कफ दोष
मागील लेखात आपण वात आणि पित्त दोषांची सामान्य माहिती पहिली आज आपण तिसऱ्या व अंतिम कफ दोषाची माहिती पाहूया
कफ म्हटला की प्रत्येकाच्या समोर सर्दी, खोकला, आणि त्यावेळी नाकातून येणारा कधी पांढरा, पिवळा, हिरवट असा स्त्राव हे चित्र उभे राहते, ह्यालाच कफाचा प्रकोप अथवा दुष्टी असे म्हणतात.
मूलतः कफ हा श्वेत वर्णी व शरीरातील जलीय अंशात वास करणारा दोष आहे. शरीरातील शीतलता, दृढता ह्याच दोषावर अवलंबून असते.
कफाचे गुण –
कफ हा इतर दोषांच्या तुलनेत गुरु म्हणजेच जड आहे, शीत, मृदु, स्निग्धत्व, मधुर, स्थिरपणा, चिकटपणा हे कफाचे गुण आहेत.
कफाचे शरीरातील प्राकृत कार्य –
१) इतर दोन दोषांप्रमाणे चलत्व हा गुण ह्या दोषात नाही त्यामुळेच शरीरातील स्थैर्य टिकवून ठेवणे हि कफ दोषाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे.
२) कफ आपली शरीराची कार्य पाच प्रकारांच्या साहाय्याने करतो. बोधक, श्लेषक, अवलंबक, तर्पक आणि क्लेदक.
३) हृदय, फुफ्फुस येथील संधींना बल देणे, सर्व हाडांच्या सांध्यांमध्ये जे द्रव असते ज्यामुळे संधींची हालचाल नीट होते ते हि कफचेच कार्य आहे, अस्थीना स्थिरत्व देणारी मज्जा (bone marrow) ह्याचे पोषण देखील कफामुळे होते.
४) अन्न पचन होताना लागणारा ओलावा तसेच सर्व शरीरात आवश्यक जलीय अंश व्यवस्थित ठेवणे हे देखील कफाचे कार्य आहे.
५) इंद्रियांचे पोषण करणे, शुक्र धातु निर्माण व पोषण तसेच मज्जा तंतूंचे (nervous system) पोषण हे देखील कफ दोषाचे कार्य आहे.
६) शरीराची स्थिती राखण्याचे कार्य कफ दोष करतो, शरीरातील सात धातूंपैकी पाच धातु हे कफ दोषावर प्रत्यक्ष अवलंबून आहेत म्हणूनच कफाची विकृती त्या धातूंना देखील विकृत करू शकते.
** कफ दोष वाढणे अथवा विकृतीचे कारण –
सतत अधिक मात्रेत मधुर, आंबट,खारट पदार्थांचे सेवन करणे, सतत स्निग्ध पदार्थ खाणे, व्यायाम न करणे, सतत बसून कामे करणे,दिवसा झोपणे हि सर्व कफ विकृतीची कारणे आहेत.
** वातावरणात वसंत ऋतूत कफाचा प्रकोप होतो म्हणून सामान्य निरोगी माणसाने सुद्धा ह्या काळात वमन व नस्य हि पंचकर्मे वैद्याच्या सल्ल्याने करावीत जेणेकरून पुढे कफाचे विकार सहसा उद्भवणार नाहीत, व आजारी व्यक्तींनीसुद्धा वैद्याच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेऊन हि कर्मे करावीत.
** बालपणीचा काळ हा कफ दोष प्राधान्य असतो मुलांच्या शाररीक,मानसिक,बौद्धिक वाढीसाठी हा आवश्यकच आहे, परंतु ह्या काळात अन्न देखील कफाला वाढवणारे असते म्हणूनच लहान मुलांना कफाचे विकार होतात. अशावेळी वैद्याच्या सल्ल्याने आहारात बदल करून योग्य ते औषध उपचार कारावेत. मुल योग्य वयात आले की त्यास पंचकर्म आहेच सहाय्याला.
आयुर्वेदातील हे तीन दोष आपल्या मर्यादेत असताना संपूर्ण शरीराचे धारण करतात, पालन पोषण करतात. पण तेच प्रकुपित झाले की व्याधी उत्पन्न करतात, पण त्याही आधी ते काही प्रमाणात लक्षणे दाखवतात तेव्हा ती ओळखून आपण जर आहार विहार तसा राखला तर नक्कीच रोगांपासून आणि औषधांपासून सुटका मिळेल
ह्यासाठी आपली जीवनशैली थोडी बदलूया आणि आपले आरोग्य आपणच राखुया
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

– लेखन : वैद्य शार्दुल चव्हाण. एम.डी. आयुर्वेद

🌹खूप उपयुक्त माहिती 🌹