हिंदीत एक म्हण आहे, ती म्हणजे, “सिर्फ नाम ही काफी है ” ! …ही म्हण तंतोतंत लागू असलेल्या थोर गायिका आशा भोसले यांचे काल मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात, विविध अवयव निकामी झाल्याने निधन झाले
आणि जगभरातील त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले.
आशाताईंच्या गाण समृद्धी विषयी आजवर इतके काही लिहून आले आहे आणि त्यांच्या निधनानंतर तर अजूनच इतके काही लिहून येत आहे की, त्या बद्दल मी आणखी वेगळे काय लिहिणार ?
पण मला लिहावेसे वाटते, ते आशाताईंच्या एका अत्यंत वेगळ्या पैलू विषयी आणि तो म्हणजे, त्यांच्या व्यक्तीगत जीवनात कोसळत राहिलेली दुःखे, सार्वजनिक जीवनात त्यांनी कधीही चेहर्यावर दिसू दिली नाही ! ना कधी त्या दुःखाची कधी जाहीर वाच्यता केली नाही, की कधी कोणत्या गोष्टीबद्दल खेद, खंत, पश्चाताप, देवाला, इतरांना दूषणे देणे, असे काही केले नाही. ही एक प्रकारची आध्यात्मिकताच नाही का?

८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताईच्या नवव्या वर्षीच वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे सांगली सोडून मंगेशकर कुटूंबाला जगण्यासाठी मुंबईत यावे लागले. बालपण विसरून त्यांना लतादीदी समवेत कुटुंबाचा भार उचलावा लागला आणि त्याही गायनाकडे वळल्या.
आशाताईंनी त्या काळात, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पळून जाऊन त्यांची थोरली बहीण लता मंगेशकर यांचे व्यवस्थापक असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. पण त्यांची, त्यांच्या गुणांची कदर नसलेल्या नवर्याकडून, त्यांच्या सासरच्यांकडून त्यांच्या वाट्याला छळ, त्रास आणि दुःखच. शेवटी अकरा वर्षांच्या संसारानंतर तीन मुले घेऊन त्या घराबाहेर पडल्या आणि त्या काळात कुठलीही स्त्री दाखवू शकत नव्हती, अशी हिम्मत त्यांनी दाखविली, ती म्हणजे घटस्फोट घेण्याची.

आजही आपण बघतो, लग्न झालेल्या किती तरी स्त्रियांना माहेरचे मोठे आडनाव सोडवत नाही. त्यातून मंगेशकर या नावाला प्राप्त झालेले, प्राप्त होत असलेले वलय बघूनही आशाताईंनी घटस्फोटानंतर भोसले हेच आडनाव तह हयात कायम ठेवले, हे आश्चर्यच नाही का ?
पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे नाव कमावणाऱ्या आशाताईंची तुलना, दुसरे कुणी नाही तर त्यांच्या सख्ख्या बहिणीशी; लता मंगेशकर यांच्याशीच होत राहिली ! ही श्रेष्ठ की ती श्रेष्ठ या वरुन मित्रमंडळीत जणू युद्ध पेटायचे ! तर खुद्द आशाताईंची मनस्थिती काय राहिली असेल ?
आशाताईंच्या पत्रकार असलेल्या ; वर्षा ह्या मुलीस काही मानसिक त्रास होता. तिच्या लग्नानंतर काही काळातच ती घरी परतली होती. पण त्रास असह्य झाल्याने तिने वयाच्या पंचावन्नव्या वर्षी घरातच 8 ऑक्टोबर 2012 रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

पुढे मोठा मुलगा; संगीतकार हेमंत भोसले यास कॅन्सरने गाठले. प्रदीर्घ उपचार करूनही शेवटी 28 सप्टेंबर 2015 रोजी त्याचा स्कॉटलंड मध्ये मृत्यू झाला.

दरम्यान त्यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन (पंचम दा) यांच्याशी विवाह केला. पण हा विवाह पंचमदा यांच्या आईला मान्य नव्हता.
त्यामुळे या संसारात त्यांना किती सुख मिळाले असेल, हा प्रश्नच आहे. पण पंचमदा यांच्या अकाली मृत्यूमुळे पुन्हा एकटेपणाच त्यांच्या वाट्याला आला.

जिवाभावाची थोरली बहीण; भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 6 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या मृत्यूनंतर दिलेल्या काही मुलाखतींमधून आशाताईंच्या बोलण्यात निरवानीरव करण्याची भाषा डोकावू लागली असल्याचे दिसून येते. तरी नव्या उमेदीने उभे राहिले पाहिजे, असेही त्या म्हणत असत. यातूनच त्यांची लढाऊ वृत्ती दिसून येते.

आशाताईंचा आवाज जितका गोड आणि विविधरंगी होता, तरी वेळ आल्यास त्या जाहीरपणे कठोर भूमिका घेण्यास मागे पुढे पहात नसत. दहा वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक सत्र त्यांच्या गायनाचे होते. आयोजकांशी झालेल्या करारानुसार त्यांचे गाणे हे फक्त समक्ष उपस्थित असलेल्या रसिकांसाठीच होते. पण गाणे चालू असताना, त्यांना जेव्हा हे कळाले की, काही वाहिन्या त्यांच्या गाण्याचे थेट प्रसारण करीत आहेत तेव्हा अजिबात भीडभाड न ठेवता त्यांनी गाणे थांबविले. शेवटी थेट प्रसारण बंद झाल्यावरच, जणू काही घडलेच नाही, अशा थाटात परत एकदा त्यांचे गाणे सुरू झाले ! विशेष म्हणजे, गाणे सुरू होण्यापूर्वी त्या मिश्किलपणे म्हणाल्या, आताचे गाणे मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत गाणार आहे ! हे ऐकताच सर्व उपस्थित श्रोते बुचकळ्यात पडले नसते तरच नवल ! आणि खरोखरच तितक्यात श्रोत्यांमधून सहा फुट उंच, गोरापान, काळा टी शर्ट, काळी विजार घातलेला एक तरुण नाचत गात स्टेज वर आला आणि पुढे दोघांनी मिळून गाण्यावर एकत्र ठेका धरला. गाणे संपल्यावर त्यांनी मिश्कीलपणे सांगितले, हा माझा नातू !
क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर यांच्या मुलाच्या गेल्या महिन्यात झालेल्या लग्नाला आशाताई उपस्थित होत्या. तेच त्यांचे शेवटचे सार्वजनिक दर्शन ठरले.
आशाताईंच्या वैविध्यपूर्ण आवाजासाठी प्रसिद्ध, त्यांना पद्मविभूषण (२००८) आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेली कलाकार २०११ मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना मान्यता दिली आहे. पण त्यांची समग्र कामगिरी पाहून भारत सरकारने त्यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च पुरस्कार देणे आवश्यक आहे असे वाटते.
प्रिय आशाताई, तुम्ही शरीराने गेलात तरी तुमच्या आवाजाच्या रूपाने तुम्ही अजरामर आहात. आशाताईना विनम्र अभिवादन.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
