जीवन म्हणजे प्रवास…. एक रस्ता….कधी स्पष्ट दिसणारा तर कधी धुक्यात लपणारा, अंधुक दिसणारा, कधी सरळ, तर कधी अनेक नागमोडी वळण. कधी बोचणारा…. रक्तबंबाळ करणारा…..
मग…..पुन्हा स्वतःला सावरून अथक परिश्रमाने, हिंमतीने न दमता, न थकता पार केल्यावर एक विलोभनीय दृश्य…. सुंदर फुलांचा गालिचा जणू आपली वाट पाहत असतो. क्षणात सर्व शीण नाहीसा होतो आणि आयुष्य सुंदर वाटू लागते. शेवटी म्हणतात ना कष्ठाचे फळ गोड असते……
जीवनातील हेच चढ उतार, यश अपयश जगणे सुंदर बनवते. नवे आव्हान…. नव्या कल्पना… नवी क्षितिजे…. हेच तर यशाचे अदृश्य दरवाजे असतात हे तेव्हाच उघडतात जेव्हा त्यांना चिकटीची, प्रयत्नांची, धीराची व धैर्याची जोड असते.
बदल अटळ असतो. परिस्थितीही बदलते. शारिरीक, मानसिक ताण जाणवतो. थोडा वेळ घेतो मग पुन्हा सावरतो.
असेच असतेना जीवन जणू एक रहस्य उद्या काय होणार माहित नाही ! सुख दुःख तर पाठशिवणीचा खेळ असतात.
हे मनुष्य जीवन म्हणजे एक देणगी आहे. एक संधी त्याचा नेहमीच आदर करून कितीही संकट आली तरी परमेश्वराचे आभार मानायचे कारण ही बोचरी वाट खूप काही शिकवून जाते. आधीपेक्षा आपल्याला कणखर बनवते. अशक्य ही शक्य करण्याचे जणू सामर्थ्य देते.
आपल्या जीवनात जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि पुढेही जे होणार ते चांगल्यासाठीच होणार हा दृढ विश्वास जगण्याचे बळ देते. एक अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे याची जाणीव होते.
ही सकारात्मक ऊर्जा सदैव आशावादी ठेवते. मी करणार….मी करू शकतो…..हे शब्द संजीवनी सारखे कार्य करतात. मनातील भीती दूर झाली की पुन्हा नवी झेप घेण्याची स्फुर्ती मिळते.
Why me असे म्हणण्यापेक्षा Try me असे परमेश्वराला म्हणावे….त्यामुळे आपल्या शक्तीची जाणीव होते ….मग चमत्कार घडतात. ज्या लोकांकडून कोणालाच अपेक्षा नसतात ती अनन्यसाधारण कामे करतात हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असतो. कोणीही सोबत असो नसो ही आशेची ज्योत लढण्याचे बळ देत, जी यशाची वाट दाखवते.
जोपर्यंत आपण स्वतः हार मानत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही हा आत्मविश्वास, ही इच्छाशक्ती, तो आधार हे लाख मोलाचे शब्द जर आपल्यात कोणी निर्माण केले तर पुन्हा उभारी घेऊन उंच भरारी घेता येते.
ही आशा निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे आपले पालक, गुरुजन, हितचिंतक अथवा जवळचा मित्र किंवा मैत्रीण असू शकते. ही व्यक्ती म्हणजे जणू परमेश्वराच्या रूपाने आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते एक भक्कम आधार वाटतो व गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत होता. एक आशा जी दूर करते सगळी निराशा व जगण्याला मिळते नवयाने दिशा.
जेव्हा सगळीकडे अंधार दाटून आला असतो तेव्हा तेथे हा छोटासा आशेचा दिवा चमत्कार करतो. आजूबाजूला प्रकाश निर्माण करतो. जणू एक नवीन रस्ता, एक नवी वाट दाखवतो.
हा अंधार म्हणजे अपयश, संकट, फसवणूक, अवहेलना, त्रास,मानसिक, शारीरिक आघात, विश्वासघात, नकारात्मक विचार……या सर्वांवर मात म्हणजे आशा, तो अदृश्य दिवा जो कधीच हरु देत नाही.
हा आशेचा दिवा कायम आपल्या सर्वांच्या मनात तेवत राहो……

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.