Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यइलेक्शन बिलेक्शन

इलेक्शन बिलेक्शन

संगमनेर येथील साथी हिरालाल पगडाल सर यांच्या  “इलेक्शन बिलेक्शन” चे परीक्षण मी करणार आहे. लेखनाची सुरुवात इलेक्शनवर करतो.

इलेक्शन हे केवळ निवडणुका अशा मर्यादित अर्थाने घेता येणार नाही व या पुस्तकाचाही तो उद्देश नाही. 15 ऑगस्ट 1947 ला अनेक बलिदानांच्या, सत्याग्रहांच्या, असहकाराच्या जनचळवळीच्या रेट्याने या देशाला स्वातंत्र्य मिळाले व 26 जानेवारी 1950 रोजी हा देश प्रजासत्ताक राष्ट्र बनला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्यायावर आधारीत जगातील सर्वात मोठ्या कल्याणकारी लोकशाहीचा उद्घोष घटनेच्या रुपाने केला. या घटनेतील विविध तत्त्वांना धरून “लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता” चालविलेल्या राज्यात घटनेची अंमलबजावणी करून समाजाभिमुख राज्य चालविण्याची जबाबदारी या शासन व्यवस्थेवर असते व ही शासन व्यवस्था लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकांतून निर्माण होते. हे आपल्या सर्वांना माहीत जरी असले, तरी निवडणुका या का महत्त्वाच्या आहेत हे आपण गांभीर्याने समजून घेतले पाहिजे व या पुस्तकाचा उद्देशही खऱ्या अर्थाने असाच आहे.

प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे लोकशाही संवर्धीत करणे किंवा अर्पणपत्रिका ही जिवंत ठेवणाऱ्यांना अर्पण केली आहे, त्यामुळे हे स्पष्ट होते. एक एक मत देऊन सर्वांना आपापले प्रतिनिधी निवडून जन कल्याणकारी विश्वस्त म्हणून या प्रतिनिधींनी काम करायचे असते. ते जनतेचे विश्वस्त असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा समग्र परिवर्तनासाठी त्यांनी काम करायचे असते. त्यातून राष्ट्र, राष्ट्रातील लोक, त्यांचे जीवन, संस्कृती, परदेश धोरण, विकास इत्यादी अनेक बाबींचा रावापासून रंकापर्यंत सामाजिक न्यायाने काम करायचे असते. म्हणून निवडणुका (इलेक्शन) हे महत्त्वाचे आहे.

पुस्तकाचे लेखक, हिरालाल पगडाल

अशा अर्थाने पगडाल सरांनी एका महत्त्वाच्या व आगळ्या-वेगळ्या विषयाला हात घालून लोकशिक्षणाचा, प्रबोधनाचा उद्देश ठेवून अगदी सर्वसामान्य माणूस डोळ्यांपुढे ठेवून या पुस्तकाचे लेखन केले आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या होणाऱ्या निवडणुकांच्या उलथापालथी मांडताना त्याच वेळी घडणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक महत्त्वाच्या घटना मांडून हे पुस्तक अभ्यासयुक्त केले आहे. तरुणांना दिशा, नवपुढाऱ्यांना मागील इतिहास तर कार्यरतांना घटनाक्रमांची जंत्री या पुस्तकात अगदी सहज मिळून जाते.

खरे तर यातील प्रत्येक घटना ही एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय व फुटलेल्या आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे अतिशय गुंतागुंतीची व विविध अंगे असणारी आहे. तरीही ती अगदी सोपी करून एकाच पुस्तकात मांडताना सरांचे कसब, त्यांचा राजकीय व सामाजिक जीवनातला अनुभव व निरीक्षण एका अर्थाने उपयोगात आले आहे, त्याशिवाय हे शक्य झाले नसते.

कार्ल मार्क्सने म्हटल्याप्रमाणे इतिहासाचे वास्तव ज्ञान देऊन भविष्यातील परिवर्तनाची दिशा साहित्यिकांनी जनतेला द्यायची असते, असे काम या पुस्तकाने केले आहे. 1952 ते 2019 पर्यंतची देशपातळीवर झालेल्या निवडणुका, त्यांचे विश्‍लेषण व त्यावेळी त्या अनुषंगाने घडणाऱ्या अनेक घटनांची गुंफण यात आपल्याला वाचायला मिळते, ती थोडक्यात अशी…

जसे की, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सहकाराचा उदय व त्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम, चीनचे युद्ध, त्यावरील भाष्य, त्या काळात हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री, पाकिस्तानचे युद्ध व बांगला देशाची निर्मिती, गरिबी हटावची घोषणा किंवा अंधेरे में एक प्रकाश, संस्थानिकांचे विलिनीकरण व बंद झालेले तनखे, बँकांचे राष्ट्रीयीकरण, आणीबाणी, खलिस्तानवादी चळवळ, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर व झालेल्या दंगली, इंदिरा गांधी व राजीव गांधींची झालेली हत्या, खाऊजा (खासगीकरण उदारीकरण व जागतिकीकरण) धोरणाचे झालेले जागतिक परिणाम, मंडल आयोग, बाबरी विध्वंस व राम मंदिराचे भूमिपूजन, संगमनेर व नगर जिल्हा परिसराला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाची निर्मिती व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, रामलीला मैदानावर झालेल्या अण्णांच्या उपोषणाचा परिणाम इत्यादी घटनांचा सकारण व वास्तव वेध अगदी मोजक्या ओळीत अभ्यासपूर्वक मांडण्यात आला आहे. विस्तारभयास्तव सर्वच गोष्टींचा उल्लेख टाळत आहे, कारण ते पुस्तक तुम्हांला यासाठी वाचायचे आहे.

आता बिलेक्शन संबंधीचा विचार मांडताना एक एक मत या निवडणुकांमध्ये राष्ट्र घडवत असते आणि त्यामुळे त्या मताची किंमतही राष्ट्राइतकीच महत्त्वाची असते. म्हणून काही काळ निवडणुका या मुल्यांवर, विचारांवर, आचारांवर, नैतिकतेवर, धोरणावर, समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्‍नांवर, देशाच्या विकास प्रक्रियेवर, परदेश धोरणांवर, ग्रामीण भारत डोळ्यांसमोर व विज्ञान युगातील येणाऱ्या बदलांना सामोरी जाताना येणारी आव्हाने समोर ठेवून धवल व हरीत क्रांतिवर झाल्या.

पण नंतर मात्र मत देणारा व घेणारा यांच्यात सौदा होऊन निवडणुकांचे बाजारीकरण झाले. राजकारण हे समाजासाठी करायचे असते हा विचार लुप्त होऊन सत्ता-संपत्ती-सत्ता असे दुष्टचक्र सुरू झाले. राजकीय विचारधारा तू-तू मै-मै मध्ये रंजक व अधःपतीत झाल्या. याचे सरांनी परखडपणे वर्णन केले आहे.

डॉ.सुधीर तांबे सरांनीही या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या भाषणात सध्याच्या मूल्यहीन निवडणुकांवर व संपत्तीच्या विनियोगावर परखड मत मांडले आणि मग मात्र आपल्याला इलेक्शन हे बिलेक्शन झाल्याचे केव्हा कळून येते हे समजत नाही. अशा अर्थाने सरांनी विचारपूर्वक ‘इलेक्शन बिलेक्शन’ हे नाव कसे दिले असावे हे समजते. मात्र त्यासाठी सर्व पुस्तक वाचायला हवे, आणि तुम्ही ते वाचा.

समाजाने निवडून दिलेले प्रतिनिधी व शासन समाजाचे स्वातंत्र्य हिरावत असतील, विविध सामाजिक, सांस्कृतिक प्रश्‍नांवर असहिष्णुतेने वागत असतील, सामाजिक परिवर्तनाचे विचार मांडताना त्यांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकत असतील, कधी बहुजनवाद तर कधी जात-धर्माच्या नावाने राजकीय शिमगा खेळत असतील, लोकशाहीच्या नावाखाली छुपा फॅसिझम (श्रेष्ठत्व – हुकुमशाही) आणू पाहत असतील तर याला जबाबदार कोण ? तर आपण व आपले मत व त्यातून होणाऱ्या निवडणुका होत. आणि म्हणूनच त्या दृष्टीने या पुस्तकाने महत्त्वाचे काम केले आहे.

निवडणुका व निर्माण व त्यातून घडणारे बरेवाईट परिणाम कमी शब्दात का होईना त्यांनी मांडून जागृती केली आहे. म्हणूनच समाजाने निवडणुकांकडे विचारपूर्वक व इतिहासावर नजर टाकून गांभीर्याने पहायला हवे व देशातील सर्वात मोठी लोकशाही व घटनेतील तत्त्वांची अंमलबजावणी होण्यासाठीचे मतदान करायला हवे. आपल्याला असेच प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत अशा अर्थाने हे पुस्तक दिशादर्शक विचार मांडते.

आमदार डॉ.सुधीर तांबे व जयहिंद लोक चळवळ व त्यांचे कार्यकर्ते यांचेही या ठिकाणी अभिनंदन करायला हवे की त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. कारण पुस्तके हे मस्तके घडवतात व अशी मस्तके झोटींगशाही विषमतेपुढे न झुकता समाजवादी इतिहास निर्माण करतात. नाठाळांच्या पाठी काठी देतात तर सामान्यांच्या प्रती कासेची लंगोटी देतात. जेव्हा लिहिण्या-वाचण्याचा-बोलण्याचा व अभिव्यक्त होण्याचा अधिकारच नव्हता, तेव्हा महाराष्ट्रात भक्ती आंदोलनाने आध्यात्मिक समतावादी लोकशाही निर्माण करताना काव्यात्मक मीथकांचा किर्तन रुपाने वापर करून समाजाला आत्मभान देण्याचे काम केले.

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी… या तत्त्वाचा ध्यास घेऊन संत नामदेवांनी भारतभर भ्रमण केले. अठरापगड संतांना आधार, प्रेरणा दिल्या. अठरापगड समाजाला सामाजिक प्रतिष्ठा देताना सर्वसामान्य माणूस देवत्वाला पोहचू शकतो, तो संत होऊ शकतो, तो लिहू शकतो-वाचू शकतो-बोलू शकतो यासाठी भक्तिमाध्यमातून त्याला त्याचे श्रेष्ठत्व देऊन सर्व संतांच्या मांदियाळीने जे लेखन केले व त्यातून जी सांस्कृतिक उत्क्रांती घडली त्याच पायावर पुढे शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांती घडवून आणली. याचे श्रेय निश्‍चितच ज्ञानाला, अनुभवांना जाते व हे ज्ञान देण्याची साधने पुस्तके, आजचा सोशलमिडिया आहे. त्यामुळे या क्षेत्रात जयहिंद लोकचळवळ निश्‍चितच प्रतिभा असणारी परंतु अनेक कारणांनी व्यक्त न होऊ शकलेल्या प्रतिभावान माणसांना प्रेरणा देईल, लिहिते करतील व त्यांना पुस्तक रुपाने समाजापुढे मांडतील अशी आशा व्यक्त करून सरांना मी भावी लेखनाच्या शुभेच्छा देतो व संत तुकाराम महाराजांच्या शब्दांनी या परीक्षणाचा शेवट करतो…
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे
यज्ञ करू॥
शब्दांचि आमुच्या जीवाचे जीवन।
शब्द वाटू धन
जन लोका॥
तुका म्हणे पहा
शब्द हाचि देव।
शब्देचि गौरव पूजा

डॉ सोमनाथ मुटकुळे

– लेखन : डॉ. सोमनाथ मुटकुळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments