Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यऋणानुबंध

ऋणानुबंध

नुकताच ख्रिसमस येऊन गेला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

दरवर्षी ख्रिसमस जवळ येऊ लागला की मला हमखास माझा विद्यार्थी मोलविनच्या आईची आठवण येते. आज त्यांना भेटून जवळ जवळ पंचवीस वर्षे झाली असतील, पण ते दिवस अजूनही आठवतात.
परवेज, माझा मुलगा त्या वेळी इयत्ता चौथी मध्ये होता. आम्ही अंधेरीला रहायला असल्याने तो जवळच असणाऱ्या डी. एन. नगर मधील काॅस्माॅपाॅलेटीन शाळेत जात असे. मिस्टर हाऊसिंग बोर्ड, बांद्रा येथे सिव्हील इंजिनिअर म्हणून कार्यरत असल्याने ते अत्यंत बिझी असत. लहान मुले असल्याने सान्ताक्रुझ विमान तळावर लागलेली नोकरी मला सोडावी लागली होती. त्यामुळे घरी राहून करता येईल असे काम करू या म्हणून पाचवी ते बारावीच्या मुलांना मराठी, हिंदी ची शिकवणी मी करू लागले होते. दिवसभर माझ्या शिकवण्या चालत असत. त्यामध्ये मोलविन शिकत होता. त्याचा मोठा भाऊ मोवेन ही माझ्याच कडे शिकवणीला होता.

सहाफूट उंच पण बोलण्यात अडखळणारा मोवेन स्वभावाने अत्यंत चांगला आणि आज्ञाधारक होता. मुळात ख्रिश्चन असल्याने मराठी हिंदीत प्रगती अगदी नगण्य होती. तसे मुंबईत मराठी विद्यार्थी सुध्दा मराठी शिकण्यासाठी कंटाळा करीत. अशा परिस्थितीत अतिशय विचार करून ठराविक अभ्यास करवून घेऊन कसे तरी मोवेन दहावीत मराठी हिंदी मध्ये पास झाला होता. त्याची प्रगती बघून त्याचा धाकटा भाऊ मेलविन देखील आठवीपासून माझ्याकडे शिकवणीला येऊ लागला. हा तसा हुशार पण खूप अवखळ पण समजूतदारही तेवढाच होता.

परवेज अभ्यासात तसा खूप हुशार होता असे नाही पण अभ्यास करायचा. आज्ञाधारकपणे जे सांगेल तसे वागणारा परवेझ चौथीच्या वर्गात मागे पडू लागला. घरातील शिस्तबद्ध वातावरणाचा त्याच्या मनावरही परिणाम होत होता. आमच्यामुळे त्याचे नुकसान होऊ नये म्हणून शेवटी आम्ही त्याला लातूरला शिकण्यास ठेवायचे असे ठरविले. लातूरला माझी दोन नंबरची नणंद जमेला आपा रहात होत्या. त्या स्वतः शिक्षिका तर होत्याच पण त्यांचे मिस्टरही शाहू महाराज काॅलेजला प्रोफेसर व इंग्रजी डिपार्टमेंट चे मुख्य होते. अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकण्यासाठी येत. त्यांचे अनेक विद्यार्थी बोर्डात देखील आले होते. स्वभावाने अतिशय मायाळू सरांकडे परवेज राहिला तर चांगला शिकेल, त्याच्या मनावरील दडपण कमी होईल असा विचार करून आम्ही लातूरच्या शाळेत पाचवीला अॅडशिन घेतली.

सुरूवातीला आनंदाने रहाणारा परवेज दोन चार महिन्यातच मुंबईला परत यायचं म्हणू लागला. आम्ही महिना दोन महिन्याला त्याला भेटायला जात असू पण तरी देखील त्याची मुंबईला घरी येण्याची घालमेल मी पहात होते. मलाही तो घरी नसल्याने त्रास होत होताच. त्याच्या भविष्यासाठी त्याला तेथे राहू दे असे त्याच्या वडिलांचे म्हणणे होते पण त्याला तिथे रहायचेच नाही तर ठेवून फायदा काय ? यावरून नेहमीप्रमाणे घरी थोडाफार वाद झालाच. माझा मुलगा अडाणी राहिला तरी चालेल, पण त्याला मुंबईला घेऊन येऊ या, हा हट्ट केल्याने मी शेवटी त्याला मुंबईला आणले.

अचानक नविन वर्षाच्या सुरूवातीला मुंबईत आणल्यामुळे त्याला लवकर अ‍ॅडमिशन मिळेना. घराजवळील चांगल्या शाळेत त्याला अ‍ॅडमिशन मिळावी म्हणून मी प्रयत्न करीत होते, पण ते काही जमेना. शाळेचे नविन वर्ष सुरू झाले पण अजून अॅडमिशन झाले नव्हते. वर्ष वाया जाईल की काय अशी भीती वाटू लागली. मी काही मित्रांना सांगून ठेवले आहे बघू या असे त्याच्या वडिलांचे म्हणणे होते. पहिल्या शाळेत त्याला पाठवायचे नव्हतेच. वाडीयाला प्रयत्न केला, इतरही शाळेत प्रयत्न केला. शाळा सुरू झाल्या पण अजून अॅडमिशन होत नव्हती. ” मी नको म्हणत असताना तू मुलाला इकडे आणले आणि त्याचे नुकसान झाले” हा ठपका नेहमीप्रमाणे माझ्यावर येणार या चिंतेतच मी होते.

घरी मुलांची शिकवणी घेताना सहज हा विषय मी मुलांच्या समोर काढला. “काय करावे समजत नाही. परवेजचे अॅडमिशन अजून झाले नाही मी खूप काळजीत आहे.” हे ऐकताच मेलविन म्हणाला “मिस, मेरी मम्मी हंसराज स्कूलमें टिचर है, मेरी मम्मी से बात करो” मी त्याच संध्याकाळी त्यांच्या घरी फोन केला. त्यांनी दुसऱ्या दिवशी हंसराज शाळेत या असे सांगितले. अॅडमिशन मिळेल हा विश्वास मिस्टरांना नव्हताच, पण ते कसेतरी माझ्या बरोबर आले. हंसराज शाळा तशी नावाजलेली.. अतिशय मोठे पटांगण असलेल्या भव्य अश्या शाळेत परवेजला प्रवेश मिळावा ही मी मनोमन कामना केली. आम्ही शाळेत आलो आहोत हे कळताच मेलविनची आई देखील वर्गाबाहेर आल्या. आम्हाला थांबायला सांगून त्या प्रिन्सिपॉल मॅडमना बघायला गेल्या. प्रिन्सिपॉल मॅडम दुसऱ्या वर्गावर तासीकेसाठी गेल्या होत्या. वर्ग प्रतिनिधीला वर्गात थांबवून मेलविनची आई आमच्या बरोबर तिथेच बाहेर थांबल्या. त्या म्हणाल्या, मी प्रिन्सिपॉल मॅडमशी बोलले आहे. त्या माझे काम करतील. नाही म्हणणार नाहीत.

शाळेचा तास संपला. प्रिन्सिपॉल मॅडम आल्या. आपल्या केबिनमध्ये त्यांनी मला बोलवले. मिस्टर शाळेच्या बाहेरच थांबले होते. मी परवेज आणि मेलविनची आई व आम्ही प्रिन्सिपॉल मनिषा मॅडमच्या समोर उभे होतो. मेलविनची आई म्हणाल्या “मॅडम या माझ्या मुलाच्या मराठी, हिंदीच्या शिक्षिका आहेत, खूप छान मराठी, हिंदी शिकवितात. त्यांच्या मुलाला आपल्या शाळेत प्रवेश हवा आहे.” प्रिन्सिपॉल मॅडमनी एकदा माझ्याकडे व परवेजकडे पाहिले, त्याचे प्रगतिपुस्तकही पाहिले, मार्क कमी बघून त्यांनी विचारले “त्याला दुसरीकडे शिकण्यासाठी का ठेवले ?” मी थोडेफार सांगताच त्या म्हणाल्या, मॅडम, “बच्चा माँ से अलग रहकर कैसे अच्छा पढ सकता है ?” माझ्या डोळ्यातील पाणी पहाताच त्या म्हणाल्या, “ठिक है, मै अॅडमिशन करा देती हूं, पर आपको एक काम करना पडेगा” मला वाटले त्या डोनेशनबद्दल बोलतील! पण त्या म्हणाल्या “हमारे स्कूल के आठवी, नववी, दसवी के बच्चों को आपको ग्रामर (व्याकरण) पढ़ना होगा ।” मी हसतच त्याचा स्विकार केला. त्यांनी शाळेची फी युनिफॉर्म चे पैसे भरण्यासाठी सांगितले.

मी आनंदाने आॅफीस बाहेर आले. मेलविनच्या आईचे धन्यवाद मानत बाहेर पडले. बाहेर मिस्टरांना सांगितले की प्रिन्सिपॉल मॅडमनी फी व युनिफॉर्मचे पैसे भरण्यास सांगितले आहे. काहीही डोनेशन न घेता आणि अजून अॅडमिशनचा फार्म ही भरला नाही मग फी भरायला कसे काय सांगितले ? नेहमीप्रमाणे त्यांनी शंका उपस्थित केली. विश्वास मिळविण्यासाठी नेहमी प्रमाणे आताही परीक्षा द्यावी लागणार होती. मी आॅफीस मध्ये जाऊन फी भरली त्याची रिसीट त्यांना दाखविली तेंव्हा त्यांचा विश्वास बसला.

येताना मी मात्र मनोमन मेलविन आणि त्याच्या आईचे खूप खूप आभार मानत होते. मेलविन आज बाहेर देशात स्थाईक झाला आहे. पण त्यांच्या उपकाराची जाणिव मला आजही आहे. आज ही ख्रिसमस आला की त्यांची आठवण येते. निस्वार्थ मदत करणारे लोक माझ्या जीवनात पावलो पावली आले जणू ही परमेश्वरची कृपाच ! .
मेलविनच्या आई त्या वेळी म्हणाल्या होत्या, “आपने मेरे दोनो बच्चों को इतना अच्छा मराठी, हिंदी पढ़ाया है, तो क्या मैं आपका इतना भी काम नहीं कर सकती ?”

— लेखन : फरझाना इकबाल.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी