“आधी रचिली पंढरी
मग वैकुंठ नगरी
जेंव्हा नव्हते चराचर
तेंव्हा होते पंढरपूर”
इतकी पुरातन ही पंढरपूर नगरी. तिची अनेक नावं आहेत. पौंडरीकपूर, पुंडलिकपूर, पंडरिगे, पंडरगे, पंढरी आणि आता प्रचलित आहे पंढरपूर. पंढरपूरला आपली विठूमाऊली कायमच भक्तांची वाट बघत उभी आहे. ती माऊली आहे म्हणून पंढरपूर हे सगळ्यांचे माहेर आहे. भक्तीचे मळे इथेच फुलवले जातात म्हणून फक्त देशातले नव्हे तर संपूर्ण जगातले विठ्ठल भक्त इथे येतात आणि डोळे भरुन माऊलीला बघतात आणि तेंव्हाच ते विसावतात.
पंढरपूरात आपल्याला भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा नदी चंद्रभागा या नावाने भेटते. तिचे चंद्राक्रुती पात्र पाहिले आणि तिच्या प्रवाहात पाय धुतले तरी सगळ्या पापांचं क्षालन होतं. विठ्ठलाच्या मुख्य मंदिराबरोबरच रुख्मिणी मंदीर, भक्त पुंडलिक मंदीर, चोखामेळा पायरी, नामदेव पायरी, गरुडखांब, संत जनाबाई मंदीर, सुळाचे पाणी, गोपाळपूर, जनाबाईचा ताकाचा डेरा, जनाबाईचे जाते, तिचा संसार, कैकाडी महाराज मठ अशी अनेक पौराणिक प्रार्थनीय स्थळं पहायला मिळतात.
इस्कॅान ने पण आता अतिशय अद्ययावत श्रीक्रुष्ण मंदीर बांधलं आहे. तुळशी व्रुंदावन उद्यान, गजानन महाराज मठ, पंचतारांकित भक्त निवास, कान्होपात्रा मंदीर, पालखी सोहळा या ही गोष्टी बघण्यासारख्या आहेत.
मुख्य विठ्ठल मंदिराच्या आवारात परिवार देवता आहेत. त्या महालक्ष्मी मंदीर, राम लक्ष्मण मंदीर, शनैश्वर मंदीर, अष्ट काल भैरव मंदीर, गणपती मंदीर, काशी विश्वेश्वर मंदीर, कालभैरव मंदीर, एकमुखी दत्त, गरुड हनुमान मंदीर अशी अनेक मंदीरं एका पंढरपूरात भेटतात म्हणून भक्तजन पंढरपुरकडे आकर्षित होतात आणि दिंड्या, पताका, टाळ, चिपळ्या हातात घेऊन डोक्यावर तुळस घेऊन पंढरीची वाट चालू लागतात. पाऊस पाण्याची, उन्हावाऱ्याची तमा न बाळगता झपाटल्यासारखे चालू लागतात आपल्या माऊलीला भेटायला. वारी करायला. आनंदाची वारी करायला.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी घालून दिलेली ही पायी पंढरीची वारी दरवर्षी अखंडीतपणे चालू आहे.
आता तर IT वारी, Doctors वारी, निर्मल वारी अशा अनेक वाऱ्या आधुनिक रुपाने चालू झाल्यात. मोठ्या प्रमाणात सामाजिक एकोप्याचं दुसरं उदाहरण या धर्तीवर पहायला मिळत नाही.
आली पंढरीची वारी
विठू उभा विटेवरी
वाट पहातो गाभारी
पायी चाले वारकरी
मुखे रामक्रुष्ण हरी
मुखे रामक्रुष्ण हरी.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
— लेखन : प्रा. सौ. सुनीता पाठक. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800