आजच्या काळात गरजेशिवाय माणसं एकमेकांना भेटत नाही, जीवनातील सहजपणा हरवत चालला आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या वतीने आपण प्रयत्न करीत आहोत.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण दरमहा एक स्नेह मिलन आयोजित करीत असतो.
कुठल्या हॉटेल मध्ये किंवा कुठल्या हॉल मध्ये ते न घेता आपण ज्या सदस्याने आमंत्रित केले असेल त्याच्या घरी ते घेत असतो.यामुळे ते कृत्रिम न वाटता अतिशय घरगुती स्वरूपाचे, फार काही खर्च न येता संपन्न होत असते. इथे कुणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, नेहमीचा औपचारिक नसतो. असे आगळे वेगळे पण असल्याने स्नेह मिलन संस्मरणीय ठरत आहेत.
आंतरराष्ट्रीय बालरोग तज्ञ, आरोग्य जागृतीसाठी दिवसरात्र झटणारे विरार येथील डॉ हेमंत व सौ डॉ अर्चना जोशी यांच्या घरी आयोजित स्नेह मिलन चांगलेच उद्बोधक झाले.
यावेळी जोशीसरांनी, महिलांनी प्रसृती ही झोपून न करता उभ्याने केल्यास किंवा कमोड सारखी खुर्ची घेऊन केल्यास किती फायदे होतात, ते सहजसोप्या भाषेत सांगितले. डॉ अर्चना जोशी यांनी स्वानुभव कथन करून बालकांचे आरोग्य कसे जपायचे या विषयी मार्गदर्शन केले.
या स्नेह मिलना विषयी बेस्ट अभियंता, कवी, मीरारोड वासी श्री विलास कुलकर्णी यांचे मनोगत पुढे देत आहे….

तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ
प्रचिती, हे अगदी सत्य आहे. ज्या व्यक्ती कोणताही आर्थिक फायदा न बघता सामाजिक काम करतात, त्यांच्यापुढे आपले मस्तक नक्की झुकते.
विरार येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ जोशी दाम्पत्य यांच्या आग्रहाखातर विरार येथील त्यांच्या घरी रविवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता न्यूज स्टोरी टूडेचे दिलखुलास स्नेह मिलन पार पडले.
स्नेह मिलनासाठी कवी नितीन केळकर, मी व माझी पत्नी कवयित्री सुचिता कुलकर्णी, युवांगणच्या रामेश्वरी अहेर, प्रकांड पंडित हरी ओम देशपांडे, न्यूज स्टोरी टुडेचे संपादक मा. श्री. देवेंद्र भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ. अलका भुजबळ यांची आणि जोशी कुटुंबियांच्या स्नेह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ हेमंत जोशी यांनी त्यांच्या व पत्नी अर्चना जोशी यांच्या कार्याची ओळख करून दिली.
मा. देवेंद्र भुजबळ यांनी न्यूज पोर्टल टुडे बद्दल खूप माहिती दिली. आपले पोर्टल 77 देशातील साडेतीन लाख वाचकांपर्यंत पोहचले असल्याचे सांगून त्यांनी त्याची उपयुक्तता लक्षात आणून दिली. न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर शरणपूर आश्रमावर आलेला लेख वाचून त्या आश्रमाला मदतीचा ओघ सुरू झाल्याचे मी निदर्शनास आणून दिले. जगभर असलेल्या उत्कृष्ट काव्य, लेख लिहिणाऱ्या कवी, कवयित्री यांचे दर्जेदार साहित्य पोर्टल वर प्रसिद्ध होत असल्यामुळे वाचक वर्ग संख्या वाढत असल्याचे सौ अलका भुजबळ यांनी सांगितले.
डॉ सौ राणी खेडीकर यांचे लालबत्ती विषयावरील लेख व विकास भावे यांचे ओठावरील गाणे हे लेख वाचकांना विशेष भावतात. न्यूज पोर्टल टुडे वर प्रसिद्ध झालेली कवयित्री सौ सुचिता कुलकर्णी यांची गाजलेली कविता ‘हळुवार हाताळ जरा’ त्यांनी सुंदररित्या सादर केली. ती कविता सर्वांना खूप आवडली.
कवी नितीन केळकर यांनी राजकीय उपहासात्मक कविता सर्वांची वाहवा मिळवून गेली. मी देखील झोका नावाची माझी कविता सादर केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हरी ओम देशपांडे यांनी गोवंश संवर्धन करण्यासाठी ते करीत असलेले कार्य सांगून, हिंदू कालगणने नुसार त्यांनी बनवलेली मराठी दिनदर्शिका सर्वांना भेट दिले.
प्रा.रामेश्वरी अहेर यांनी त्यांच्या युवांगण संस्थेची माहिती सांगून प्रसिद्ध व्यक्तींच्या घेतलेल्या मुलाखती बद्दलचे अनुभव कथन केले.
मा. देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या पोर्टलचे धेय्य धोरण सांगून पोर्टल राजकारण ह्या विषयापासून मुद्दाम दूर ठेवून फक्त साहित्य, समाजकारण हाच विषय असल्यामुळे पोर्टल वाचकांना पसंत पडत असल्याचे मत व्यक्त केले.
अगदी हसत खेळत हे स्नेह संमेलन पार पडले जे कायम स्मरणात राहील.
– विलास कुलकर्णी. मीरा रोड
या स्नेह मिलन कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नसल्याची खंत केळवे निवासी, संकलक, लेखक श्री विकास पाटील यांनी पुढील पत्र पाठवून व्यक्त केली…
न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टल चे संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ यांचे सह सर्व पत्रकार, लेखक यांचे स्नेह मीलन रविवारी २४ एप्रिल २०२२ रोजी डॉ जोशी यांचा मुलांचा दवाखाना, अमृत बाग इमारत, स्टेशन समोर, श्रेय हॉटेल च्या बाजूला, विरार (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले होते.
सर्व पत्रकार, लेखक यांचे स्नेह मीलनाला ऊपस्थित राहण्याचा एक चांगला योग होता. परंतू ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ऊदगीर, लातूर येथे ऊपस्थित असल्या कारणाने मला या “स्नेह मिलन” समारंभास ऊपस्थित राहता आले नाही या बद्दल मी प्रथमतः दिलगीरी व्यक्त करतो.
या कार्यक्रमासाठी आपण मला निमंत्रीत केले याचा आनंद निश्चित आहे. आपल्या सर्वांसोबत स्नेह मिलनाचा आनंद घेता आले नाही याचे शल्य मला जरुर आहे.
निवृत्त झालो असलो तरी कौटुंबिक जबाबदारी म्हणून मी बागायती व्यवसायात खूप व्यस्त आहे. माझी ही अडचण कृपया लक्षात घ्याल ही माझी खात्री आहे.
भविष्यात जवळपास कुठे असे स्नेह संमेलन असल्यास ऊपस्थिती देण्याचा माझा प्रयत्न जरुर असेल. धन्यवाद..!
आपला,
– विकास पाटील.
आता खुद्द जोशी सरांचे मनोगत जाणून घेऊ या….
अनंत देशात, अनंत वाचक असलेल्या न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टल चे स्नेह मिलन आमच्याकडे झाले। रविवार दि 24 एप्रिल ला । भुजबळ पती पत्नी, कवी कुलकर्णी पतिपत्नी, कवी नितीन केळकर, श्री हरी ओम देशपांडे, व पत्रकार रामेश्वरीताई आहेर एवढे लोक स्नेहमिलनाला आमच्या कडे आले ।

सर्व कविंनी मस्त काव्य गायन केले।आम्ही स्वर्गात होतो।
सौ प्रदक्षिणा हुद्दार यांनी अलिबाग भेटीची गोष्ट सांगितली। त्या म्हणाल्या की मी निवृत्त बँक कर्मचारी आहे । अलिबागला एक साधे व्यक्ती श्री चिंतामणी केळकर यांनी 15 वर्षांपूर्वी त्यांची 10 कोटी रुपये किमतीची जमीन शाळा काढायला मोफत दिली। त्या शाळेत आता 1500 मुले आहेत। गेली 10 वर्षे दहावीचा निकाल 100 % लागतो। हे पाहून मी त्यांना लाख रूपये देणगी दिली।
– डॉ. हेमंत जोशी
या वेळीं जोशीसरांनी बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तयार केलेले साहित्य तसेच श्री हरी ओम गुरुजींनी तयार केलेली बाल स्तोत्रांजली व दिनर्शिका सर्वाँना भेट दिली.
घरगुती पन्हे, टरबुज आणि विशेष म्हणजे या मोसमातील पहिल्याच हापूस आंब्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहील. तसेच शरीरातील लोहाची कमी भरून काढण्यासाठी स्वयंपाक करताना लोखंडाची कढाई वापरणे चांगले असते हे सांगूनच जोशी दाम्पत्य थांबले नाहीत तर त्यांनी सर्व उपस्थितांना चक्क लोखंडाची कढाई भेट दिली. आजकाल अशा वस्तू पहायलाही मिळत नसल्याने ही कढाई मिळाल्याने सर्वच हरखून गेले😊
संगमनेर, नाशिक, पुणे आणि विरार येथील स्नेह मिलन झाल्यावर पुढील स्नेहमिलन कुठे होतेय, हे लवकरच कळेल !
– टीम एनएसटी.☎️ 9869484800.
🌹छान उपक्रम 🌹