आरोग्य शास्त्राच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी समाजाचे आरोग्य प्रश्न मूळापासून समजावून घेऊन त्यावर संशोधनाव्दारे उत्तरे शोधणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कार्यान्वीत असलेल्या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचच्या अभ्यासक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी विद्यापीठातर्फे या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास व्यासपीठावर मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांच्या समवेत प्रमुख व्याख्यात्या एमिस्टस कन्सलन्टंट, नॅशनल युनिव्हर्सिटी, सिंगापूर येथील नेफ्रालॉजी विषयातील तज्ज्ञ प्रा. डॉ. याप हयु किम उपस्थित होत्या.
याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असल्याने तुमच्या वरील जबाबदारी अधिक महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात अभ्यासक्रमासमवेत विविध विषयांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण आहे. या अनुषंगाने विद्यापीठाचे रौप्य महोत्सवी वर्षात विद्यार्थी व शिक्षकांसाठी व्याख्यानांचे आयोजन आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षण व संशोधनाचा उपयोग समाजातील नागरिकांना हाणे महत्वाचे आहे. पदव्युत्तर शिक्षणात संशोधनाला चालना गुणात्मक दर्जावाढीसाठी संवाद कौशल्य, व्यक्तीमत्व विकास आदींवर विद्यार्थ्यांनी प्रभावी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. याप हयु किम यांनी सांगितले की, तुमचे संशोधन केवळ अभ्यासक्रमाचा भाग न होता अधिक व्यापक उद्दिष्ट्य ठेवणारे असलं पाहिजे. तुमच्या संशोधनामुळे एका जरी रुग्णाला जीवदान मिळाले तर ते तुमच्या सगळ्या कष्टांचे फलित आहे असे समजावे असे समजावे. याप्रसंगी त्यांनी पेडिएट्रीक अॅण्ड चाईल्ड नेफ्रॉलॉजी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
या कार्यक्रमाचे आभार डॉ. किरण पाटोळे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा, डॉ. आशुतोष ओझा,
डॉ. राजकुमार सूर्यवंशी, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800