Sunday, July 13, 2025
Homeलेखआ प ट्या च्या  पा नां चं ...

आ प ट्या च्या  पा नां चं ऑ स्ट्रे लि य न  व्ह र्ज न

थोडं आश्चर्य वाटलं ना शीर्षक वाचून !
पण थांबा, मंडळी. लवकरच त्याचा उलगडा होईल
पण त्यासाठी तुम्ही माझी कथा शेवटपर्यंत पाना पाना नं वाचत राहा तसं तुम्हाला हे व्हर्जन कसे उलगले ते कळेल….वाचा तर मग….

15 वर्षाच्या परदेशी वास्तव्यामध्ये मला दोन म्हणींची नेहमी आठवण येते पण त्यामध्ये एक तिसरी म्हण मी ऍड केली आहे .

दोन म्हणी अशा…लग्न पाहावे करून… आणि
घर पाहावे बांधून… आणि ऍड केलेली तिसरी म्हण म्हणजे परदेशी पहावं राहून ! …याचं कारण असं की आपले मायदेशी, मायदेशातून परदेशाची कल्पना इतक्या रम्यतेने करता इतका सुंदर तो आहे. नाही असं नाहीये पण पडद्यामागचे जसं नाटक असतं तसं या परदेशाच्या मागे तडजोडीचं एक नाटक आहे हे फार मजेशीर असतं आणि ते कुणाला कळत नसतं जोपर्यंत एखादा माझ्यासारखा परदेशस्थ त्याचा उलगडा करत नाही.

परदेशात साजरे होणारे सण हा त्यातलाच एक भाग आहे. आम्ही परदेशीची मंडळी जे काही सण-समारंभ साजरे करतो ते ज्या काही तत्सम वस्तू मिळतील जशाच्या तश्या पद्धतीने आणि अगदी साध्याभोळ्या पद्धतीने. जसा देश तसा वेश या अविर्भावाने.

आम्ही ऑस्ट्रेलियाच्या हॉर्न्सबी या भागात राहतो. हा भाग निसर्ग सौंदर्य आणि दऱ्याखोऱ्यानी नटलेल्या सेंट्रल कोस्ट या भागापासून फार लांब नाही. तसा सेंट्रल कोस्ट हा भाग मनाला जास्त जवळचा असण्याचे आणखी एक कारण की म्हणजे आम्ही तिथे दहा वर्षे राहिलो आहे.

गमतीचा भाग असा की दरवर्षी आम्ही दसरा साजरा करतो पण आपट्याच्या पानांनी नाही, कारण आपट्याची पानं मिळालीच नाहीत आजपर्यंत…
(तत्सम प्रतीक म्हणून घरा शेजारून फूल झाडांची पानं आणून आपट्याची म्हणून देव्हाऱ्यात ठेवतो)

पण झालं काय पहा ..काही कामा निमित्त आम्ही सहकुटुंब सेंट्रल कोस्ट ला गेलो. एका स्ट्रीट मध्ये कार पार्क केली आणि काम संपल्यानंतर परत जेव्हा कार जवळ आलो तेव्हा नेहमीप्रमाणे तिथले निसर्गसौंदर्य पाहून आमच्या मधलं सेल्फी काढण्याच्या वेडेपणाला जाग आली. आणि नेहमीप्रमाणे मी सेल्फी काढतो, तू नको तुला नीट येत नाही मी उंच आहे… मी एक्स्पर्ट आहे असे आमच्या चौकोणाचे (मी – बायको – मोठा मुलगा – लहाना मुलगा)..तू तू मै मै होऊन…भव्य दिव्य क्षणिक बाचाबाचीच्या गराड्यात नेहमीप्रमाणे आमचा लहान मुलगा जिंकला. आणि कसेतरी हा…ऊ..हि… ही..करत से चीज म्हणत.. हसा जरा पासून ते हसवा जरा पर्यंतच्या बऱ्याच प्रयत्नानंतर कुणाचेही डोळे लागलेले नाहीत आणि सर्वजण हसले आहेत अशा प्रकारचे 3 ते 4 सेल्फी मिळाले. मधेच आमच्या मॅडमच्या काही डायलॉगची उजळणी पण झाली. जसे की तुमचे फोटो छान येतात माझे नाही येत… तुमच्यापेक्षा माझ्या मोबाईल मध्ये काढा ह्याच्यामध्ये आपले फोटो छान येतात वगैरे वगैरे..

तेवढ्यात आमच्या मोठ्या मुलाने त्याच्या नवीन केलेल्या हेअर स्टाईल साठी (हेअर स्टाईल कसली… दोन-तीन महिने न कापता केसांचा झालेला डोलाऱ्यासारखी अवस्था नव्ह ती त्याची स्टाइल) झाडा सोबत स्पेशल सेल्फी घेतला. सध्या त्याने वाढवलेल्या केसांची स्टाईल आम्ही काढलेल्या सेल्फीच्या मागच्या झाडाने पसरलेल्या फांदयासारखी सारखीच वाटली. असो..

हे सेल्फी प्रकरण तिथेच संपलं नाही..सेल्फी काढूनच नुसतं पोट भरत नाही..सेल्फी कशी आली हे पाहावं लागतं तेव्हाच पोट भरतं आणि ढेकर येतो…
असं का ? असं प्लिज कुणी विचारू नका….
कारण ते एक शास्त्र असतं….हा हा हा..
ह्या शास्त्रानुसार माझा सेल्फी पाहण्यासाठी फोटो झूम करून बघू लागलो.

नेहमीप्रमाणे आमच्या मालकीणबाई पण डोकावल्या.. बघू मी कशी दिसते..बघू माझा फोटो कसा आला असं म्हणत कॅमेरा माझ्याकडून हिसकावून घेतला आणि स्वतःच फोटो झूम करून त्या पाहू लागल्या… काही क्षणांत त्यांनी डोळे विस्फारून मला म्हटलं अहो इकडे या आपल्या सेल्फीतील मागच्या झाडाची पानंही कुठंतरी पाहिल्यासारखी आणि ओळखीची वाटतायेत.
मी…. ज्याला..बॉटनीतला बी सुद्धा ओळखीचा नसणारा आणि झाडांविषयी ओ का ठो माहीत नसलेला… बायको समोर बरच काही कळतंय असा आव आणून तिच्यासोबत मी पण डोचकं खाजवू लागलो.

नेहमीप्रमाणे मी सांगितलेल्या तीन-चार उत्तरां पैकी सर्व उत्तरे खोडून काढत तिने सांगितलं अहो ही तर आपट्याची पाने आहेत. बायकांसाठी नेहमीच नवरे मठ्ठ असतात हे माहित असून देखील मी आपला पुन्हा एक केविलवाणा प्रयोग करत हे तिचं म्हणणं खोडून काढण्याचा आणि मी जिंकल्याचा आनंद मिळवण्याच्या नादानं म्हटलं… असं कसं होईल ? पंधरा वर्षे आपण ऑस्ट्रेलियात राहतो तरी सापडले नाही आणि आपट्याचे झाड ऑस्ट्रेलियात कसे येईल ?
मधेच माझ्या लहान्या मुलानं नेहमीप्रमाणे अजून एक प्रश्न केला पप्पा आपट्याची पाने म्हणजे काय हो ?

हे सर्व आपट्याच्या पानांचे प्रकरण लांबून माझा मोठा मुलगा पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव स्पष्टपणे सांगत होता की किती बावळट आम्ही दोघं आहोत. ते फक्त तो म्हणायचं बाकी होता. कारण या पूर्ण चर्चेमध्ये आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीचं भान पूर्णपणे विसरलेलो होतो आणि आर्किमिडीज सारखं वेडे झालो होतो आपट्याच्या पानांच्या शोधात….

आम्ही मुलांच्या विचित्र भावनांकडे दुर्लक्ष करून विचार करू लागलो की ह्या आपट्याच्या पानांचं काय करायचं ? मी म्हटलं थांब नेहमी प्रमाणे आपल्याला प्रश्न पडला की आपण एका देवतेची पूजा करतो तिचं नाव आहे गुगल देवता ! मी पण त्याला काही अपवाद नव्हतो आणि मी पटकन ‘आपट्याची पानं’ गूगल वर टाईप केलं आणि दादर पुलाखाली राहणाऱ्या मुलांना गोष्टी सांगताना एकनाथ आव्हाडइमेज सदरा खाली गुगल पटावर काय येतं ते पाहिलं…आणि काय सांगू जादू ? आपट्यांच्या पानांची इमेज आणि आमच्या सेल्फी च्या मागच्या झाडाची पानं खूप मिळतीजुळती होती. आणि आमच्या आनंदलेल्या मनानं त्या पानांचं पटकन बारसं करून टाकलं आणि त्यांना नाव दिलं आपट्याच्या पानांचे ऑस्ट्रेलियन व्हर्जन…

पण काही असो सापडलेल्या ऑस्ट्रेलियन व्हर्जन च्या आपट्याच्या पानांनी आमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित हास्य पसरलं होतं आणि एक वेगळाच आनंद पसरला होता आणि तो म्हणजे या वर्षीचा दसरा हा आता तडजोडीच्या पानांनी न होता ऑस्ट्रेलियन
व्हर्जन का असेना पण मिळत्याजुळत्या आपट्यांच्या पानांनी होणार होता.

या बरोबर देव सुद्धा या वर्षी जास्त आनंदानं नटणार ह्याचाही एक वेगळाचं आनंद पानांबरोबर पसरलेला होता जसे की त्याच्यावर सोनेरी मुलामाच चढलाय…

पटकन भानावर आलो आणि लक्षात आलं हे सगळं चर्चासत्र फक्त मोबाईल वरच्या इमेज वरूनच चाललं होतं खरी पान तर तोडणं बाकीच होतं. पटकन अधाशासारखं दोन-चार फांद्या तोडायचं ठरवलं.
इथं ऑस्ट्रेलियात झाडाची फांदी तोडताना पण दहावेळा विचार करावा लागतो… कुणी पाहतं का ?
हे झाड नेटिव्ह आहे का ?… कुणी शिक्षा करेल का ? असे नाना प्रश्न अनुत्तरितच ठेवून आणि कसंतरी धाडस करून 2 ते 4 खालच्या खालच्या फांद्या अशा पटकन तोडल्या की जसं काही खरोखर सोन्या च्या फांद्या तोडतो आणि पटकन कारचं दार उघडून त्या कारमध्ये ठेवल्या पण…

भारतामध्ये राजरोसपणे आपट्याची पानं तोडण्याचा आनंद आठवता काहीतरी चुकीचं केल्याचा भास जास्त होता.. पण देवासाठी केलेले हे छोटसं चोरटं काम मोठा आनंद देऊन गेलं… काहीतरी मोठं घबाड मिळाल्याच्या आनंदात आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. अधून-मधून गाडीच्या मधल्या काचे मधून मागच्या सीटवर मध्ये ठेवलेल्या त्या दोन चार फ़ांद्याची रखवाली खरोखरच्या सोन्याच्या फ़ांद्या पलीकडे मी ड्राइविंग करता करता करत होतो.

भरीस भर म्हणून की काय आणि ह्या लुटलेल्या ऑस्ट्रेलियन व्हर्जन च्या आपट्यांच्या पानांचा वास कस्तुरी सारखा सगळीकडे पसरला म्हणून की काय आमच्या एका मित्राचा फोन पण आला. योगायोग असा की त्यांनी मला विचारलं काय हो पाटील साहेब आपट्याची पाने कुठे मिळतात, माहित आहे का ?
आणि मला डबल आनंद झाला. मी त्याला घडलेली ही सर्व स्टोरी सांगितली आणि म्हटलं ये कि भावा घरी.

देशी नाही पण परदेशी का असेना आपट्याच्या पानाचं ऑस्ट्रेलियन व्हर्जन आम्हाला मिळालं आहे.
अस्सल सोन्याच्या खाणीत सापडलेल्या सोन्यासारखी आपट्याचं पानं सापडलेली आहेत.
यावर्षी स्पेशल दसऱ्याचा तर आनंद झालेलाच आहे पण तू आल्यानंतर सीमोल्लंघनाचा डबल आनंद आपल्याला लुटता येईल.

मित्राचा परिवार पण हरकून टूम होऊन संध्याकाळी आमच्या घरी आला. आणलेल्या फांद्या मधून चांगली चांगली पानं फक्त हिरवी…पिवळी आणि खराब झालेली बाजूला टाकून देवासमोर मांडली आणि खरोखरच काय सांगू…
अगरबत्ती न लावताच एका आगळ्यावेगळ्या आनंदाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता

पुन्हा एकदा फोटूचं वेड जागं झालं आणि तीन चार फोटो देवासोबत आणि ह्या आपट्याच्या ऑस्ट्रेलियन व्हर्जन सोबत काढले. चांगल्यापैकी फोटो निवडून ते माझ्या डीपी वर आणि स्टेटस वर चिपकवले आणि जेवढे कुठले व्हर्च्युअल रस्ते आहेत की जसे इंस्ट्राग्राम, फेसबुक, व्हाट्सअँप आणि इतर तत्सम महाभाग यांच्याकडे रवानगी केली. काही वेळाने मित्रांचे कॉमेंट्स आणि व्ह्यूज पाहून डिजिटल सीमोल्लंघनाचा आनंद घेऊन मन तृप्त झालं.

पुन्हा एकदा व्हरच्युअल आपट्याच्या पानांनी नटलेल्या देवीचं मी आणि अर्धांगिनी नं हात जोडून डोकं टेकून तृप्त दर्शन घेऊन खरंच हे कोणतं झाड आहे ? ऑस्ट्रेलिया मध्ये याच खरं नाव काय आहे हे शोधण्याचा रिसर्च पुढचा दसरा येईपर्यंत करण्याची खूणगाठ बांधून आपट्याच्या पानांचं ऑस्ट्रेलियन व्हर्जन ची फाईल ओपन च ठेवली आहे.

सर्जेराव पाटील

– लेखन : सर्जेराव पाटील, ऑस्ट्रेलिया
(कौलवकर – नाशिककर)
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800

RELATED ARTICLES

11 COMMENTS

  1. सुंदर लेख आणि तुमच्या चेहर्यावरील आनंद
    ❤️ मस्त

  2. कांचनवृक्षाची पानंही अशीच मोठी असतात. आपट्याची पानं आकाराने लहान असतात. आपल्याकडचा कुणी पूर्वी कधीतरी तिथे हे रोप घेऊन गेला असेल का?
    लेख छान!

  3. खूप सुंदर लिहीले आहे .लहानपणी दसरा साजरा करताना जो आंनद व्हायचा त्याचा पुन:प्रचिती आली.

  4. मस्त कथा – किंचित लांब आहे – पण ‘पहिला प्रयत्न आहे , स्तुत्य आहे. मी हि हे सर्व middle ईस्ट आणि आफ्रिकेत अनुभवलं आहे. वाचतांना स्मरण रंजनात गुंतलो.

  5. अप्रतिम लेख!
    विजयादशमीचे दिवशी सीमोल्लंघनाचे महत्त्व असते. आपल्यासारख्या परदेशी राहणाऱ्या मंडळींनी कर्म करण्याचे निमित्ताने सीमोल्लंघन केलेले आहेच. त्यात अश्या निराळ्या version च्या असल्या तरी आपल्या संस्कृतीच्या खुणा दिसल्या तर आनंद द्विगुणित होतो.
    आपली शोधक वृत्ती देखील दिसते ह्यात.
    मनःपूर्वक आभार 🙏🏻

  6. मस्त लेख ! ॲास्ट्रेलिअन व्हर्जन भारीच !

  7. वाह, एकदम मस्त वर्णन केलं आहे. ही कोणची पान आहेत हे शोधून काढयची उस्तुकता जागी झाली आहेच शिवाय इथे म्हणजे, यु.के. मधे मिळतील का ते बघायचे ठरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments