११ डिसेंबर २०२०
सर,
माझ्यासमोर तुम्ही सर्वप्रथम आलात तेव्हा मला माहीत नव्हतं, त्या अज्ञात शक्तीनं तुम्हाला माझ्यासाठी पाठवलंय ते माझ्या आयुष्यात पुढे वाढून ठेवलेल्या अनंत अडचणींचं उत्तर म्हणून !
आयुष्यात अशी व्यक्ती भेटणं जी अडचणीत साथ देते हे नक्कीच गेल्या जन्मीचे ऋणानुबंध असावेत, अन्यथा तुमची आणि माझी भेट होण्याची सुतराम शक्यता नव्हती, तुमच्यात आणि माझ्यात कुठलीही सामायिक गोष्ट नसताना तुम्ही कसे काय माझ्या आयुष्याच्या वाटेवर godfather सारखे मला भेटू शकता ? आणि अनंत अडचणीतून तुम्ही कसे काय मला अलगद बाहेर काढू शकता ?
जिथे जिथे अडचणी होत्या तिथे तिथे वाटेवर मार्ग दाखवण्यास तुम्ही मदतीचा हात पुढे करून उभे होतात पथदर्शक म्हणून ! अगदी काव्यात्म भाषेत बोलायचं झालं तर जिथे जिथे अडचणी आल्या तिथे तिथे समोर आलात, विस्तीर्ण फांद्या पसरल्यात आणि झाड होऊन उभे राहिलात सावली देण्यासाठी !
झाड निरपेक्षपणे सावली देत असतं, तुमच्या कक्षाही तितक्याच विस्तीर्ण आहेत, त्या मोबदल्यात मी तुम्हाला काय देणार ?
आणि हे ही खरंच आहे की, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते.. आणि चांदणं पसरतं.
सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या रूपात बाहेर पडते.. पृथ्वीला प्रकाश देते तसंच पृथ्वीच्या वातावरणात, हवामानात बदल घडवते.
तुम्ही मला भेटलात ते काय, माझ्यात केवढा तरी बदल झाला, मला जगण्याची ऊर्जा मिळाली, अडचणींना सामोरं जाण्याचं बळ मिळालं, तुमच्या अदृश्य हातामुळेच जीवनसागरातील असंख्य अडचणींचे ओंडके मी पार करू शकले. माझ्याच मनात लपलेल्या अंधारातील खोल भावनेशी तुमच्यातील प्रकाशाचा स्पर्श झाला, तुमच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतूनच मग प्रत्येक शब्दाची कविता झाली.
तुमचे आभार… कसे, कधीं… आणि किती मानायचे…
जे मनातलं राहून गेलंय..
ते सगळं सगळं सांगायचंय…
असं मला कायमच वाटायचं…
पण हे सगळं मी तुम्हाला कधीच सांगू शकले नाही..
कारण व्यक्त केलं असतं..
तर ऋण मुक्त झाले असते..
एखाद्या व्यक्तीच्या ऋणात राहणं यातदेखील सुख असतं.
त्यात सुख विश्वासाचं..
निधान आनंदाचं..
आणि व्याप्ती आभाळाची असते.
नंदादीपाप्रमाणे मनाच्या गाभार्यात ती व्यक्ती कायमची तेवत राहते.
आणि ऋणात राहण्याचं सुख वाटावं हेच तर रुजलेल्या नात्याचं यश असतं.
आणि तुम्हीच तर म्हणत असता…
आभाळाचं देणं..
असं काही….
आज उद्यात फिटत नसतं..
आणि तुमचं चांदणं तर शरदाचं..
पावसाचा थेंब पानावर पडला तर दवबिंदू , स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला तर मोती अन्यथा तो केवळ पाण्याचा थेंब.
माझ्या डोळ्यातील अश्रू शिंपल्यात ओघळला म्हणून प्रत्येक अश्रूचा मोती झाला.
तुम्ही माझ्यासमोर सावली सारखे आलात…
माझ्या अश्रूंचे चांदणमोती आभाळभर पसरले…
आणि असंख्य अडचणीतून मार्ग शोधत माझा लखलखाट मात्र सुरूच राहिला.
असे आधारवड प्रत्येकाला आयुष्यात जरूर भेटावेत, वेळ येते तेव्हाच मदतीचा हात पुढे येतो, तिथेच आपले हात जोडले जातात आणि तेच हात खाली झुकून चरणस्पर्श करतात.
—- वैजयंती

– लेखन : वैजयंती आपटे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
न पाठवलेलं पत्र..वैजयंती ताई खूप सुंदर लिहीलं आहे.अगदी भावपूर्ण.
खूपच छान!!! खरंच असं एखादे व्यक्तिमत्त्व असते की, त्याच्या अस्तित्वाने आपल्याला खूप ऊर्जा मिळते आणि उर्मी वाढते. मस्त लिहिले आहेस.
धन्यवाद
🌹खूपच छान, अनाहुत पणे एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येऊन आयुष्य बदलू शकते.
हे सत्य आहे.
छान लिहिले आहे.
“एक नं पाठवले पत्र ”
धन्यवाद 🌹
वैजयंती आपटे
🌹🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
धन्यवाद राधिका ताई
हे सत्यकथन आहे
हे सत्यकथन आहे