रूप असे तव लोभसवाणे
पघळून जातो कणकण
प्रकाश देण्या तुला कवळण्या
हाजीर राणी तनमन
असे तीक्ष्ण तीर नको चालवू
घायाळ मी जायबंदी
एक जखम ना भरते तोवर
पापणी आड मी बंदी
मोजू पापण्या रेखीव सुंदर
की मी डुंबू दे नयनी
एक नजर ती मला छेदते
तुला गर्व तू सुनयनी
जळतो दिव्यासम संपवून मज
तेज तुझेच हे मोही
डोळ्याधल्या दोन ज्योतींच्या
प्रेमात पडतो मीही
त्या ओठांच्या धुंद पाकळ्या
कधी नशिबी येतील
मलाच त्यांच्यासवे प्रदेशी
सुधामृताच्या नेतील
रुळते बट ही चेहऱ्यावरती
हक्क सांगते आपुला
कपाळावरी ऐटीत लटकत
चुंबन घेई कपोला
सुंदर मोहक सरळ नासिका
चेहऱ्याची खुणगाठ
दो भुवयांच्या मधली टिकली
चांदणी शोभे त्यात
जागू न शकतो झोपू न शकतो
जगतो कसे की मरतो
आत तुझ्या तू डोकावून बघ
तुझ्या मनातच उरतो
एकदाच मज आपुला म्हणशील
तुझ्या प्रीत शब्दाने
त्या शब्दातच जगणे माझे
सार्थक शतजन्माने
रचना : डॉ.मंजूषा कुलकर्णी.