कवियत्री उषा चांदूरकर यांच्या “उषाकिरण” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत कवी प्रविण दवणे यांच्याहस्ते झोकात झाले.
यावेळी बोलताना श्री दवणे यांनी उषाताईंच्या कविता तत्वज्ञान, अध्यात्माच्या पातळीवर चपखल बसतात इतकेच नव्हे तर त्यांनी गझलसदृष्य कविता, लावणी, अष्टाक्षरी, अभंग असे विविध काव्यप्रकार लिलया पेलले आहेत असे म्हटले. त्यांनी उषाताईंची एक गेय कविता गाऊनही दाखवली.
सुवर्णकमळ विजेत्या “श्वास” चित्रपटाच्या लेखिका श्रीमती माधवी घारपुरे आपल्या भाषणात म्हणाल्या की, उषाताईच्या कविता जीवनाच सार सांगणा-या आहेत. बहिणाबाईंच्या कवितेचा भास उषाताईंच्या कविता वाचताना होतो.
निवेदक श्री दिपक वेलणकर म्हणाले की, कविता लिहिण्यासाठी कवीकडे प्रतिभा लागतेच पण त्याबरोबर कविता लिहिण्यासाठी पोषक वातावरण सुध्दा लागते. उषाताईंच्या कविता विविध विषयावर असल्या तरी प्रत्येक कविता पूर्णपणे वेगळी आणि लय, नाद युक्त आहे.
“आम्ही सिद्ध लेखिका” अध्यक्षा प्रा.पद्मा हुशिंग यांनी उषाताईंच्या कवितेचे कौतुक केले. तसेच त्यांच्या संस्थेच्या संमेलनाचीही माहिती दिली.
या काव्य संग्रहाचे प्रकाशक, ग्रंथालीचे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर यांनी यावेळी ग्रंथालीच्या उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने आणि सिमा अगरवाल व कविता भडके यांच्या सुंदर गणेशवंदना नृत्याने झाली.
प्रकाशनापूर्वी प्रा.मानसी जोशी आणि वृत्त निवेदिका वासंती वर्तक यांनी उषाताईंच्या कवितेचे सादरीकरण केले. प्राची गडकरी यांनी निवेदन केले.
यावेळी विविध मान्यवर, काव्य रसिक उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
अभिनंदन