महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील पहिल्या महिला माहिती संचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कवयित्री, मूळ वसमतकर श्रद्धा बेलसरे खारकर लिहितायत आम्ही वसमतकर….
थोर विचारवंत प्रा नरहर कुरुंदकर यांचं वसमत, हे माझं मुळ गाव. मी वसमतला शिकायला होते. वसमत म्हणजे परभणी जिल्हा. नववीत असताना माझ्या वर्गामध्ये एक मुलगी आली. उंच, गोरीपान, देखणीच होती दिसायला. तिचं नाव होतं सुनीता पैठणे. तिचे वडील मुख्य अधिकारी होते पालिकेमध्ये.
सुनीताच्या घरी मी खुपदा जायची. तिथेच माझी भेट झाली भारतीशी. गोरीपान, गोबर्या गालाची, ऐटबाज, बॉबकट केलेला, झालरीचा गुलाबी फ्रॉक घातलेली बाहुलीसारखी भारती मला आजही आठवते.
त्यावेळी ती खूपच लहान होती. मी आणि सुनीता जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा मध्येमध्ये करणारी भारती आठवते. मग पुढे बर्याच वर्षांनी मी औरंगाबादला आले. सुनीताच्या वडिलांचीही बदली झाली. त्यामुळे बरीच वर्षे भेट झाली नाही.
मी औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी असताना एक दिवस अचानक प्रतिभा पुराणिक आणि भारती पैठणे माझ्या ऑफीसमध्ये आल्या. भारतीचं आधीचं नावं पैठणे होतं. त्या आल्या आणि म्हणाल्या की आम्ही मराठवाड्यातल्या कर्तबगार स्त्रियांवर लोकमतमध्ये एक मालिका करीत आहोत. त्यासाठी तुमची मुलाखत पाहिजे. मी मुलाखत दिली.
त्यानंतर माझी आणि भारतीची वारंवार भेट होऊ लागली. तिचे काही ना काही उद्योग चाललेले असायचे. विविध विषयावर तिचे लेख प्रसिद्ध होत असत. अनेक सामाजिक चळवळीतही ती अग्रभागी असे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिला गती होती.
कॉलेजमध्ये असताना तिची आई वारली. तेव्हा ती सगळं घर सांभाळायची. मला तिचं खूप कौतुक वाटायचं. मग काही वर्षांनी ती दूरदर्शनच्या एका कार्यक्रमामध्ये मला मुंबईत भेटली. मग पुन्हा मुंबईमध्ये आमच्या भेटी होतच राहिल्या. भारती पैठणे आता भारती लव्हेकर झाली होती. मराठवाडा विकास मंचाची ती सेक्रेटरी होती. मराठवाडा विकास मंचाचे खूप कार्यक्रम चालायचे. मराठवाडा विकास मंचच्या वतीने दरवर्षी मराठवाड्यातल्या विविध क्षेत्रांत काम करणार्या कर्तबगार व्यक्तींची निवड केली जाई. त्यातील पाच लोकांना ‘मराठवाडा गौरव पुरस्कार’ दिले जात. तर विशेष कार्य असलेल्या एका व्यक्तीला ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार दिला जाई. त्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमही असत. या सगळ्या कार्यक्रमांचं नेटकं, सुंदर, देखणं नियोजन भारती करत असे.
मी मंत्रालयात होते आणि भारती कधीतरी मंत्रालयामध्ये आली की आमच्या मस्त गप्पा व्हायच्या. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर आम्ही बोलायचो. ती मला नेहमी म्हणायची की, ‘श्रद्धाताई, तूझा इतका चांगला जनसंपर्क आहे तू राजकारणात यायला हवे !’ मी तिला म्हणायचे की, राजकारण हा काही माझा प्रांत नाही, मी आहे तिथेच बरी आहे. तू मात्र राजकारणात घट्ट पाय रोवून उभी रहा. भारती मग राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेली आणि पक्षाची प्रवक्ती झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचं ‘राष्ट्रवादी’ हे मुखपत्र होतं आणि ती त्याची संपादक होती. अनेक वर्षे भारतीनं राष्ट्रवादी मासिकाचं संपादकपद भूषवलं. त्या काळामध्ये या मासिकाचे अतिशय सुंदर अंक निघत. अंकाला चांगला प्रतिसादही मिळत होता. भारतीची घोडदौड खूप चालली होती. तिचा जनसंपर्क फार दांडगा होता.
माझ्याकडे भारतीची एक गंमतीची आठवण आहे. एक दिवस भविष्यकार पंडीत राजकुमार शर्मा यांचा कार्यक्रम दूरदर्शनला चालला होता. त्या कार्यक्रमामध्ये पंडीतजींनी असं म्हटलं होतं की या पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विलासराव देशमुख असतील. त्यावेळी ती गोष्ट फारशी कुणाला पचण्यासारखी नव्हती. त्याचं कारण असं की त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेसने विजयी घोडदौड केली होती. त्यामुळे त्यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित आहे अशी सर्वांना खात्री होती. पण पंडीत राजकुमार शर्मांनी ही जी भविष्यवाणी केली होती ती ऐकल्यानंतर भारतीनं सरळ विलासराव देशमुखांना फोन केला आणि पंडीतजींची भविष्यवाणी त्यांना सांगितली. त्यावेळेस विलासराव म्हणाले की असं कसं शक्य आहे ? सुशीलकुमारजींचं नाव पुढे आहे. तरीही भारतीनं आग्रह केला आणि म्हणाली की नाही तुम्ही पहाच पुढे काय होतं ते ! त्यानंतर ग्रह फिरले आणि विलासरावजी मुख्यमंत्री झाल्याचे पहायला मिळाले !
भारतीला राजकारणामध्ये गती आणि रुची असूनही हवी ती संधी मिळत नसल्याने ती कधी कधी नाराज वाटायची. तरीही निराश न होता आपण सारखं काहीतरी काम केलं पाहिजे अशी अखंड ऊर्जा तिच्या मनामध्ये असायची. त्यानंतर तिने “ती” नावाचं फाऊंडेशन सुरू केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कामे केली. त्याच नावाचं मासिकही तिने सुरु केले. महिलांच्या विषयाला वाहिलेलं हे अतिशय छान मासिक होतं. त्याला देशविदेशातून असंख्य वर्गणीदार मिळाले होते.
भारतीच्या मनात महिला सक्षमीकरणाच्या अनेक कल्पना होत्या. त्यामध्ये एक अशी होती की मोलकरणींचं प्रशिक्षण करायचे आणि त्यांची रोजगार क्षमता वाढवायची. त्यांची संघटना तयार करायची. त्यांचे न्याय हक्क मिळवून द्यायचे. त्याचबरोबर कॉस्मोपॉलिटिन शहरामध्ये काम करता करता, त्यांना आणखी काही कौशल्य शिकवण्यासाठीही तिने खूप काम केलं. तिनं मोलकरणींसाठीची संघटनाही उत्तम पद्धतीने सांभाळली.
भारतीला २०१४ साली वर्सोवामधून शिवसंग्राम पक्षातर्फे आमदारकीचं तिकीट मिळालं. अनेकांना ती निवडून येईल की नाही अशी शंका वाटत होती. कारण ती मूळची औरंगाबादची होती. वर्सोवा हा कॉस्मोपॉलिटिन मतदार संघ अवघड होता. पण ती पहिल्याच वेळेस निवडून आली. तिनं खूप चांगलं काम केलं. दुसर्या वेळेस म्हणजे २०१९ मध्ये सुद्धा ती निवडून आली.
कधीकधी मी तिच्या असंख्य कामांकडे बघून विचार करते की हिचं मला कोणते काम जास्त आवडलं ? मला वाटते तिनं मुलींसाठी आणि महिलांसाठी सुरू केलेली सॅनिटरी पॅडची बँक फार वेगळी आणि महत्वाची आहे. शाळकरी मुलींना, ऑफीसमध्ये काम करणार्या महिलांना दिवसदिवस बाहेर रहावं लागतं त्यामुळे त्यांना सॅनिटरी पॅडची गरज असते. त्यावरचा इलाज म्हणून भारतीने ही बँक तयार केली. सॅनिटरी पॅडचे ११४ शाळांमध्ये एटीएम सुरू केले. मला वाटतं की देशातला हा एकमेव मतदार संघ असेल जिथे सॅनिटरी पॅडची ‘बँक’ आहे.
ज्येष्ठ अभिनेता अक्षय कुमार याचा पॅडमन नावाचा सिनेमा लोकप्रिय झाला होता. एका कार्यक्रमामध्ये अक्षयकुमार भारतीला भेटला आणि म्हणाला की मी जो संदेश सिनेमामधून देत होतो त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे तुमचा हा मतदार संघ आहे. मी तुमच्या मतदार संघामध्ये राहात नाही याचं मला कधीकधी वाईट वाटतं. तुमचं काम खूप छान आहे.
मुंबई हे मुळात ७ बेटांचे एक शहर आहे. आपण दिवसेंदिवस बघतो की मुंबईतील मिठी या एकमेव नदीला पूर येतो आणि मुंबई शहरामध्ये समुद्राचं पाणी शिरतं. तर हे असं का होत ? याचं कारण म्हणजे समुद्रकिना-याजवळ जी कांदळवनं आहेत त्यामध्ये समुद्राचं पाणी अडविण्याची क्षमता असायची पण अलीकडे ही कांदळवनं नष्ट झाली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. भारतीनं कांदळवन जपण्यासाठी व संवर्धन होण्यासाठी तिच्या मतदार संघामध्ये प्रयत्न केले. तिच्या मतदारसंघामध्ये चौपाट्या आहेत, त्याचं सुशोभिकरण तिनं केलं.
भारतीचा सतत काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न सुरूच असतो. जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तो पर्यंत त्या गोष्टीचा ती सातत्याने पाठपुरावा करते. तिनं सॅनिटरी पॅडची जी बँक सुरू केली होती त्याबद्दल तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
मला आठवतं की एकदा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका सुरु होत्या. त्यांची पाहणी करण्यासाठी एका शिष्टमंडळात तिची निवड झाली होती. ती अमेरिकेला गेली. अनेक मोठे पुढारी, आमदार, मंत्री त्या निवडणुकीच्या पाहणीसाठी जातात. भारतीने तिथे जावून आपल्या पाहणीचे जे रिपोर्ट तयार केले ते अतिशय अभ्यासपूर्ण होते. ते ‘महाराष्ट टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनाही खुप छान असा प्रतिसाद मिळायचा. हे सगळे सुरु असताना भारतीने अभ्यासही सोडला नव्हता. तिने Uniform Civil Code या विषयात संशोधन करून पी.एच.डी. मिळवली.
भारतीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. मी तिच्याकडे बघते तेव्हा एक साधी, सरळ, कार्यमग्न आणि कुठलाही तामझाम नसलेली कार्यकर्ती मला दिसते. महिला कशा जास्त आत्मनिर्भर होतील याचा ध्यास तिला लागलेला असतो. माझी छोटी बहिण मोठी झालेली बघताना मला खूप आनंद वाटतो आणि अर्थातच आम्ही वसमतकर असण्याचाही ☺️

– लेखन : श्रद्धा बेलसरे-खारकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800