Thursday, September 19, 2024
Homeलेखउन्हाळ्यातील मित्र

उन्हाळ्यातील मित्र

उन्हाळ्यात सकाळचा सूर्य डोंगराआडून जरासा वर चढला की ऊन तापायला सुरुवात होते. उन्हात थोडेसे फिरले की तळपायांची, डोळ्यांची आग आग होते. उन्हाचे दिवस असले तरी माणसाने स्वीकारलेल्या सामाजिक समायोजन संस्कृतीमुळे आपल्याला लग्न समारंभ, शेती, भेटीगाठी, बाजार हाट अशा काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावेच लागते.

उन्हाळा सर्वानाच त्रस्त करतो. भर दुपारी पशु,पक्षी, पाळीव प्राणीही झाडाखाली विसावा घेतात.
उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून निसर्गाने आपल्यासाठी काही खास नैसर्गिक जादुगार तयार केले आहेत. ते जादुगार म्हाणजे मातीचा माठ, वड लिंबाची गडद सावली, पिवळा 👌🏽धम्मक आंबा, हिरवेगार रसरस मोसंबी-लिंबू, लालबुंद रसरस टरबूज, भगव्या छटेचे खरबूज, आगीच्या रंगाच्या फुलांचा गुलमोहर व पळस, ऊसाचा थंडगार रस या सर्वांची निर्मिती कोणी उन्हाला शिव्याशाप देऊ नयेत म्हणून निसर्गानंच केलेली आहे. ही सगळी मित्र माणसाला थंडावा देत असतात.

एसी, पंखे, कुलर ही जरी उन्हाशी लढण्याची मानवनिर्मित शस्त्रे असली तरी झाडाच्या मंद झुळकीला तोड नाही. रानात सर्वत्र पानगळ झालेली असली तरी वडाचे व कडुलिंबाचे झाड गडद वस्त्र ल्यालेले असते. रागाने लालबुंद झालेल्या ऊन्हावेळी वड, आंबा, लिंब या झाडांचा आसरा घेतला की तिथं ऊन पोहचतच नाही.

सभ्यपणाचा बुरखा थोडावेळ बाजूला ठेऊन उघड्या पाठीपोटी सावलीचा आनंद घेणं, ही मौज लय भारी. रसरस ऊस हा ही आपला ऊन्हाळी सवंगडी.
पूर्वी फक्त बसस्थानकावरच दिसणारी फडतरे बंधू यांची नवनाथ रसवंती आता स्थानिक नावासह कुठेही दिसते. घुंगराचा आवाज घेऊन आता रसवंती रस्तोरस्ती उभी आहे. घशाला गोडवा व थंडावा देत पोटापर्यंत गारगार प्रवास रस म्हणजे अमृतपानच.

मनामनातला आंबा घराघरात भोजनाला रसाळता आणतोच. पाहुणे आणि आंबे हे गोड नातं सध्या आपणच आपल्यासाठी थांबवलं आहे. पण आमरसात कुरडई बुडवून खाल्ल्याचा आनंद आठवतोच ना?
लालबुंद टरबूज तर पोटाच्या आंतरिक शांतीसाठी रामबाण ईलाज. टरबुजा खरबुजाच्या जोडी हाताशी असली की दुपारच्या ऊन्हाची काहिली कोण लक्षात घेतो?

आगीच्या रंगाच्या फुलांचा गुलमोहर व पळस आपल्याला कठीण परिस्थितीतही फुलणं व जगणं शिकवितो. प्रतिकूल परिस्थितीत पानांनी संगत सोडली तरी हे बहाद्दर फुलण्यात कमी पडत नाहीत.

अहाहा ! मातीच्या माठातले पाणी पोटात जाताच जी तृप्ती लाभते तिचे वर्णन ते काय करावे ? स्वतः ऊन सोसून माठानं तो गारवा निर्मिलेला असतो. स्व गुणधर्माचं पाण्यात समर्पण करून मातीने तो गोडवा दिलेला असतो.

मंदवासाचं हिरवट, पिवळसर आंबुस लिंबुपाणी हे तर अमृतच. ओबडधोबड कुटलेली सोप टाकून लिंबू शरबत प्यावं ते सध्याच्या दिवसातच. कैरीचे व चिंचेचे पन्हे याचाही आनंद वेगळाच! पण कैरी व चिंचेची उपलब्धता कमी झाल्यामुळे पन्हे पिण्याचा योग आजकाल फारसा येत नाही.अन् तरीही घरात पन्हे बनलेच तर मध्यमवर्गीय जीणं जगताना गावच्या गावरान मेनुचा हक्क न सोडल्याचा तो पुरावाच होय.

नैसर्गिक जादुगारांचा आस्वाद घ्या. उन्हाळ्यालाही आनंदाचा पाझर फुटेल.

कचरू चांभारे

– लेखन : कचरु चांभारे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments