Monday, July 14, 2025
Homeसाहित्यआयुष्यावर बोलू काही...

आयुष्यावर बोलू काही…

सा क व्य व्हॉट्सॲप समूहाच्या दुसऱ्या परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी संमेलनात कवयत्री प्राची देशपांडे यांच्या कवितेचे “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम प्रा विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण…

कवयित्री बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात….
“नहीं सरलं सरलं, जिवा तुझं येनं-जानं |
जसा घडला मुक्काम, त्याले म्हणती रे जिनं ||”
हे आपलं ‘जिणं’ चांगलं आणि सुखकर करणं आप-आपल्या हातातच असतं.! म्हणूनच तर सद्गुरू वामनराव पै सांगायचे, “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !” मग शिल्पकारा प्रमाणे स्वतःचं जीवन जर उत्कृष्ठ घडवायचं असेल तर कसं घडवावे लागेल ? हेच कवयित्री प्राची देशपांडे यांनी आपल्या “आयुष्यावर बोलू कांही” या कवितेतून सोप्या शब्दात सांगितलेले आहे.

प्रथमतः आपल्या जन्मदात्यांचे आशिर्वाद घेतले पाहिजेत, तसेच ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण केले पाहिजे. ‘दे हरी पलंगावरी’ असे कधीही न म्हणता कार्य करीत राहिले पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे चढ-उतार येतच असतात, पण न-डगमगता आत्मविश्वासाने
येणाऱ्या परिस्थितीशी सामना‌ केला…संसार आणि परमार्थ यांची योग्य पद्धतीने सांगड घातली, तरच आपलं आयुष्य, आपलं जीवन अतिशय आनंदी होऊ शकतं, आपली नाती, आपले मैत्र आपल्या पश्चातही कवन रूपाने सदैव रहात असतात. हे सांगणाऱ्या प्राचीताई कांहीं दिवस अमेरिकेत रहात असल्या तरी त्यांची नाळ मात्र मराठी मातीशी निगडित आहे, हे मात्र नक्कीच जाणवतं..
– विसुभाऊ बापट. मुंबई.

आता, प्रत्यक्ष कवितेचा आस्वाद घेऊ या…

आयुष्यावर बोलू काही

आयुष्य म्हणजे जीवन
एका श्वासाचे अंतर.
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास
घ्यावा जाणून निरंतर.

लक्ष चौ-याऐंशी योनी
जीव फिरत रहातो.
गतजन्मीचे पापपुण्य
भोगण्यास धरेवर येतो.

सुखदुःख कर्मफलानुसार
चढउतार येती आयुष्यात.
हे ही दिवस जातील
खूणगाठ बांधा मनात.

प्रयत्नवाद सोडू नये
ठाम असावा आत्मविश्वास .
परिस्थितीशी करावा सामना
भिऊ नये संकटास.

मातापिता आपले जन्मदाते
आज्ञापालन त्यांचे करावे.
आशिर्वाद त्यांचे घ्यावे
दुःख कदापि न द्यावे.

ईश्वरावर दृढ श्रध्दाभाव
नामस्मरणाची कास धरावी.
संसार आणि परमार्थ
सांगड प्रत्येकाने घालावी.

आयुष्यावर बोलू काही
संध्याछाया हृदयास भिवविती.
कवनरुपे रहातील परि,
स्मृती मैत्री आणि नातीगोती.

– रचना : प्राची प्रकाश देशपांडे. निगडी प्राधिकरण/अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments