सत्कवी सूर्यकान्त द. वैद्य यांच्या भक्ति-अध्यात्मपर ‘उन्मनी’ या काव्य ग्रंथाचे प्रकाशन संतवाङ्मयाचे अभ्यासक आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्याहस्ते नुकतेच पुणे येथे झाले.
यावेळी बोलताना डॉ. सदानंद मोरे पुढे की, ‘उन्मनी’ अवस्था ही साहित्यिकाला लाभलेली देणगीच असून या अवस्थेतील साहित्यसृजन हे अभिजाततेच्या दर्जाचे असते. सत्कवी सूर्यकान्त वैद्य यांच्या उन्मनी संग्रहातील कविता त्या दर्जाच्या आहेत.‘उन्मनी’ अवस्था ही थेट संत परंपरेशी जोडलेली असून अलिकडच्या कवींना ‘उन्मनी’ अवस्था फार क्वचितच प्राप्त होते. ‘उन्मनी’ अवस्था ही निर्मितीची हिमशिखरीय अवस्था आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी या अवस्थेचे संत साहित्यात वर्णन करून ठेवलेले आहे. ज्या साहित्यिकाकडे अध्यात्माची ओढ आणि साधना करण्याची क्षमता असते, तो या ‘उन्मनी’ अवस्थेत जाऊन साहित्य निर्मिती करू शकतो. वैद्यांच्या उन्मनीतल्या कविता त्या दर्जाच्या आहेत.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म.जोशी म्हणाले की, कवीने कविता करून रसिकार्पण केली की ती कविता रसीकांची होते. रसिक -वाचक त्या कवितेचा अन्वयार्थ हा त्याच्या त्याच्या बौध्दिक क्षमतेनुसार लावत असतो. मराठीतील पंचवीस निवडक कवींची यादी तयार केली तर वैद्यांचे स्थान त्यांच्या प्रभावळीत निश्चित दिसेल असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना विश्व आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले की, “‘उन्मनी’ अवस्था प्राप्त होण्यासाठी सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि चिंतनशील मनोभूमिका असणे आवश्यक आहे. त्या अवस्थेपर्यंत जाऊन ईश्वरीय नियोजनानुसार सर्वसामान्यांचे दुःख निवरणासाठी परत सामान्य अवस्थेत येणे याला साधनेचीच जोड लागते. हा काव्यसंग्रह रसिक वाचकांना ‘उन्मनी’ अवस्थेचा अनुभव आणि प्रचीती घेण्यास प्रेरित करतो.”
प्रारंभी राजश्री महाजनी यांनी शारदास्तवन सादर केले. सुधीर कुबेर यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. हा ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या मिहाना पब्लिकेशन्स च्या अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. ऋचा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
या सोहळ्यास अनेक संतांचे वंशज, संतसाहित्याचे अभ्यासक, वैद्यांचे अनेक माजी विद्यार्थी व कोकणातून खास आलेले त्यांचे मित्र यांची उपस्थिती लक्षणीय होती.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800