Thursday, November 21, 2024
Homeलेखउत्तर नसलेले प्रश्न !

उत्तर नसलेले प्रश्न !

जगाचे आजचे वातावरण मन उद्विग्न करणारे आहे. एकीकडे माणूस चंद्रावर चाललाय. आकाशातील ग्रहावर झेपावतोय. तंत्रज्ञानाची एकेक झेप थक्क करणारी आहे. अन् दुसरीकडे तिसऱ्या महायुद्धाची तयारी चालली आहे. जीवघेणे हल्ले होताहेत. प्रत्येक देशात अस्वस्थता, अशांतता आहे. अनेक समस्या आहेत. आर्थिक मंदी आहे. सामाजिक दुही आहे. जाती धर्मावरून द्वेषाची बीजे पेरली जाताहेत. दहशतवादी अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत.
हे कमी म्हणून की काय माणूस चक्क जनावरासारखा वागायला लागलाय. म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागले अशी स्थिती ! तीच जुनी रानटी अवस्था पुनः आली की काय अशी परिस्थिती ! पूर्वी देवांना छळायचे दानव..आता माणसेच राक्षसासारखी वागताहेत. रोज बलात्काराच्या, मुली, महिलांवरील लैंगिक अत्त्याचाराच्या अंगावर काटा आणणाऱ्या बातम्या कानावर आदळताहेत. कायद्याची भीती राहिलीच नाही. जेलमध्ये जायची भीती नाही. समाज काय म्हणेल, कसे बघेल आपल्याकडे याची चिंता नाही. ना गुन्हा करणाऱ्या नराधमाला, ना त्याच्या कुटुंबाला !

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजाचे राज्य, त्या आधी मुस्लिमांचे राज्य असे म्हणून आपण हात झटकायला मोकळे होतो. पण एव्हढ्या मोठ्या दीर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले. आपले सर्वात मोठी लोकशाही म्हणविणारे राज्य आले. त्यानंतर परिस्थिती बदलेल ही स्वाभाविक अपेक्षा. कारण आता दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवायला आपण मोकळे नाही. आपलेच कायदे, आपलेच आपणच निवडून दिलेले सरकार. पण परिस्थिती सुधारली का ? शिक्षणाचा दर्जा सुधारण्याऐवजी घसरला आहे. संख्यावाढ झाली सगळीकडे. पण गुणवत्ता घसरली. भ्रष्टाचार तर कमालीचा वाढला. लोकशाहीचा अर्थ शिरगणती एव्हढाच उरला. निष्ठा, नैतिकता उरलीच नाही राजकारणात. जातीय तेढ वाढली.धार्मिक द्वेष वाढला. मी, माझे अशी संकुचित झाली सामाजिक बंधुभावाची त्रिज्या ! धनदांडग्या पुढाऱ्यांची संख्या वाढली राजकारणात. त्यांची भाषा गलिच्छ झाली. राजकारण अन् शिक्षण यांचे व्यस्त समीकरण झाले.

सत्तेसाठी सारे काही. अक्षरशः काहीही..हाच स्वतंत्र भारतातील सरकारचा मंत्र झाला.. जी विकासाची कामे झाली, त्यात सामान्य नागरिकाचा लाभ किती अन् मंत्री, पुढाऱ्यांचा, कंत्राटदारांचा, नोकरशाहीचा मलिदा किती हे आकडे डोळे पांढरे करणारे ! श्रीमंत अन् गरीब यातली दरी वाढतच चाललीय. समता, सामाजिक न्याय, अनुदान योजना या कागदावरच्या करामती. सरकारे कर्जात बुडाली खोल खोल. पण आश्वासनांचा महापूर धो धो वाहतो निवडणुकांच्या तोंडावर. अजूनही अनेक गावात रस्ते नाहीत, दवाखाने नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शेतकऱ्याच्या समस्या आहे तशाच आहेत. लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढत असल्यामुळे सरकारही हतबल झाले. कुणाला, किती कोण काय पुरणार ? अशी दारुण अवस्था आहे.

या घसरलेल्या नीतीमत्तेचे कारण काय ? आपली संपन्न भारतीय संस्कृती, आपले शिक्षण, आपले पारंपारिक संस्कार कुठे कमी पडले ? गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, यातून काहीच कसे शिकलो नाही आपण ? काळ बदलला असे म्हणावे तर आपण बदलत्या काळाचे नीती नियम का नाही बनवले, स्वीकारले ?

आपण चंद्र मोहिमेवर, अवकाश योजना वर करोडो रुपये खर्च करतो. तितकेच ढासळत्या नीती मत्तेवर, गढूळ लेल्या सामाजिक प्रश्नावर तोडगा काढणारे प्रकल्प महत्वाचे नाहीत का ? का नाही सुटत प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्येचा ? आरक्षणाचा ? का नाही अभ्यास होत अतिरेकी, अविवेकी, अत्याचारी विचारसरणीचा. का नाही ताबडतोब कडक शिक्षा होत बलात्कारी नराधमाला ? का नाही जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकवला जात राक्षसी प्रवृत्तीच्या बलात्कारी आरोपींना ? एवढं कठीण आहे का हे करणं सरकारला ? की त्यांना हे करायचंच नाही.प्रश्न तसेच भिजत ठेवायचे आहेत ? समाजातील तेढ वाढत जाणेच त्यांच्या फायद्याचे आहे ? काय, प्रॉब्लेम काय आहे हे तरी कळू द्या सामान्य जनतेला..

५जी तंत्रज्ञान म्हणा किंवा ए आय चे जादुई चमत्कार म्हणा,चार पाच वर्षे उशिराने आले तरी काही बिघडणार नाही समाजाचे. इंपाला आली म्हणून बैलगाडी गेली नाही. ती हवीच आहे.उलट काही जणासाठी तीच जास्त महत्वाची आहे.अंतराळात शास्त्रज्ञ गेले नाहीत तर आपली माणसे उपाशी राहणार नाहीत. या प्रकल्पापेक्षा शेतकऱ्याच्या समस्या, वाढत चाललेल्या बलात्काराच्या, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या समस्या जास्त गंभीर, जास्त महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला, सरकारला कधी समजणार ? चौकशी चालू आहे,आरोपींना गंभीर शिक्षा होईल, सरकार योग्य ती कारवाई करेल अशी पोकळ आश्वासने देऊन हे प्रश्न सुटणारे नाहीत. या प्रश्नाचे गांभीर्य वेळीच ओळखलेले बरे. एरवी या समस्या आक्राळ विक्राळ स्वरूप धारण करतील. मग कुणाच्याच हाती काही उरणार नाही. माणसाला गुलाम करू पाहणाऱ्या कृत्रिम बुध्दीमत्ता नावाच्या तंत्र राक्षसापेक्षाही ही नीतीमत्तेची घसरण अधिक घातक, संहारक आहे.या सामाजिक समस्येवर सरकार बरोबरच आपलाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे. ही समाजातील घातक प्रवृत्तींना आळा घालणारी चळवळ सर्वांना मिळून पुढे रेटावी लागेल. हे कुणा एकाचे काम नाही. “सहविरयम कर्वावहे” या तत्त्वाने हातात हात घालून काम करावे लागेल. कठीण आहे, पण अशक्य नाही !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments