बोचरी थंडी कमी व्हायला लागली की होळीचे वेध लागतात. निसर्गाचं रूपही पार बदलून गेलेलं असतं. होत्याचं नव्हतं झालेलं असतं. निष्पर्ण वृक्षाकडे नजर गेली तरी क्षणभर भीती वाटते की आता पालवी फुटलीच नाही तर ? पण असं होत नाही. वाळलेल्या पानांच्या / फांद्यांच्या त्यागा नंतर नूतन पालवी ही फुटतेच.
याच दिवसात येणारा होळीचा किंवा रंगपंचमीचा सण हेच तर सांगत असतो. मनातले रुसवे, हेवेदावे, तुझं माझं त्यागून नात्यांची नवी सुरुवात करणं म्हणजे होळीचा सण. राग, द्वेष यांचा त्याग करून प्रेमाच्या रंगांची उधळण करणे म्हणजे रंगपंचमीचा सण. या दिवसात बाजारात बऱ्याच प्रकारचे रंग दिसायला लागतात. प्रत्येक रंगाचं काही ना काही तरी वैशिष्ट्य हे असतंच. या सुंदर रंगांची मिसळण झाली की नेमका असा कोणताही रंग उरत नाही. उलट एक नवाच रंग तयार होतो. दिसायला तो रंग बरा नसला तरी आपल्याला आपली ओळख विसरायला लावणारा असतो. रंगांनी रंगलेले सारे मग सारखेच दिसायला लागतात.
या रंगांचा सर्वोत्तम वापर नक्की कोणी केला असेल ? निसर्गाने ? अर्थातच. निसर्गासारखी रंगाची उधळण कुठेही पाहायला मिळत नाही. एखाद्या चित्रकाराने ? हो..त्याच्या हातातील रंगांची उधळण देखील विशेष खुलून दिसते.
मला मात्र हे रंग एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. तिथे जाताच मी..मी राहात नाही. तिथलाच एक भाग होऊन जाते आणि मजा घेत राहते.
तिथे साऱ्या गोपी कृष्णाच्या मागे लागलेल्या असतात, भांडत असतात. शरद ऋतूत खेळलेली रासलीला आता मागे राहिली आहे….किती दिवस त्या आठवणींवर आम्ही काढायचे ? कृष्णा…..पुन्हा कधी भेटायचं रे ? शरद ऋतू तर अजून किती तरी लांब आहे. कान्हा…. पुन्हा कधी भेटशील रे तसा?… समजावूनही गोपी जेव्हा ऐकेनात तेव्हा कृष्ण रंगपंचमीचं आश्वासन देतो. साऱ्या गोपींना येताना जो आवडतो तो रंग आणायलाही सांगतो.
झालं… साऱ्या गोपींच्या मनात रंगांची उधळणच सुरू होते. नेहमी कृष्ण त्याच्या मुरलीच्या धुंद सुरवाटींनी आम्हाला बेभान करतो .. पण आता आमच्या रंगात तो रंगणार आहे.. प्रत्येक गोपी आपल्या आवडीचा रंग शोधायला सुरुवात करते. एका गोपीच्या अंगणात सुवर्ण चंपकाचं झाड आहे. तिला माहिती आहे की ही फुलं कृष्णाला फार आवडतात. ती गोपी मनात म्हणते.. माझ्या कृष्णाला ही फुले आवडतात, मी हाच रंग घेऊन जाईन.. ही फुलंही घेऊन जाईन. एका गोपीला कृष्णाचं मोरपीस आठवतं. ती म्हणते… माझ्या कान्हाला मोरपीस इतकं आवडतं की त्याने ते सतत सोबत ठेवलंय .. त्यातला मोरपंखी रंग त्याचा आवडता असणार.. मोरपंखी रंग सुचल्यामुळे ती गोपी एकदम खुलून जाते.
शारद पौर्णिमेला रासक्रीडा चालू असताना एका गोपीला दिसलेलं निळंभोर आकाश आठवत असतं. त्याच रंगाचा निळासावळा कान्हा… त्याचे डोळेही निळे.. या रंगा शिवाय दुसरा सुंदर रंग तरी कोणता ? होळी आली तरी गोपींना रंग सुचतच असतात… एका गोपीला घरी सतत स्वयंपाक करावा लागत असतो. चुलीपुढे काम करताना तिला कोणताही रंग सुचतच नसतो.. पण सतत दिसणारा चुलीतला जाळ मात्र आठवत असतो.
होळी पौर्णिमेलाही होळीचा हाच रंग असतो आणि त्या केशरी रंगात झळाळणारा कृष्णाचा चेहराही तिला डोळ्यापुढे दिसू लागतो… तिला केशरी रंगच कृष्णासाठी न्यावासा वाटतो. शारद पौर्णिमेला रासक्रीडा करून थकली भागलेली कोणी गोपी झाडाखाली बसली होती.. तेव्हा तिचा कृष्ण सखाही तिच्या सोबत बसला होता… फक्त तिचा सखा….आणि त्यावेळी जाणवत असलेली पानांची सळसळ… त्या गोपीच्या मनात आजही ती आठवण ताजी असते… त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ती हिरवा रंग घ्यायचं ठरवते. कुणाला रंगात चंदन कालवून ते चंदन कृष्णाला लावायचं आहे. ती विचार करते…की बाकी रंग कोरडे आहेत.. माझा रंग मात्र चंदनात कालवलेला…ओला असणार.. सहजी निघणार तर नाहीच… आणि बराच काळ दरवळेलही..
या गोपींचं काही कळत नाहीए. कृष्णाने सांगितले की तुम्हाला आवडतो तो रंग आणा. या गोपींना स्वतःची आवड तरी कुठे राहिली आहे.. कृष्णाला काय आवडतं तेच त्यांचं विश्व झालंय. आवड-निवड सारी विलयाला गेलीये. माझ्या कृष्णाला आवडतो ना तोच माझा रंग… सारं काही साधं, सोपं आणि सरळ..
पंचमीला कृष्णाने दिलेल्या वेळेवर पोहोचण्याची तयारी तरी किती.. मनानी त्या कृष्णा जवळ पोहोचल्याही आहेत.. देह मात्र आपापली कर्तव्ये करतोय.. कोणी साऱ्यांची जेवणं करतंय… कुणी आपल्या नवऱ्याचे, सासू-सासर्यांचे पाय चेपून देतंय.. कोणी लहानग्याला झोपवतंय.. कुणी वासरांना पान्हावलेल्या धेनूपाशी नेतंय.. तिला चारापाणी करतंय.. आपापली कामे टाकून आलो तर माझा कान्हा रागावेल.. नको नको… त्यापेक्षा सारी कामं होऊ दे.. मग निवांत भेटेन मी माझ्या कृष्णाला… अधीर मनात…दुसरी गोपी गेली तर नसेल ना पुढे..ही भिती आहेच. पण कृष्णाची ओढ आता मात्र आवरेनाशी झाली आहे.
मग कोणी रडणाऱ्या बाळाला थोपटतानाच उठून जाऊ लागते.. तर कोणी रांधायचंही विसरून जाते आहे.. कोणी केसात माळायला ठेवलेली वेणी गळ्यात घालून जाते… तर कोणी कपाळावरचा मंगल तिलक चुकून डोळ्याच्या भिवईच्या वर रेखून जाते. कुणी काजळाची रेघ गालावरही रेखली आहे …कोणी अंगण सारवून त्याच हातांनी रंग उचलून घेतला आहे तर कोणी रंगही घरीच विसरून आली आहे..
त्या गोपींना आता कृष्ण सामोरा येतो… त्याला पाहून त्यांच्या मनात होणारी विचारांची उधळण तरी किती…. हिरवा रंग तर आणला पण शारद रात्रीची ती आठवण जशी मला आहे तशीच ती कृष्णालाही असेल ना?.. त्याला आपल्या हिरव्या रंगाचे गुपित कळेल ना? ही हूरहूर… जो साऱ्या सृष्टीचा पालनहार आहे, करता, निर्माता आहे.. त्याला त्यांच्या मनातलें हिंदोळ करणार नाहीत का ?
साऱ्या गोप सख्यांकडे कोरडे रंग आहेत आणि आपला रंग मात्र ओला आहे…. कृष्णाला आवडेल ना चंदनातला रंग ?… ज्याचा दरवळ या गोपीच्या मनात भरला आहे तो दरवळ कृष्णाला मान्य नसेल?… एक गोपी निघुन तर आली आहे…. मात्र आपला रंग घरी राहून गेला आहे हे कळताच ती कावरीबावरी झाली आहे.. कदंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या कृष्णाला पाहून तिने कदंबाची फुलंच वेचून घेतली आहेत. कृष्णाला पाहायच्या नादात स्वतः कडे न पाहता निघालेल्या या सार्या गोपीच एक विलक्षण ध्यान झाल्या आहेत.. तरीही त्या साऱ्यांचा रंग गोरा आहे आणि त्यांचा लाडका कृष्ण मात्र सावळा.. आता तर या गोपींना आपला गोरा रंगही नकोसा झालाय..
मोरपिशी रंग आणणार्या गोपीलाही आपण रंग आणला नाही हे जाणवले आहे.. आता काय ? आजपर्यंत या वृंदावनात माझा कृष्ण गोपींसह सह खेळला.. त्याच्या स्पर्शाने पावन झालेली ही मातीच ती त्याला रंग म्हणून लावणार आहे.. सुवर्ण चंपक आणि सोनेरी रंग आणणारी गोपी तर अधीरपणे पुढेही झाली आहे.. ज्या कृष्णावर माझं प्रेम आहे तो माझा लाडका कृष्ण माझ्या रंगात आता रंगणार आहे… अधीरपणे कृष्णाच्या निकट येऊन ती त्याला रंगवणार तोच तिला त्याचा सावळा रंग दिसलाय… या रंगाच्या प्रेमात, कृष्णाच्या प्रेमात पुढे काय हे तिला सुचलंही नाही.. तिने आणलेला सुवर्ण रंग कृष्णाच्या चरणांवर वाहून दिलाय.. कृष्णाने तिला सावरलं आणि सारा सोनेरी रंग तिलाच लावून टाकला.. आपोआपच कृष्णही सोनेरी दिसू लागलाय.. प्रत्येक गोपी आपापला रंग कृष्णासाठी घेऊन आली आहे…. प्रत्येक रंग त्या गोपींच्या भावनांचं प्रतीक आहे.. शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे… साऱ्या रंगांचा स्विकार करून कृष्णाने गोपींच्या भावनांचा, प्रेमाचा, श्रद्धेचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. स्वतः कृष्णानेही गोपींना वेगवेगळे रंग लावून टाकले आहेत..
आता कोणताही रंग वेगळा राहिला नाही.. साऱ्या रंगांच्या भावांच्या छटा एकत्र होऊन नवा भक्तिरंग सर्वत्र भरून राहिला… स्वतःच्या रंगाचं समर्पण होत नाही, सारे भाव कृष्णार्पण होत नाहीत, तोवर कृष्णरंगही चढत नाही.. आता कृष्ण सावळा, गोपिका सावळ्या आणि आसमंतही सावळा झाला आहे… गोपींना स्वतःची ओळख, अस्तित्व असं उरलंच नाहीये .. साऱ्या कृष्णमय झाल्या आहेत.. कृष्णाने त्यांना मनसोक्त रंगवून टाकलं .. त्याने गोपींच्या देहालाच नाही तर विचारांना, मनाला, इतकच नाही तर आत्म्यालाही रंगवलं आहे… सारीकडे श्रीरंग लागला आहे. आता कसली मागणी नाही, जाणीव नाही, भान नाही…. सारीकडे फक्त रंग….रंग… श्रीरंग…

– लेखन: अलका अग्निहोत्री
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वेगवेगळ्या रंगात गुंफलेली गोपी व कृष्ण यांची रासलीला, सुंदर शब्दांत केली आहे. त्याला समर्पक असे फोटो पण टाकल्याने लेख उठावदार झाला आहे. 👏👏👏