ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो ही शिकवण आजची युवा पिढी आचरणात आणत असल्याचे पाहून आनंद होतो.
ज्यांनी कधी ढुंकूनही स्वयंपाकघरात पाहिले नसेल अशी ही युवा मंडळी.
मात्र आज चित्र बदललेले दिसत आहे. हीच मुलं मुली एकत्र येऊन अगदी मंडई आणण्यापासून स्वयंपाक स्वतः करून, गरजू व्यक्तीपर्यंत डब्बे पोहोचवण्याचे मोलाचे काम करत आहे. त्यांची ही चिकाटी पाहून आजूबाजूला अनेक व्यक्ती देखील मदत करत आहेत.
प्रामाणिक समाज कार्याची ज्योत आज समाजात अनेक ठिकाणी रुजत आहे. कोणीही उपाशी राहू नये हाच त्यांचा एकमेव हेतू आहे. ना कोणते फोटो सेशन ना कोणती प्रसिद्धी. अगदी निरपेक्ष भावनेने त्यांचे कार्य करत आहेत.
खरे तर मुलांवर कोणतेही वेगळे संस्कार करावे लागत नाही, ते तर केवळ अनुकरण करतात जे घरातील ज्येष्ठ मंडळी करत असतात. त्यासाठी कोठेही वेगळे संस्कारवर्ग लावावे लागत नाही, कारण हे उपजत असते, रक्तात असते. ह्या पिढीला ना कोणता मोठेपणा हवा आहे, नाही कोणाचे कौतुक. त्यांना फक्त समाजसेवा करायची आहे. त्यांचे विचार खूप आधुनिक आहेत.
आपण ह्या बिकट परिस्थितीत काय करू शकतो व कोणाला मदत करू शकतो हाच विचार सध्या अनेक युवा करताना दिसत आहे. आपल्या परीने जशी मदत करत येईल तसे करत आहेत. कोणी आर्थिक तर कोणी कष्टाने एकत्र येऊन पडेल ते काम करत आहेत.
अनेक तरुणांनी आपले लग्न साध्या पद्धतींनी करून त्या पैशातून अन्न धान्य लोकांपर्यंत पोचवले आहे. वृत्तपत्रात एक बातमी वाचली, त्या युवकाने तर चक्क आपली २२ लाखांची गाडी विकुन ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचे काम हाती घेतले आहे, कारण लोकांचे प्राण वाचवण्याचा त्याने संकल्प केला आहे. त्या गाडीपेक्षा लाख मोलाचे आहे त्यांचा जीव. ही आपली माणसं रक्ताची नसतील पण आपलेपणाची जाणीव त्यांच्यात आहे. असे त्यांचे प्रगल्भ विचार हा मनाचा किती मोठेपणा आहे.
नाही का ?
आजचे युवक खूप हुशार, निर्भीड,कष्टाळू, अभ्यासू, जिद्दी आहेत. जे आपले ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटीने, प्रामाणिकपणे मेहनत करतात व यशस्वी होतात. ही पिढी जेवढी स्पष्ट आहे तेवढीच प्रेमळ व मायाळू देखील आहे. अशी अनेक उदाहरणे आज ह्या कोरोनाच्या बिकट परिस्थिती पहायला मिळाली.
अनेक तरुणांनी आपल्या बचतीच्या पैश्यातून लोकांना जमेल तशी मदत केली. जेष्ठांची काळजी घेतली. त्यांना लागणाऱ्या वस्तू, औषध, घरपोच आणून देत आहेत. त्यांची काळजी घेत आहेत. तसेच सामाजिक संस्थाना मदतीचा हात देत आहेत.
अनेक मित्र मैत्रिणी एकत्र येऊन कोरोनाग्रस्त व्यक्तींना बेड मिळवून देणे, इंजेक्शन व लागणारे औषध मिळवून देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, दवाखान्यातील व्यक्तीला व नातेवाईकांना जेवणाचा डब्बा मोफत देणे, अथवा मजुरांना गावी जाण्यासाठी प्रवासाची सोय करणे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे अशी अनेक कामे करत आहेत. लहान वयातील त्यांची समज कौतुकास पात्र आहे. त्यांच्या ह्या कार्याला सलाम.
आता तुम्ही असा विचार करा, जर अशी हुशार व निस्वार्थी युवा पिढी राजकारणात आली तर नक्कीच चित्र बदलून जाईल. खऱ्या अर्थाने क्रांती घडेल. कारण हेच तर उद्याचे भविष्य आहेत, आपल्या देशाचा अभिमान आहेत. यांच्या पिढीत बहुदा राजकारण नसेल तर समाजकारण असेल.
हे युवा देशाची शान आहे. ह्यांच्या सकारात्मक व आधुनिक विचारांमुळे भ्रष्टाचार व लोकांवर होणारे अन्याय संपुष्टात येतील ह्यात तिळमात्र शंका नाही. त्यावेळी न कोणती सभा असेल न कोणते आंदोलन होतील. समानतेचा वसा घेऊन कार्यरत असतील. सर्वांना समान कायदे, एकसारखे नियम व योग्य न्याय दिला जाईल.सर्व हातात हात घालून सर्व मिळून चांगले काम करतील. येथे ‘मी’ नव्हे तर ‘आम्ही’ मिळून काम करू व सर्वांच्या विचाराने देशाचे नाव मोठे करू हाच ह्यांचा हेतू असेल.
नवे आचार व विचार असतील ज्यामुळे नवीन गोष्टी करण्याचा त्यांचा कल असेल. येथे न कोणती चढाओढ असेल न कोणती भाषणे असतील. फक्त आणि फक्त समाजकार्य हाच एकमेव नारा असेल. जात पात, उच्च नीच, श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष असे कोणतेही भेदभाव नसतील.
ह्यांच्यातील एकीमुळे अशक्य गोष्टी ही शक्य होतील. कोणत्याही शत्रूला वाईट नजरेने पाहण्याचे धाडस होणार नाही. आपल्या परंपरा चाली रीती ह्याला आधुनिकतेची भक्कम जोड असेल. ह्यांचे व्यवहार अगदी स्वच्छ व पारदर्शक असतील त्यामुळे भ्रष्टाचार संपुष्टात येईल जी आपल्या देशाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. कायदे कठोर असल्याने कोणावर ही अन्याय होणार नाही व देशाची प्रगती होणार हे निश्चित. उद्याचा भारत हा एक नवा भारत असेल. ह्या पिढीकडे आपण मोठ्या अपेक्षेने पाहू या, जमेल तेव्हढे प्रोत्साहन देऊ या.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो ही शिकवण आजची युवा पिढी आचरणात आणत असल्याचे पाहून आनंद होतो.
खरेच आहे कोरोना महामारी लॉकडाऊन च्या काळात शहरात अडकलेले मजूर, शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, रोजंदारीने हातावर पोट भरणारे गरीब लोक, फुटपाथ वरचे गरीब, विकलांग, भिकारी यांची खूपच वाईट परिस्थिती होती. कित्येक दिवस लहान लहान मुलांसहित उपाशी होते. त्या बिकट परिस्थितीत अशाच दानशूर व्यक्तींनी, सामाजिक संस्थांनी, तरुण तरुणीनी अहोरात्र मेहनत घेऊन भुकेलेल्यांना अन्न पाणी देऊन सेवा केली त्या सर्वच सेवेकऱ्यांना दंडवत 🙏
युवा पिढीचे हे उत्स्फूर्त योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. याच युवा पिढीकडून उद्या करिता उज्ज्वल भविष्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.. अप्रतिम लेख आहे.