पावसात बहरला निसर्ग
पाचुंचे सभोवती पडले सडे
धबधबे फेसाळती दरीत
पानापानांवरती चमकती खडे ||१||
पक्षी किलबिलती भोवती
गाईगुरे दंग हिरव्या चार्यात
मंडुकांचे मंत्र खड्या आवाजात
पसरला धुंद नाद वार्यात ||२||
छेडले स्वर बासरीचे कृष्णाने
धुन ऐकण्यास इंद्रधनु अवतरला
सप्त रंगाची करत बरसात
ध्ननि चारी दिशांत वसला ||३||
धुक्यात गुरफटला इंद्रधनु
उधळूनी सप्तरंग क्षणात लपला
लपणडाव सृष्टीसवे खेळता
इंद्रधनु राधेच्या गाली हसला ||४||
राधा-कृष्ण सप्तरंगी न्हाले
इंद्रधनुच्या झुल्यावर झुलले
नाद गंधमय झाली सृष्टी
क्षणात’मी’ ‘तू’पण निमले ||५||

— रचना : अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800