२०१३ पासून आपण दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करतो.
या दिवसाचे औचित्य साधून मिलेनियम टॉवर्सच्या मराठी रहिवाशांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अ-क्षरकाव्य समूह, नवी मुंबई यांचा “उत्सव शब्दसुरांचा … ध्यास मराठीचा” हा मराठी कविता व गाणी असा दोन अडीच तासांचा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता.

कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, सुरेश भट, पु.शि. रेगे, इंदिरा संत, शांता शेळके, वसंत बापट, नलेश पाटील, गदिमा अशा अनेक कवींच्या दर्जेदार कविता व मनामनात रूंजी घालणारी सुमधुर गाणी, आठवणीतले किस्से, निवेदन यातून उलगडत जाणारी सहज सुंदर मैफल… म्हणजे “उत्सव शब्दसुरांचा …ध्यास मराठीचा”.

उत्सव शब्द सुरांचा गौरव स्त्रीत्वाचा
उधळण चांदण्यांची
लेणे शब्दसुरांचे
क …कुसुमाग्रजांचा…
शितल देशपांडे, सुप्रिया देशपांडे, पल्लवी देशपांडे आणि प्रज्ञा लळिंगकर या चार कलाकारांनी हा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर सादर केला. बालपणी ऐकलेल्या कविता, गाणी या नव्या रुपात ऐकताना प्रेक्षक मुग्ध होउन गेले. प्रत्येक कवितेला, गाण्याला उत्स्फूर्त दाद देत रसिकांनी त्यांचा आस्वाद घेतला. “या बाळांनो या रे या”; “खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या”; “छडी लागे छमछम”; “भव्य हिमालय तुमचा आमचा” (कवी वसंत बापट); “पैंजण” (बा. भ. बोरकर) ; “आगगाडी आणि जमीन” (कुसुमाग्रज); “फांद्यावरी बांधले गं मुली हिंदोळे”(गदिमा); “काय बाई सांगू कसं ग सांगू” (शांताबाई शेळके); अशा अनेक मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला.
तसेच “वेडात मराठे वीर दौडले सात” या अजरामर गाण्याने श्रोते अक्षरशः गहिवरले. कित्येकांच्या डोळ्यात पाणी तरळले. तर “आज गोकुळात रंग खेळतो हरी” या गाण्यावर मिलेनियम टॉवर्सच्या उत्साही महिलांनी गरबा नृत्याचा ताल धरून कार्यक्रमाची रंगत अजून वाढविली.
कार्यक्रमाचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या “जयोस्तुते” या गीताने श्रोत्यांमध्ये जणू वीरश्री संचारली. टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांनी उभे राहून कलाकारांना मानवंदना दिली.

खरं तर आजच्या ‘व्हॉट्स ऍप’, ” आणि आता ‘ए आय’ च्या जमान्यात असा कार्यक्रम करणे हे खूप धाडसाचे काम आहे. पण अ-क्षरकाव्य समूहातील कलाकारांनी हे धाडस उत्तमरित्या निभावले. त्यांच्या कवितांनी, गाण्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवलं आणि मंत्रमुग्ध केले. एक सुंदर कार्यक्रम बघता, ऐकता आला, जो रसिक श्रोते नेहमीच लक्षात ठेवतील.

— लेखन : प्रज्ञा आठल्ये. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून एका चांगल्या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचते ही गोष्ट निश्चित अभिनंदन आहे. आजकाल थोड्या वेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद मिळण्याबद्दल मनात शंका असते परंतु मिलेनियम टॉवरच्या लोकांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या या काव्य गायनाच्या कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद हा वाखाणण्या सारखाच आहे.