इंग्लंडमधील वॉरिंगटन येथे राहणाऱ्या सौ. लीना फाटक यांच्या खुप जवळचे एक मित्र कोरोनामुळे कालवश झाले. गेलेल्या मित्राशी ५/६ आठवड्यापूर्वी त्यांच्या मनमुराद गप्पा झाल्या होत्या. त्यामुळे तो धक्का त्यांना सहनशीलते पलिकडचा वाटला. आता मात्र, देवाला त्यांनी दिलेल्या “धमकी” मुळे जगांतील सर्व देशांतल्या देशांधिकाऱ्यांना vaccination program जारीनी अंमलात आणायची सत्बुद्धि दिली असे त्यांना वाटते. कोरोनाचे प्रमाण कमी होतं आहे. या विषाणूंवर हांच एक उत्तम उपाय आहे असे सगळ्या तज्ञांचे म्हणणे आहे. त्या जगन्नाथाची क्षमा मागून त्या त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहचवत आहे. शेवटी त्याला शरण जाणे हेच योग्य. खरंय ना ?
हे माझ्या अनादि अनंता, हे निर्गुण निराकारा, देवाधीदेवा. ….
आम्ही मानव तुम्हांला किती वेगवेगळ्या रूपांत शोधतो. निरनिराळ्या नांवांनी हांक मारतो, बोलवतो. आमच्या श्रद्धेनुसार तुमची आराधना करतो, भजतो, पुजन करतो.
मी, भारतांतल्या सनातन धर्मात वाढलेली व परदेशात राहूनहि, शक्यतोवर तो जपत असलेली एक सामान्य, वयस्क स्री, तुमच्यावर रागावून, तुमची तक्रार घेऊन, तुमच्याकडेच आले आहे. तुम्ही सगळ्यांत “Supreme”, म्हणून इतरांकडे तुमची तक्रार करून उपयोग होणारं नाही हे जाणून आहे. जगातल्या सद्ध्याच्या परिस्थितीची व तुमच्या कर्तव्याची तुम्हांला जाणिव करून देणार आहे. हो, कोणीतरी हे धाडस करायलाच हवे.
हे देवाधीदेवा, आमच्या सनातन धर्माप्रमाणे तुम्ही ३३ कोटी आहात. एखाद्या लहान सेनेएवढी तुमची संख्या. शिवाय तुमच्यातले कितीतरी जणं चतुर्भुज आहात. काही देवता तर अष्टभुजा आहेत. सर्व जण सशस्त्र, हातांत आयुधे असलेले आहांत. एवढे असुनहि तुम्ही जगावरचे हे कोरोनाचे संकट दूर करू शकत नाही ? इतक्याशा विषाणुंचा त्यांना चिरडून नाश करू शकत नाही ? या जगाचे पालन-पोषण करणारे, ते शेषशायी भगवान, अजुन झोपलेलेच आहेत का ? जा, त्यांना जागं करा.
हे निर्गुण निराकारा, जगातल्या सर्व देवाधीकांशी संगनमत करा. सर्व धर्मगुरुंचे, संत-महंतांचे सहकार्य घ्या. त्यांना प्रेरणा द्या. तुम्हा सर्वांत एकी करून, आचरणांतुन आम्हां मानवांना धडा घालुन द्या. श्रीकृष्णांच्या हातात सुदर्शन चक्र आहे ना ? Cowboys जशा गायी किंवा shepherd’s dogs जशा मेंढ्या एकत्र गोळा करतात तसे हे कोरोनाचे विषाणू, सुदर्शन चक्र सोडून, एका ठिकाणी एकत्र करा. म्हणजे शिव-शंकरांना त्यांचा तिसरा डोळा उघडून हे सगळे विषाणू पटकन भस्मसांत करता येतील. माझी ही सूचना, कल्पना तुम्हाला कदाचित childish वाटेल. पण प्रयत्न करा.
हे परमेश्वरा, ह्या विषाणूंनी जगभर नुसते थैमान घातले आहे. लोकांना काम-धंदे नाहीत, व्यवसाय बंद पडले आहेत. कित्येकांना पुरेसे खायला मिळत नाहीये. ठिकठिकाणी लोकं दंगेखोर होऊ लागले आहेत. भविष्याची सर्वांना फार मोठ्ठी काळजी वाटत आहे. या कोरोनानी कित्येक जणांचे बळी घेतले आहेत. या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून अंत्यसमयी, अंत्यविधीला जवळचे लोक एकत्र येऊ शकत नाहीत. जन्मानंतर मरण येतेच. वृद्धापकाळ, शारिरीक व्याधींनी मृत्यु येतो. पण रोज हजारो माणसे कोरोनानी मृत्युमुखी पडत आहेत हे रोजच्या बातम्यांतून कळतेच आहे. ज्या धर्मांत मृत्युनंतर पुरण्याची पद्धत आहे त्यांना जागेच्या अभावी एकत्र पुरले जात आहे. दुसऱ्या महायुद्धांनंतर परत मानवांवर ही वेळ यावी ही किती खेदाची गोष्ट आहे.
भारतांतही एकापाठोपाठ एक चिता जळत आहेत. हे बघून व एैकूनहि, आम्हां मानवांची तुम्हांला काहीच दया येत नाही ? तुमच्यावरचा राग त्यामुळे फार बळावला आहे. एवढं असुनहि कांही श्रद्धाळु मानव “आमचीच चुक आहे” असे म्हणत, तुमची क्षमा मागत याचना करतात त्याचे वैषम्य वाटते. कबूल आहे. चुकतो आम्ही. कर्ताकरविता तुम्ही, जशी तुम्ही आम्हांला बुद्धी देतां तसेच आम्ही वागतो. आमचे अवगुण तुम्हीच दूर करा.
सर्व भाविक लोक, तुमच्याशी मी वाद घालतीय म्हणून मला घाबरवतील. “तुमच्या अगाध शक्तीने हळुच फुंकर मारून मला नरकांत ढकलाल” असं म्हणतील. ठीक आहे. पृथ्वीतलावर कोरोनामुळे नरकच होणारं आहे मग खरा नरक तरी पाहीन. नाहीतरी नकली मला कांही आवडत नाहीच. असा मी मनांशी विचार केला. पृथ्वीवर जर नरक झाला तर आम्ही मानव आमचा “तिसरा डोळा” उघडू व त्यांत तुमच्यावरची श्रद्धा मात्र भस्मसांत होईल याची खात्री असू द्या एवढच सांगावस वाटतय.
हे जगन्नाथा, आमच्या खुप जवळच्या एका मित्रांचा कोरोनानी बळी घेतलाय. कोरोनाबद्दलचे सर्व नियम पाळण्यांत ते आमच्यापेक्षा चौपट काळजी घेणारे. असे असूनहि कोरोनानी त्यांना गिळून टाकले. एकाचवेळी ते, त्यांची बायको व मुलगा, कोरोनानी ग्रस्त होऊन हाॅस्पिटलमधे होते. एकमेकांना आधार, धीर ते देऊ शकले नाहीतच पण आमच्या मित्रांच्या अंत्यसमयी ते जवळपास सुद्धा जाऊ शकले नाहीत. ही अतिशय धक्कादायक बातमी अंत:करणाला पोळली व दु:ख्खाचे रूपांतर तुमच्यावरच्या रागांत झाले. तुमच्यावरच्या रागाचा घडा पूर्णपणे भरला. कोणत्याही दोन भावनांमधे एक खुप सुक्ष्म, अदृश्य अशी रेषा असते. हा असामान्य रागच, मला, तुम्हांला सरळ, रोखठोक जाब विचारण्याचे सामर्थ्य देऊन गेला. तुमच्यावरचा राग आता शब्दांत उतरवला आहे. मन थोडे शांत झाले आहे. आंतरीक मन:शांती मिळाली की आपोआपच माझे हांत जोडले जातांत आणि माझ्या नकळत मी नतमस्तक होते. तसेच काहीसे आता वाटते आहे.
हे अनादि अनंता, अखेरीस, जे काही व्हायचं असत ते होतंच. ते कोणीहि, तुम्हीसुद्धा, थांबवू शकत नाही. हे विश्वाच्या कालभैरवा, तुम्हीच आमचे दाता व त्राता आहांत हेच त्रिवार सत्य आहे. म्हणूनच, कालाय तस्मै नम:
– लेखन : सौ. लीना फाटक, वॉरिंगटन, इंग्लंड.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
Nice
देवा समोर ठेवलेला महामारीचा उद्रेक, खरचं डोक्यात जातो. लेखिकेने मांडलेल्या भावूक वैचारिक शब्द रचना, खूपच सुंदर देवाला जगातील सजीवांची लवकर दया येवो व तुमच्या म्हणण्या प्रमाणे सारे विषाणू कृष्णा च्या हाती एकत्र होवून नाश होवो.
खरच कोरोना महामारीने जगभर लाखो नागरिक मृत्यूमुखी पडले. काही घरात एकही सदस्य उरला नाही. दुःखाची बाब म्हणजे कुटुंबातील लाडक्या व्यक्तीचं अंतिम दर्शन घेणे सुध्दा शक्य झाले नाही. काही लहान लहान बालके आई बापा विना पोरकी झाली. आता ह्या महामारीने आवरत घ्यावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏