शिशिर ऋतु आणि उत्तरायण
साधाणपणे दरवर्षी डिसेंबर २१ ला सौर शिशिर ऋतु (mid December to mid February) प्रारंभ होतो आणि त्याच बरोबर चालु होते ते उत्तरायण.
तसा २१ डिसेंबर हा सगळ्यात मोठी रात्र असणारा दिवस. त्या नंतर सूर्यास्ताची वेळ वाढत जाते आणि वाढत जातो तो दिवस आणि कमी होते ती रात्र.
भारतातील ऋतु हे सूर्याच्या दिशा भ्रमणावर ठरतात. दक्षिणायानात वर्षा, शरद, हेमंत हे ऋतु येतात. जे हळू हळू मानवी देहाला पुष्ट करण्यास मदत करतात, तर उत्तरायणात हळू हळू मानवाला सूर्याच्या तीव्रतेला सामोरे जावे लागते आणि त्या वेळी देहाला पुष्टी मिळत नाही.
उत्तरायणात सूर्य उत्तरेकडे सरकतो आणि ह्यामुळेच सूर्याची तीव्रता वाढते. ह्यात पहिला ऋतु येतो तो म्हणजे शिशिर. निसर्ग कधीच एकदम बदलत नाही. तो हळू हळू बदलतो जेणेकरून वनस्पती व प्राणी ह्या बदलास सामोरे जाऊ शकतील. म्हणूनच शिशिर ऋतु जरी उत्तरायणात असला तरी लगेच तापमान वाढत नाही, उलट आधी रुक्षता वाढते आणि त्यामुळे थंडी अधिक बोचरी होते.
वातावरण सारखेच असल्याने हेमंत आणि शिशिर ऋतूत सामान ऋतुचर्या पालन करावी. जसे शरीराला तेल लावणे, व्यायाम करणे, मधुर, आम्ल, लवण रसाचे इतर रसांच्या तुलनेत अधिक सेवन करावे.
ह्या ऋतूत स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. ज्या प्रमाणे हेमंत ऋतुत थंडी आणि भुकेचा अंदाज घेऊन हे पदार्थ सेवन करण्यास सांगितले आहे तोच नियम इथे लागू होतो.
दिवसा झोपणे देखील ह्या ऋतूत वर्ज्य आहे.
ह्या ऋतूत वात त्याच्या रुक्ष आणि थंडाव्यामुळे वाढतो आणि म्हणूनच संधी वाताच्या वेदना वाढतात अशा वेळी वैद्याच्या सल्ल्याने स्नेहन, स्वेदन, बस्ती सारखे पंचकर्म अवश्य करावे.
भेटूया, पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

– लेखन : वैद्य शार्दुल चव्हाण. एम. डी. आयुर्वेद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800