काही गोष्टी योगायोगाने घडतात, अनेक गोष्टी नशिबाने साध्य होतात त्यामुळे अलौकिक असा आनंद प्राप्त होतो. काल असाच एक हृदयात जपून ठेवावा असा प्रसंग घडला. नुकताच माझा ‘मोबाईल माझा गुरू’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘मासिक ऋग्वेद चिल्ड्रन फंड अंतर्गत अल्पमूल्य पुस्तक प्रकाशन योजना, आजरा’ यांनी अत्यंत आकर्षक आणि देखण्या स्वरूपात प्रकाशित केल्यानंतर मी टाकलेली फेसबुकवरील पोस्ट वाचून स्वर्गीय साखळे गुरूजी उच्च प्राथमिक शाळा, गणेशपेठ मनपा नागपूर या शाळेतील शिक्षिका आणि बालभारती अभ्यास मंडळाच्या सदस्या सौ.प्रतिभा लोखंडे ह्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या कथासंग्रहाच्या एकवीस प्रती विकत घेतल्या. काल नवीन वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे स्वागत केले. हा प्रसंग एक लेखक म्हणून माझ्यासाठी अत्यंत आनंददायी असाच होता. सौ. लोखंडे, मुख्याध्यापिका सौ. गुजर यांचे मी मनापासून आभार मानतो.
या पुस्तकाचा हैदराबाद ते नागपूर हा प्रवास अत्यंत रोमहर्षक झाला. हा आनंद मी आपणा सर्वांसोबत साजरा करू इच्छितो. मोबाईल माझा गुरू ह्या कथासंग्रहाच्या प्रती मी हैदराबाद येथून नागपूरच्या पत्त्यावर पाठवल्या. परंतु हे पार्सल पोहोचले ते थेट अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या चरणी! झाले असे की, नागपूर येथील सौ. लोखंडे यांच्या पत्त्याचे पोस्ट ऑफीस आहे ते अयोध्या नगर या नावाचे. त्यामुळे पिनकोड योग्य असूनही ते पार्सल गेले हैदराबाद – नवीदिल्ली- लखनौ आणि अयोध्या परंतु तिथे पोस्टाची चूक लक्षात येताच पार्सलचा परतीचा प्रवास सुरू झाला. मी ऑनलाईन हा प्रवास पोस्टाच्या साइटवर पाहात होतो. शेवटी ते पार्सल नागपूर येथे पोहोचले आणि मी सुटकेचा श्वास सोडला. परंतु तत्क्षणी एक विचार मनात आला, अयोध्या इथे सध्या जे राममय वातावरण आहे, तिथे माझा कथासंग्रह पोहोचला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.
— लेखन : नागेश शेवाळकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अजब प्रवास पुस्तकांचा
गोविंद पाटील जळगाव जिल्हा
छान लेख.