Friday, July 4, 2025
Homeलेखआला पावसाळा, तब्येत सांभाळा

आला पावसाळा, तब्येत सांभाळा

डॉ स्विटी प्रकाश पै., या ज्युनियर हायस्कूलपर्यंत कॅनडामध्ये होत्या. त्यानंतर मुंबई, शिक्षणासाठी दिल्ली, केरळ, थायलंडला होत्या. कामानिमित्ताने त्या बंगलोर आणि मुंबईत असतात. त्यांनी बीएएमएस केले असून त्यांना ‘लाईफस्टाईल डिसिज अँड ट्रीटमेंट’ यात आवड होती म्हणून त्यातच इंटर्नशीप आणि पुढे प्रॅक्टीस केली.

बराच काळ त्यांनी ‘आयुर्वेदालया’ सोबत काम केले. सध्या ‘वेलनेस जेनिक्स’ या कंपनीत औषध विभागात त्या सुरवायझर म्हणून आणि नवीन जॉईन झालेले आणि इंटर्नशीप करण्यासाठी आलेल्यांना ट्रेनिंग देण्याचे काम करत आहेत.

डॉ पै यांना शाळेत असल्यापासूनच लेखनाची आवड होती. मराठी, इंग्रजी, हिंदी तिन्ही भाषांमध्ये त्या लिहितात.त्यांनी कंटेंट रायटींगचा कोर्स केला आहे. सध्या त्या ‘सात्त्विक फूड’वर पुस्तक लिहित आहेत. आपल्या ‘न्यूजस्टोरीटुडे’ साठी त्या नियमित लिहिणार आहेत.

आपल्या पोर्टलबद्दल त्या म्हणतात, “मला या पोर्टलसाठी लिहायला आवडेल. एका मैत्रिणीने बऱ्याचदा एनएसटीच्या लिंक शेअर केल्या होत्या, तेथूनच एनएसटीबद्दल समजले आणि वाचायला लागले. मला आपली वेबसाईट खूप आवडते, अगदी सहज – सोप्पी, अनेकांच्या अनुभवांनी नटलेली अशी आहे. त्यामुळे मलाही लिहिण्याची इच्छा झाली. मी मैत्रिणीला विचारले की येथे लिहिता येईल तर तिने लगेचच हो म्हटले आणि तुम्हाला संपर्क साधण्यास सांगितले.

तर, मला हेल्थ विषयी लिहायला आवडेल.
मला यातून मानधन किंवा पब्लिसिटीची अपेक्षा नाही, तर माझी लेखनाची आवड पूर्ण व्हावी तसेच माझ्याकडे असलेले ज्ञान एका चांगल्या मंचावरुन लोकांपर्यंत पोहोचावे एवढीच इच्छा आहे.”

डॉ स्विटी प्रकाश पै. यांचे न्यूजस्टोरीटुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे. आज वाचू या त्यांचा पहिला लेख….

कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झाल्याने, आपल्याला पावसाचे वेध लागतात. सध्या सर्वत्र तुफानी पाऊस पडत आहे. चित्रपटांमुळे पावसाचे चित्र आपल्या मनात हिरवळ, थंड वारा, धबधबे, पावसाळी सहल आणि रोमॅन्स असे आहे. प्रत्यक्षातले चित्र मात्र रस्त्यांवर खड्डे, जागोजागी पाणी भरणे, चिखल, ट्रॅफीक असे आहे. यासह पाऊस घेऊन येतो, आजार ! अगदी घसा बसणे, सर्दी, खोकला ते मलेरीया, डेंग्यू आदी आजार होतात. मुळातच सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती मजबूत असणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकवेळेस आपल्याला औषध घेण्याची गरज नाही, तर ऋतुनुसार आपल्या आहार विहाराचे व्यवस्थापन केल्यास आपल्याला होणाऱ्या आजारांचा धोका टळेल.

स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे व्यायाम आणि दुसरे म्हणजे अन्न ! आता हे जगजाहीर आहे की दोन्हीचा योग्य समतोल असेल तर आपण शारिरीकदृष्ट्या सुखी, आनंदी राहू शकतो. तर व्यायाम करणे हे तर अत्यंत गरजेचे आहे. मान्सूनमध्ये आपली पचनक्रिया मंदावते, अशावेळी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखातून आपण मान्सूनमध्ये आहार काय घ्यावा, हे जाणून घेऊयात.

गील्ट फ्री भजी

पाऊस म्हटले की पहिले भजीची आठवण येते. पाऊस पडायला सुरुवात झाली नाही की ‘शास्त्र असतं ते’ म्हणत आपण घरी भजी बनवण्याची फर्माईश करतो किंवा बाजारातून आणतो. तर पावसातून भजी खाल्लीच पाहिजे परंतु एकावेळी खूप भजी खाण्यापेक्षा त्याच प्रमाण आटोक्यात आणा. एकवेळी केवळ ३ ते ४ भजींचा आस्वाद घ्या. कांदा भजीसह घोसाळे, ओव्याच्या पानांची भजी शरिरासाठी अधिक लाभदायक ठरेल. भजीमध्ये सोडा, टेस्ट मेकर अजिबात घालू नका. भजीमध्ये बेसनासह तांदुळाचे पीठ मिसळा. आदी गोष्टी केल्याने तुम्हाला गील्ट फ्री भजीचा आनंद घेता येईल.

आज कोणती भाजी ?
पावसाळ्यात बाजारात नेहमीच्या भाज्या येणे कमी झालेले असते. आपण मुख्यत्वे कडधान्यांच्या उसळी अधिक करतो. ताजे मासे येणे ही बंद झालेले असते त्यामुळे सुखे मासे खातो. यासह आपण पावसाळी पालेभाज्या खाण्याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे, कारण या भाज्या संपूर्ण वर्ष कधीच मिळत नाहीत. फोडशी, भोपळ्याची पाने, टाकळा, कवळा, भारंगी, कर्टुले, पडवळ, दोडके, घोसाळे, कारले आदी पावसाळी भाज्यांचे आवर्जुन सेवन करावे.

पावसात शेवग्याची भाजीही मोठ्या प्रमाणात मिळते. ही भाजी सुपरफूड आहे. त्यामुळे याची चटणी, पराठे, पावडर, पोळीसोबत खाण्यासाठी नेहमीप्रमाणे भाजी असे काहीही बनवू शकता. ही भाजी किमान आठवड्यातून एक ते दोन वेळा खाल्लीच पाहिजे.

यासह सर्व कडधान्यांच्या उसळी कराव्यातच. खास या ऋतुमध्ये कुळिथाची उसळ नक्की करा. कुळिथाच्या पिठाची आमटीसारखी पिठी किंवा पिठलदेखील करता येईल. भात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आठवड्यातून एकदाच कधान्याची भाजी करा.

या ऋतुमध्ये मांसाहार कमी करता येईल, तेवढा कमी करावा. आठवड्यातून एकदा आणि एकचवेळ मांसाहार करावा.

गरमा – गरम सूप
पावसाळ्यात नेहमीच काहितरी गरम – गरम खावेसे वाटते. प्रत्येकवेळी भजी किंवा इतर तेलकट पदार्थ बनवण्याऐवजी विविध भाज्यांचे, डाळींचे सूप करता येईल. डाळी थोड्या उगरस असल्या तरी तुपावर तमालपत्र, दालतिनी, जिरे, लसूण, टोमॅटो, कांदा परतून त्याचे वाटण सूपमध्ये झक्कास लागेल.

सूप जास्तच चविष्ट करण्यासाठी किंवा व्हिडीओमध्ये पाहून त्यात थिकनिंग एजंट, स्टॉक क्यूब्ज, टेस्ट मेकर घालू नका. यामुळे सूप रेस्ट्राँटसारखे लागले तरी ते तुमच्यासाठी आरोग्यदायी नसेल. त्यामुळे आपल्या भारतीय पद्धतीने सूप बनवून, त्याचा आस्वाद घ्या.

आणि काय – काय खावे ?
पावसाळ्यात पचन होईल आणि शारिराला पौष्टीक घटक मिळतील अशा पदार्थांचे सेवन करावे. जेवणात पोळी नेहमीच असते, त्याऐवजी भाकरी तीही नाचणीची असेल तर उत्तमच ! या ऋतुमध्ये नाचणीची भाकरी किंवा तांदुळ – नाचणी – केळ्याचे पीठ असे मिश्रण करून भाकरी केल्यास त्याचा खूप फायदा होईल. कच्च्या केळ्याचे पीठ बाजारात आणि ई – कॉमर्सवर सहज उपलब्ध होईल.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात मध -हळद – काळेमिरी पूड घालून प्या. पित्त झालेले असल्यास पाण्यात गुलकंद घालून प्या. सकाळी १०० ते १५० मिली पाण्याचे सेवन करावे. नाश्त्याला नेहमीप्रमाणे पोहे, उपपीट, शेवयांचा उपमा, धिरडे करता येईल. मात्र थालिपीठ करताना भाजाणीचे किंवा मिश्र डाळींचे पीठ घेण्याऐवजी तांदुळाच्या पीठाचे, भाज्या घालून कोकणी पद्धतीने करावे. तसेच कोकणी कोळ पोहे आणि दही पोहे हे सकाळचा नाश्ता किंवा मधल्या वेळेतील खाण्यासाठी चांगला पर्याय आहे. दही पोह्यात हिंग आवर्जुन घालावे. सायंकाळी चहासोबत कुरमुऱ्यांचा चिवडा किंवा भेळ, तुपात मीठ घालून भाजलेले मखाने, दाक्षिणात्य पद्धतीची मुरुक्कु चकली, गव्हाचे कुरमुरे आदी खाद्यपदार्थांचे सेवन करता येईल.

रात्रीच्या जेवणात जास्तीत जास्त हलके जेवण असू द्या. कच्चे पदार्थ रात्री खाणे टाळा. खिचडी, तांदुळाची पेज सोबत फेण्या हेदेखील कधीतरी खा. रात्रीचे जेवणानंतर किमान ३ तासांनंतर झोपा. झोपताना दात स्वच्छ करण्यापूर्वी दूध नक्की प्या. ७५ मिली दूध घेऊन त्यात २५ मिली पाणी मिसळा. यात हळद, सूंठ, किंचित तूप, थोडासा गूळ मिसळून प्या.

वरील सर्व खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास मान्सूनमध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, मजबूत होईल. ज्यामुळे आजार तुमहाला स्पर्शही करणार नाहीत. तसेच तुम्हाला अपचनाचाही त्रास संभवणार नाही.

डॉ स्विटी पै

– लेखन : डॉ स्विटी पै. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments