आपल्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल साठी या वर्षासाठी नवी सदरे सुचवा, या आवाहनाच्या प्रतिसादनुसार दर सोमवारी आपण “आयुर्वेद उवाच….” हे सदर सुरू करीत आहोत.
हे सदर लिहिणार आहेत, प्रा डॉ शार्दुल चव्हाण. ते बीएएमएस, एमडी (आयुर्वेद) असून गेली ५ वर्षे सायन आयुर्वेद कॉलेज, मुंबई येथे, सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आयुर्वेद उपचारातील ७ वर्षांचा अनुभव आहे.
डॉ चव्हाण यांचे आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत आहे.
– संपादक
प्रस्तावना
आयुर्वेद म्हणजे काय ?
हिताहितं सुखं दुःखं आयु: तस्य हिताहितं l
मानं च तच्च यत्रोक्त आयुर्वेद स उच्यते l l
आयुष्यात आपल्यासाठी काय हिताचे आहे आणि काय अहित आहे, ज्यामुळे आपल्याला सुख म्हणजे आरोग्य आणि दुःख म्हणजे अनारोग्य निर्माण होऊ शकते त्याचे योग्य मान म्हणजेच योग्य प्रमाण ज्या शास्त्रात सांगितले आहे त्यास आयुर्वेद म्हणतात.
येथे मान म्हणजेच प्रमाण याला महत्व आहे, कारण आयुर्वेदाच्या दृष्टीने तुम्ही हितकर गोष्टींचा देखील जर अतिरेक केला तर त्या सुद्धा क्वचित तुम्हाला अहितकर ठरू शकतात. आणि म्हणूनच प्रमाण महत्वाचे आहे.
उदाहरण द्यायचे तर अन्न हे आपल्याला आवश्यक आहे, आपल्या शरीरास बल देणारे आहे, परंतु ते जर कमी खाल्ले तर कुपोषण आणि अधिक सेवन केल्यास अजीर्ण होते. थोडक्यात काय तर योग्य प्रमाणात खाणे गरजेचे. हे अन्नाबद्दल झाले. असे प्रत्येक गोष्टीसाठी आयुर्वेदात मान, प्रमाण आहे ज्याचे पालन केल्याने आपल्याला आरोग्य लाभते.
चला तर मग आयुर्वेदाच्या अशाच साध्या सरळ सोप्या गोष्टी आपण पुढल्या लेखापासून जाणून घेऊया आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या, ज्यामुळे आपले आयुष्य निरोगी राहण्यास मदत होईल.
भेटू या पुढल्या लेखात तोपर्यंत………
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे !
क्रमशः…

– लेखन : डॉ शार्दुल चव्हाण. एमडी (आयुर्वेद).मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800