वटपोर्णिमा हा सौभाग्यवतींचा सण. अगदी सकाळपासूनच सर्व तयारी सुरू होते पण घरात जर एखादी पती गमावलेली महिला असेल तर तिच्या भावनांचा, तिच्या मनाचा विचार घरातला कोणीही करत नाही. खरं म्हणजे विधवा होणं हा काही त्या स्त्रीचा दोष नसतो. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला अंत आहेच. या उक्तीनुसार एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणारच आहे. तरीही पती जाण्याचं पूर्ण खापर त्याच्या पत्नीवर फोडलं जाते आणि विधवा म्हणून तिला समाजात अतिशय हिन वागणूक तिला दिली जाते. विधवा म्हणून तिला कुठलाच अधिकार नाही .
ही सर्व सामाजिक, पारंपरिक परिस्थिती विचारात घेऊन कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान तर्फे एकल महिलांनी अगदी सजून धजून येऊन वटवृक्षाची लागवड केली. हे वटवृक्ष वाढवण्याची जबाबदारी देखील या एकल महिलांवर देण्यात आली. हा उपक्रम श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
या अभिनव उपक्रमाबाबत बोलताना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती व जमिनीखाली गारवार राहण्यासाठी, वटवृक्षाच्या दाट सावली खाली प्रत्येकाने विसावा घ्यावा असे सर्व दृष्टिकोन समोर ठेवून प्रतिष्ठान तर्फे वटवृक्षाची लागवड करण्यात आली. झाडाच्या पूजेपेक्षाही हे झाड वाढवणे त्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. या पर्यावरणीय उद्देशाबरोबरच एकल महिलांचा एकटेपणा दूर होऊन, त्यांनाही स्वत्वाची जाणीव निर्माण होईल.”
याप्रसंगी माजी नगरसेविका वर्षाताई गंगुले, स्वाती मुळे, नंदिनी पाटील, योगिता देवडे, मीरा पवार, अर्चना जैन, जया कनगारे, स्मिता पोळ, देशमुख ताई आधी महिला उपस्थित होत्या.
खरं म्हणजे, उपरोक्त प्रतिष्ठान ने एकल महिलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमा सारखे इतरही काही उपक्रम ठिकठिकाणच्या महिला मंडळांनी, सामाजिक संस्थांनी हाती घेण्याची नितांत गरज आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800