पनीर, खरवस ह्या बद्दल आयुर्वेदाचे मत
*किलाट –
दूध फाटल्यावर जो घन भाग उरतो त्यास ‘किलाट’ म्हणतात. सध्याच्या भाषेत पनीर अथवा छेना म्हणजेच किलाट होय.
हा पचायला अत्यंत जड असतो, वाताचे शमन करतो, तसेच शरीराचे विशेषतः मांस आणि मेदाचे पोषण करतो. तसेच अत्यंत निद्रा जनन करतो. म्हणूनच मेदस्वी व्यक्ती, मेदाचे विकार असलेले, सतत बसून काम करणारे, सर्दी खोकला सतत कफ असणारे, ज्या व्यक्तींना अन्न पचनाचे विकार आहेत अशा लोकांनी ह्याचे सेवन टाळावे.
*पियुष-
गाय वासराला जन्म दिल्यावर सात दिवस जे दूध स्रवते त्यास पियुष म्हणतात. आजच्या काळात ह्यास खरवस असे म्हणतात. हा उत्तम पोषक आहार आहे, परंतु पचायला तितकाच जड आहे.
*मोरट–
सात दिवसांनंतर दूध पूर्ण स्थिर होईपर्यंत त्यास मोरट म्हणतात. त्याचे गुणही पियुष प्रमाणे आहेत.
मोरट, पियुष, किलाट हे पोषक असले तरी पचण्यास जड असतात. तेव्हा आपल्या पचनशक्ती नुसारच ह्याचे सेवन करावे.
दुधाचे प्रत्येक पदार्थ हे पौष्टिकच आहेत. फक्त पचन शक्ती प्रमाणे त्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
भेटूया पुढील लेखात तोपर्यंत………
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।

– लेखन : प्रा वैद्य शार्दूल चव्हाण
एम. डी.आयुर्वेद. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800