Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्य"इंग्रजी बोलणारा स्मार्ट, मराठी बोलणारा गावंढळ !" - मिर्झा बेग

“इंग्रजी बोलणारा स्मार्ट, मराठी बोलणारा गावंढळ !” – मिर्झा बेग

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भरणाऱ्या पहिल्याच आणि नवी दिल्लीत आजपासून सुरू होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शुद्ध वऱ्हाडी बोलीत लोकप्रिय विनोदी कविता सांगता सांगता अंतर्मुख करणारे कवी डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांची परखड मते आज आपण जाणून घेऊ या. कविवर्य मिर्झा बेग यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

आजपासून नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत असली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, याचा कितीही आनंद वाटत असला तरी मराठीचे वास्तवातील सामाजिक स्थान काय आहे ? हा शोध घ्यावा लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन कवी मिर्झा बेग यांनी न्यूज स्टोरी टुडेचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

आपल्या प्रतिक्रियेत श्री मिर्झा बेग पुढे म्हणतात, एकीकडे मराठी भाषेची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संमेलने भरत असताना, प्रत्यक्षात मराठी भूमीत मराठी लुप्त होण्याच्या मार्गावर असून तिची प्रतिष्ठापना करतांना कुणी दिसत नाही. गावांची, दुकानांची, उत्पादनांची, पदवी, पदविकांची नावे इंग्रजीत लिहावी, वाचावी लागतात. मराठी शाळा बंद पडत असून इंग्रजी शाळा वेगाने वाढत आहेत. कार्यक्रम, लग्नादी पत्रिकांचे इंग्रजीकरण होत असून आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. “इंग्रजी बोलणारा स्मार्ट, मराठी बोलणारा गावंढळ” असा आपण समज करुन घेतला असावा. साहित्य संमेलने या सारखे प्रकार एखाद्या परंपरेसारखे घेतल्या जातात व विसरल्या जातात. त्यांच्या होण्याने भाषिक बदल घडत नाहीत. मराठी चित्रपट बघणाऱ्यांची किंवा मराठी वृत्तपत्रे, पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. दर्जेदार मराठी मासिके, साप्ताहिके तर बंदच पडली आहेत. एकूण काय तर मराठी भाषा दुष्टचक्रात सापडली असून कुठला तरी जालीम उपाय शोधावा लागेल. मराठी माणसाने मराठी भाषाच वापरायला हवी. शासकीय कार्यात, कार्यालयात, दैनंदिन जीवनात मराठीचाच वापर व्हावा, मराठी बोलणाऱ्यांचा गौरव करण्यात यावा, शाळा, महाविद्यालयात, माध्यम मराठी असावे परंतु हा वरवरचा उपाय वाटतो. कुठलाही बदल आतून मनापासून घडावा लागतो. जोपर्यंत मानसिकता मराठी होणार नाही तोपर्यंत मराठीची हिरवळ उगवणार नाही इतर भाषेचे गाजर गवत तिला जगू देणार नाही, यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.

मिर्झा बेग यांनी व्यक्त केलेली ही मते केवळ पुस्तकी नाहीत तर त्याला ते गावोगावी प्रत्यक्ष जाऊन सादर करीत असलेल्या त्यांच्या “मिर्झा एक्सप्रेस” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आलेल्या अनुभवांची जोड आहे.

या निमित्ताने पाहू या मिर्झा बेग यांच्या मिर्झा एक्सप्रेस चा प्रवास…..

“काल माह्या सपनात
माय मराठी आली
दाखवली तिनं मले
झोई तिची खाली

मी हाव म्हणे मिर्झा
करोडोची आई
भीक मांगाची आली
आज मायावर पाई

पोळ्याच्या बैलावानी
मी पहिले सजत होती
साहित्याच्या तोरणात
वाजत गाजत धजत होती

आज मातर मले
फेकून दिलं तयात
इंग्रजी जाऊन बसली
ज्याच्या त्याच्या गयात !!”

कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे त्यांच्या तुफान लोकप्रिय असलेल्या ‘मिर्झा एक्सप्रेस’ या एकपात्री कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमात जेव्हा मायबोली मराठीवर निरतिशय प्रेमाने पण तितक्याच शैलीदार उपरोधाने कविता सादर करतात, तेव्हा सर्व श्रोते, प्रेक्षक अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त होतात.

एकीकडे आपण मराठीचे गुणगान करतो, राज्य पातळीवरच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी साहित्य संमेलने भरवतो आणि प्रत्यक्षात, व्यवहारात मात्र मराठी भाषेचा अभिमान न बाळगता इंग्रजीत बोलतो, लिहितो, इंग्रजीचाच अभिमान बाळगतो या विरोधाभासाला काय म्हणावे ?

खुद्द मुंबईतच दोन व्यक्ती तासभर एकत्र बोलतात आणि शेवटी शेवटी एकमेकांची नावे विचारायची वेळ आली की, कळते, अरे हा ही मराठी माणूस आहे ! कित्येकदा तर समोर चा माणूस मराठी नसला तरी तो मराठी उत्कृष्ट लिहिणारा, बोलणारा असतो तरी पण आपणच हिंदी, इंग्रजीत बोलतो म्हणून ती व्यक्तीही त्याच भाषेत बोलू लागते, याला काय म्हणावे ? म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मी लेख लिहिला होता, “मराठी अभिजात झाली. पुढे काय ?” त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात जो पर्यंत आपण मराठी भाषेचा सातत्याने आग्रह धरीत नाही, तो पर्यंत केवळ कागदोपत्री दर्जा मिळाल्याने, दोन तीन दिवसांची मोठमोठी संमेलने भरविल्याने ती तात्कालिक प्रभावी वाटत असली तरी, जल्लोषाचे ते दोंन चार दिवस सरले की परत “ये रे माझ्या मागल्या सुरू” होते आणि म्हणूनच माय बोली मराठीची अहोरात्र पूजा करणारे, मायबोली मराठीवर मनापासून प्रेम करणारे, कधी हसवत तर कधी अंतर्मुख करत आपला “मिर्झा एक्स्प्रेस” कार्यक्रम करणारे डॉ मिर्झा रफी बेग मला थोर आणि वंदनीय व्यक्ती वाटतात.

तसे तर डॉ मिर्झा रफी बेग यांचे काही कार्यक्रम मी टिव्ही वर बघितले होते. मग कधी खूपच कंटाळा वाटू लागला की मी त्यांचे कार्यक्रम यू ट्यूब वर बघायचो. पण सात एक वर्षांपूर्वी छ्त्रपती संभाजीनगर येथे कासार साथी प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला समक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून त्यांनी माझ्या मनात कायमचे घर केले. त्यांना दुसऱ्यांदा समक्ष ऐकण्याची संधी नवी मुंबई पत्रकार संघाने गेल्या वर्षी आयोजित केलेल्या काव्य विषयक कार्यक्रमामुळे मिळाली. दरम्यान आता ते इतके लोकप्रिय होऊन गेले आहेत की, नवी मुंबईतील कार्यक्रम पूर्ण होण्याची वाट बघत न बसता त्यांच्या कविता सादर करून त्यांनी हसे, टाळ्या मिळवल्या आणि प्रेक्षकांची, आयोजकांची माफी मागून ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी लगेच निघून गेले. अशा या मराठी प्रेमी, निसर्ग कवी, सर धर्म प्रेमी, माणुसकीवर निरतिशय विश्वास असलेल्या त्याच बरोबर इतकी अफाट प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवून ही आपले पाय जमिनीवर ठेवलेल्या या कवी विषयी मला अधिक जाणून घ्यावेसे वाटले.

डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचा जन्म १७ जुलै १९५७ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत तालुक्यातील धनज माणिकवाडा येथे झाला. या गावातच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे शिक्षण एसएससी, डी एच एम एस इतके झाले आहे. म्हणजे तसे ते होमिओपथि डॉक्टर आहेत.

जन्मापासूनच वऱ्हाडी बोली कानावर पडत राहिल्याने ते साहजिकच या बोलीत नुसतेच पारंगत झाले नाही तर या बोलीचा अभिमान बाळगून लहानाचे मोठे होऊ लागले.

शेतकरी आत्महत्या, इंग्रजी मुळे मराठीची झालेली दुरावस्था, माणसातील हरवत चाललेले माणूसपण यावर ते विनोदाच्या माध्यमातून मार्मिकपणे बोट ठेवत आले आहेत.

वाढते प्रदूषण, फळे, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन वाढण्यासाठी खतांचा,औषधांचा जो बेसुमार वापर वाढला आहे, त्यावर उपरोधिकपणे ते कसे लिहितात आणि बोलतात, हे त्यांनी दोन वाघांच्या पुढील संवादातून अतिशय चपखलपणे मांडले आहे.

“आजकाल माणसायले
राहिली नाही चव
रसायनच खाऊ खाऊ झाले बेचव
सल्फेट खाते, केमिकल खाते,
रक्ताले त्याच्या कसा
घुर्रट वास येते
परवा एका वाघानं
माणूस फस्त केला
तंगड्या घासु घासु
लेकाचा कुत्र्यासारखा मेला
अशा जहरी माणसाची
शिकार कोण करते
वाघ असलो तरी
गवत खाले पुरते !!”

आपल्या आयुष्याची जडणघडण सांगताना बेग सरांनी यवतमाळच्या ओम सोसायटीत शारदा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनात सहभागी झाल्याबद्दल तेथील पदाधिकारी महिलेने ५१ रुपये मानधन आणि प्रवास खर्च देऊन बोलाविले होते, याची आवर्जून आठवण सांगितली.
त्यापूर्वी त्यांना कोणत्याही कवी संमेलनासाठी कधीच असे मानधन मिळाले नव्हते. ते कवीसंमेलन पुढच्या कार्यक्रमासाठी पायाचा दगड ठरले. कार्यक्रमाचे पैसे मिळू शकतात हे या कार्यक्रमाने त्यांना कळाले आणि त्यांची मिर्झा एक्सप्रेस सुसाट सुटली. त्यामुळे यवतमाळकर आणि यवतमाळच्या त्या महिलेचा मी आयुष्यभर ऋणी आहे असे ते नम्रपणे म्हणतात.

जगात धर्मावरून जितकी युद्धे झाली आणि होत आहेत, त्यामुळे माणूस कसा अडचणीत येतो हे सांगण्यासाठी ते कवी निरज यांची पुढील कविता सादर करीत असतात.
“जितना कम सामान रहेगा
सफर उतना आसान होगा
जितनी भारी गठडी होगी
उतना तू हैरान रहेगा
हात मिले और दिल ना मिले
ऐसे में नुकसान रहेगा
जब तक मंदिर, मस्जीद है
मुश्किल में इन्सान रहेगा !!”

मिर्झा रफी अहमद बेग यांचे प्रमाण मराठी भाषेवर जसे प्रभुत्व तसेच त्यांचे व-हाडी बोलीवर विशेष प्रेम आहे. “साधी राहणी, उच्च विचारसरणी”चे ते पाईक आहेत. त्यांचे कवितेचे सादरीकरण हे इतके सहज सुंदर, नैसर्गिक आणि विनोदी असते की सभागृह सतत हास्याच्या हिंदोळ्यावर राहते. आजवर त्यांचे ३ हजार च्या वर कार्यक्रम झाले असून त्यांना ७० हजारच्या वर चाहत्यांची पत्रे आलीत आहेत यावरूनच त्यांची तुफान लोकप्रियता कळते.

डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे झी टी.व्ही.च्या मराठी हास्यसम्राट कार्यक्रमात उपविजेते ठरले होते.
राजधानी दिल्ली, ई टी.व्ही. मराठी आणि अन्य काही वाहिन्यांवर सुध्दा त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
यू ट्यूब वर त्यांचे शेकडो कार्यक्रम उपलब्ध आहेत.

स्वतंत्र एकपात्री प्रयोग करीत असतानाच नागपूरच्या दैनिक लोकमतने “मिर्झाजी कहीन” मिर्झा बेग यांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारोच्या संख्येने वाचकांची पत्र यायची. त्या सर्व पत्रांना ते मार्मिक उत्तरे देत. त्यामुळे ते सदर खूपच लोकप्रिय ठरले.
लोकमत बरोबरच दैनिक देशोन्नती मधीलही त्यांचे सदर अफाट लोकप्रिय ठरले होते.

मिर्झा बेग यांची आजपर्यंत….
घुयमाती, उठ आता गणपत; जांगळबुत्ता; मिर्झायन; धोतर गुलल बोरीले (६००० ओळींचे खंड काव्य); घरावर गोटे; अशी एकूण १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

पहिले बहुजन साहित्य संमेलन, नेरपरसोपंत १९९६, दहावे वन्हाडी साहित्य संमेलन, धनज माणिकवाडा १९८६, दुसरे विदर्भ मुस्लिम बुहुजन साहित्य संमेलन, वणी १९९७, दलित बहुजन साहित्य संमेलन, पांढरकवडा २००४, पाथर्डी साहित्य संमेलन २०१३ अशा विविध साहित्य संमेलनात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.

आकाशवाणी नागपूर च्या कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य, मराठी रंगभूमी नाठ्य परिनिक्षण मंडळाचे सदस्य राहिलेल्या मिर्झा बेग यांचा, याशिवाय अनेक साहित्यिक, सामाजिक उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग असतो.

स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड, संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या विद्यापीठातील अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ मिर्झा बेग यांना आतापर्यंत डॉ. गौरीश गांधी ट्रस्ट, नागपुर यांचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार २०१९, अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटचा इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर पुरस्कार, मा.बा. गांधी ट्रस्ट, नागपुर यांचा १९९९ चा उत्कृष्ट ग्रामिण साहित्य निर्मिती पुरस्कार असे असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.

असा हा मानवतेचा मसिहा तुम्हा आम्हाला हसवत हसवत शतायुषी होवो या मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खुप छान लिहिलं आहे तेही दाखल्यांसह…सत्य परिस्थिती आहे ही 👌👌👌👌🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित