दुर्दम्य आशावाद जागविणारे, “आम्ही अधिकारी झालो”
राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनात लोकार्पण झालेल्या, श्री देवेंद्र भुजबळ लिखित “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे नुकतेच जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये प्रकाशन झाले.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला भुजबळ पतीपत्नीसह एम टी एन एल च्या निवृत्त व्यवस्थापक, सौ पौर्णिमा शेंडे, खन्ना ट्रॅव्हल्सचे संपूर्ण कुटुंब व लेखकावर निस्सीम प्रेम करणारी अनेक मान्यवर मंडळी हजर होती. एखाद्या पुस्तकाचे अशा प्रकारे प्रकाशन झालेले मी पहिल्यांदाच ऐकले. आजकाल आपल्या जीवनातील महत्वाचे क्षण असे हटके साजरे करण्याची कल्पना खूप सुखावह आहे.
श्री देवेंद्र भुजबळ यांना न ओळखणारी व्यक्ती महाराष्ट्रात तरी विरळच! ते मुळ विदर्भातले असले, तरी त्यांच्या कर्तृत्वाने न्यूज स्टोरी टुडे च्या माध्यमातून देश विदेशातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
या पुस्तकाविषयी लिहिण्याआधी लेखकाबद्दल चार शब्द लिहिण्याचा मोह मी आवरू शकत नाही. लहानपणीच पितृछत्र हरविले, आर्थिक स्थिती नाजूक. परंतु दुर्दम्य आत्मविश्वास, जिद्द, कुछ कर दिखायेंगे ही वृत्ती असल्याने हलकी सलकी कामे करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रा ल ना गोखले ही पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेची शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिलेच विद्यार्थी ठरले. पुढे पत्रकार, दूरदर्शन निर्माता म्हणून काम केले.
मंत्रालयात माहिती संचालक पदावर काम करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे, आता त्यांचे न्यूज स्टोरी टुडे ९० देशात पोहचले ते उगीच नाही. अगदी तळागाळातली व्यक्ती देखील मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर किती प्रगती करू शकते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे या पुस्तकाचे लेखक श्री देवेंद्र भुजबळ होत.
उच्च पद मिळविण्यासाठी कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते हे त्यांना स्वानुभवातून चांगले माहीत असल्यानेच पुढील पिढीसाठी आदर्श असणारे हे पुस्तक देवेंद्रजीनी लिहिले आहे,
या पुस्तकात एकंदर ३५ प्रकरणे आहेत. ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या ध्येयवेडयांनी सोसलेल्या हालअपेष्टांच्या कथा यात आहेत. मुखपृष्ठ अतिशय बोलके आहे. ते पाहूनच लक्ष्यात येते की या सर्व कथा नायक, नायिकांनी आत्मविश्वासाने हे यश मिळविलेले आहे.
पुस्तकाच्या सुरवातीला अगदी थोडक्यात पण उद्दिष्ट स्पष्ट होणारे लेखकाचे मनोगत असून लेखांच्या शेवटी लेखकाचा परिचय व त्यांनी प्रकाशित व संपादित केलेल्या पुस्तकांची नावे आहेत. अगदी शेवटच्या पानावर सुरेश भटांची आशयघन रचना.. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही ही गझल पुस्तकाविषयी बरेच काही सांगून जाते.
पुस्तक वाचताना प्रकर्षाने हे जाणवले की ध्येय प्राप्तीसाठी झगडणारे फक्त पुरुषच नाहीत तर स्त्री शक्तीचेही दर्शन यात होते. स्वतंत्र भारतातील स्वतंत्र विचार करू शकणारी स्त्री गगनाला गवसणी घालू शकते. मनात आणलं तर ध्येय प्राप्ती करू शकते. असंभव हा शब्द तिच्या शब्दकोशातच नाही, इतकी पात्रता तिच्यात आहे हे लेखकाने दाखविले आहे.
ह्या पुस्तकात पहिलाच लेख पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्यावर लिहिला आहे. एक दिलदार व्यक्तीच हे करू शकते याबद्दल लेखकाचे अभिनंदन ! दुर्दैवाने नीलाताई आज या जगात नाहीत. असो.
गरीब, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात कर्तृत्वाची यशपताका उंच फडकविणाऱ्या या ध्येयवेड्या व्यक्तींचे हे जीवनचरित्र एकदा तरी सगळ्यांनी वाचावे. त्यातून बोध घ्यावा असे वाटते !, “हे पुस्तक वाचतांना खुदी को कर इतना बुलंद कि, खुदा बंदेसे पुछे,– बता ‘तेरी रजा क्या है” याची सत्यता पटते. प्रत्येकाची संघर्ष कहाणी वेगळी. व्यथा वेगळ्या. ध्येय मात्र एकच ! जिंकू किंवा मरू या भावनेने केलेली वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे.
या ध्येय वेड्यांमध्ये स्वतः लेखकही आहेत. तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर श्रीकांतजी, कौटुंबिक समस्येवर मात करीत आय ए एस झालेली अमरावती जिल्ह्यातील भाग्यश्री बानायत, मोलमजुरी व भाजी विकण्याचा धंदा करणाऱ्या गरीब बापाची बंजारा समाजाची, यु पी एस सी परीक्षेत ४९२ व्या क्रमांकावर येणारी स्वाती राठोड, आदिवासी समाजाचा नंदुरबार जिल्ह्यातील डॉ राजेंद्र भारुड, ह्यांची आई तर मजुरीत भागत नाही म्हणून दारू विकत असे. अमरावतीच्या बिच्छू टेकडी परिसरात राहणारी पल्लवी चिंचखेडे ,अमरावतीचीच व साईनगर भागातली गरीब वस्तीत राहणारी प्राजक्ता बारसे, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तेजस्वी सातपुते ची यशोगाथा तिचे नाव सार्थ करणारी, माळकरी वडिलांचा धडपड्या मुलगा, आय पी एस शुभम आणि कँटीन बॉय ते मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी पर्यंत प्रगतीचा टप्पा गाठणारे बंजारा समाजाचे राजाराम जाधव, गुणवंत पशु वैद्यक पुरस्कार मिळविणारे डॉ चंद्रकांत हलगे, दृष्टिहीन असून स्टेट बँक ऑफ इंडियात अधिकारी झालेली सुजाता कोंडीकिरे, भिकारी ते अधिकारी पर्यंतचा प्रवास करणारे सुरेश गोपाळे यांना सुमन कल्याणपुरकर यांचे “एक एक पाऊल उचली” हे गाणे ऐकून जगण्याचे बळ मिळाले. किती नावे सांगावी ? सगळ्यांची ओळख करून देणारा हा असा सुगंधी पुष्पगुच्छ ! सुंदरसा रत्नहार. कोणत्या रत्नांची मी तारीफ करू ? त्यापेक्षा आपण सुज्ञ लोकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. कारण प्रत्येकाबद्दल लिहीन म्हटलं तर— —
नितांत सुंदर प्रेरणादायी असे हे पुस्तक तरुणांनी, विद्यार्थ्यानी व पालकांनीसुद्धा वाचलेच पाहिजे असा मी वारंवार आग्रह करीन.
पुस्तक प्रकाशित झाल्यापासून अल्पावधीतच पुस्तकाच्या पहिल्या आवृत्ती च्या ५०० प्रति ताबडतोब संपल्या सुद्धा ! हेच लेखकाचे सुयश आहे. इतके सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन !
चला तर वाट कशाची बघता ? “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक नक्की वाचा.
— परीक्षण : प्रतिभा पिटके. अमरावती
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००