहे..
लुईव्हील हे खरं तर निवृत्त लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. आता हे चित्र बदलतय कारण तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ‘बराक ओबामा‘ यांच्या भेटीनंतर हळुहळु हे शहर झपाट्याने मोठं होतंय. अनेक नवीन कंपन्या येथे आपले बस्तान बसवतायत. इथेही सर्व प्रकारचे भारतीय लोक आहेत आणि भारतीय जनसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.
निसर्ग सौंदर्यपूर्ण असं हे टूमदार गाव आता मोठ्ठ शहर होण्याच्या मार्गावर आहे. बदलतं हवामान, काही ठिकाणी जाणवणारा वर्णद्वेष असला तरीही आता सध्या लुईव्हील हेच आमचे घर आहे.
मनात अजुनही सतत भारताच्या, जन्मगावाच्या आठवणी रुंजी घालत असतात. परदेशी असल्याचे, आपल्या माणसांपासून दूर असल्याचे दु:ख मनात घोळत असते. अनेक सण समारंभ आमच्या उपस्थितीशिवाय होतात. तरीही इथेही आता नवी नाती निर्माण झाली आहेत. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा भारताला भेट देतोच.
आमच्या मनातला भारत इथेच निर्माण करण्याचा प्रयत्न बहुतेक सर्वच परदेशस्थ भारतीय नागरीक मनापासून करत असतात. निदान आमच्या बाबतीत मी हे निश्चित पणे सांगू शकते !

– लेखन : शिल्पा कुलकर्णी, लुईव्हील, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ, +91 9869484800
सुंदर वर्नण ,सुंदर शहर .वाचताना आनंद वाटाला .
👌👌👌
धन्यवाद। 🙏🙏
धन्यवाद राजारामजी !
नमस्कार मित्रांनो,
“आम्ही लुईव्हीलकर ” हे अप्रतिम विचारांची आणि वाचनीय सदर शिल्पा कुलकर्णी यांनी ” मराठी न्यूज स्टोरी टुडेच्या ” ब्लॉग मध्ये लिहिलेल्या आणि श्री देवेंद्र भुजबळ साहेबांनी संपादित केलेले सदर उत्कृष्ट विचारांची व नैसर्गिक वातावरणातील शहरांची नवीन ओळख करून दिली त्याबद्दल लेखकांचे आणि संपादकांचे मनापासून अभिनंदन व पुढील चांगल्या लिखाण उपक्रमासाठी शुभेच्छा !!
राजाराम जाधव,
सहसचिव ( सेवानिवृत्त )
महाराष्ट्र शासन
सुरेख शब्दात वर्णन केलं आहे. नेहेमीच्या पर्यटन स्थळांपेक्षा वेगळ अस वाचायला जास्त छान वाटत. मनापासून अभिनंदन.
धन्यवाद लीनाताई ! ☺️