वर्धा जिल्ह्यातल्या धनोडी बहाद्दरपूर या गावात नेहमीच सांस्कृतिक गोष्टीवर भर असायचा. गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांच्या विचारांचा पगडा असल्यामुळे संस्कृती आणि कला या विचारांची माणसे गावात होती.
आमच्या गावातील शाळेत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन आजही माझ्या चांगल्याच आठवणीत आहे. स्थळ असायचे शाळेचे पटांगण. मोठा पेंडोल उभारला असायचा. तिथे शाळेत बसवलेले नाटक, नृत्य, गाणे, मुलाची भाषणे असे भरगच्च कार्यक्रम व्हायचे. मी आठवीत असताना एक नाटक बसविले होते. त्यातल्या कलाकारांचा मी मेकअप केला होता. सर्व भयंकर खुशीत होते पण ठाकरे मास्तरांचा राजू त्याचा मेकअप बघून रडायला लागला होता. तो मेकअप मीच करून दिला होता. मी त्याला म्हणालो, ‘अरे नाटकात तुझी अशीच भूमिका आहे..’ जरा वेळानं तो शांत कसाबसा शांत झाला. अशी अनेक संकटे नाटकाच्या वेळी यायची. नेमका एक विद्यार्थी आजारी पडला होता… रात्र भर दुसऱ्या एका विद्यार्थ्याकडून संवादाची घोकमपट्टी करून कसे बसे त्याला नाटकासाठी उभे केले होते. त्याचे एक टेन्शन होते. जितकी संकटे तितकाच देसी उत्साह अंगात संचारला असायचा.
शाळा तेव्हा वेगवेगळ्या फुलांसारखी वाटायची. नाटक हा त्या कार्यक्रमात महत्वाचा भाग असायचा. १९७७/७८ हा तो काळ होता. गावात तेव्हा शाळेत संस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. माझ्या घरात मोठ्ठा मंदिराचा सभागृह असल्यामुळे नाटकाच्या तालमीसाठी जागा असल्यामुळे देवळात तालमी व्हायच्या. आई लग्नापूर्वी, माहेरी असताना नाटकात कामे करायची. मुळात तिलाच नाटकांची आवड असल्यामुळे मला तिचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन सतत मिळायचे.
शाळेतला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आमची मौज असायची. शाळा आणि अभ्यास यातल्या निराशेवर हे औषध असायचे. त्या उडत्या वयात शाळा खरोखरच नको वाटायची. पण एक चांगले होते, ते म्हणजे त्या काळात अभ्यासासाठी घरून आणि शाळेतून धमक्या वगैरे नसायच्या. म्हणून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची आम्हाला प्रतीक्षा असायची.

१५ ऑगस्ट यायच्या पंधरा/ महिना दिवस अगोदर हालचाली सुरू व्हायच्या. नाटक, गीते, नृत्य, भाषणे, पोवाडा, सजावट, अशी सर्व कामे वाटून देण्यात येत. या दिवसात आमची ऊर्जा जबरदस्त वाढलेली असायची. असे वाटायचे की अभ्यास रद्द करून असेच जर वर्षभर चालू राहिले तर किती बरे होईल ! पण ते एक दिवा स्वप्न असायचे. पंधरा ऑगस्ट हा दिवस उजाडला की सकाळी गावातून शाळेतून प्रभात फेरी निघायची. त्या छोट्याश्या गावात सुद्धा शाळेचे ड्रमपथक होते. सर्वात पुढे पाच सहा विद्यार्थी ड्रम व बासरी वाजवीत पुढे चालायचे. त्या मागे तीन चार लाकडी खुर्चीत तेव्हाच्या पुढारी लोकांचे फोटो जसे की, भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, दुसऱ्या खुर्चीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, तिसऱ्या खुर्चीत महात्मा गांधी, चौथ्या खुर्चीत सुभाषचंद्र बोस यांच्या तसबिरी असायच्या. त्या खुर्च्या उंच विद्यार्थीवर्गाच्या डोक्यावरून पूर्ण गावभर त्याची मिरवणूक निघायची. पाचवी ते दहावी चे विद्यार्थी मुलेमुली मोठ मोठ्याने नारे देत निघायचे. ‘बोल गांधीचे मनी धरू गरिबांसाठी राज्य करू’ ‘आराम हराम है’ असे अनेक नारे देत ती मिरवणूक गावातून निघायची. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा सदरा, निळी हाप पँट अशा गणवेशात मोठ्या उत्साहात पंधरा ऑगस्ट साजरा होताना संपूर्ण गाव ती मिरवणूक बघायला घराघरांतून रस्त्यावर यायची. प्राथमिक शाळा सुद्धा यात सहभागी व्हायची. अगदी पहिली ते चौथितले चिल्लेपल्ले, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि शाळेचे गावातले पदाधिकारी पाहुणे म्हणून शाळेत भाषणे ठोकायला हजर असायची. चांगल्या विचारांचे वक्ते व चित्रकलेचे प्रदर्शन शाळा भरवायची तेव्हा गावातला एकमेव बालचित्रकार म्हणून माझी व इतर चित्रकार विद्यार्थी वर्गाची मुला मुलींची चित्रे भिंतीवर लावण्यात यायची. ते प्रदर्शन बघायला गावकरी यायचे तेव्हा आभाळ ठेंगणे वाटायचे.
ते दिवस राष्ट्रीय विचारांनी खरोखरच भारावलेले असायचे. विनोबा भावे लिखित गीताई शाळेतून वाटप व्हायचे. त्यामुळे खिशात मावणारी गीताई आम्ही रोज खिशात ठेवून वाचायचो. त्याचे छानसे संस्कार मनावर व्हायचे. रात्री अंधार पडला की, कार्यक्रम सुरू व्हायचा. शाळेच्या समोर मोठा पेण्डोल तयार केलेला असायचा. सारा गाव झाडून पुसून हजर व्हायचा. आता सारखी तेव्हा रेकॉर्डेड गाणी नसायची. कुणी तरी माईक वरून गायचा आणि त्यावर नृत्य व्हायची. रेडिमेड काहीही मिळत नसल्यामुळे अनेक लोकांचा सहभाग असायचा. तबलजी, हार्मोनियम, खंजिरी असे वाद्य वाजविणारे गावातली कलावंत मंडळी या सांस्कृतिक कार्यक्रमात विना मोबदला वाजवायला यायचे. एका माईकवर नाटक करताना मोठी पंचाईत व्हायची पण लोकांना तेही आवडायचे. सर्व काही शंभर टक्के देशी कार्यक्रम असायचे. तेव्हा इंग्रजी संस्कृतीचा वरचस्मा अजिबात नव्हता.लोकगीते, देसी बोलीतील नाटके, विदर्भातील विनोदी नकलाकार यांच्या नकला… केवळ याच कार्यक्रमामुळे शाळा आम्हाला आवडायची. पण अभ्यास वाढला की मग शाळा नकोशी वाटायची. ते दिवस पुन्हा आठवले की पुन्हा ते दिवस आणि ते बालपण आणि देशी माणसे पुन्हा तो काळ पुन्हा परत यावा असे वाटत राहते. या कार्यक्रमामुळे आजही आमच्या मनात देशी संगीत, साहित्य, लोककला, नाटक, बोलीभाषा, राष्ट्रीय संत यांच्या विषयी आदर आहे.
आज माझ्या घरी साडे तीन हजार पुस्तके आहेत. मातृभाषेतून शिक्षण झाले म्हणून आम्ही काही दुबळे ठरलो नाही की बावळट राहिलो नाही. काळाच्या स्पर्धेत पुरून उरलो.आपल्या संस्कृती विषयी आजही स्नेह आहे. आपण ग्लोबल झालो म्हणजे काय झालो याचे उत्तर कुणाला नीट देता येईल का ? की फक्त पुष्कळ पैसा मिळावा म्हणून ही इंग्रजी शिक्षण पद्धती स्वीकारली आहे का ? पैसा एक फक्त माध्यम आहे. पण या माध्यमाने आज काय काय अडचणी निर्माण करून ठेवल्या त्याची कल्पना करवत नाही. सावली देणारी घरे काही कोटींच्या घरात गेलीत. जीवनशैली पश्चिमात्य संस्कृतीकडे झुकली. विवाहसंस्था बदलत चाललीय. मोठी टक्के वारी मिळविणारे विद्यार्थी बाहेरच्या देशात शिक्षण घेवुन तिथेच स्थायिक होतानाचे चित्र दिसत आहे. आता ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी शिक्षण शिरल्यामुळे देसी संस्कृती लयाला चालली आहे. आज अनेक शाळा आपल्या अस्सल, मुळ संस्कृतीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
हा काळाचा महिमा म्हटले तर हा बदल इथल्या माणसांनी घडवून आणला आहे. माध्यमे अनावर झालीत, शहरी भागातल्या स्कूल मधे तर मराठी भाषेला कुठलेही स्थान उरलेले दिसत नाही. सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इंग्रजीतून करण्याचा सपाटा सुरू झालाय.पाहुणे सुद्धा इंग्रजीतून भाषणे करतात. शाळेत एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर आपण लंडन मधे आहोत की काय ? असे वाटत राहते. एका इंग्रजी भाषेने आपल्याला सर्व काही बदलवयला भाग पाडले. आजचे शिक्षण हे राष्ट्रीयत्वाची शिकवण कमी आणि पैसा कसा मिळवायचा याचे पॅकेज मिळवून देण्याचे शिक्षण देण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आजची मुले मातृभाषेतील साहित्याकडे ढुंकूनही बघत नाही. देशी भाषा शाळेतून हद्दपार झाली आणि सांस्कृतिक डोलारा कोसळला. आजच्या तरुण पिढीसमोर जुन्या पिढीला इंगर्जी बोलावे लागते तेव्हा कुठे तरी मनात सल निर्माण होते. मी एका छोट्याश्या गावात पाहुणा म्हणून गेलो होतो तेव्हा तिथल्या मुलांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजीतून केले. मी सुन्न झालो. आपल्या आताच्या जीवन शैलीतले राष्ट्रीयत्व हरवत चालले आहे.
आमची पिढी भारतीय पिढी म्हणून शेवटची की काय ? कुठल्याही भाषेचा आपण नेहमीच आदर करतो पण ती भाषा जेव्हा देशातील राष्ट्रीयत्वाला संपविण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या भाषेबद्दल चिंता वाटायला लागते. आता आपण ग्लोबल झालो म्हणून देशी संस्कृती उतारावर आणून ठेवायची का ?
पंधरा ऑगस्ट रोजी आपण स्वतंत्र झालो होतो पण आज पुन्हा आपण स्व-तंत्र गमावून तर बसलो नाही ना ? हा प्रश्न विचारावासा वाटतो.. पण याचे उत्तर कोण देईल ? भारतातल्या शाळेतून जर मातृभाषा नाहीशी झाली तर ही मातृभूमी स्वतंत्र होवून आपण काय मिळविले आणि काय गमविले याचा उहापोह कधी करणार आहोत ?

— लेखन : विजयराज बोधनकर. जेष्ठ चित्रकार
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800